जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३३२/२०१० तक्रार दाखल दिनांक – ३०/०४/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१४
१. श्रीमती सोनाबाई चैत्राम परदेशी,
उ.व.- ७२, धंदा – काहीनाही,
२. श्री. महादेव चैत्राम परदेशी,
उ.व.५५, धंदा – व्यापार,
रा.सि.स.नं.२४११, चैनीरोड
धुळे .. तक्रारदार
विरुध्द
१. म.उपकार्यकारी अभियंता,
म.रा.वि. वितरण कंपनी लि.,
शहर उप विभाग क्र.१, धुळे,
साक्रीरोड, धुळे
२. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि. वितरण कंपनी लि.,
(सामनेवाला नं.२ ची नोटीस बजावणी सामनेवाला नं.१ वर व्हावी.)
.सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.बी.व्ही. सूर्यवंशी)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.वाय.एल. जाधव)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. सामनेवाले यांनी अवास्तव वीज देयके देवून सेवेत त्रुटी केली या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक ०८००१०२६४१५८ असा आहे. तक्रारदार यांनी घरगुती वापरासाठी विजपुरवठा घेतला आहे. त्यांचा मिटर क्रमांक ९००२६९३२३ असा आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना जानेवारी २००९ पासून रिडींगमध्ये मोठी तफावत असलेली वीज देयके दिली आहे. ही देयके अवास्तव आणि अवाजवी आहे. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे दि.११/०१/२०१० आणि दि.१९/०३/२०१० रोजी लेखी तक्रार केली आहे. तक्रारदार यांना सप्टेंबर २००९ मध्ये ३५६६ युनीटचे रूपये २५,७६०/- एवढ्या रकमेचे देयक आले होते. ते दुरूस्त करून मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली होती. सामनेवाले यांनी ते देयक दुरूस्त करून रूपये ७,५४२/- एवढ्या रकमेचे सुधारीत देयक दिले. हे देयकही चुकीचे आहे, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी दिलेले चुकीचे देयक रद्द करून रिडींगप्रमाणे दुरूस्त देयक देण्याचे आदेश करावेत, जानेवारी २००९ पासून दरमहा सरासरी १०० युनीटप्रमाणे देयकांची आकारणी करावी, मानसिक त्रासापोटी रूपये ५०,०००/- द्यावे, तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- द्यावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत फेब्रुवारी २००९ ते ऑक्टोबर २०१० या कालावधीतील वीज देयके, सामनेवाले यांना पाठविलेले दि.२०/१०/२००९ चे पत्र, दि.११/०१/२०१० रोजी केलेली तक्रार, दि.१९/०३/२०१० रोजीची तक्रार, सामनेवाले यांचे दि.२९/०७/२०१० रोजीचे पत्र, सामनेवाले यांनी बीएनजी एजन्सीला दिलेले दि.२९/०७/२०१० चे पत्र आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार पूर्णपणे खोटी आहे. तक्रारदार यांनी दि.०१/०२/२००८ पासून देयकांचा भरणा केलेला नाही. त्यांना वारंवार देयक दुरूस्त करून दिले आहे. तरीही तक्रार दाखल करून ते खोटा कांगावा करीत आहेत. तक्रारदार यांना घर बंद असल्याबाबत कमीतकमी देयक दिले जात होते. मात्र त्यांचा वीज वापर होताच आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर युनीट कार्यालयाने घेतलेल्या वाचनाप्रमाणे ३५६६ युनिटचे वाचन नोंदविण्यात आले. त्याचे देयक समान १२ महिन्यात प्रचलित दराप्रमाणे विभागून देण्यात आले. या व्यतिरिक्त काहीही सुधारणा होवू शकत नाही. त्यामुळे ही बाब सेवेत त्रुटी आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५ . सामनेवाले यांनी खुलाशासोबत तक्रारदार यांचा खातेउतारा दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांना युक्तिवादासाठी वेळोवेळी आठ तारखांना संधी देण्यात आली. तथापि, त्यांनी युक्तिवाद केला नाही. सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांनी त्यांचा लेखी खुलासा आणि प्रतिज्ञापत्र हाच युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा त्यासोबत दाखल केलेला खातेउतारा विचारात घेता आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
. मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही
ब. तक्रारदार यांनी त्यांची तक्रार सिध्द केली
आहे काय ? नाही
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- ‘अ’- सामनेवाले यांनी जानेवारी २००९ पासून रिडींगमध्ये तफावत असेलेली वीज देयके दिली, अवास्तव आणि अवाजवी रकमेची देयके दिली अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. त्यासंदर्भात लेखी तक्रारी करूनही सामनेवाले यांनी देयक दुरूस्त करून दिले नाही, असेही तक्रारदार यांनी म्हटले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे हे कथन फेटाळून लावले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सप्टेंबर २००९ मध्ये ३५६६ युनिटचे रूपये २५,७६०/- एवढ्या रकमेचे देयक दिले होते. त्याबाबत तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर ते देयक दुरूस्त करून रूपये ७,५४२/- एवढ्या रकमेचे देयक देण्यात आले. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीतच हे कथन केले आहे.
तक्रारदार यांनी वीज देयकांबाबत सामनेवाले यांच्याकडे दि.११/०१/२०१० आणि दि.१९/०३/२०१० रोजी लेखी तक्रार केली होती. त्याबाबत दखल घेवून सामनेवाले यांनी दि.२०/१०/२००९ आणि दि.२९/०७/२०१० रोजी उत्तर दिले आहे. तक्रारदार यांनी लेखी तक्रार दाखल केल्यानंतर सामनेवाले यांनी त्याची दखल घेवून तक्रारदार यांना योग्य ते उत्तर कळविले आहे हे यावरून दिसून येते. त्याचबरोबर तक्रारदार यांच्याकडे घेणे असलेली रक्कम मागणी करणे हे अयोग्य आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांच्याकडे घेणे असलेल्या रकमेसाठी सामनेवाले यांनी देयके दिली आहेत. त्यांची ही कृती सेवेतील त्रुटी ठरत नाही. याच कारणामुळे आम्ही मुद्दा ‘अ’ चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
८.मुद्दा ‘ब’- सामनेवाले यांनी जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २०१० या कालावधीत रिडींगमध्ये तफावत असलेली अवाजवी आणि अवास्तव रकमेची देयके दिली असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. त्यावर स्पष्टीकरण देतांना सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, सप्टेंबर २००९ चे संचित युनिट ३५६६ हे १२ महिन्यांचे देयक विभागून दुरूस्त करून जानेवारी २०१० मध्ये रूपये ७,८५२/- एवढ्या रकमेचे देण्यात आले होते. तक्रारदार यांना घर बंद असल्याच्या कारणामुळे कमितकमी रकमेची देयके दिली जात होती. मात्र तक्रारदार यांचा वीज वापर होताच युनीट कार्यालयाने प्रत्यक्ष पाहणी करून घेतलेल्या वाचनाप्रमाणे ३५६६ युनीटचे देयक १२ महिन्यांच्या प्रचलित दराप्रमाणे विभागून दिले. तक्रारदार यांच्या विनंतीनुसारच ही दुरूस्ती करण्यात आली. यापेक्षा अधिक सुधारणा होवू शकत नाही. सामनेवाले यांच्या या खुलाशावर तक्रारदार यांनी कोणतेही स्पष्टीकरण किंवा खुलासा दिलेला नाही.
तक्रारदार यांनी जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २०१० या कालावधीतील वीज देयकांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. त्याचेही आम्ही अवलोकन केले. या सर्वच देयकांमध्ये ‘मागील पावतीचा दिनांक’ या रकान्यात दिनांक ‘०१/०२/२००८’ अशी तारीख नमूद असल्याचे दिसते. यावरून तक्रारदार यांनी दि.०१/०२/२००८ या तारखेनंतर कोणतेही देयक भरले नसल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २०१० या कालावधीतील देयकांबाबत सदरची तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यापूर्वीची म्हणजे जानेवारी २००९ पूर्वीची आणि वादातील देयके भरल्याबाबत कोणताही पुरावा त्यांनी मंचासमोर आणलेला नाही. सामनेवाले यांनीही आपल्या खुलाशात तक्रारदार यांचा देयकांचा भरणा अनियमीत असल्याचे म्हटले आहे. त्याबाबतही तक्रारदार यांनी खुलासा केलेला नाही.
वरील मुद्यांवरून तक्रारदार यांची जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २०१० या कालावधीतील देयकांबाबत तक्रार असली तरी त्या पूर्वीची देयके किंवा तक्रार कालावधीतील देयके त्यांनी भरलेली नाहीत हेही दिसते आहे. सामनेवाले यांच्या खुलाशावर तक्रारदार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याने तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन योग्य आहे असे म्हणता येणार नाही असेही आमचे मत आहे. सामनेवाले यांनी दिलेली देयके कशी चुकीची आहेत याबाबतचा कोणताही पुरवा तक्रारदार यांनी समोर आणलेला नाही. याचाच अर्थ तक्रारदार यांनी त्यांची तक्रार सिध्द केलेली नाही. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ – वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे त्यांची तक्रार सिध्द करू शकलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. म्हणून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.