मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 03/03/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 मार्फत आरोग्य विमा पॉलिसी काढण्याकरीता रु.914/- प्रीमीयम अदा केले व गैरअर्जदार क्र. 2 ने 02.09.2009 ते 01.09.2010 या कालावधीकरीता पॉलिसी निर्गमित केली. दि.02.11.2009 रोजी तक्रारकर्त्यांच्या पत्नीची प्रकृती खराब झाल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. दि.03.11.2010 रोजी सोनोग्राफी करण्यात आली व त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची सुचना गैरअर्जदार क्र. 1 ला देण्यात आली. त्यांच्या प्रतिनीधीने दि.04.11.2009 रोजी रुग्णालयास भेट दिली. तक्रारकर्त्याच्या मते त्याला एकूण सर्व उपचाराचा रु.19,156/- खर्च आला. या खर्चाचे देयक व संपूर्ण दस्तऐवज विमा प्रपत्रासह दि.02.12.2009 रोजी गैरअर्जदाराला दिले. गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यांना अन्य कागदपत्रे मागितली व त्यानुसार दि.14.12.2009 रोजी तक्रारकर्त्यांनी सदर कागदपत्रे गैरअर्जदारांना पुरविली. दि.01.01.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यांना पत्र पाठवून त्याचा विमा दावा रद्द केल्याचे कळविले. त्यावर तक्रारकर्त्यांनी वारंवार गैरअर्जदारांच्या अधिका-यांना भेटून दावा मंजूरीबाबत विनंती केली. परंतू सदर दावा मंजूर करण्यात आला नाही. म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन तीद्वारे पत्नीच्या उपचारावर केलेला खर्च रु.19,156/-, त्यावर 9% व्याज, मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश मंचाने दि.28.06.2010 रोजी पारित केला. गैरअर्जदार क्र. 2 ने सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी उत्तरात सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि तक्रार खोटी व गैरकायदेशीर आहे असा उजर केला आहे व पॉलिसी निर्गमित केल्याची बाब मान्य केली आहे. मात्र पॉलिसीतील अटी आणि शर्तीप्रमाणे, अट क्र. 4.2 नुसार हा दावा देय होत नव्हता, तक्रारकर्त्याच्या पत्नीला, पॉलिसी निर्गमित झाल्यापासून 30 दिवसाचे आत Lumber Region Left side pain चा त्रास सुरु झाला असे रुग्णालयाचे रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे, म्हणून दावा देय नव्हता. करीता सदर तक्रार खारीज करण्यात यावी असा उजर घेतला. 3. 4. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता 24.02.2011 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 2 यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द एकतर्फी कारवाईचा आदेश पारित. मंचाने सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, शपथपत्रावरील कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. 4. -निष्कर्ष- 5. सदर प्रकरणी पॉलिसी ही 02.09.2009 रोजी निर्गमित केल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे. तक्रारकर्त्याच्या पत्नीवर उपचार हे दि.02.11.2009 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे करण्यात आले ही बाबही उभय पक्षांना मान्य आहे. वादातील मुद्दा हा आहे की, पॉलिसीच्या अट क्र. 4.2 प्रमाणे विमा दाव्याची रक्कम देय आहे किंवा नाही ? गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात अट क्र. 4.2 नमूद केली आहे. ती खालीलप्रमाणे आहे. 4.2 “ANY DISEAS OTHER THAN THOSE STATED IN CLAUSE 4.3 CONTRACTED BY THE INSURED PERSON DURING THE FIRST 30 DAYS FROM THE DATE OF COMMENCEMENT OF POLICY………………” जेव्हा की, गैरअर्जदाराने पृष्ठ क्र. 72 वरील दाखल केलेल्या पॉलिसीमध्ये अट क्र. 4.2 खालीलप्रमाणे नमूद आहे. 4.2 “DURING HOSPITALIZATION EXPENSES INCURRED IN THE FIRST 30 DAYS FROM THE COMMENCEMENT DATE OF INSURANCE COVER EXCEPT IN CASE OF INJURY ARISING OUT OF ACCIDENT.” अट ही दस्तऐवजामध्ये नमूद असल्याप्रमाणे, ‘रुग्णालयीन खर्च हा पॉलिसी निर्गमित केल्यापासून 30 दिवसाचे आत करावा लागला तर रक्कम देय नाही’ असे स्पष्ट केले आहे. मात्र असा प्रकार या प्रकरणात मुळात घडलाच नाही. पॉलिसी ही 02.09.2009 रोजी निर्गमित केली आणि तक्रारकर्त्याच्या पत्नीचा आजार हा 02.11.2009 रोजी उद्भवला आहे व दुस-या दिवशी तिचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ही बाब पॉलिसीचे अट क्र.4.2 मध्ये येत नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांचा दावा नाकारणे ही बाब मुळातच चुकीची आहे आणि दुर्भावी आहे हे स्पष्ट होते. 6. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी स्वतः पुढाकार घेऊन तक्रारकर्त्याचा दावा मिळवून देणे गरजेचे होते. तसे त्यांनी केलेले नाही आणि या प्रकरणी हजरही झालेले नाही, त्यामुळे दोन्ही गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांचा विमा दावा योग्य असूनही नाकारल्याने त्यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. तसेच मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली, म्हणून सदर प्रकरणी तक्रारकर्ता मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.19,156/- ही रक्कम, तक्रार दाखल दि.30.03.2010 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी प्रत्येकी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई म्हणून रु.3,000/- अदा करावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी प्रत्येकी रु.1,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने संयूक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्यथा गैरअर्जदार हे द.सा.द.शे. 9% व्याजाऐवजी 12% व्याज देय राहील.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |