::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/09/2017 )
मा. सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द मंचाने विना लेखी जबाबाचा आदेश दिनांक 09/05/2017 रोजी पारित केल्याने फक्त तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व दस्त यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने खालीलप्रमाणे निष्कर्ष काढला, तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडून घरगुती वापराकरिता विज पुरवठा घेतलेला आहे व त्याचा विज ग्राहक क्र. 326017707291 असा आहे, व त्याचे विद्युत देयक मंचात दाखल केले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होते.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याचा विज वापर हा अत्यंत काटकसरीचा आहे व विरुध्द पक्षाने दिलेल्या विद्युत देयकाचा वेळोवेळी नियमीत भरणा केलेला आहे. सरासरी प्रत्येक महिन्याला 70 ते 80 युनिटचे विद्युत देयक आलेले आहे. परंतु मागील काही वर्षापासुन विरुध्द पक्षातर्फे कुणिही मिटर वाचन घेण्याकरिता आले नाही. त्यामुळे मिटर वाचन न करता गैरवाजवी युनिटचे विज देयक देण्यात आले आहे, जसे की, ऑक्टोंबर- 2015 = 372 युनिट, नोव्हेंबर - 2015 = 568 युनिट, डिसेंबर 2015 ते फेब्रुवारी 2016 = प्रत्येकी 142 युनिट, एप्रिल 2016 = 817 युनिट, जुलै 2016 = 6320 युनिट, ऑगष्ट 2016 = 1292, सप्टेंबर 2016 = 858 युनिटचे देयक देण्यात आले. बरेच वेळा गैरवाजवी देयकांची तक्रार करुन, सुधारीत देयकांची व मिटर तपासणी करुन ते दोषयुक्त असल्यास तात्काळ नविन बदलुन देण्याची प्रत्यक्ष कार्यालयात जावून, भेट घेवून मागणी केली, परंतु विरुध्द पक्षाकडून फक्त आश्वासने देण्यात आली. जुलै 2016 चे देयकात तात्पुरती अतांत्रिक दुरुस्ती करुन रुपये 72,400 तसेच ऑगष्ट 2016 चे 96,480 व सप्टेंबर 2016 चे 1,22,670 असे विज देयक देण्यात आले. कुठल्याही प्रकारची थकबाकी नसतांना एवढी मोठी विज देयकाची रक्कम गैरपणे लादणे न्यायोचित नाही. त्यामुळे वरील दिलेले विज देयक मान्य नाहीत. त्यामुळे नाईलाजाने सदर प्रकरण ग्राहक मंचामध्ये दाखल करावे लागले.
तक्रारकर्ते यांच्या कथनाला विरुध्द पक्षाकडून कोणतेही नकारार्थी कथन रेकॉर्डवर उपलब्ध नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त जसे की, जुलै 2016 व ऑगष्ट 2016 चे विज देयक यामध्ये विरुध्द पक्षाने हाताने दुरुस्ती करुन दिली आहे मात्र ही कती अयोग्य आहे, असे मंचाचे मत आहे. सप्टेंबर 2016 च्या देयकात हाताने दुरुस्त केलेली रक्कम समायोजित केलेली दिसत नाही. तक्रारकर्ते यांचा दरमाह सरासरी विज वापर 80 युनिट एवढा आहे, या तक्रारकर्त्याच्या कथनाला, नकारार्थी पुरावा विरुध्द पक्षाकडून मंचाला प्राप्त न झाल्याने, तक्रारकर्त्याचा युक्तिवाद मंचाने ग्राहय धरला आहे. तक्रारकर्ते यांचा अंतरिम अर्ज मंचाने मंजूर केला होता.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दोषमुक्त मीटर तक्रारकर्त्याकडे लावावे व तक्रारकर्त्याचे ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीतील विद्युत देयके दुरुस्त करुन ती दरमहा सरासरी 80 युनिट प्रमाणे आकारावी, व तक्रारकर्ते यांनी जमा केलेली रक्कम, विरुध्द पक्षाने समायोजीत करावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या वा वेगवेगळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी, सदर प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रक्कम रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) द्यावी.
4. विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri