जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ६५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०४/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१३
सौ.प्रतिभा विजय महाजन
उ.व.३५ धंदा – शेती
रा.सावळदे, ता.शिरपूर जि.धुळे. --------------- तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,
नोटीसीची बजावणी – सहाय्यक अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी, शिरपूर
ता.शिरपूर जि. धुळे. ------------ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी. जोशी/ वकील श्री.एस.एन.राजपूत)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.एस.एम. शिंपी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
तक्रारदार यांच्या शेतात लावलेला ऊस सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे जळाला. त्यापोटी नुकसान भरपाई मिळावी यासाठी तक्रारदार यांनी कलम १२ अन्वये सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांची मौजे सावळदे, ता.शिरपूर येथे गट क्रमांक ३८/२/१, क्षेत्रफळ हे.१.९० आर, आकार रूपये १८.१० ही शेतजमीन आहे. या जमिनीत ट्यूब वेल असून, त्यासाठी सामनेवालेंकडून वीजपुरवठा घेतला आहे. तक्रारदार यांनी सन २०११-१२ या कृषी हंगामात हे.०.६० आर एवढया शेतजमिनीत ऊसाची लागवड केली होती. दि.२९/१०/२०११ रोजी तक्रारदार यांच्या शेतात अचानक शॉर्ट सर्कीट झाले. त्यात संपूर्ण ऊस जळून खाक झाला. सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. शेतात लोंबकळणा-या वीज तारांची त्यांनी देखभाल केली नाही, त्यामुळे शॉर्ट सर्कीट होवून आग लागली असे तक्ररदाराचे म्हणणे आहे. या घटनेत रू.१,०५,०००/- चे नुकसान झाले असून ती रक्कम सामनेवालेंकडून मिळावी. त्यावर दि.२९/१०/२०११ पासून १३ टक्के प्रमाणे व्याज मिळावे, शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रू.२५०००/- व तक्रारीचा खर्च सामनेवालेंकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
२. सामनेवाले यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदाराची तक्रार अमान्य केली आहे. तक्रारदार यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या विनंती कलमातील मजकूर खरा नाही. उलट दि.१४/०६/२००४ पासून त्यांनी वीजपुरवठा घेतला आहे. त्याच्या वीज बिलाची कोणतीही रक्कम बिल देवूनही त्यांनी आजपर्यंत भरलेली नाही. तक्रारदार हे विजेचा बेकायदेशीर वापर करीत आहेत. शासनाने व वीज कंपनीने सन २०११ मध्ये कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती. ज्याचा लाभ तक्रारदाराने घेतलेला नाही किंवा त्यांनी वीज बिलही भरलेले नाही. तक्रारदार यांच्याकडे थकीत वीज बिलापोटी दि.२९/१०/२०१२ पर्यंत रू.१९,५२०/- एवढी थकीत रक्कम निघते. त्यामुळे त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार पोहोचत नाही. असे सामनेवाले यांनी खुलाशात म्हटले आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्राच्या पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, शेतीचा सातबारा, तलाठ्यासमोरील जबाब, तलाठीने तहसीलदारांना दि.०२/११/२०११ रोजी पाठविलेले पत्र, दि.३१/१०/२०११ रोजीचा पंचनामा, सामनेवाले यांना दि.०२/१२/२०१२ रोजी पाठविलेली नोटीस, पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तर सामनेवाले यांनी आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ सहाय्यक अभियंता दुर्गेश दयाराम साळुंखे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तक्रारदाराच्या वकीलांनी तोंडी युक्तिवादही केला. सामनेवालेंच्या वकीलांनी युक्तिवाद केला नाही.
४. दोन्ही बाजूंकडील दाखल असलेली कागदपत्रे व तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्याय मंचासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
ब. सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार
यांचे नुकसान झाले आहे का ? होय
क. तक्रारदार अनुतोषास पात्र आहेत का ? होय
ड. आदेशकाय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
५. मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी शेतातील ट्यूब वेलसाठी सामनेवाले यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. ही बाब सामनेवाले यांनीही नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत, हे निश्चित होते. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही ‘होय’ देत आहोत.
६. मुद्दा ‘ब’- सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या शेतात दिलेल्या वीजपुरवठयाच्या विद्युत तारांना वेष्टण् नाही. त्यांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच शॉर्ट सर्कीट होवून शेतात आग लागली आणि ८० हजार रूपयांचा ऊस जळून खाक झाला, असे तक्रदाराचे म्हणणे आहे. हे म्हणणे सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात नाकारले आहे. आगीची घटना अन्य दुस-या कोणत्याही कारणामुळे होवू शकते. ती सामनेवाला यांच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेली नाही असे त्यांनी खुलाशात म्हटले आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी तज्ज्ञांचा कोणताही अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तलाठयाने त्यांचा घेतलेला जबाब, तलाठयाने केलेला पंचानामा दाखल केला आहे. त्यातही तक्रारदार यांच्या शेतातील ऊस शॉर्ट सर्कीटमुळे जळाला असे स्पष्ट नमूद केले आहे. म्हणूनच मुद्दा क्र. ‘ब’ चे उत्तर आम्ही ‘होय’ देत आहोत.
७. मुद्दा ‘क’- सामनेवाले यांनी आपल्या विद्युत तारांबाबत काळजी घेणे आवश्यक होते, असे न्याय मंचाला वाटते. अशी काळजी घेतली गेली असती आणि वीज तारांवर सुरक्षिततेचे वेष्टण चढवले असते तर कदाचित शॉर्ट सर्कीट टळू शकले असते. याच कारणामुळे तक्रारदार सामनेवाले यांच्याकडून अनुतोषास पात्र आहेत, असे न्याय मंचाचे मत बनले आहे. म्हणूनच मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही ‘होकारार्थी’ देत आहोत.
८. मुद्दा ‘ड’- सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात तक्रारदार यांच्याकडील थकीत वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण सदरच्या तक्रारीचा तो मुद्दाच नाही. त्यामुळे येथे त्याचा विचार करता येणार नाही. शॉर्ट सर्कीटमुळे नव्हे तर अन्य कारणांमुळे आग लागली असावी, असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. पण त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. त्यामुळेच तक्रारदार यांची तक्रार योग्य असल्याचे न्याय मंचाला वाटते. तक्रारदार यांनी तलाठ्याने केलेल्या पंचनाम्याची प्रत दाखल केली आहे. त्यावर सरपंचासह पंचाच्या सह्या आहेत. या पंचनाम्यात ऊसाच्या नुकसानीची रक्कम रू.८०,०००/- दाखविली आहे. त्यामुळे तेवढी भरपाई तक्रारदाराला मिळणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत बनले आहे.
वरील सर्व विवेचन आणि मुद्यांच्या आधारे न्याय मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना, निकालाच्या ३० दिवसांच्या आत,
अ. ऊसाच्या नुकसानीपोटी रू.८०,०००/- (रूपये ऐंशी हजार मात्र) भरपाई द्यावी.
ब. मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी रूपये १०००/- (रूपये एक हजार मात्र) आणि तक्रारीचा खर्च रूपये ५००/- (रूपये पाचशे मात्र) द्यावा.
क. वरील रकमेवर दि.२६/०४/२०१२ पासून संपूर्ण रक्कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
धुळे.
दि.३०/१०/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.