जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/143 प्रकरण दाखल तारीख - 24/06/2009 प्रकरण निकाल तारीख – 13/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य प्रवीण पि.अशोकराव पोपशेटवार, वय वर्षे 30 धंदा शिक्षण, अर्जदार. रा. भोकर ता.भोकर जि.नांदेड. विरुध्द. 1. लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस प्रा.लि, 3 रेनको हाऊस, 2 रा मजला सावेडी रोड, गैरअर्जदार. अहमदनगर.414003. 2. दि.ओरिएंटल ईन्शुरन्स कं.लि, विभागीय कार्यालय, अंबर प्लाझा, दुसरा मजला, अहमदनगर 414003 3. लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस प्रा.लि., सिंचन भवन जवळ, वर्कशॉप रोड,नांदेड. 4. दि.ओरएंटल ईन्शुरन्स कं.लि. शाखा कार्यालय तारासिंग मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.महेश कनकदंडे. गैरअर्जदार क्र.1 व 3 - स्वतः गैरअर्जदार 2 व 4 - अड.पि.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार क्र. 1 ते या सर्वांनी सेवेत कमतरता केली याबद्यल अर्जदार आपल्या तक्रारी म्हणतात की, अर्जदार हे मयत अशोकराव पोपशेटवार यांचा नियोजित वारसदार आहेत व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी विमा पॉलिसी अर्जदाराचे वडील कै.अशोकराव पोपशेटवार यांच्या नांवावर दि.02/04/2007 रोजी दिली होती. या पॉलिसीत मयताने नॉमीनी म्हणुन अर्जदाराचे नांव दिलेले होते. मयत अशोक पोपशेटवार यांच्या नांवाने वैयक्तिक अपघात पॉलिसी क्र.49417/1 रक्कम रु.5,00,000/- ही दि.02/04/2007 ते दि.01/04/2008 या कालावधीसाठी दिली होती. दि.02/03/2008 रोजी मोटर अपघातामध्ये मयत अशोक पोपशेटवार यांचा मृत्यु झाला यानंतर अर्जदाराने संबंधीत सर्व कागदपत्रांची पुर्तता केली व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे विम्याची रक्कम देणे बाबत लेखी स्वरुपात विनंती केली व गैरअर्जदाराने अर्जदाराचे म्हणणे विचारात घेतले नाही म्हणुन शेवटी दि.21/12/2008 रोजी अर्जदाराने अड.महेश कनकदंडे यांच्या मार्फत विम्याची रक्कम मिळण्यासाठी कायदेशिर नोटीस पाठविली. त्या अनुषंगाने फक्त गैरअर्जदार क्र. 1 यांना पत्र देऊन असे कळविण्यात आले की, सदर रक्कम देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 2 ची आहे आमची नाही व गैरअर्जदार क्र. 2,3 व 4 यांनी नोटीसचे उत्तरच दिलेले नाही. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, विम्याची रक्कम रु.5,00,000/- व त्यावर 18 व्याज व मानसिक त्रासाबद्यल रु.20,000/- व दावा खर्च म्हणुन रु.10,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी म्हणणे पोष्टाने मंचात पाठवले त्या संबंधी गैरअर्जदार क्र. 1 कंपनी ही इंशुरन्स संबंधी सेवा देणारी खाजगी कंपनी आहे. त्या अनुषंगाने इंशुरन्स सेवा देण्यासाठी लाईफ लाईन लाईफ केअर लि कंपनी आहे. कंपनीने निरनिराळया किंमतीची व कालावधीची लाईफ केअर कार्ड विक्रीसाठी बाजारात आणले आहे.लाईफ केअर कार्ड धारकास इंशुरन्स कव्हर कार्ड देण्यासाठी ओरीएंटल इंशुरन्स कंपनी अहमदनगर बरोबर बिझनेस टाय अप केलेला आहे. याप्रमाणे ते दोनच देते ज्यात जनता वैयक्तिक अपघात पॉलिसी व नागरी सुरक्षा पॉलिसी येतात. वरील पॉलिसी ही गैरअर्जदार क्र. 1 यांचे तर्फे घेतले असल्यास संबंधी प्रमाणपत्रावर त्यांचे व ओरीएंटल इंशुरन्स कंपनीचे नांव असून त्यावर दोघांचे आधिका-याचे सहया असतात. यात अपघात झाल्यानंतर गैरअर्जदाराना लेखी सुचना मिळतात व ओरीएंटल इंशुरन्स कंपनी लि अहमदनगर तर्फे त्यांचा क्लेम फॉर्म त्याच क्लेमंटला पाठवतो तो पुर्ण करुन संबंधीत कागदपत्र परत पाठवावेत अशी विनंती करतात, क्लेम मिळताच ग्राहकाच्या हित लक्षात घेऊन त्याची तपासणी करुन लगेच ओरीएंटल इंशुरन्स कंपनी यांचेकडे पाठवतो. सदरील इंशुरन्स पॉलिसी ही त्यांची असल्यास संबंधी पॉलिसीच्या अटीनुसार क्लेम सेटल करणे ही त्यांची संपुर्ण जबाबदारी आहे. अशोक पोपशेटवार यांनी लाईफ लाईन केअर सर्व्हीसेस प्रा.लि चे कंपनीचे टेबल 28 चे लाईफ कार्ड घेतले होते. दुर्दैवाने दि.02/03/2008 रोजी मयत अशोक यांचा अपघाती मृत्यु झाला, क्लेम संबंधीची सुचना दि.15/03/2008 रोजी मिळाली. क्लेम फॉर्म दि.22/03/2008 ला पाठविले व गैरअर्जदाराच्या ऑफिसला तो दि.03/05/2008 ला मिळाले तो त्यांनी दि.10/05/2008 रोजी सेटलसाठी गैरअर्जदाराकडे पाठविला त्या त्यांनी दि.23/10/2008 रोजी दावा धारकास पत्र लिहुन त्यास व्हिसेराचा रिपोर्ट पाठवावा असे म्हटले आहे व दि.14/11/2008 रोजी प्रशांत, प्रवीण व रत्नमाला पोपशेटवार यांना क्लेमचे पैसे देणे बाबत ना हरकत प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, 7/12, क्लेम फॉर्म देणेसाठी सांगीतले होते. दि.11/11/2008 रोजी प्रशांत पोपशेटवार यांनी नको असलेले कागदपत्राची मागणी करुन क्लेम प्रलंबीत करीत आहोत असे म्हटले आहे व दि.21/02/2009 ला वकीला मार्फत नोटीस पाठविली त्याचे आम्ही उत्तर दि.27/02/2009 रोजी दिला आहे. पॉलिसी दि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि अहमदनगर ऑफीसची असल्याने ते क्लेम सेटल करतात ती त्यांची जबाबदारी आहे. क्लेम मागीतल्या पासुन ते सादर करेपर्यंत आमच्या कंपनीने कुठेही चुकीचे मार्गदर्शन अथवा सेवेत त्रुटी केलेली नाही. म्हणुन त्यांची प्रार्थना अशी आहे की, त्यांना दोषमुक्त करावे. गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी संयुक्तीकरित्या आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांच्याकडुन सेवेमये कमतरता झाली नाही, कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यपार प्रथेचा अवलंब केलेला नाही. गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, मयत अशोक पोपशेटवार यांनी दाखल केलेल्या रेकॉर्डप्रमाणे दोन मुले प्रवीण व प्रशांत, पत्नी रत्नमाला व आई पदमीनबाई हे वारस आहेत. सदरील प्रकरण अर्जदाराने एकटयाने दाखल केले आहे. सदरील तक्रार मयताच्या वारसा मार्फत दाखल करणे जरुरीचे होते. अर्जदाराने तक्रार करतांना इतर वारसांना सदरील प्रकरणांत पार्टी केलेले नाही. मयत अशोक पोपशेटवार यांनी आपल्या हयातीत गैरअर्जदाराकडुन वैयक्तिक अपघात पॉलिसी घेतली ही बाब गैरअर्जदारांना मान्य आहे. विमा धारकाला पॉलिसीसाठी अर्ज करतांना सत्य माहिती देणे जरुरी आहे. जी माहिती दिली जाते ती माहिती बरोबर आहे, असे गृहीत धरुन पॉलिसी दिली जाते. त्यात माहीती नंतर चुकीची निघाल्यास त्याचे परिणाम विमाधारकास किंवा त्यांच्या वारसांना भोगावे लागतात. विमाधारकाने गैरअर्जदाराकडुन रु.5,00,000/- ची अपघात पॉलिसी घेतली आहे. अपघाताची पॉलिसी रु.1,00,000/- पेक्षा जास्त असल्यास विमाधारकास वार्षिक उत्पन्नाचा दाखल द्यावा लागतो तो त्यांनी पॉलिसी घेतांना जोडलेला नाही. विमाधारक अशोक पोपशेटवार यांचा दि.02/03/2008 रोजी मृत्यु झाला ही बाब पोष्ट मॉर्टेम रिपोर्टवरुन सिध्द होते परंतु त्यांचा अपघाती मृत्यु झाला ही बाब त्यांनी सिध्द करावयाची आहे. गैरअर्जदारांनी काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सांगीतले होते, या पैकी अर्जदाराने आजपर्यंत मयताचा व्हिसेरा रिपोर्ट सादर केलेला नाही. गैरअर्जदाराचे म्हणणे की, त्यांना वकीला मार्फत पाठविलेली नोटीस मिळाली व त्या आधी अर्जदारास कळविले होते की, व्हिसेरा रिपोर्ट सादर केलेला नाही म्हणुन क्लेम नामंजुर करण्यात येतो. यात गैरअर्जदारानी कोणत्याही प्रकारची सेवेत कमतरता केली नाही व कायदेशिररित्या अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला म्हणुन अर्जदाराची मागणी मान्य करण्यात येऊ नये व अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदारा यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील प्रमाणे मुद्ये उपस्थीत होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 गैरअर्जदार क्र. 1 यांनी मयत अशोकराव पोपशेटवार यांना पॉलिसी क्र.49417/1 रक्कम रु.5,00,000/- व दि.02/04/2007 ते 01/04/2008 या कालावधीसाठी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडुन घेऊन दिली होती. अर्जदारानेही पॉलिसी दाखल केलेली असून या पॉलिसीवर जनता वैयक्तिक अपघात पॉलिसी ही ओरीएंटल इंशुरन्स कंपनी लि यांच्या मार्फत व लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस लि यांच्या मध्यस्थीने देण्यात आलेली आहे. यात पॉलिसी तिघांच्या नांवाने असून मयत अशोकराव पोपशेटवार, प्रशांत अशोक पोपशेटवार, प्रवीण अशोक पोपशेटवार या तिघांचे नांव आहे व यावर नॉमीनी म्हणुन प्रवीण पोपशेटवार यांच्या नांवाचा स्पष्ट उल्लेख आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात कै.अशोकराव पोपशेटवार यांनी टेबल क्र.28 क्रमांकाचे कार्ड घेतलेले आहे. त्यात दि.02/03/2008 रोजी मयत अशोकराव पोपशेटवार यांचा अपघात झाला व त्यात ते मरण पावले. पॉलिसीचा क्लेम प्रपोझलप्रमाणे क्लेम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दि.22/03/2008 रोजी पाठविण्यात आला. यावर ता गैरअरर्जदार क्र. 2 यांनी पुर्ण तपासणी करुन निर्णय घ्यावयाचा आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी मयताचा व्हिसेरा रिपोर्ट मागीतला होता तसेच प्रशांत पोपशेटवार, प्रवीण पोपशेटवार व श्रीमती. रत्नमाला अशोक पोपशेटवार यांचे नाहरकत प्रमाणपत्र मागीतले होते व उत्पन्नाचा दाखला मागीतला होता, याची पुर्तता अर्जदाराना करावयाची होती. गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडुन सेवेत त्रुटी झालेले दिसुन येत नाही परंतु निर्णय गैरअर्जदार क्र.2 यांनाच घ्यावयाचा असल्या कारणाने त्यांनी जो मुद्या उपस्थित केला आहे तो प्रकरणांतील कागदपत्र पाहीले असता, पहीली गोष्ट मयत अशोकराव पोपशेटवार यांचा अपघाती मृत्यु झाला काय ? घटनास्थळ पंचनामा व पोष्टमॉर्टेम रिपोर्ट पाहीले असता, मयताचा मृत्यु समोरुन वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागुन मृत्यु झाला. पोष्टमॉर्टेम मध्ये देखील डोक्यास मार लागुन जखम होऊन मृत्यु झाला असे स्पष्टपणे डॉक्टराचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे. गैरअर्जदाराचा हा आक्षेप अमान्य करण्यात येतो. याला वेगळे मृत्यु प्रमाणपत्राची गरज नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांचा दुसरा आक्षेपाप्रमाणे पॉलिसीवर नॉमिनी म्हणुन प्रवीण पोपशेटवार यांचे नांव आहे म्हणजे मयताच्या मृत्युपुर्वी त्यांनी आपल्या मर्जीने नॉमीनी म्हणुन नेमलेले आहे. तेंव्हा आता इतर दोघांचा व मयताच्या पत्नीचे नाहरकत प्रमाणपत्र मागण्याची गरज नाही व त्या सर्वांनी त्यांच्या तर्फे कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही तेंव्हा नॉमीनीला गैरअर्जदारानी क्लेमची रक्कम देण्यास टाळाटाळ करण याचा अर्थ सेवेतील त्रुटी आहे. तिसरा आक्षेप मयत अशोकराव पोपशेटवार यांना गैरअर्जदारानी पॉलिसी देतांना रु.5,00,000/- ची त्यांनी दिलेली आहे, उत्पन्नाचा दाखला त्यांना पाहीजेच असल्यास पॉलिसी देते वेळेस जिवंतपणे त्यांना मागु शकले असते, अपघात पॉलिसी दिल्यानंतर व त्या इसमाचे निधन झाल्यानंतर त्यांचे उत्पन्न कोणी सिध्द करायचे त्यांच्या नंतर मुलाला व त्यांच्या पत्नीला त्यांचे उत्पन्न माहीत असलेच असे नाही. त्यामुळे निधनानंतर हा आक्षेप काढणे हे गैर आहे. पॉलिसीप्रमाणे जोखीमेची रक्कम ठरिवल्यानंतर मयताची जोखीम ही रु.5,00,000/- पर्यंतचे गैरअर्जदारांनी घेतलेली आहे. त्यात त्यांचा उत्पन्नाचा भाग येण्याचा प्रश्न येत नाही तरीही अर्जदारांनी मयताच्या नांवानाचा 7/12 व इतर कागदपत्र दिलेली आहेत. त्यामुळे गैरअर्जदारांनी उत्पन्नाबाबतचा मुद्या उपस्थित करणे हे गैर आहे. मयताचे उत्पन्न काय होते हे तोच सांगू शकतो. क्लेमची रक्कम जी जोखीमेची रक्कम आहे. गैरअर्जदाराचा चौथा आक्षेप व्हिसेरा रिपोर्टबद्यल आहे. मयत अशोकराव पोपशेटवार यांचा मृत्यु हा अपघातात झालेला आहे, विष प्राशन करुन झालेला नाही तेंव्हा व्हिसेराचा रिपोर्टमध्ये नव्याने काही मुद्ये येऊन वेगळे होणार नाही व व्हिसेरा रिपोर्टची आवश्यकता देखील नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी विना कारण अनावश्यक कागदपत्राची मागणी करुन क्लेमची रक्कम देण्यास विलंब केला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी विना कारण आक्षेप उपस्थित करुन क्लेम देण्यास टाळाटाळ केलेले आहे व सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.2 व 4 यांनी पॉलिसी क्र. 49417/1 या अंतर्गत मयत अशोकराव पोपशेटवार यांचा अपघाती मृत्युनंतर मिळणारी विम्याची रक्कम रु.5,00,000/- व त्यावर दि.27/02/2009 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. हा क्लेम लवकरात लवकर सेटल करण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांच्यावर जबाबदारी टाकण्यात येते. 3. मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- व दावा खर्चाबद्यल रु.2,000/- मंजुर करण्यात येतात. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |