श्री.पोपट दगडु भदाणे. ----- तक्रारदार
उ.वय.75, धंदा-काहीनाही.
रा.19,शांतीनगर, मिल परीसर,धुळे.
ता.जि.धुळे.
विरुध्द
(1)महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्यूशन ----- विरुध्दपक्ष
कंपनी लि.
सह्याद्री, आनंद नगर,देवपुर,धुळे.ता.जि.धुळे.
(2)मुख्य अभियंता,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लि.
सह्याद्री, आनंद नगर,देवपुर,धुळे.ता.जि.धुळे.
(3)मुख्य अभियंता,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लि.
पावर हाऊस, साक्री रोड,धुळे,ता.जि.धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.बी.ए.पवार.)
(विरुध्दपक्षा तर्फे – वकील श्री.वाय.एल.जाधव.)
निकालपत्र
--------------------------------------------------------------------------
(1) अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना अवाजवी वीज बिल देऊन सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लि. (यापुढे संक्षिप्ततेसाठी महावितरण असे संबोधण्यात येईल) यांचे ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक 080010551548 आर 55154 आहे व त्यांचा मिटर क्रमांक 9001991890 आहे. महावितरणने त्यांना दिलेली सर्व वीज बिले त्यांनी नियमित भरलेली आहेत.
(3) तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, महावितरणने जुलै 2011 व ऑगष्ट 2011 या महिन्यांचे रिडींग घेतले नाही व तक्रारदारास अॅव्हरेज बिल नमूद करुन अवाजवी बिल दिले. महावितरणकडे त्यांनी तक्रार केली असता त्यांच्या अधिका-याने त्यावर सदर मिटर बदलून दिल्याशिवाय फॉल्टी स्टेटस जाणार नाही असा शेरा लिहीला. वास्तविक मिटर व्यवस्थीत असतांना नवीन मिटर बसवण्याचा महावितरणचा आग्रह आहे तो चुकीचा आहे.
(4) तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, महावितरणने जून 2011 च्या बिलात मागिल रिडींग 13174 व चालू रिडींग 13361 दर्शवून 187 युनीटचे बिल दिले आहे. जुलै महिन्याचे बिलात मागील रिडींग 13361 व चालू रिडींग 13489 दर्शवून 128 युनिट्सचे बील दिले. ऑगस्टचे बिलात मागील रिडींग 13489 दर्शवून चालू रिडींग फॉल्टी दाखवले. परंतु रिडींग घेतले नाही व 185 युनिट्सचे बिल देण्यात आले. सप्टेबरचे बिलात फोटो व रिडींग घेण्यात आले. प्रत्यक्ष फोटोमध्ये रिडींग 13767 असतांना चालू रिडींगमध्ये फॉल्टी स्टेटस असे नमूद करुन 185 युनिट बिल देण्यात आले. ऑक्टोबरचे बिलावरील फोटोमध्ये रिडींग 13847 दिसत असतांना पुन्हा 185 युनिट्सचे बिल देण्यात आले. वास्तविक सदर मिटर व्यवस्थित चालू असतांना महावितरणने रिडींग उपलब्ध असतांना सरासरी 185 युनिट्सची बिले दिलेली आहेत.
(5) तक्रारदार यांनी महावितरणला नोटिस देऊन रिडींगनुसार बिल देण्याबाबत कळवले. परंतु महावितरणने त्याची दखल घेतली नाही व रिडींगनुसार बिल दिले नाही व अवाजवी बिल भरण्याचा आग्रह धरला आहे.
(6) तक्रारदार यांनी जुलै 2011 ते ऑक्टोबर 2011 चे रिडींग उपलब्ध असतांना महावितरणने सरासरीच्या आधारावर मोघमपणे 185 युनिटची दिलेले बिल दुरुस्त करुन तक्रारदारास ऑक्टोबरचे रिडींग 13841 वजा जुलै चे रिडींग 13361 = 480 युनिट्सचे बिल द्यावे तसेच महावितरणने प्रत्यक्ष रिडींग उपलब्ध असतांना सरासरीच्या आधारावर 383 युनिट्सची केलेली मागणी रद्द करावी व रिडींगनुसार 480 युनिट्सचे बिल देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
(7) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.3 वर शपथपत्र तसेच नि.नं.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 12 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.नं.5/1 ते 5/7 वर वीज बिले, नि.नं.5/8 वर नोटिसची प्रत, पावत्या दाखल केल्या आहेत.
(8) महावितरणने आपली कैफीयत नि.नं.12 वर दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार खोटी व चुकीची आहे, तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही त्यामुळे ती रद्द करावी असे म्हटले आहे.
(9) महावितरणने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांचे मिटर फॉल्टी झाल्यामुळे संगणक प्रणालीनुसार वापराचे 185 युनिट्सचे बिल देण्यात आले आहे. तक्रारदाराचा वीजेचा वापर सुरु होता त्यामुळे समान संगणकीय पध्दतीन्वये किमान वापर आकारणी करावी लागते. या बाबत तक्रारदार यांना माहीतीही देण्यात आली होती व त्या बाबत दि.21/12/2011 रोजी पत्र देऊनही कळवले होते.
(10) महावितरणने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांना दिलेले बिल योग्य आहे व तक्रार मंचासमोर चालू शकत नाही. शेवटी तक्रार रद्द करुन महावितरणला रु.5,000/- देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
(11) महावितरणने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.15/1 वर तक्रारदारांच्या सी.पी.एल. ची प्रत दाखल केली आहे.
(12) तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष महावितरणचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) महावितरणने तक्रारदार यांना अवाजवी वीज बिले देऊन सेवेत त्रृटी केली आहे काय ? | ः होय |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(13) मुद्दा क्र.‘‘अ’’–तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे की, महावितरणने त्यांना माहे जुलै 2011 ते ऑक्टोबर 2011 या कालावधीत त्यांचे मिटर चालू असतांना त्यावरील नोंदीनुसार बिले न देता सरासरीच्या आधारे वीजेची बिले दिली आहेत व सेवेत त्रृटी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जुलै 2011 चे वीज बिल नि.नं.5/4 वर मागिल रिडींग 13361 व चालू रिडींग 13489 दर्शवून त्यांना 128 युनिट्सचे बिल देण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट मध्ये रिडींग न घेता 185 युनिट, सप्टेंबरला 185 युनिट्स, ऑक्टोंबरला 185 युनिट्स, अशी बिले देण्यात आली. परंतु प्रत्यक्ष मिटरवर ऑक्टोबरमध्ये चालू रिडींग 13841 असे नमूद होते. मिटर चालू असतांना सरासरीनुसार बिले देणे चुकीचे आहे.
(14) महावितरणच्या म्हणण्यानुसार मिटर फॉल्टी असल्यामुळे संगणकीय प्रणालीनुसार त्यांना 185 युनिट सरासरी वापराची बिले देण्यात आली व ती योग्य आहेत.
(15) या संदर्भात आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या बिलांचे अवलोकन केले आहे. त्यात एप्रिल मध्ये चालू रिडींग 12948 नमूद आहे व 231 युनिट्सचे बिल त्यांना देण्यात आले. त्यानंतर मे 2011 मध्ये रिडींगनुसार 226 युनिट्सचे बिल देण्यात आले. जुन मध्ये 187 युनिट्सचे बिल देण्यात आले. जुलै मध्ये 128 युनिट देण्यात आले व नंतर ऑक्टोंबर पर्यंत 185 युनिट्सची बिले देण्यात आली. मिटरच्या नोंदी पाहिल्या असता ऑक्टोंबरमध्ये 13841 ची नोंद असल्याचेदिसून येते. परंतु रिडींगमध्ये फॉल्टी असे दर्शविण्यात आले. त्यावरुन मिटर चालू स्थीतीत होते असे दिसून येते.
(16) वास्तविक मिटर चालू असतांना सरासरीच्या आधारावर बिले देण्याची काहीही आवश्यकता नाही. मिटर हे रिडींगच्या नोंदीसाठी बसवले जाते व त्यानुसारच बिलांची आकारणी करणे आवश्यक असते. महावितरणतर्फे अॅड.जाधव यांनी संगणकीय प्रणालीनुसार सरासरीची बिले देण्यात आली असा युक्तिवाद केला. जी संगणकीय प्रणाली जानेवारी 2011 मध्ये 88 युनिट्स, जुलै 2011 मध्ये 128 युनिट्स, जानेवारी 2012 मध्ये 123 युनिट्सची नोंद घेते, तीच प्रणाली ऑगष्ट ते ऑक्टोंबर 2012 या कालावधीत प्रत्यक्ष रिडींगच्या नोंदी घेत नाही हे पटण्यासारखे नाही. आमच्या मते मिटर सदोष आहे हे जोपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यात दोष होता असे म्हणता येणार नाही. महावितरणने मिटरची तपासणी केल्याबाबत अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष रिडींग उपलब्ध असतांना महावितरणने सरासरीच्या आधारावर दरमहा 185 युनिट्सचे बिल देऊन सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(17) मुद्दा क्र.‘‘ब’’–तक्रारदार यांनी वीजेच्या मिटरवर नोंद झाल्यानुसार जुलै 2011 ते ऑक्टोंबर 2011 या कालावधीत 13841-13361=480 युनिट्सचे बिल देण्याबाबत आदेश करावा व सरासरीच्या आधारे दरमहा 185 युनिट्सची दिलेली बिले दुरुस्त करुन देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
(18) आम्ही तक्रारदारांच्या वीज मिटरवरील नोंदीचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यानुसार तक्रारदारांचा सदर चार महिन्याचा वीज वापर हा मिटरवर नोंदल्याचे दिसून येते व एकूण 480 युनिट्स असल्याचे दिसून येते. त्यामुळे महावितरणने माहे ऑगस्ट 2011 ते मिटर बदललेला महिना डिसेंबर 2011या कालावधीत दिलेली वीज बिले दुरुस्त करुन मिटरवरील रिडींगनुसार बिले द्यावीत असा आदेश करणे आम्हास योग्य व न्यायाचे वाटते. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.500/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.500/- मिळण्यासही पात्र आहेत असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र.‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(19) मुद्दा क्र.‘‘क’’ - उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरुध्दपक्ष महावितरण कंपनी लि. ने या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत...
(अ) तक्रारदारास माहे ऑगस्ट 2011 ते मिटर बदललेला महिना डिसेंबर 2011या कालावधीत दिलेली सरासरी 185 युनिट्स वापराची वीज बिले दुरुस्त करुन, त्या ऐवजी मिटरवरील प्रत्यक्ष रिडींगनुसार बिले द्यावीत.
(ब)तक्रारदारास मानसिक त्रासापोटी 500/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 500/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) दयावेत.
धुळे
दिनांक – 26-07-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.