(पारित दिनांक-24 फेब्रुवारी, 2020)
(पारित व्दारा श्री नितीन मा.घरडे, मा.सदस्य)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 खाली त्याने विरुध्दपक्ष खते व बि-बीयाणे विक्रेत्याने त्याचे मागणी ऐवजी दुसरेच रासायनिक औषधी पुरविल्याने त्याचे शेतातील धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक मंचा समोर दाखल केली.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की-
तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याची मौजा गरडापार (वाही) तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथे गट क्रं 77,78 व 63/2 अशी शेत जमीन असून त्याने जुन-जुलै-2018 चे हंगामात अंदाजे तीन एकर क्षेत्रात धानपिकाची (भातपिकाची) लागवड केली होती व सदर धानाचे पिकावरील रोगाचे प्रार्दुभावा पासून संरक्षण होण्यासाठी कृषी तज्ञ डॉ.श्री शेषराव लांजेवार यांची भेट घेतली होती, त्यांनी मेटॅरायशियम अॅनॉसोफील या नावाची जैविक किड नियंत्रक औषधी देण्याची लिखित स्वरुपात माहिती दिली होती. कृषी तज्ञ श्री लांजेवार यांचे लिखित शिफारसी प्रमाणे मेटॅरायशियम अॅनॉसोफील हे जैविक किड नियंत्रक औषधी विकत घेण्या करीता तो विरुध्दपक्ष विक्रेता मे. लोहिया बिज भंडारा, नागपूर येथे गेला आणि त्याने सदरच्या जैविक किड नियंत्रण औषधाची मागणी केली, त्यावेळी विरुध्दपक्ष विक्रेत्याने तक्रारकर्त्यास सिलबंद पॅकींग करुन मेट्रीगील गील ही औषधी दिली व त्या बाबत दिनांक-01/10/2018 रोजीचे एकूण रुपये-1700/- चे बिल दिले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने दिनांक-02/10/2018 रोजी विरुध्दपक्ष विक्रेत्याने दिलेल्या औषधाची फवारणी आपले शेतातील धान पिकावरील किड नियंत्रणासाठी केली परंतु दिनांक-05.10.2018 रोजी पासून त्याचे शेतातील धान/भाताचे पिक वाळून गेले. त्याने या बाबत महाराष्ट्र शासनाचे कृषी विकास विभाग पवनी/भंडारा यांना माहिती दिली, त्यानुसार कृषी विकास विभाग पवनी/भंडारा तर्फे मोक्यावर येऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी करण्यात आली. तक्रारकर्त्याला कृषी तज्ञ डॉ.श्री लांजेवार यांनी लिहून दिलेल्या औषधीचे दस्तऐवजाची पाहणी केली असता त्यांना असे आढळून आले की, तक्रारकर्त्याला कृषी तज्ञ यांनी लिहून दिलेल्या औषधी ऐवजी वेगळयाच तणनाशक औषधाची विक्री विरुध्दपक्ष विक्रेत्याने केल्यामुळे त्याचे शेतातील धान पिकाचे अंदाजे रुपये-5,00,000/- चे नुकसान झाल्या बाबत चौकशी अहवाल दिला. त्याने या बाबतीत विरुध्दपक्ष बी-बियाणे, खते विक्रेत्याची भेट घेतली आणि वि.प.ने विक्री केलेल्या चुकीचे औषधीमुळे त्याचे शेतातील धानपिकाच्या झालेल्या नुकसानीची माहिती देऊन रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई देण्याची मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने उलट सुलट शब्दात उत्तर दिले व त्याचेशी र्दुव्यवहार करुन दुकानातून हाकलून लावले. विरुध्दपक्ष विक्रेत्याची संपूर्ण कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेतील त्रृटी ठरते, म्हणून त्याने विरुध्दपक्षाला अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-03.12.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदर नोटीसला विरुध्दपक्षाने दिनांक-10.12.2018 रोजी उत्तर देऊन त्याव्दारे त्याची झालेली नुकसान भरपाई देण्याचे नाकारले, उलट, कोर्टात जाऊन तक्रार दाखल करावी अशी धमकी दिली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष बि-बीयाणे, खते औषधी विक्रेत्याने चुकीची तणनाशक औषधी दिल्याने त्याचे शेतातील भात पिकाचे सरासरी रुपये-5,00,000/- चे नुकसान झाले म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष विक्रेत्या विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष रासायनिक औषधी विक्रेत्याने चुकीच्या किड नियंत्रक औषधाची तक्रारकर्त्याला विक्री केल्यामुळे त्याचे शेतातील धान पिकाचे झालेल्या नुकसानी बाबत रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई विरुध्दपक्षाने त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- प्रस्तुत तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षाने त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03 विरुध्दपक्ष रासायनिक औषधी विक्रेत्याने ग्राहक मंचा समोर उपस्थित होऊन लेखी उत्तर पान क्रं 52 ते 55 वर दाखल केले. त्याने आपले लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप घेऊन नमुद केले की, विरुध्दपक्ष हा लोहीया बीज भंडार या प्रतिष्ठानचा व्यवस्थापक असून तो सदर प्रतिष्ठानचा प्रोप्रायटर नसताना देखील तक्रारीत प्रोप्रायटर म्हणून दर्शविले असल्याने योग्य त्या प्रतिपक्षाचे अभावी तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले. परिच्छेद निहाय उत्तरे देताना नमुद केले की, तक्रारकर्त्याने तक्रारीत वर्णन केल्या प्रमाणे त्याचे मालकीची मौजा गरडापार, तहसिल पवनी जिल्हा भंडारा येथे शेती असून त्याने तीन एकर क्षेत्रात जुन-जुलै-2018 चे हंगामात त्याचे शेतात धान पिकाची लागवड केली होती ही बाब माहिती अभावी नाकबुल केली. तसेच त्याचे शेतातील धान पिकावर रोग आल्याने त्याने कृषी तज्ञ श्री शेषराव लांजेवार यांचे मार्गदर्शन सल्ल्या नुसार मेटॅरायसीन अॅनासोफील नावाची जैवीक किड नियंत्रक औषधी घेण्याची माहिती दिली होती ही बाब पुराव्या अभावी नामंजूर केली. तसेच तक्रारकर्ता त्याचे दुकानात मेटॅरायसनी अॅनासोफील नावाची जैवीक किड नियंत्र्क औषधी विकत घेण्या करीता आला होता ही बाब सुध्दा नामंजूर केली. विरुध्दपक्ष रासायनीक औषधी विक्रेत्याने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा त्याचे दुकानात आला होता व त्याने मौखीक स्वरुपात तसेच स्वेच्छेने व पसंतीने मॅट्रीगील नावाच्या तणनाशकाची मागणी केली होती, त्यावेळी विरुध्दपक्षाने त्याला स्पष्ट सुचित केले होते की, सदर औषध हे ऊसाचे पिकाचे तणनाशक म्हणून कार्य करते व सदर औषधाचे पाकीटवर त्याची माहिती दिलेली आहे हे सुध्दा सांगितले होते परंतु तक्रारकर्त्याने सदर औषधीच पाहिजे असे सांगितल्याने तेऔषध विक्री केले. तक्रारकर्त्याने सदर औषध कशासाठी पाहिजे हे विरुध्दपक्षाला सांगितले नव्हते व त्याने औषध खरेदीचे वेळी कोणतीही लेखी चिठ्ठी आणलेली नव्हती. तक्रारकर्त्याने स्वतःच तो श्री शेषराव लांजेवार यांचे सल्ल्याने शेती करतो व त्यांचे सल्ल्या नुसार सदर औषधीचा वापर करेल असे औषध खरेदीचे वेळी विरुध्दपक्षाला सांगितले होते. तक्रारकर्त्याने मॅट्रीगील औषध खरेदीचे बिल रुपये-1700/- विरुध्दपक्षाला दिले होते ही बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने सदर मॅट्रीगील औषधाची त्याचे शेतात दिनांक-02.10.2018 रोजी फवारणी केली व दिनांक-05.10.2018 पासून त्याचे शेतातील धानाचे पिक वाळून गेले ही बाब माहिती अभावी व पुराव्याचे अभावी नाकबुंल केली. कृषी विकास विभागाने कृषी तज्ञ श्री लांजेवार यांनी लिहून दिलेल्या औषधा ऐवजी विरुध्दपक्षाने वेगळे औषध लिहून दिल्याने तक्रारकर्त्याचे रुपये-5,00,000/- चे नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याची बाब नामंजूर केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाची भेट घेऊन चुकीच्या रासायनिक औषधाची विक्री केल्यामुळे त्याचे पिकाचे नुकसान झाल्या बाबत सुचित केले व त्याला धमकी देऊन दुकानातून हाकलवून लावले ही बाब नामंजूर केली. या उलट सदर औषधाचे विक्री नंतर तक्रारकर्ता कधीही विरुध्दपक्षाचे नागपूर येथील दुकानात आला नाही व त्याला भेटला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला वकीलांचे मार्फतीने दिनांक-03.12.2018 रोजीची नोटीस दिली होती व विरुध्दपक्षाने त्याचे नोटीसला दिनांक-10.12.2018 रोजी उत्तर दिले होते या बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष विक्रेत्या विरुध्द केलेली संपूर्ण तक्रार ही खोटी आहे, त्याने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षा कडून कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याने पैसे उकळण्याचे हेतूने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे व कारण नसताना विरुध्दपक्षाचे विरुध्द तक्रार दाखल केलेली असल्याने त्याचेवर रुपये-10,000/- दंड ठोठवावा व सदर रक्कम विरुध्दपक्षाला देण्यात यावी असे नमुद केले.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कृषी तज्ञ श्री एस.बी.लांजेवार यांनी रासायनिक औषधी बाबत दिलेल्या सल्ल्याचा दिनांक-01.10.2018 रोजीचा दस्तऐवज, विरुध्दपक्ष लोहीया बिज भंडार सुभाष रोड, नागपूर यांचे METRIGIL GIL ही रासायनिक औषधी तक्रारकर्त्याला विकल्या बाबत दिनांक-01.10.2018 रोजीचे दिलेले रुपये-1700/- चे बिलाची प्रत, त्याचे नावाचे मौजा गरडापार, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथील भूमापन क्रं 77, 78, 63/2 चे सात-बारा उता-याच्या प्रती, त्याचे शेतातील धान पिकाचे फोटो, त्याने तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-12.10.2018 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत ज्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची पोच म्हणून सही व शिक्का आहे तसेच दिनांक-16.10.2018 रोजी तहसिलदार पवनी व उपविभागीय अधिकारी पवनी यांचे कार्यालयात दिलेल्या अर्जाच्या प्रती व पोच व ईतर अधिकारी पोलीस स्टेशन अधिकारी, पवनी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात केलेल्या अर्जाच्या प्रती व पोच दाखल केल्यात. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा दिनांक-26.10.2018 रोजी केलेल्या प्रत्यक्ष मोका पाहणीचे अहवालाची प्रत दाखल केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला नोंदणीकृत डाकेने दिनांक-03.12.2018 रोजी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत व रजि.पोस्टाच्या पावत्या प्रती, वि.प.ने नोटीसला दिनांक-10.12.2018 रोजी दिलेले उत्तराची प्रत अशा दसतऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने त्याचे पुराव्याचे शपथपत्र पान क्रं 56 ते 58 वर दाखल केले. तसेच पान क्रं 65 व 66 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. पान क्रं 68 वर हटवार ट्रेडींग कंपनी पवनीचे त.क.चे नावे दिलेले बिल दाखल केले.
05 विरुध्दपक्ष विक्रेत्याने आपले लेखी उत्तर ग्राहक मंचा समोर पान क्रं 52 ते 55 वर दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद पान क्रं 59 व 60 वर दाखल केला. वि.प. ने पान क्रं 62 वरील यादी नुसार मेट्रीजील औषधाचे वरचे लेबलची प्रत दाखल केली.
06 तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज व शपथे वरील पुरावा तसेच विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरे, व लेखी युक्तीवाद आणि दाखल दस्तऐवज याचे ग्राहक मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची कारणमिमांसा पुढील प्रमाणे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो काय | होय |
02 | वि.प.ने त.क.ला चुकीची रासायनिक औषधी विक्री करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | होय |
03 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 01 ते 03-
07 तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष लोहीया बिज भंडार सुभाष रोड, नागपूर यांचे कडून METRIGIL GIL ही रासायनिक औषधी विकत घेतल्या बाबत दिनांक-01.10.2018 रोजीचे रुपये-1700/- चे बिलाची प्रत पुराव्या दाखल सादर केलेली आहे व ही बाब विरुध्दपक्षाला मान्य आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत असल्याची बाब सिध्द होत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 01 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. तक्रारकर्त्याने त्याचे नावाच्या मौजा गरडापार, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथील भूमापन क्रं 77, 78, 63/2 चे सात-बारा उता-याच्या प्रती, त्याचे शेतातील धान पिकाचे फोटो, त्याने तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-12.10.2018 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत ज्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची पोच म्हणून सही व शिक्का आहे तसेच दिनांक-16.10.2018 रोजी तहसिलदार पवनी व उपविभागीय अधिकारी पवनी यांचे कार्यालयात दिलेल्या अर्जाच्या प्रती व पोच व ईतर पोलीस स्टेशन अधिकारी, पवनी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात केलेल्या अर्जाच्या प्रती व पोच दाखल केल्यात. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा दिनांक-26.10.2018 रोजी केलेल्या प्रत्यक्ष मोका पाहणीचे अहवालाची प्रत दाखल केली. विरुध्दपक्षाला नोंदणीकृत डाकेने दिनांक-03.12.2018 रोजी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत व रजि.पोस्टाच्या पावत्या प्रती, वि.प.ने नोटीसला दिनांक-10.12.2018 रोजी दिलेले उत्तराची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती पुराव्या दाखल सादर केलेल्या आहेत.
09. विरुध्दपक्षाने आपले उत्तराचे समर्थनार्थ मेट्रीजील औषधाचे वरचे लेबलची प्रत दाखल केली.
10. या प्रकरणात वादाचा मुख्य मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष रासायनिक औषधी विक्रेत्यास कृषी तज्ञ श्री लांजेवार यांनी दिलेल्या लिखित प्रती नुसार मेटॅरायशियम अॅनॉसोफील हे जैविक किड नियंत्रक औषधी विकत देण्याची मागणी केली होती परंतु विरुध्दपक्ष विक्रेत्याने त्याला सिलबंद पॅकींग करुन मेट्रीगील गील ही औषधी दिली व त्या बाबत दिनांक-01/10/2018 रोजीचे एकूण रुपये-1700/- चे बिल दिले.
11. विरुध्दपक्ष रासायनिक विक्रेत्याने उपरोक्त नमुद तक्रारकर्त्याचे सर्व आरोप पुराव्या अभावी नामंजूर केलेत. त्याने असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने त्याचे दुकानातून औषधी खरेदी करताना कोणत्याही लिखित स्वरुपातील दस्तऐवज न देता मौखीकरित्या तसेच स्वेच्छेने व पसंतीने मॅट्रीगील नावाच्या तणनाशकाची मागणी केली होती, त्यावेळी विरुध्दपक्षाने त्याला स्पष्ट सुचित केले होते की, सदर औषध हे ऊसाचे पिकाचे तणनाशक म्हणून कार्य करते व सदर औषधाचे पाकीटवर त्याची माहिती दिलेली आहे हे सुध्दा सांगितले होते परंतु तक्रारकर्त्याने सदर औषधीच पाहिजे असे सांगितल्याने ते औषध विक्री केले. तक्रारकर्त्याने सदर औषध कशासाठी पाहिजे हे विरुध्दपक्षाला सांगितले नव्हते व त्याने औषध खरेदीचे वेळी कोणतीही लेखी चिठ्ठी आणलेली नव्हती. विरुध्दपक्षाने आपले उत्तराचे समर्थनार्थ मेट्रीजील औषधाचे वरचे लेबलची प्रत दाखल केली.
12. ग्राहक मंचाचे वतीने पान क्रं 10 वर दाखल श्री शेषराव लांजेवार कृषी तज्ञ यांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या प्रिस्क्रीप्शनचे अवलोकन केले, त्यावर श्री शेषराव लांजेवार यांची सही नाही, परंतु त्यावर Use Metarhizium anisophile for control of brown plant hopper S.B. Lanjewar Received 09:16 Date 01/10/2018 असे नमुद आहे. सदर प्रिस्क्रीप्शनवर श्री शेषराव लांजेवार यांची सही नाही असे दिसून येते. मात्र या संदर्भात मौखीक युक्तीवादाचे वेळी ग्राहक मंचाव्दारे तक्रारकर्त्याला त्याने विरुध्दपक्षा कडून रासायनिक औषधी खरेदी करताना लिखित स्वरुपात म्हणजे कोणत्या दस्तऐवजाचे आधारे मागणी केली होती अशी विचारणा केली असता त्याने स्वतःचे भ्रमणध्वनीवर कृषी तज्ञ श्री लांजेवार यांचे कडून आलेला संदेश ग्राहक मंचा समोर दाखविला व त्या संदेशामध्ये सदर Metarhizium anisophile औषधाचे नाव नमुद केलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने चुकीच्या रासायनिक औषधाचे विक्रीमुळे त्याचे झालेल्या पिकाचे नुकसानी बाबत शासनाचे अधिकारी/कृषी अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती पुराव्या दाखल सादर केलेल्या आहेत. तसेच शेतातील पिक वाळून गेल्या बाबत फोटो दाखल केलेले आहेत. मॅट्रीगील ्या या या ाने ाला मान्य आहे.औषधाचे फवारणीमुळे तक्रारकर्त्याचे शेतातील धान पिक वाळून गेले ही बाब तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन सिध्द होते. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्दपक्षाने कृषी तज्ञ श्री लांजेवार यांना तपासण्याची मागणी ग्राहक मंचा समोर केलेली नाही.
13. अशाप्रकारे वि.प. रासायनिक औषधी विक्रेता याने तक्रारर्त्याने लिखित स्वरुपात मागणी करुनही चुकीचे मेट्रोगिल औषधाची विक्री केल्याची बाब पान क्रं 11 वर दाखल बिलावरुन सिध्द होते. वि.प.ने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 02 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. त.क.ने पान क्रं 68 वर हटवार ट्रेडींग कंपनीचे दिनांक-11.12.2019 रोजीचे बिल दाखल केलेले असून त्यानुसार धानास प्रतीक्विटल रुपये-4500/- प्रमाणे दर असल्याचे नमुद आहे. सदर बिलामध्ये 110 क्विंटल अपेक्षीत उत्पादनासाठी रुपये-4,95,000/- आणि वजा हमाली रुपये-1440/- करुन रुपये-4,93,560/- असे दर्शविले आहे. आम्ही सदर तक्रारी मध्ये नुकसान भरपाई निश्चीतीसाठी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीच्या क्षेत्रीय भेटीचा अहवाल जो पान क्रं 33 ते 37 वर दाखल आहे, त्याचा आधार येथे घेत आहोत. सदर अहवालात बाधीत क्षेत्र 3 एकर दर्शविलेले आहे आणि नुकसानीचे प्रमाण 90 टक्के दर्शविलेले आहे. सदर बाधीत क्षेत्राचा विचार करता एकूण रुपये-2,00,000/- एवढी रक्कम अपेक्षीत उत्पन्नासाठी तक्रारकर्त्यास मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे. या शिवाय त्याने तक्रारीचे खर्चाची मागणी केलेली असल्याने त्यास तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे. मुद्दा क्रं 02 चे उत्तर होकारार्थी आल्याने मुद्दा क्रं 03 अनुसार तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे.
14 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, ग्राहक मंचाव्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
-अंतिम आदेश-
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष मे. लोहीया बिज भंडार, सुभाष रोड, नागपूर आणि सदर प्रतिष्ठानचा व्यवस्थापक श्री संजय मोतीराव शिंगार याचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष मे. लोहीया बिज भंडार, सुभाष रोड, नागपूर आणि सदर प्रतिष्ठानचा व्यवस्थापक श्री संजय मोतीराव शिंगार यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला चुकीचे रासायनिक औषध मेट्रोगिलचे फवारणीमुळे झालेल्या अपेक्षीत नुकसानीपोटी एकूण रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) तक्रारकर्त्याला सदर निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत दयावेत. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो सदर नुकसानीची रक्कम रुपये-2,00,000/- वार्षिक-6 टक्के दराने व्याजासह देण्यास विरुध्दपक्ष मे. लोहीया बिज भंडार, सुभाष रोड, नागपूर आणि सदर प्रतिष्ठानचा व्यवस्थापक श्री संजय मोतीराव शिंगार हे वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला देण्यास जबाबदार राहतील.
(03) विरुध्दपक्ष मे. लोहीया बिज भंडार, सुभाष रोड, नागपूर आणि सदर प्रतिष्ठानचा व्यवस्थापक श्री संजय मोतीराव शिंगार यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला प्रस्तुत तक्रारीचे खर्चापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दयावेत.
(04) विरुध्दपक्ष मे. लोहीया बिज भंडार, सुभाष रोड, नागपूर आणि सदर प्रतिष्ठानचा व्यवस्थापक श्री संजय मोतीराव शिंगार यांनी सदर अंतिम आदेशाचे अनुपालन प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत करावे.
(05) सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन द्दावी.
(06) तक्रारीचे ब व क संचाची प्रत तक्रारकर्त्याला परत करण्यात यावी.