जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ४९/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०३/०३/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/०८/२०१३
श्री.गुलाब दगडू लोहार ----- तक्रारदार.
उ.व , धंदा - शेती.
राहणार- मु.पो.रामी,
ता.शिंदखेडा,जि.धुळे.
विरुध्द
महा.राज्य विजवितरण कंपनी मर्या ----- सामनेवाले.
म.कार्यकारी अभियंता सोा,
महा.राज्य विज वितरण कं.मर्या
शिंदखेडा,दोंडाईचा,
ता.शिंदखेडा,जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.के.आर.लोहार)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.एन.पी.अयाचित)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सदोष सेवेमुळे नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांची स्वत:च्या मालकी हक्क व कब्जे उपभोगात सि.स.नं.७४/२ प्रमाणे क्षेत्रफळ १ हे.२१ आर प्रमाणे शेतजमीन आहे. तक्रारदारांनी त्यांच्या परिवाराच्या उपजिविकेसाठी सदर शेतजमिनीवर शेत पंपासाठी विजपुरवठा जोडणीसाठी सामनेवाले यांचेकडे विज जोडणी होण्यासाठी एस.डी.ए. योजने अंतर्गत अर्ज केला असून, त्यासाठी दि.१०-०५-२०११ ला रितसर डिमांम पोटी रक्कम रु.१०,१००/- भरलेले आहेत. असे असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदाराला विजजोडणी दिली नाही. म्हणून तक्रारदाराने लोकायुक्तांकडे दि.१५-१२-२०११ रोजी तक्रार केली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सामनेवाले यांनी दि.१६-०१-२०१२ रोजी आर्थिंग जोडणी न करता जोडणी केली आहे. सामनेवाले यांनी दिलेल्या वागणुकीमुळे तक्रारदाराला या शेतजमिनीत नियोजीत ज्वारी, गहू, रब्बी व खरीप पिके घेता आलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे रक्कम रु.२,००,०००/- चे नुकसान झाले असून त्यास सामनेवाले जबाबदार आहेत. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. सबब तक्रारदाराची विनंती अशी आहे की, शेती उत्पन्नाचे नुकसानीपोटी रक्कम रु.२,००,०००/ व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.२५,०००/- तसेच अर्जाचा खर्च मिळावा.
(३) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी जबाब देऊन सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी यापुर्वी याच प्रकारची तक्रार म.लोक आयुक्त मुंबई यांच्याकडे केलेली आहे. त्यामध्ये यापुर्वीच त्यांना न्याय दिलेला आहे. त्यामुळे सदर तक्रार अर्जास आता काही एक कारण राहिलेले नाही. तक्रारदार यांनी डिमांड नोट भरल्यानंतर शेतक-यांच्या शेतात वीज पुरवठा करण्याकामी पोलची व विद्युत तारांची आवश्यकता असते. त्याची उभारणी ही ठेकेदारांकडून करुन घ्यावयाची असते. तक्रारदाराने डिमांड नोट भरल्यानंतर सदर पोलची उभारणी केली होती. परंतु त्या बाबत तक्रारदार यांनी, उभारलेले पोल हे बेकायदेशीर आहेत अशा अनेक तक्रारी केल्या. तक्रारदारांनी दि.२६-०९-२०११ रोजी म.लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. त्याची सुनावणी दि.१५-१२-२०११ रोजी होऊन त्यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे एक महिन्याचे आत तक्रारदारास वीज जोडणी करुन दिली आहे. त्यामुळे सदर वीज जोडणी आर्थिंग जोडणी न करता केली हे तक्रारदारांचे म्हणणे खोटे असून, तक्रारदार हे विनाकारण भांडण करुन सामनेवालेंवर दबाव आणत आहेत. सबब सामनेवाले हे तक्रारदारांच्या कोणत्याही नुकसानीस जबाबदार नाहीत. त्यामुळे सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
(४) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र नि.नं.३ वर, कागदपत्र नि.नं.५/१ ते ५/७ वर, सामनेवालेंचा जबाब नि.नं.११ वर, लेखी युक्तिवाद नि.नं.१२ वर पाहता तसेच तक्रारदार व सामनेवाले यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले विद्युत कंपनीकडे दि.१०-०५-२०११ रोजी शेत जमिनीवरील शेत पंपावर वीज जोडणी करणेकामी डिमांड नोट मार्फत रक्कम रु.१०,१००/- भरले आहेत. त्याची पावती नि.नं.५/१ वर दाखल आहे. सदर पावती बाबत उभयपक्षात वाद नाही. सदर डिमांड नोटचा विचार करता तक्रारदार हे या सामनेवालेंचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सदरचे काम हे सामनेवाले यांनी ठेकेदारांना दिलेले असून ते योग्य नसल्याबाबत, तक्रारदार यांनी दि.१३-०६-२०११ रोजी दोंडाईचा कार्यालयात तक्रार अर्ज दिला व दि.२६-०९-२०११ रोजी म.लोक आयुक्त यांच्याकडे सदर विद्युत जोडणीसाठी रोवलेले खांबाबाबत तक्रार केली आहे. या अर्जावर सुनावणीकामी नोटिस तक्रारदार यांना दिलेली असून, सदर नोटिस दि.२२-११-२०११ रोजीची नि.नं.५/२ वर दाखल आहे. या अर्जावर सुनावणी होऊन, वीज जोडणीचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी म.आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे एक महिन्याचे आत तक्रारदारास वीज जोडणी करुन दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी म.मुंबई कार्यालय यांच्याकडे दि.१५-१२-२०११ रोजी पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्र नि.नं.५/३ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे तक्रारदार यांना जो न्याय मिळाला आहे तो समाधानकारक व योग्य असल्याचे तक्रारदार यांनी मान्य केले आहे. परंतु सदर अर्जामध्ये त्यांनी नुकसान भरपाई वसुल करण्याची मागणी केलेली दिसत आहे.
वरील सर्व कागदपत्र पाहता असे दिसते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे व म.लोक आयुक्त यांच्या निर्णयाप्रमाणे तक्रारदारास वीज जोडणीचे काम पूर्ण करुन दिले आहे हे स्पष्ट होत आहे.
(७) तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्जात आर्थिंग जोडणी न करता वीज जोडणी केली आहे या बाबतची तक्रार केली आहे. सामनेवाले यांनी वीज जोडणी केली हे तक्रारदारांनी मान्य केले आहे, परंतु त्यास आर्थिंग लावलेले नाही असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सदर अर्जात दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे व म.लोक आयुक्तांचे निर्णयाप्रमाणे आर्थिंग जोडणी करुन वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही हे स्पष्ट होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर शेतामध्ये पीक घेता न आल्यामुळे रु.२,००,०००/- च्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु या बाबत सामनेवाले यांना वीज जोडणी करण्याबाबत जो विलंब झालेला आहे त्यास तक्रारदाराने सामनेवालेंच्या कार्यालयात जे तक्रारी अर्ज केलेले होते, ही बाब कारणीभूत आहे. कारण सदर तक्रार अर्जांवर निर्णय होऊन आलेल्या आदेशानंतर सामनेवाले यांनी आदेश दिनांका पासून एक महिन्याचे आत वीज जोडणी करुन दिलेली आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, सामनेवालेंच्या सेवेत कमतरता नाही, सदर झालेला विलंब हा तक्रारदारांमुळे झालेला आहे. त्यामुळे सदर नुकसानीस सामनेवाले हे जबाबदार होऊ शकत नाहीत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(८) वरील सर्व कारणांचा विचार करता, तक्रारदार यांनी अर्जामध्ये केवळ सामनेवाले यांनी आर्थिंग जोडणी न करता वीज जोडणी केली असे मोघम कारण नमूद करुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदर अर्ज केलेला दिसत आहे. ही बाब निश्चितच योग्य व रास्त नाही. सामनेवाले यांनी मे.लोक आयुक्त यांच्या निर्णयानंतर लागलीच एक महिन्याचे आत तक्रारदारास वीज जोडणी करुन दिलेली आहे व तक्रारदाराने ते मान्य केले आहे. याचा विचार करता सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार रद्द करणे योग्य होईल या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
(९) वरील सर्व बाबीचा विचार होता, व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २३/०८/२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)