(मा. सदस्या अॅड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र सामनेवाला यांनी अर्जदार नं.1 यांचे पती व अर्जदार नं.2 ते 5 यांचे पिता कै.कृष्णाजी कुलकर्णी यांचेवर उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे कै.कृष्णाजी कुलकर्णी यांचा मृत्यु झाला. त्यामुळे अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रार अर्जामध्ये वर्णन केल्याप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.20,00,000/- मिळावी व या रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांनी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. जाबदेणार क्र.1 यांनी या कामी पान क्र.333 लगत लेखी म्हणणे व पान क्र.336 लगत प्रतिज्ञापत्र, जाबदेणार क्र.1 व 2 यांनी पान क्र.56 लगत व पान क्र.235 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.61 लगत प्रतिज्ञापत्र, जाबदेणार नं.3 यांनी पान क्र.66 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.69 लगत प्रतिज्ञापत्र, जाबदेणार नं. 4 यांनी पान क्र.96 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे, जाबदेणार नं.5 यांनी पान क्र.162 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.164 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्दे 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 4 व 7 यांचे लाभधारक ग्राहक आहेत. 2) सामनेवाला यांनी वैद्यकिय सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केला आहे काय?- नाही. 3) अंतिम आदेश? –अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. विवेचन याकामी अर्जदार यांनी पान क्र.499 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे तसेच अर्जदार यांचे वतीने अॅड.के.जी.कुलकर्णी यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला नं.1 यांनी पान क्र.395 लगत लेखी युक्तीवाद, सामनेवाला नं.2 यांनी पान क्र.430 लगत लेखी युक्तीवाद, सामनेवाला नं.3 यांनी पान क्र.377 लगत लेखी युक्तीवाद, सामनेवाला नं.4 यांनी पान क्र.379 लगत लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.5 यांनी पान क्र.385 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेले आहेत. तसेच सामनेवाला नं.4 यांचे वतीने अॅड.एस.एस.पुर्णपात्रे व सामनेवाला नं.5 यांचे वतीने अॅड.ए.आर.साठे यांनी युक्तीवाद केलेले आहेत. सामनेवाला यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार हे ग्राहक असल्याची बाब अमान्य केलेली नाही तसेच सामनेवाला यांनी मयत कृष्णाजी यांचेवर उपचार केलेले आहेत ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार हे मयत कृष्णाजी यांचे वारस आहेत ही बाबही सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.20 ते 32 लगत उपचाराची कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडलेल्या आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी नाकारलेली नाहीत. पान क्र.20 ते 32 लगतची उपचाराची कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 4 व 7 यांचे मयत कृष्णाजी कुलकर्णी यांचे वारस म्हणून लाभधारक ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचे पती कै.कृष्णाजी कुलकर्णी यांना सर्वसाधारणपणे मे 2003 च्या पहिल्या आठवडयात किरकोळ प्रमाणात डोकेदुखी व उलटीचा त्रास जाणवत होता. म्हणून सुरुवातीला लक्षणाप्रमाणे त्यांनी कोपरगाव येथे उपचार घेतला. दि.12/3/2003 रोजी सकाळी चक्कर येणे व बोलण्यात तोतरेपणा जाणवु लागल्यामुळे कोपरगाव येथील डॉ.माळी यांनी तपासले असता त्यांनी नाशिक येथील सामनेवाला क्र.1 यांचे हॉस्पीटलला पाठवले. त्यानुसार 11.30 च्या दरम्यान रुग्णाला सामनेवाला नं.1 व 2 यांचे हॉस्पीटलला भरती करण्यात आले. भरतीचे वेळी रुग्णाची तब्येत चांगली होती.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “सामनेवाला यांचे हॉस्पीटलचे न्युरॉलॉजिस्ट पॅनलवरील डॉ.संजय वराडे यांनी तपासले. हॉस्पीटलला एम आर आय तपासणीची सुविधा नसल्याने पुढील तपासणी डॉ.विंचूरकर डायग्नोस्टीक सेंटर नाशिक यांचेकडे करण्यात आली. विंचूरकर हॉस्पीटल सामनेवाला नं.1 यांच्या हॉस्पीटलपासून 3 कि.मी.अंतरावर आहे. संध्याकाळी 6 वाजता एम आर आय घेतला व तो सामनेवाला क्र.2 यांना दाखवला. परंतु दुसरा एम आर आय घेतला जावा असे सामनेवाला नं.2 यांचे मत पडल्याने त्यानुसार दि.13/5/2003 रोजी दुसरा एम आर आय घेण्यात आला. त्याचा रिपोर्ट रात्री 9 वाजता मिळाला. सामनेवाला क्र.1 यांनी रुग्णाला दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान विंचूरकर हॉस्पीटलला पाठवले. अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे विंचूरकर हॉस्पीटलच्या पुढील व्हरांडयात रुग्ण जोरात पडला. त्यावेळी कोणीही मदतीला आले नाही. रुग्णाला टॉयलेटला जायचे होते परंतु ती सुविधा तेथे नव्हती.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “एम आर आय घेण्याचे दरम्यान रुग्ण अचानक हिंसक/आक्रस्ताळी झाला. अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे व विंचूरकर हॉस्पीटलच्या इतर संबंधीतांमुळे रुग्णाला मानसिक व शारिरीक त्रास झाला. म्हणून रुग्णाला भूल देवून एम आर आय घेण्यात आला. सामनेवाला नं.3 यांनी दि.12/5/2003 रोजीचा एम आर आय ठेवून घेतला. रुग्णाचे भावाने त्याची मागणी केंली असता दि.12/5/2003 व दि.13/5/2003 चे एम आर आय सारखेच आहेत असे सांगितले.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “दि.12/5/2003 रोजी सकाळी 11.30 चे दरम्यान हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर दि.13/5/2003 चे रात्री 9 वाजेपर्यंत रुणाच्या महत्वाच्या वैद्यकिय तपासण्या करण्यास मोठा विलंब झाला. त्यामुळे रुग्णावर परीणामकारक औषधोपचाराची योजना ठरविता न आल्याने व रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील त्रुटी व पाठपुराव्याचा अभाव यामुळे रुग्णाची परिस्थिती गंभीर झाली. अशी परिस्थिती असतांनाही त्याची कल्पना रुग्णाचे नातेवाईकांना/अर्जदारास दिली नाही.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि डॉ.संजय वराडे यांचे वर्तन अयोग्य व सहानूभुतीशुन्य होते. दि.14/5/2003 रोजी रुग्ण बेशुध्द होण्याचे अवस्थेत आला. त्याचीही माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली नाही. रुग्णाची परिस्थिती बघून अर्जदारानी रुग्णाला बॉम्बे हॉस्पीटलला नेण्याचे ठरवले. एस ओ एस व्यवस्थापनाची वेळ वाया जाऊ नये म्हणून मेंदुरोग तज्ञ डॉ.सिंघल यांना पुर्ण कल्पना देण्यास विनंती केली परंतु सामनेवाला नं.2 यांनी प्रतिसाद दिला नाही व दि.14/3/2003 रोजी सकाळी औपचारीक रेफर नोट दिली.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “दि.14/3/2003 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान बॉम्बे हॉस्पीटलला दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्ण बेशुध्द अवस्थेत होता. सामनेवाला नं.4 च्या हॉस्पीटलमध्ये डयुटीवर असलेल्या डॉक्टरांनी पेशंटची परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव दिली. डॉ.सिंगल यांनी अर्जदारांना दि.15/3/2003 रोजी पेशंटची प्रकृती गंभीर असल्याची कल्पना दिली.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “दि.14/3/2003 ते दि.22/3/2003 पर्यंत बॉम्बे हॉस्पीटलमध्ये रुग्णावर उपचार करण्यात आले परंतु कै.कृष्णाजी कुलकर्णी यांची शारिरीक परिस्थिती सुधारली नाही आणि दि.22/5/2003 रोजी त्यांचा मृत्यु झाला. सामनेवाला नं.4 च्या रुग्णालयात दाखल केल्यापासून मृत्युपावेतो ते एकदाही शुध्दीवर आले नाहीत.”असे म्हटलेले आहे. तसेच अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडील सुविधा/व्यवस्थेचा अभाव, निष्काळजीपणाचे व्यवस्थापन, सेवेतील कमतरता या सर्व गोष्टींचा एकत्रीत परीणाम म्हणून रुग्ण कै.कृष्णाजी कुलकर्णी यांचा मृत्यु झाला.” अशी तक्रार केलेली आहे.”असे म्हटलेले आहे. वरीलप्रमाणे अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये सविस्तर कथन केलेले आहे. सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी दिवाणी प्रक्रीया संहिता 1908 चे क्रम 1 नियम 10 प्रमाणे दिलेल्या अर्जावरील आदेशानुसार समाविष्ट करुन घेण्यात आलेले आहे. परंतु सदर अर्जातील कथन हे मुळातच दिशाभूल करणारे व निराधार आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीशी सामनेवाला यांचा दुरान्वयेही संबंध नाही. लाईफलाईन हॉस्पीटल व सहयांद्री हॉस्पीटल ही वेगवेगळया स्वतंत्र हॉस्पीटल्स कंपन्या असून दोन्ही हॉस्पीटल्स कंपनी कायदा 1956 नुसार नोंदणीकृत केलेली आहेत. त्यांची व्यवस्थापन मंडळे देखील वेगवेगळी आहेत. सदर कंपन्या देखील अस्तित्वात आहेत.” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “लाईफलाईन हॉस्पीटल ने सि के पी बँकेकडून जे काही कर्ज घेतले होते त्याची परतफेड हॉस्पीटल आर्थीक मंदीत असल्याने करु शकले नाही. दि.सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल अॅसेटस् अॅण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट 2002 च्या तरतुदीप्रमाणे हॉस्पीटलचे व्यवस्थापनाबरोबरच हॉस्पीटलची संपुर्ण मालमत्ता सि के पी बँकेने प्रत्यक्षपणे ताब्यात घेतलेली होती. नोव्हेंबर 2005 पासून ते दि.6/10/2008 पावेतो लाईफलाईन हॉस्पीटलचे व्यवस्थापन, व्यवहार व प्रत्यक्ष ताबा सदरच्या सी के पी बँकेकडे होता. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सी के पी बँकेला कर्ज वसूल करावयाचे असल्याने सदर मिळकतीची जाहीर सुचना देवून विक्री काढली. त्यानुसार सहयाद्री हॉस्पीटल लि. यांनी सी के पी बँकेला रक्कम अदा केली. त्यानुसार लाईफलाईन हॉस्पीटलच्या जे कोणी कर्ते डॉक्टर्स असतील त्यांचे संमतीने विना बोझा व ओझे सदर मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा सहयाद्री हॉस्पीटलस लि. यांना दि.8/10/2008 रोजी सुपूर्द केला. त्यानुसार सहयांद्री हॉस्पीटलस लि. हे सदर मिळकतीचे कायदेशीर मालक झालेले आहेत. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “वरील परिस्थीतीनुसार सदर लाईफ लाईन हॉस्पीटलच्या तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या कोणत्याही व्यवहाराशी सदर सामनेवाला यांना प्रत्यक्ष अथवा कोणत्याही दृष्टीने संबंध येत नाही. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी तक्रारीत कथीत केलेली घटना ही 2003 मध्ये घडलेली आहे. सदर काळात सदर इस्पीतळाची देखभाल व कोणतेही व्यवहार हे सामनेवाला नं.1 यांच्या देखरेखीखाली नव्हते. तसेच लाईफ लाईन हॉस्पीटल व सहयाद्री हॉस्पीटल यांचे दरम्यान जबाबदारी घेण्याचा कोणत्याही प्रकारचा करार मदार व समजूत नव्हती. त्यामुळे सामनेवाला हे सदर तक्रारीसाठी जबाबदार नव्हते व नाहीत. तक्रार रद्द करण्यात यावी तसेच सामनेवाला नं.1 यांना या तक्रारीत विनाकारण सामील करुन मानसिक त्रास दिलेला आहे. त्यामुळे भरपाई म्हणून अर्जदार यांचेकडून रक्कम रु.1 लाख देण्याचे आदेश व्हावेत.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांची तक्रार मेडीकल निग्लीजन्स यात मोडत नाही. सामनेवाला यांचेकडून कै.कृष्णाजी कुलकर्णी यांचेकडे दुर्लक्ष झालेले नाही अथवा त्यांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. त्यांचेवर अत्यंत व्यवस्थीत देखभाल केलेली आहे व योग्य ट्रीटमेंट दिलेली आहे. मयत कृष्णाजी यांचेवर त्यांना डोकेदुखी व उलटयांचा त्रास होत होता त्यासाठी कोपरगाव येथे डॉ.माळी यांचेकडे उपचार चालु होते. त्यात सुधारणा झाली नाही म्हणून त्यांना लाईफ लाईन हॉस्पीटल येथे डॉ.माळी यांचे सल्ल्याने (रेफर नोटने)दाखल करण्यात आले. तसेच दाखल होण्याअगोदर कोपरगाव येथे ताप व फेशीयल पॅरेलिसीसचा त्रास होता. दि.12/5/2003 रोजी ज्यावेळेस मयत कृष्णाजी यांना दाखल करण्यात आले त्यावेळेस त्यांना giddiness (जडत्व) व त्यांचे वाणीवर परीणाम म्हणजे शब्दांना कंप Stammered होता. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रुग्ण कृष्णाजी लाईफलाईन हॉस्पीटलला आले त्यावेळेस त्यांना त्वरीत अॅडमिट करुन न घेता त्या आधी ओ.पी.डी. मध्ये सर्वप्रथम सामनेवाला डॉ.व-हाडे यांनी तपासले असता त्यांना Provisional Brain-stemstroke असल्याचे निदान केले. त्यानंतर रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर असल्यामुळे त्वरीत आय.सी.यु.मध्ये हलविण्यात आले. दाखल केल्यानंतर परत तपासणी करीता रुग्ण कृष्णाजी यांचे डाव्या बाजुचा फेशियल पॅरालॅसिस असल्याचे व डाव्या डोळयाचा Opthalmologia असल्याचे लक्षात आले. Opthalmologia म्हणजे डोळयाच्या स्नायुचा जलन होणारा पॅरॅलॅसिस ज्यामध्ये convulsion देखील येतात. रुग्णाच्या उजव्या डोळयाची डाव्या दिशेने हालचाल करणे शक्य होत नव्हते, त्यात असंतूलन होते. म्हणजेच Nystagmus झाले होते.” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रुग्ण कृष्णाजी यांची शारिरीक अवस्था व लक्षणे बघून बरोबर निदान व्हावे म्हणून सामनेवाला यांनी तातडीने मेंदुचा एम आर आय घेण्यास सजेस्ट करण्यात आले.” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “मयत रुग्ण कृष्णाजी हे violent झाले होते व त्यामुळे तशा अवस्थेत पेशंटमध्ये असलेला Pathological disturbance म्हणजे lesion व्यवस्थीतरित्या दिसत नव्हते व त्यामुळे सामनेवाला रेडीऑलॉजीस्टशी चर्चा करुन रुग्णास भूल देवून contrast study करण्यात आला. जरी दोनदा एम आर आय करण्यात आला तरी दोनदा फी आकारण्यात आली नाही. उलट फीमध्ये सवलत देण्यात आली. अचूक निदान व्हावे म्हणून दोनदा एम आर आय करण्यात आला. अर्जदार यांचे म्हणण्यानुसार जरी दि.13/5/2003 रोजी रात्री 9 वाजता रिपोर्ट हाता पडला असला तरी सदर रिपोर्टबाबत रेडीऑलॉजीस्ट यांनी फोनवर त्वरीत सामनेवाला यांना सांगितलेले आहे. त्यानुसार त्वरीत पुढील उपचार सुरु करण्यात आले. त्यामुळे मयतास त्वरीत योग्य उपचार न मिळाल्यामुळे मयताची तब्येत खालावली हा आरोप खोटा आहे. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “एम.आर.आय रिपोर्ट infective etiology with cranulomas असल्याचे सुचवित होता. त्याबाबत सामनेवाला यांनी त्वरीत उपचार केले व रुग्णाच्या नातेवाईकास रुग्णाच्या अवस्थेची कल्पनाही दिली. एम.आर.आय.नंतर cranulomas चे स्वरुप कळण्यासाठी Cerebro Spinal Fluid ही चाचणी करण्यास सांगितली व ही चाचणी लाईफ लाईन हॉस्पीटलला होईल असेही सांगितले परंतु मयताचे नातेवाईकांनी डॉ.सिंगल बॉम्बे हॉस्पीटल यांना पत्र देण्याचा आग्रह धरला व वैद्यकिय सल्ल्याच्या विरुध्द जावून रुग्णास बॉम्बे हॉस्पीटल येथे हलवले. सामनेवाला यांनी रुग्णास न हलवण्याचा सल्ला दिला होता. रुग्णाची शारिरीक अवस्था विचारात घेवूनच रुग्णासोबत डॉ.राजन हे होते व रुग्णास आय.सी.यु.अॅम्ब्युलन्स देण्यात आली होती. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला यांनी दि.13/5/2003 रोजी पत्र दिले जे रुग्णांचे नातेवाईकांनी दि.14/5/2003 रोजी स्विकारले. लाईफ लाईन हॉस्पीटल यांनी दि.14/5/2003 रोजी डिसचार्ज कार्ड रुग्णास दिले परंतु त्यामध्ये वैद्यकिय सल्ल्याचे विरुध्द हलविले असा शेरा असल्याने ते हेतुतः दाखल केलेले नाही.” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे रुग्णास बॉम्बे हॉस्पीटल येथे दाखल करण्यास उशीर झाला असे बॉम्बे हॉस्पीटलच्या डॉक्टराने सांगितले हे म्हणणे खोटे आहे. तसे म्हटल्याचे बॉम्बे हॉस्पीटलने देखील मान्य केलेले नाही. रुग्ण दि.22/5/2003 रोजी मयत झाला. बॉम्बे हॉस्पीटलने दिलेली डेथ स्लिपमध्ये रुग्णाचे निदान multiple intro-cranial tubeculoma असे केले आहे. ते सामनेवाला यांचे निदानाशी जुळणारे आहे. यावरुनच सामनेवाला यांनी रुग्णास योग्य ट्रीटमेंट दिली हे स्पष्ट होते. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला यांनी रुग्णाची व्यवस्थीत काळजी घेवून त्वरीत उपचार केलेले आहेत. रुग्ण हा सतत शेवटपर्यंत तज्ञांच्या देखरेखीखाली होता. अशा परिस्थितीत सामनेवाला यांचेकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. सबब तक्रार सामनेवाला यांचेविरुध्द फेटाळण्यात यावी.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला नं.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला नं.3 हे डायग्नोस्टीक सेंटर आहे. रिपोर्ट देण्यापुर्वी काही प्रक्रीया पुर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच रिपोर्ट तयार करुन संबंधीत हॉस्पीटलला दिला जातो. त्यासाठी रिजनेबल टाईम लागतो. सदर तक्रारीतही तेवढाच रिजनेबल टाईम घेवून रिपोर्ट तातडीने संबंधीत डॉक्टरांना दिलेला आहे. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला यांचे हॉस्पीटलमध्ये टॉयलेटची सुविधा होती व आजही आहे. रुग्णास अॅम्बुलन्स मधून आणले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे रुग्ण उठून टॉयलेटला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रुग्णाला विंचूरकर हॉस्पीटलमध्ये आणले त्यावेळी रुग्ण रावडी होता. एम.आर.आय. करण्यासाठी पेशंट शांत व एका जागी असणे आवश्यक असते. त्यामुळे एम.आर.आय. सिडेशन विथ सुपरविझन ऑफ अॅनेस्थेशिया करणे गरजेचे होते. त्याप्रमाणे रुग्णाचा एम.आर.आय. करण्यात आला. व रिपोर्ट डॉ.वराडे यांना तातडीने सांगण्यात आला. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रुग्ण लाईफ लाईन हॉस्पीटलला दाखल झाला त्यावेळेला मयतास ब्रेन स्टेन स्ट्रोक झालेला होता असे हॉस्पीटलचे कागदपत्रात म्हटलेले आहे. याचाच अर्थ मयताची प्रकृती अत्यंत गंभीर होती व एम.आर.आय.चा निष्कर्षही त्याच पध्दतीचा आहे. त्यामुळे लाईफ लाईन हॉस्पीटलला दाखल केले त्यावेळी रुग्णाची प्रकृती धडधाकट होती हे म्हणणे खरे नाही. ” असे म्हटलेले आहे. तसेच सामनेवाला नं.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रुग्णावर केलेल्या टेस्टचे रिपोर्ट ताबडतोब संबंधीत हॉस्पीटलला कळविण्यात आलेले आहेत. सामनेवाला यांनी कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा केलेला नाही व सेवेत त्रुटी केलेली नाही. सामनेवाला यांना अर्जदार यांचेकडून कॉम्पेन्सेटरी कॉस्ट रु.3000/- मिळावी.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला नं.4 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांची सामनेवाला नं.4 यांचेविषयी काहीही तक्रार नाही. सामनेवाला नं.4 यांना सामनेवाला नं.1 व 2 यांच्या लेखी जबाबातील तक्रारीवरुन फॉर्मल पार्टी म्हणून सामील केलेले आहे असे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी केलेले उपचार योग्य बरोबर होते त्याविषयी अर्जदार यांनाही तक्रार नाही. त्यामुळे सामनेवाला नं.4 यांनी द्यावयाच्या सेवेत काहीही त्रुटी नाहीत.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला नं.5 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला नं.2 यांनी डॉक्टर म्हणून जी सेवा दिली असेल त्या सेवेपुरताच रक्कम रु.10,00,000/- इतक्या रकमेपर्यंतचे मर्यादीत विमा संरक्षण दिलेले आहे. डॉक्टर खेरीज व्यक्तीगत अखत्यारीत हॉस्पीटलचे मॅनेजमेंट वा लायबिलीटीजबाबत काही जबाबदारी स्विकारली असल्यास त्याबाबत विमा संरक्षण दिलेले नाही. तसेच इतर सामनेवाला नं.1,3,4 व 6 साठीही विमासंरक्षण दिलेले नाही. सामनेवाला नं.2 यांचेकडून व्यावसाईक हलगर्जीपणा झाला, सेवेत व्यावसाईक कमतरता झाली वा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीविरुध्द कृत्य झाले असे शाबीत झाले तरच फक्त सामनेवाला नं.2 करीता मर्यादीत स्वरुपात पैसे भरण्याचे हुकूम करता येवु शकतो. केवळ औषधोपचाराचे दरम्यान पेशंटचा मृत्यु ओढवला म्हणून त्यास डॉक्टर जबाबदार असे समीकरण मांडणे चुकीचे होईल. औषधोपचार सुरु करण्यापुर्वी पेशंटची अवस्था काय होती, डॉक्टरांनी काय व कसे प्रयत्न केले, त्यास पेशंटचे शरीराने साथ दिली किंवा नाही या सर्व गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. या सर्व बाबी पहाता डॉक्टर वराडे यांचेकडून व्यावसाईक हलगर्जीपणा झाला अथवा व्यावसाईक सेवा देण्यात कमतरता झाली म्हणून मयताचा मृत्यु ओढवला वा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीशी विसंगत कृत्य झाले असे दिसत नाही. तक्रार रद्द करण्यात यावी.” असे म्हटलेले आहे. वरीलप्रमाणे सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये सविस्तर कथन केलेले आहे. मयत कृष्णाजी कुलकर्णी यांचेवर उपचार करतांना सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी नक्की कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणता निष्काळजीपणा केलेला आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये स्पष्टपणे केलेला नाही. पान क्र.18 लगत डॉ.राजेश माळी यांनी सामनेवाला क्र.2 यांना दिलेल्या पत्राची प्रत दाखल आहे. या पत्रामध्ये मयत कृष्णाजी यांना पॅरॅलॅसिसचा अॅटॅक आलेला आहे असा स्पष्ट उल्लेख दिसून येत आहे. अर्जदार यांनी पान क्र.21 ते 27 लगत मयत कृष्णाजी यांचेवर सामनेवाला नं.1 व 2 यांनी जे उपचार केलेले आहेत त्या उपचाराच्या नोंदी असलेले वैद्यकिय कागदपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत. पान क्र.21 ते 27 च्या कागदपत्रामधील नोंदींचा विचार करता मयत कृष्णाजी यांची प्रकृती गंभीर होती व त्यांना पॅरॅलॅसिसचा अॅटॅक आलेला होता व पॅरॅलॅसिस अॅटॅक कंट्रोल करण्याकरीता सामनेवाला नं.2 यांनी मयत कृष्णाजी यांचेवर योग्य तेच उपचार केलेले आहेत असे दिसून येत आहे. मयत कृष्णाजी यांची दोन वेळा एम.आर.आय.टेस्टही घेण्यात आलेली आहे असे दिसून येत आहे. मयत कृष्णाजी हे Violent झाले होते ही बाब अर्जदार व सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे म्हणजेच मयत कृष्णाजी यांची प्रकृती गंभीर होती असे दिसून येत आहे व त्यामुळेच मयत कृष्णाजी यांना भूल देवून दुसरा एम. आर.आय. घेण्याचा निर्णय सामनेवाला नं.2 यांनी घेतला होता असे दिसून येत आहे. याचा विचार करता सामनेवाला नं.2 यांनी मयत कृष्णाजी यांचेबाबतीत निदान करण्याकरीता व उपचार करण्याकरीता योग्य ते सर्व प्रयत्न केलेले आहेत हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला क्र.4 यांनी मयत कृष्णाजी यांचेवर जे उपचार केलेले आहेत त्या उपचाराची सर्व कागदपत्रे पान क्र.103 ते 160 लगत दाखल आहेत. सामनेवाला क्र.4 यांचेकडे मयत कृष्णाजी यांचेवर पॅरॅलॅसीसचे विकाराकरीताच उपचार करण्यात आलेले आहेत असे दिसून येत आहे. सामनेवाला क्र.4 यांचेकडे मयत कृष्णाजी यांना अॅडमीट केल्यानंतर दि.15/5/2003 रोजी व दि.16/5/2003 रोजीचे केसपेपरवरील नोंदीनुसार मयत कृष्णाजी यांचे प्रकृतीमध्ये थोडीफार सुधारणा झालेली होती असेच दिसून येत आहे. परंतु दि.17/5/2003 नंतर पुन्हा मयत कृष्णाजी यांची प्रकृती बिघडलेली होती व त्यानंतर दि.22/5/2003 रोजी त्यांचा मृत्यु झालेला आहे असे दिसून येत आहे. मयत कृष्णाजी यांना दि.14/5/2003 ते दि.22/5/2003 या कालावधीत सामनेवाला क्र.4 यांचेकडे अंतररुग्ण म्हणून विशेष दक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलेले होते व या कालावधीमध्ये सामनेवाला क्र.4 यांनी मयत कृष्णाजी यांचेवर पॅरॅलॅसीसचे करीता योग्य तेच सर्व उपचार केलेले आहेत असे दिसून येत आहे. वर उल्लेख केल्यानुसार मयत कृष्णाजी यांचेवर उपचार करतांना सामनेवाला नं.1 ते 4 यांचेकडून म्हणजे नक्की कोणाकडून उपचार करतांना निष्काळजीपणा झालेला आहे याचा स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये केलेला नाही. याउलट पान क्र.21 ते पान क्र.27 लगतची सामनेवाला क्र.2 यांचेकडील उपचाराची कागदपत्रे व पान क्र.103 ते पान क्र.160 लगतची सामनेवाला क्र.4 यांचेकडील उपचाराची कागदपत्रे व त्यावरील नोंदी याचा एकत्रीतरित्या विचार करीता सामनेवाला क्र.2 यांनी मयत कृष्णाजी यांचेवर पॅरॅलेसीसचे अॅटॅक करीता जे उपचार करावे लागतात ते सर्व उपचार केलेलेच आहेत असे दिसून येत आहे. सामनेवाला क्र.4 यांचेकडील पान क्र.103 ते पान क्र.160 लगतचे उपचाराचे कागदपत्रामध्ये कोठेही सामनेवाला क्र.2 यांचेकडून मयत कृष्णाजी यांचेवर उपचार करतांना निष्काळजीपणा करण्यात आलेला आहे असा उल्लेख दिसून येत नाही. याकामी मयत कृष्णाजी यांचेवर सामनेवाला क्र.2 व सामनेवाला क्र.4 यांनी जे उपचार केलेले आहेत त्या उपचाराबाबतची सर्व कागदपत्रे तज्ञ वैद्यकिय मंडळाकडून तपासून घेवून तज्ञ वैद्यकिय मंडळाचा अहवाल या कामी दाखल होण्यासाठी अर्जदार यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत तसेच सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी मयत कृष्णाजी यांचेवर उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे हे स्पष्टपणे शाबीत करण्याकरीता अर्जदार यांनी कोणत्याही तज्ञ डॉक्टरांची सर्टिफिकेटस व प्रतिज्ञापत्रे दाखल केलेली नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 ते सामनेवाला क्र.4 यांनी मयत कृष्णाजी यांचेवर उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. या कामी अर्जदार यांनी पान क्र.510 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे सादर केलेली आहेत. 1) 2010(3) सी.पी.आर. सर्वोच्च न्यायालय. पान 10. व्ही किसनराव विरुध्द निखील सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल 2) 2010(4) सी.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 136. सि उन्नेण व इतर विरुध्द सी सुध्दा व इतर 3) 2010(1) सी.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 369. एम सी कटारे विरुध्द बॉम्बे हॉस्पीटल 4) 2009(1) सी.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 108. साई हॉस्पीटल विरुध्द गोदावरी बाई 5) 2012(1) सी.पी.आर. केरला राज्य आयोग. पान 115. ए के जी हॉस्पीटल विरुध्द कालेन माधवन 6) (1) 1998 सी.पी.सी. सर्वोच्च न्यायालय. पान 423. स्प्रिंग मेडॉस हॉस्पीटल विरुध्द हरजोन अहलुवालिया 7) 1996 सी.टी.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 465. पुनम वर्मा विरुध्द आश्विन पटेल 8) ए.आय.आर. 1974. सर्वोच्च न्यायालय. पान 890. शाम सुंदर विरुध्द स्टेट ऑफ राजस्थान 9) 2011(4) सी.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 420. डॉ प्रभा अग्रवाल विरुध्द कामय्या सिंग 10) 2011(4) सी.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 426. डी पम्पा पाथी विरुध्द डॉ.एच.व्ही.दयानंद 11) 2011(3) सी.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान 312. डॉ व्ही श्रीनाथ विरुध्द गौरव लांबा 15) 2010(1) सी.पी.आर. सर्वोच्च न्यायालय. पान 167. कुसूम शर्मा विरुध्द बत्रा हॉस्पीटल परंतु वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुत तक्रार अर्जाचे कामी सामनेवाला यांचेकडून वैद्यकिय सेवा देण्यामध्ये नक्की कोणता निष्काळजीपणा झालेला आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत केलेली नाही यामुळे वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत. अर्जदार यांनी या कामी पान क्र.516, 517, 518, 519 लगत मेंदुचे विकाराचे बाबतीत उपचाराच्या पध्दतीविषयी माहितीपत्रके व पुस्तके दाखल केलेली आहेत. परंतु सामनेवाला यांचेकडून वैद्यकिय सेवा देण्यामध्ये नक्की कोणता निष्काळजीपणा झालेला आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत केलेली नाही यामुळे वर उल्लेख केलेली माहिती पत्रके व पुस्तके या कामी लागु होत नाहीत. याकामी मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 3(2011) सी.पी.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 54. सेंथील स्कॅन सेंटर विरुध्द शांती श्रीधरण 2) 4(2011) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 677. हेमंत चोप्रा (डॉक्टर) विरुध्द कुलविंदर सिंग 3) 2012 सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 178. शकील मोहम्मद वकील खान विरुध्द सी के दवे 4) 4(2011) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 280. नलिनी विरुध्द मणीपाल हॉस्पीटल 5) 2(2011) सी.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 513. नामदेव एकनाथ घोंगे विरुध्द रुबी हॉल. अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, अर्जदार यांचे वतीने अँड.के.जी.कुलकर्णी यांचा तोंडी युक्तीवाद व अर्जदार तर्फे लेखी युक्तीवाद, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, सामनेवाला यांचे वतीने अँड.श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे व अॅड.साठे यांचा तोंडी युक्तीवाद व सामनेवाला यांचा लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे |