निकालपत्र :- (दि.28/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.7 यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 2 ते 12 मे.मंचासमोर हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांना नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. उभय पक्षांचे युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासहीत अदा न केलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार हे नात्याने पती-पत्नी आहेत. सामनेवाला क्र.1 ही सहकार कायदयातील तरतुदीनुसार नोंदवणेत आलेली सहकारी पत संस्था असून सामनेवाला क्र. 2 ते 12 हे सदर संस्थेचे संचालक आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेकडे खालीलप्रमाणे मुदत बंद ठेव व सेव्हींग खाते स्वरुपात रक्क्मा ठेवल्या आहेत. अ. क्र. | तक्रारदाराचे नांवे | ठेवपावतीक्र. सेव्हींगक्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख | व्याज दर | 01 | राजेंद्र स.पाटील | 908 | 27,000/- | 04/10/04 | 46दिवसवपुढे | 9 % | 02 | सौ.सरिता रा.पाटील | 671 | 5,000/- | 17/02/03 | 46दिवसवपुढे | 13 % | 03 | सौ.सरिता रा.पाटील | 672 | 5,000/- | 17/02/03 | 46दिवसवपुढे | 13 % | 04 | सौ.सरिता रा.पाटील | 866 | 25,000/- | 28/06/04 | 46दिवसवपुढे | 10 % | 05 | सौ.सरिता रा.पाटील | 881 | 20,000/- | 11/08/04 | 46दिवसवपुढे | 10 % | 06 | राजेंद्र स.पाटील | 49/243 | 4,165/- | 30/03/09 | | | 07 | सौ.सरिता रा.पाटील | 265/2/66 | 34,998/- | 13/04/09 | | |
सदर मुदत बंद ठेव पावतीची मुदत संपली असता तक्रारदार यांनी त्यांच्या आजारपणाच्या उपचारासाठी सदर ठेवींच्या रक्कमेची व्याजासह मागणी केली असता सामनेवाला संस्थेच्या पदाधिका-यांनी आज देतो उदया देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रारदाराची सदर रक्कम देणेस टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदार यांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास झाला. शेवटी तक्रारदाराने त्यांचे वकीलांमार्फत दि.17/07/2009 रोजी नोटीस पाठवून ठेव रक्कमांची व सेव्हींग खातेवरील रक्क्मांची व्याजासह मागणी केली. सदर नोटीस सामनेवाला यांना मिळूनही त्यांनी सदर नोटीसची दखल घेतलेली नाही. तक्रारदार क्र.2 सौ.सरिता राजेंद्र पाटील यांचे सेव्हींग खातेवरील रक्कमेपोटी फक्त रु.10,000/-दिले व उर्वरित रक्कम देणेची टाळाटाळ केली आहे. तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व सेव्हींग खातेवरील रक्क्मा परत मिळत नसलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन सामनेवाला संस्थेकडे असलेल्या ठेव पावत्यांच्या रक्कमा व्याजासहीत परत मिळाव्यात. तसेच सेव्हींग खातेवरील रक्कमा व्याजासहीत मिळाव्यात, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च व वकील फीची रक्कम सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होऊन मिळावी अशी विनंती सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने तक्रारीसोबत नमुद ठेव पावत्यांच्या व सेव्हींग खातेच्या उता-याच्या प्रती, तक्रारदाराने वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांना सदर नोटीस पोहोचलेची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.2 ते 12 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणेप्रमाणे त्यांनी तक्रारदाराची तक्रार ठेवीच्या रक्कमांचा तपशील वगळता नाकारलेली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात,सामनेवाला संस्थेवर अवसायाकाची नियुक्ती झाली असलेमुळे व अवसायकांना सदर कामी पक्षकार न केलेने सदरचा तक्रार अर्ज मे.मंचात चालणेस पात्र नाही. तो सकृतदर्शनी नामंजूर होणेस पात्र आहे. सामनेवाला संस्थेकडे असलेल्या ठेव रक्कमेतून कर्जदारांना कर्ज दिलेले आहेत व ज्यांच्यास कर्जाची थकबाकी झालेली आहे. त्यांचेविरुध्द वसुलीसाठी 101 प्रमाणे वसुलीचे अर्ज दाखल केलेले आहेत. तसेच ज्या प्रमाणात वसुली होईल त्या त्या प्रमाणात वसुल झालेल्या रक्कमांतून ठेवीदारांच्या ठेवी वाटप करणेचे सुरु आहे. तक्रारदारांच्या ठेवीच्या रक्कमा देणेस सामनेवाला संस्था सदैव तयार होते व आहेत. सध्या सामनेवाला संस्थेवर अवसायकांची नियुक्ती केली असलेने सर्व कारभार अवसायकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे अवसायक जशी वसुली करतील त्याप्रमाणे तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा परत करणेसाठी सामनेवाला प्रयत्नशिल राहतील. तक्रारदाराच्या या ठेवी व्यतिरिक्त असणा-या इतर ठेवी वेळेत परत केलेल्या आहेत. सदर ठेवीदेखील वसुलीच्या प्रमाणात तक्रारदारास देणेस सामनेवाला तयार आहेत. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत अवसायकांची नेमणूक झालेल्या आदेशाची सत्यप्रत दाखल केली आहे. (07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला 2 ते 12 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाच्या मुद्दयाचा विचार करावा लागतो. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1:- सामनेवाला क्र.2 ते 12 यांनी तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेल्या ठेव रक्कमा सामनेवाला संस्थेकडे ठेवल्या होत्या ही वस्तुस्थिती मान्य केलेली आहे. तसेच तक्रारदाराच्या यापूर्वीही इतर ठेवलेल्या ठेवीही वेळेत परत केलेल्या आहेत. मात्र सध्या संस्थेवर अवसायकांची नियुक्ती झालेने अवसायक ज्या प्रमाणात वसुली करतील त्याप्रमाणात ठेवीच्या रक्कमा परत करणेसाठी सामनेवाला प्रयत्नशिल राहतील असे त्यांनी आपल्या लेखी म्हणणेत नमुद केले आहे. सदरच्या ठेवी या तक्रारदार पती-पत्नींच्या नांवे आहेत. सबब ठेव रक्कमांबाबत कोणताही वाद नाही. सदर ठेवी- दि.17/02/2003 रोजी पावती क्र. 671, 672, रक्कम रु.5,000/- प्रत्येकी व्याजदर 13 टक्के, दि.11/08/2004 रोजीची ठेव पावती क्र.881 रक्कम रु.20,000/- व्याजदर 10 टक्के व दि.28/06/2004 रोजीची ठेव पावती क्र.866 रक्कम रु.25,000/- व्याजदर 10 टक्के तसेच दि.04/10/2004 रोजीची ठेव पावती क्र.908 रक्कम रु.27,000/- व्याजदर 9 टक्के सदर ठेवी ठेवलेचे दाखल सत्यप्रतीवरुन सिध्द होते. प्रस्तुत अवसायकांची नियुक्ती ही दि.19/11/2008 चे आदेशानुसार झालेली आहे. तर तक्रारदाराने खालील तपशीलाप्रमाणे ठेवलेल्या ठेवी या सन 2003 व 04 सालातील आहेत. याचा विचार करता सदरच्या ठेवी या अवसायक नियुक्तीपूर्वीच्या आहेत. तसेच दाखल खातेउता-यावरुन तक्रारदार क्र.2 चे नांवे त्यांचे सेवहींग खाते क्र.265 वरील शिल्लक रक्कम रु.34,998/- तसेच तक्रारदार क्र.1 चे नांवे सेव्हींग खाते क्र.49 वरील शिल्लक रक्कम रु.4,165/- रक्कमा मागणी करुन दिलेल्या नाहीत. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदारने मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्कमा अदा न केलेने तक्रारदाराने त्यांना वकील नोटीसही पाठवलेली आहे. त्याची दखल सामनेवाला यांनी घेतलेली नाही. सबब तक्रारदाराच्या ठेवी मागणी करुनही अदा न केलेने सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर ठेव रक्कमा व्याजासहीत देणेसाठी प्रस्तुत सामनेवाला क्र.2 ते 12 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत तर सामनेवाला क्र.1 ही संस्था असून अवसायक के.एस.चौगले यांचेकडे संस्थेचा कारभार आहे. सबब संस्था प्रतिनिधी म्हणून तक्रारदाराच्या ठेव रक्कमा देणेकरिता त्यांना संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदार व्याजासहीत ठेव रक्कमा व सेव्हींग खातेवरील रक्कमा मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद स्वरुपाच्या दिसून येतात व सदरच्या ठेवी या 46 दिवस व पुढे असे लिहीले असलेने व निश्चित मुदतीची नोंद नसलेने तक्रारदाराने दि.17/07/2009 रोजी वकील नोटीस पाठवून ठेव रक्कमा व सेवहींगच्या रक्कमा मागणी केलेचे दिसून येते. सबब ठेव रक्कम ठेवलेपासून ते 17/07/2009 पर्यंत ठेवपावतीवरील नमुद व्याजदराप्रमाणे तसेच तदनंतर ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र राहतील तर सेव्हींग खातेवरील शिल्ल्क रक्कम रु.4,165/-वर दि.30/03/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत तसेच तक्रारदार क्र.2 यांचे सेव्हींग खातेवरील शिल्लक रक्कम रु.34,998/- वर दि.13/04/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच युक्तीवादाच्या वेळेस सामनेवालांच्या वकीलांनी प्रस्तुतची तक्रार दाखल झालेनंतर तक्रारदारास काही रक्कमा अदा केल्या आहेत. त्या रक्कमा व अदा केलेचे तारखेपर्यंतचे व्याज माफ करावे अशी विनंती प्रस्तुत मंचास केलेली आहे. सामनेवालांनी त्या संदर्भात कोणतेही पावत्या दाखल केलेल्या नाहीत. त्याच्या युक्तीवादाचा विचार करता सामनेवालांनी सदर ठेव रक्कमांपोटी काही रक्कमा अदा केल्या असतील तर त्यांचा त्या रक्कमा व त्याप्रमाणे व्याज वजावट करुन घेणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षीत ठेवणेत येतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झाला असलेने तक्रारदार शारिरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.2 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.1 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारास पावती क्र. 671, 672 वरील प्रत्येकी रक्कम रु.5,000/-तसेच ठेव पावती क्र.881 वरील रक्कम रु.20,000/-, तसेच ठेव पावती क्र.866 रक्कम रु.25,000/-, तसेच ठेव पावती क्र.908 रक्कम रु.27,000/- त्वरीत अदा करावेत. सदर रक्कमांवर ठेव ठेवले तारखेपासून ते दि.17/07/09 अखेर ठेवपावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज अदा करावे व तदनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. (3) सामनेवाला क्र.2 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.1 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र.1 यांचे सेव्हींग खाते क्र.49 वरील शिल्लक रक्कम रु.4,165/- त्वरीत अदा करावेत व सदर रक्कमेवर दि.30/03/09 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज अदा करावे. तसेच तक्रारदार क्र.2 यांचे सेव्हींग खाते क्र.265 वरील शिल्लक रक्कम रु.34,998/- त्वरीत अदा करावेत व सदर रक्कमेवर दि.13/04/2009 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.3.5टक्के व्याज अदा करावे. (4) सामनेवाला क्र.2 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.1 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत. (5) सामनेवाला यांनी तक्रारदारांचे ठेव पावतीवर किंवा सेव्हींग खातेवर काही रक्कम तक्रारदारास अदा केली असलेस सदरची अदा केलेली रक्कम तक्रारदारास देय रक्कमेतून वजावट करणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षीत ठेवणेत येतो.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |