::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/06/2018 )
माननिय सदस्या श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज आणि उभय पक्षाचा युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मंच खालील निर्णय पारित करीत आहे.
2) तक्रारकर्ता यांची तक्रार व युक्तिवाद थोडक्यात असा की, तक्रारकर्ता हे विजेचे वापरकर्ता असून त्यांचा दरमाह विज वापर हा अत्यल्प म्हणजे 30 ते 40 युनीट एवढा आहे. शेवटचा विज देयकांचा भरणा तक्रारकर्ता यांनी 25/07/2016 रोजी केला. तक्रारकर्त्याला जुलै-2016 चे देयक मिळाले नाही. त्यानंतर 12/09/2016 रोजी जे देयक मिळाले, त्यावर जुलै-2016 मधील 1690 युनीट असे नमुद केले आहे. शिवाय ऑगष्ट 2016 चे देयकामध्ये थकबाकी जोडण्यात आली असून ते 24,200/- रुपयाचे आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला देयक सुधारुन देण्याची मागणी केली असता, विरुध्द पक्षाच्या अधिका-यांनी तक्रारकर्त्याच्या घरातील उपकरणांची पाहणी व तपासणी केली व तक्रारकर्त्याला तपासणी अहवाल दिला. परंतु वारंवार विनंती करुनही विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला गैरवाजवी देयक रद्द करुन, सुधारीत देयक दिले नाही. म्हणून तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, ती प्रार्थनेनुसार मंजूर करावी, ही मंचाला विनंती केली आहे.
3) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब थोडक्यात असा की, तक्रारकर्त्याला वरील प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही, कोणाच्याही तर्फे तक्रार दाखल करता येत नाही. जुलै 2016 मध्ये 1690 युनिटचा वापर झाला, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याला देयक देण्यात आले. तक्रारकर्त्याने दिनांक 25/07/2016 पासुन एक रुपयाही रक्कम देयकापोटी भरली नाही. तक्रारकर्त्याला ऑक्टोंबर 2016 चे देयकामध्ये रुपये 7,454.02 पैसेची वजावट देण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर 2016 चे देयकामध्ये परत रुपये 6,908.28 पैसेची वजावट देण्यात आली. नेट बील रुपये 18,558.81 पैसे असे झाले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घरातील उपकरणांची पाहणी केली, हा रेकॉर्डचा भाग आहे. विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याच्या घरात चालु असलेले मीटर तक्रारकर्त्याच्या खर्चाने तपासून देण्यास तयार आहे. मीटर नादुरुस्त असल्याबाबतची कोणतीही तक्रार नाही. विज वापरल्याशिवाय मीटर युनिटचा वापर दाखवत नाही. त्यामुळे तक्रार क्षतीपुर्तीसह खारिज करावी.
4) अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर, तसेच तक्रारकर्ता आणि विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले दस्तऐवज यांचे काळजीपूर्वक अवलोकन करता, मंचापुढे पहिला प्रश्न हा आहे की, तक्रारकर्ता हा ग्राहक होतो किंवा नाही. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन हे स्पष्ट होते की, मीटर हे आनंद विश्वास राजुसकर यांचे नांवाने आहे तसेच सर्वर विज देयके ही पण आनंद राजुसकर यांच्या नांवाची आहेत. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता नामदेव वानखेडे हे कशाप्रकारे ग्राहक होतात ? याबद्दल ऊहापोह करणारा कोणताही दस्तऐवज तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला नव्हता परंतु विरुध्द पक्ष यांनी या मुद्दयावर जेंव्हा आक्षेप घेतला तेंव्हा तक्रारकर्ता यांनी मंचासमोर अधिकारपत्र दाखल केले. परंतु हे अधिकारपत्रही कायद्याच्या तरतुदीनुसार वैध नाही. तसेच त्यातील मजकूरावरुन हे स्पष्ट होत नाही की, कोणत्या अधिकारान्वये तक्रारकर्ता हा विजेचा वापरकर्ता होतो आणि त्याला तक्रार दाखल करण्याची Locus Standi आहे किंवा नाही. त्यामुळे मंच या निर्णयाप्रत आले आहे की, तक्रारकर्ता हा ग्राहक होत नाही. त्यामुळे मंच इतर मुद्दयांना हात न घालता, तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करत आहे व खालील अंतिम निर्णय पारित करत आहे.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करण्यांत येत आहे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती शिल्पा एस. डोल्हारकर) (सौ. एस.एम.उंटवाले)
सदस्या. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri