जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 66/2012 तक्रार दाखल तारीख – 12/04/2012
तक्रार निकाल तारीख– 14/03/2013
शेख पाशा शेख उमर
वय 70 वर्षे, धंदा शेती,
रा.कामखेडा ता.जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
अवसायक
हिना शाहीन को.ऑप.बँक लि. (अवसायनात)
बलभिम चौक, बीड ता.जि.बीड ...गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.एस.आर.राजपूत
गैरअर्जदारा तर्फे – कोणीही हजर नाही.
------------------------------------------------------------------------------------ निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 अंतर्गत सदरची तक्रार तक्रारदाराने दाखल केलेली आहे. गैरअर्जदार हे हिना शाहीन को-ऑपरेटीव बँक लि. बीड यांचे शासनाने नियुक्त केलेले अवसायक आहेत. सदर बँकेचे संचालक मंडळ सध्या बरखास्त असून त्यांचे विरुध्द बीड येथे गुन्हे दाखल आहेत. सध्या बँकेचे सर्व अधिकार गैरअर्जदार यांचेकडे आहेत.
सदर बँकेचा खातेदार म्हणून तक्रारदार यांनी त्यांचे नांवे बँकेत बचत खाते क्र.8064 मध्ये 29.09.2008 ला रु.3,00,200/- जमा केले. त्यांची नोंद पासबुकात आहे.
असे की, तक्रारदार यांनी गैरअर्जदाराकडे रक्कम मिळणे कामी अर्ज केला तेव्हा त्यांना रु.1,00,000/- परत मिळाले. नंतर तक्रारदारांनी दि.30.04.2012 रोजी बँकेत जाऊन सदरच्या खात्यातील रु.2,00,200/- मिळण्यासाठी अर्ज केला असता सामनेवाल्याने स्पष्टपणे या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे. तक्रारदार हे वयस्कर असून त्यांना वरील रक्कमेची गरज आहे आणि गैरअर्जदारांनी वरील रक्कम रोखून ठेवली आहे. ती देणे सामनेवाल्यांची कायदेशीर जबाबदारी आहे.
गैरअर्जदारांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यांचा निर्णय न्यायमंचाने दि.08.03.2013 रोजी घेतला.
वरील विवेचना वरुन खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. गैरअर्जदारांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातील
रक्कम न देऊन सेवेत कसूर केला ही बाब सिध्द
केली आहे का होय.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे का होय.
3. अंतिम आदेश काय आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली पासबुकाची झेरॉक्स प्रत, तक्रारदाराचे ओळखपत्र यांचे वाचन केले. तक्रारदाराचे वकील श्री.राजपूत यांचा युक्तीवाद ऐकला.
त्यावरुन तक्रारदाराच्या बचत खाते क्र.8064 मध्ये रु.3,00,200/- एवढी रक्कम आहे असे दिसते. त्यानंतर त्यांनी रु.1,00,000/- काढले व दि.30.04.2012 ला उर्वरित रककमेची मागणी केली असता गैरअर्जदारांनी स्पष्ट नकार दिला.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले नाही व त्यांनी काही खुलासाही दिला नाही. तक्रारदाराची तक्रार पाहता बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याचे दिसते. तक्रारदाराच्या विधानांना कोणत्याही प्रकारचा आक्षेप आला नाही तेव्हा सद्य परिस्थितीत तक्रारदारांनी नमूद केलेली विधाने ग्राहय धरण्या पलीकडे न्याय मंचासमोर पर्याय नाही.
तक्रारदाराचे पैसे गैरअर्जदाराच्या बँकेत होते ते बँकेने रोखून धरले. तक्रारदारांनी सामनेवाल्याकडे बचत खात्यात ठेवलेली रक्कम मिळण्याचा त्यांचा हक्कच आहे. त्यापासून ते वंचित झाले आहेत. त्यामुळे तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत गैरअर्जदारांनी कसूर केलेला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे ते दाद मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास त्यांच्या बचत
खात्यातील रक्कम रु.2,00,200/- (अक्षरी रु.दोन लोख दोनशे फक्त)
रक्कम जमा तारखेपासून बचत खात्याच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे
आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड