(घोषित दिनांक 19/01/2011 द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदारांनी फसवणूक केल्याच्या आरोपावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याचा भाऊ संतोष बबनलाल गुडीवाल याना दिनांक 5/8/2008 रोजी त्याच्या घरी उलटया व चक्कर येत असल्यामुळे त्याने भाऊ संतोष यास दिनांक 6/8/2008 रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय औरंगाबाद येथील किडनी विकार तज्ञ डॉक्टर सुधीर कुलकर्णी यांच्याकडे तपासणीसाठी नेले. डॉक्टर सुधीर कुलकर्णी यानी संतोष याच्या रक्ताची तपासणी आणि सोनोग्राफी करण्यास सांगितले. तपासणीनंतर संतोषचे दोन्हीही मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे डॉ.सुधीर कुलकर्णी यांनी संतोषचे मुत्रपिंड बदलावे लागेल असे सांगितले. त्यासाठी डॉ कुलकर्णी यानी तीन महिन्यानंतरची तारीख दिली . परंतु संतोषला त्रास जास्त होत असल्यामुळे त्याने कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये डॉ.बावीकर यांच्याकडे तपासणी केली. त्यांनी देखील संतोषचे मुत्रपिंड बदलावे लागेल असे सांगितले. परंतु त्या ठिकाणी खर्च जास्त येत असल्यामुळे संतोषला माणिक हॉस्पिटल , गारखेडा येथील डॉ कोंडपल्ले यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी संतोषचे डायलेसीस व मुत्रपिंड बदलण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्यामुळे त्यांने गैरअर्जदार क्र.1 लोकमान्य रक्तपेढी , गैरअर्जदार क्र.2 दत्ताजी भाले रक्तपेढी आणि गैरअर्जदार क्र. 3 मराठवाडा रक्तपेढी यांच्याकडून रक्त घेतले. वास्तविक तो व त्याचा भाऊ दारिद्रयरेषेखालील असल्यामुळे मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार दारिद्रय रेषेखालील रुग्णांना मोफत रक्त देणे गैरअर्जदार रक्तपेढींवर बंधनकारक आहे. असे असूनही गैरअर्जदारांनी मोफत रक्त दिले नाही. रक्त देण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 लोकमान्य रक्तपेढी यांनी त्याच्याकडून रु 66,250/-, गैरअर्जदार क्र.2 दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी रु 9,350/-, गैरअर्जदार क्र.3 मराठवाडा रक्तपेढी यांनी रु 12,650/- घेतले. गैरअर्जदारांनी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दूर्लक्ष करुन त्याची फसवणूक करुन त्याच्याकडून रक्त पुरवठा करण्यासाठी रु 88,250/- घेतले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिन्हीही गैरअर्जदारांकडून त्यास रु 88,250/- तसेच मानसिक त्रासापोटी आणि तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 1 लोकमान्य रक्तपेढी यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, ते शासनाकडून कोणत्याही प्रकारे अनुदान, देणगी, वर्गणी,जागा किंवा इतर कोणतीही सरकारी सवलत घेत नाहीत. मा.उच्च न्यायालयाने दारिद्रय रेषेखालील रुग्णांना रक्तपुरवठा करणे बाबत दिलेले आदेश हे शासन अनुदानीत रग्णालयांना किंवा रक्तपेढींना लागू आहेत. ते शासनाकडून कोणतेही अनुदान घेत नाही आणि त्यांची संस्था शासन अनुदानीत सार्वजनीक न्यास या संज्ञेत मोडत नाही. त्यांच्या वतीने गरजू रुग्णांस रक्ताची आवश्यक ती तपासणी करुन त्याबाबतची फीस घेऊन रक्त वितरीत करण्यात येते. रुग्ण मयत संतोष हा आर्थिक दूर्बल किंवा दारिद्रय रेषेखालील असता तर त्याने निश्चितच शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे उपचार घेतले असते. परंतु त्याने तसे न करता खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत. मयत संतोष हा तक्रारदाराच्या कुटूंबातील घटक नाही आणि तक्रारदार हा त्यांचा ग्राहक नाही. तक्रारदाराने तक्रारीमध्ये किती जास्त फीस घेतल्याचे नमूद केलेले नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 दत्ता भाले रक्तपेढी यांनी लेखी निवदेन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचा आजार या विषयी त्यांना कोणतेही ज्ञान नाही त्यामुळे त्याबाबतीत केलेले कथन त्यांना मान्य नाही. तक्रारदाराने त्यांच्याकडून रक्त विकत घेतल्या बाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने कधी रक्त घेतले किंवा कोणत्या तारखेला घेतले याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तक्रारदाराने सवलतीमध्ये रक्त मिळण्याबाबत कधीही मागणी केलेली नाही. तक्रारदाराची कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्यात आलेली नाही म्हणून ही तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 मराठवाडा रक्तपेढी यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द ही तक्रार लेखी निवेदनाविना चालविण्यात आली. दोन्ही पक्षाच्या कैफीयतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. तक्रारदाराचा भाऊ संतोष हा दारिद्रय रेषेखालील असल्यामुळे नाही मोफत रक्त मिळण्यास पात्र असतानाही गैरअर्जदारांनी मोफत रक्त न देऊन फसवणूक केल्याचे तक्रारदार सिध्द करु शकतो काय? 2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? नाही 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 :- तक्रारदाराने स्वत: युक्तिवाद केला. गैरअर्जदार क्रमांक 1 च्या वतीने अड एफ.आर.तांदळे यांनी बाजू मांडली आणि गैरअर्जदार क्रमांक 2 च्या वतीने अड स्मिता कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. गैरअर्जदार क्रमांक 3 च्या वतीने कोणीही हजर नाही. तक्रारदाराने त्याचा भाऊ संतोष यांना मुत्रपिंडाचा आजार झाला होता आणि त्यासाठी त्यांना कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि माणिक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराचे भाऊ संतोष यांना डायलेसीस आणि मुत्रपिंड बदलण्यासाठी रक्ताची आवश्यकता होती आणि त्यासाठी त्यास रक्त देण्यात आले होते,याबाबत देखील कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्याकडून कोणत्या तारखेला किती रक्त घेतले किंवा कधी रक्त घेतले याबाबत देखील कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्याने गैरअर्जदारांकडून रक्त विकत घेतल्या बाबतच्या कोणत्याही पावत्या मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून रक्त विकत घेतल्याचेच सिध्द होत नाही म्हणून गैरअर्जदारांनी तक्रारदाराची फसवणूक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गैरअर्जदारांनी रक्त विक्रीबाबत फसवणूक केल्याचे सिध्द करण्यास तक्रारदार पूर्णत: अपयशी ठरलेला आहे. म्हणून तक्रारदार कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात येते. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |