जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे. मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी --------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३७/२०१२ तक्रार दाखल दिनांक – २७/०२/२०१२ तक्रार निकाली दिनांक – १४/०३/२०१४ श्रवणकुमार परसराम चैनानी ----- तक्रारदार. उ.व.४२, धंदा- व्यवसाय रा.सिंधी कॉलनी,दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे विरुध्द महा राज्य विज वितरण कंपनी मर्या. ----- सामनेवाले. तर्फे सहाय्य अभियंता, दोंडाईचा विभाग, दोंडाईचा,ता.शिंदखेडा,जि.धुळे. न्यायासन (मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी) (मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी) उपस्थिती (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एम.बी.रुपचंदाणी) (सामनेवाले तर्फे – वकील श्री.एन.पी.अयाचित) ---------------------------------------------- निकालपत्र (द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी) ---------------------------------------------- (१) सामनेवाले यांनी तक्रारदाराचे देयकांत केलेली चुकीची व बेकायदेशीर सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम कमी करुन, दुरुस्त वीज देयक मिळावे तसेच नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अनवये या मंचात दाखल केला आहे. (२) तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदारांच्या वडिलांनी सामनेवाले यांचेकडून वीज ग्राहक क्र.०९६५१०८०३७९२ अन्वये वीज जोडणी घेतली आहे. तक्रारदारांच्या वडिलांच्या निधनानंतर सदर वीज जोडणीचा उपभोग तक्रारदार स्वत: घेत आहेत. सामनेवाले यांचे व्यावसायिक परिपत्रक क्र.५७ दि.०७-०७-२००७ अन्वये अनामत रक्कम घेण्याचे निर्देश आहेत. त्याअन्वये वर्षातून एकदा अनामत रक्कम घ्यावयाचा सामनेवालेंना हक्क आहे. तथापि, सन २००८-२००९ चे दरम्यान सामनेवाले यांनी एकूण सात वेळा अनामत रकमेची आकारणी करणारी देयक तक्रारदारास दिली आहेत व गैरवाजवी रकमेची मागणी करीत आहेत. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत कसूर केला आहे. म्हणून सामनेवालेंनी देयकातील चुकीची सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम कमी करुन दुरुस्त वीज देयक मिळावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.१०,०००/- आणि अर्जाचा खर्च रु.५,०००/- सामनेवालेंकडून मिळावेत अशी तक्रारदाराने शेवटी विनंती केली आहे. (३) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.नं.३ वर शपथपत्र आणि नि.नं.५ वरील वर्णन यादीप्रमाणे एकूण सात कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. (४) सामनेवाले यांनी त्यांची कैफियत दाखल केली असून, त्यात त्यांनी तक्रारदारांची सदर तक्रार खोटी व रद्द होण्यास पात्र असल्याचे नमूद केले आहे. त्यांचे पुढे असेही कथन आहे की, तक्रारदार हा स्वत: वीज ग्राहक नाही. तक्रारदाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही, तक्रार मुदतीत दाखल केलेली नाही. सामनेवाले यांनी नियमानुसार सुरक्षा ठेवीची मागणी केली आहे. तक्रारदाराने सुरक्षा ठेव भरलेली नाही. तक्रारदाराच्या मागणीवरुन त्याचे बिल कमी करुन देण्यात आले आहे. तसेच नियमानुसार केलेली मागणी ही योग्य व न्याय्य आहे. तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. सबब तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी सामनेवालेंनी शेवटी विनंती केली आहे. (५) सामनेवालेंनी त्यांच्या कैफियतीचे पुष्टयर्थ लेखी युक्तिवाद व इलेक्ट्रीसीटी अॅक्ट २००३ मधील पान नं.३५ वरील विवेचन दाखल केले आहे. (६) तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले यांची कैफियत व दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांचा लेखी युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत. मुद्देः | निष्कर्षः | (अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय | (ब) तक्रारदार हे त्यांचे वीज बिलातील सुरक्षा अनामत रक्कम दुरुस्त करुन मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय | (क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन (७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांच्या वडिलांनी सामनेवाले यांच्याकडून वीज कनेक्शन घेतले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तक्रारदार हे त्या वीज कनेक्शनचा वापर करीत आहेत. तक्रारदार हे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कायदेशीर वारस आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ब) (५) नुसार तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” ठरतात. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – जून २००८ ते डिसेंबर २००८ या कालावधीत आपल्याकडे सात वेळा सामनेवाले यांनी सुरक्षा अनामत रकमेची मागणी केली असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. जून २००८ च्या देयकात त्यांच्याकडे रु.१,०००/-, जुलै २००८ मध्ये रु.१,०००/-, ऑगस्ट २००८ मध्ये रु.३३४/-, सप्टेंबर २००८ मध्ये रु.५०१/-, ऑक्टोबर २००८ मध्ये रु.६६८/-, नोव्हेंबर २००८ मध्ये रु.८३५/-, डिसेंबर २००८ मध्ये रु.१,०००/- ची मागणी तक्रारदार यांच्याकडे करण्यात आली. ही मागणी बेकायदेशीर असून त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचेही दिसते. वरील मुद्यावर सामनेवाले यांनी असा खुलासा केला आहे की, मागील तीन वीज बिलांच्या सरासरीवरुन ग्राहकाची सुरक्षा अनामत रक्कम ठरविली जाते. अशी रक्कम ग्राहकाकडून घेण्याचा वीज कंपनीला अधिकार आहे. तक्रारदार यांच्या मागील तीन बिलांच्या सरासरीवरुनच त्यांना सुरक्षा अनामत रक्कम आकारण्यात आली. तक्रारदार यांनी जून २००८ मध्ये रक्कम भरली नाही म्हणून पुढील महिन्यात पुन्हा रक्कम आकारण्यात आली. जोपर्यंत ग्राहक सुरक्षा अनामत रक्कम भरत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रत्येक बिलात ती दिसत असते असेही सामनेवालेंनी म्हटले आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीचे अवलोकन केल्यावर आमच्या असे निदर्शनास येते की, सामनेवाले यांना सुरक्षा अनामत रक्कम घेण्याचा अधिकार आहे, हे तक्रारदार यांना मान्य आहे. त्याबाबतचे वीज कंपनीचे परिपत्रक त्यांनीच दाखल केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या जून २००८ ते डिसेंबर २००८ या कालावधीतील वीज बिलांचेही आम्ही अवलोकन केले. त्यावरुन असे स्पष्ट होते की, जून २००८ मधील वीज बिलात रु.१,०००/- ची सुरक्षा अनामत रक्कम दाखविण्यात आली आहे. या बिलातील सुरक्षा अनामत रक्कम तक्रारदाराने भरलेली नाही. त्यानंतर जुलै २००८ ते डिसेंबर २००८ या कालावधीतही तक्रारदार यांच्या वीज देयकात सुरक्षा अनामत रक्कम दर्शविण्यात आली आहे. ही देयके तक्रारदार यांनी भरलेली नाही. तक्रारदार यांनी जून २००८ च्या देयकातील किंवा त्यानंतरच्या देयकातील सुरक्षा अनामत रक्कम भरली असती तर त्यांना नंतरच्या देयकांत सुरक्षा अनामत रक्कम आकारण्यात आली नसती, हे स्पष्ट आहे. केवळ तक्रारदार यांनी सुरक्षा अनामत रक्कम न भरल्यानेच पुढील देयकांमध्ये ती सामनेवाले यांना आकारावी लागली असेही स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाले यांनी सहा महिन्यात सात वेळा सुरक्षा अनामत रकमेची मागणी केली हे न पटण्यासारखे आहे आणि ते तक्रारदार यांनी सिध्द केलेले नाही. तथापि, सामनेवाले यांनी जून २००८ ते डिसेंबर २००८ या कालावधीत तक्रारदार यांना आकारलेली सुरक्षा अनामत रक्कम योग्य व बरोबर आहे हेही स्पष्ट होत नाही. सामनेवाले यांनी तेही सिध्द केलेले नाही. जून २००८ मधील देयकात रु.१,०००/- एवढी सुरक्षा अनामत रक्कम दाखविण्यात आली आहे. तक्रारदार यांनी ती रक्कम भरलेली नाही. म्हणजे पुढील देयकामध्ये समान रकमेची सामनेवाले यांनी आकारणी करणे अपेक्षित आहे. मात्र तक्रारदार यांच्या जून २००८ ते डिसेंबर २००८ या कालावधीतील देयकांमध्ये ही रक्कम असमान दिसते आहे. त्यामुळे तक्रारादार यांनी त्यातील नेमकी कोणती रक्कम भरावी, याबाबत संभ्रम निर्माण होतो. याच कारणामुळे जून २००८ च्या वीज देयकातील सुरक्षा अनामत रकमेबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पुन्हा आढावा घेवून सामनेवाले यांनी सुरक्षा अनामतीची रक्कम निश्चित करणे आणि ती तक्रारदार यांना कळविणे आवश्यक होते, असे आम्हाला वाटते. वरील सर्व मुद्दे आणि विवेचनावरुन तक्रारदार यांच्या सुरक्षा अनामत रकमेचा नव्याने आढावा घेवून नव्याने त्याची रक्कम आकारली गेली पाहिजे असे आमचे मत बनले आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी उपस्थित केलेला मुद्दा पूर्णपणे चुकीचा किंवा अयोग्य आहे, हे सिध्द होत नाही. तक्रारदार यांचे अखेरपर्यंत समाधान करणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे सामनेवाले यांचे कर्तव्य आहे. या सर्व मुद्यांचा सारासार विचार करुन आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. आदेश · सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांचे आत, तक्रारदार यांना वीज ग्राहक क्र.०९६५१०८०३७९२ च्या सुरक्षा अनामत रकमेची नव्याने आकारणी करुन, सुधारीत देयक द्यावे. धुळे. दिनांक : १४-०३-२०१४ (श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. |