निकालपत्र प्रेरणा रा.काळुंखे कुलकर्णी, सदस्या यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दिनांकः18/03/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986(यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) च्या कलम 12 नुसार प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांनी त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी सामनेवाल्यांकडून कर्ज घेवून ट्रक क्र.एम-एच-41जी-7273 विकत घेतला. सदर कर्जाचे हप्ते नियमित परतफेड करीत असतांना दि.05/01/2014 रोजी सदर वाहनास अपघात होवून त्यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्यात व मालट्रकचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या कर्जाचे चार हप्ते थकीत झाल्याने सामनेवाल्यांनी सदर मालट्रक जप्त केला. त्यांनी सामनेवाल्यांना मालट्रक त्यांच्या ताब्यात मिळण्याकरीता वेळोवेळी सांगितले. परंतु सामनेवाल्यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक त्यांना परत दिला नाही. त्यामुळे सामनेवाल्यांकडून सदरच्या ट्रकचा ताबा मिळावा. तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- अर्ज खर्चासह मिळावेत, अशा मागण्या त्यांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.7 व 33 लगत कर्ज रकमेचा हप्ता भरल्याच्या पावत्या, फायनान्स प्रत, फिर्याद, पंचनामा, आर.सी.बुक, ड्रायव्हींग लायसन्स, परमिट, गाडी दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाची पावती इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचा जबाब नि.17 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदाराने कराराप्रमाणे कर्ज रकमेची परतफेड केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे कर्ज खाते थकीत झाल्याने त्यांनी तक्रारदाराचे वाहन जप्त केले. तसेच सोल आर्बिट्रेटर, मनोज दळवी, मुंबई यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या आर्बिट्रेशन नं.2307/2013 मध्ये तक्रारदार वकीलांमार्फत हजर होवूनही खुलासा दाखल न केल्याने तक्रारदार विरुध्द दि.21/4/2014 रोजी आर्बिट्रेशन अवार्ड पास झालेला आहे. त्यामुळे प्रस्तूत तक्रार टेनेबल नाही. यास्तव तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाल्यांनी आपल्या बचावा पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.19 लगत आर्बिट्रेशन अवार्ड, अकाऊंट स्टेटमेंट, नोटीस, आर्बिट्रेशन नोटीस इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद नि.31 सह उभय पक्षांच्या वकीलांचे तोंडी युक्तीवाद विचारात घेण्यात आलेत.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाल्यांनी तक्रादारास सेवा
देतांना कमतरता केली काय? नाही.
- आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्र.1 बाबतः
8. प्रस्तूत केसमध्ये तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडून घेतलेले कर्ज थकीत झाले. सामनेवाल्यांनी तक्रारदाराचे वाहन जप्त केले. तसेच सामनेवाल्यांनी तक्रारदाराविरुध्द आर्बिट्रेशन प्रोसिडींग दाखल करुन तक्रारदारा विरुध्द अवार्ड पास करण्यात आला, या बाबी विवादीत नाहीत. सामनेवाल्यांनी दाखल केलेला आर्बिट्रेशन अवार्ड नि.19/1 चे अवलोकन करता असे स्पष्ट होते की, आर्बिट्रेशन प्रोसिडींगमध्ये तक्रारदार दि.5/2/2014 रोजी वकीलांमार्फत हजर होवून तडजोड करण्यासाठी मुदत घेवूनही तक्रारदार अगर त्यांचे वकील त्या कामी हजर न झाल्याने दि.2/4/2014 रोजी आर्बिट्रेशन प्रोसिडींग तक्रारदारांच्या जबाबा विना एकतर्फा चालविण्याचे आदेश होवून दि.21/4/2014 रोजी तक्रारदारांविरुध्द अवार्ड पास करण्यात आलेला आहे. तक्रारदारांनी आर्बिट्रेशन प्रोसिडींगमध्ये बाजु मांडण्याऐवजी प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे. तसेच आर्बिट्रेशन प्रोसिडींगचा उल्लेखही तक्रार अर्जात केलेला नाही. तक्रारदार स्वच्छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत. तक्रारदारांचे कर्ज थकीत झाल्याची बाब तक्रारदाराने स्वतः तक्रार अर्जात मान्य केलेली आहे. सादर पुराव्यांवरुन तक्रारदाराचे कर्ज थकीत झाल्याने सामनेवाल्यांनी तक्रारदाराचे वाहन जप्त करणे, ही बाब सेवेतील कमतरता होत नाही, असे आमचे मत आहे. त्यासाठी आम्ही मा.राष्ट्रीय आयोग यांनी शिला कुमारी विरुध्द टाटा इंजिनीयरींग अॅण्ड लोकोमोटीव्ह कं. सी.पी.जे. 2007-2-92 व मॅनेजर संत मेरीज हायर पर्चेस प्रा.लि. विरुध्द एन.ए.जोसे सी.पी.जे. 1995-3-58 या केसेसमध्ये दिलेल्या न्यायनिर्णयाचा आधार घेत आहोत. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
9. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला यांनी सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. यास्तव तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
- उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
- निकालपत्राच्या प्रती उभयपक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः-18/03/2015