नि. 30 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 211/2010 नोंदणी तारीख – 2/9/2010 निकाल तारीख – 3/2/2011 निकाल कालावधी - 151 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री जनार्दन बापू पवार रा.धुमाळवाडी, पो.गिरवी ता.फलटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री जी.सी.काटकर) विरुध्द 1. डॉ बाळासाहेब गुलाबराव सस्ते लाईफ लाईन हॉस्पीटल ऍण्ड हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रा.लि महात्मा फुले चौक, फलटण 2. डॉ विक्रम वर्धमान निकम-पाटील पहिली गल्ली, रिंग रोड, लक्ष्मीनगर, फलटण 3. डॉ सागर जवाहर गांधी गांधी नर्सिंग होम व डायग्नोस्टीक सेंटर, प्लॉट नं.109, शिवाजी नगर, फलटण ----- जाबदार (अभियोक्ता श्री डी.एस.टाळकुटे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे वर नमूद पत्त्यावरील येथील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार यांच्या पत्नी कै.प्रमिला हिचे पोटात दुखत असल्यामुळे त्यांनी जाबदार यांचेकडे उपचारासाठी आणले असता जाबदार क्र.3 यांनी औषधे देवून पुन्हा 10 दिवसांनी दवाखान्यात येण्यास सांगितले. त्यानुसार अर्जदार यांनी तिला जाबदार क्र.3 यांचेकडे नेले. जाबदार क्र.3 यांनी त्यांना जाबदार क.2 यांचेकडे जाण्यास सांगितले. जाबदार क्र.2 यांनी गोळया दिल्या परंतु तरीही दुखायचे थांबले नाही म्हणून जाबदार यांनी कै.प्रमिला हिच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या व त्यांचे पोटात खडे झाले असून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जाबदार यांनी अर्जदार यांचे पत्नीचे दि.12/1/08 रोजी ऑपरेशन केले. परंतु ऑपरेशन केल्यानंतर पोटात दुखण्याचे थांबले नाही उलट पेशंटला जादा त्रास चालू झाला व योग्य त्या वैद्यकीय पध्दतीने उपचार न केल्यामुळे पेशंटचे पोट फुगू लागले. त्यावेळी जाबदार यांनी दि.28/11/2008 रोजी रुग्ण नाजूक परिस्थितीमध्ये असल्याचे सांगून त्यांना पूणे येथील ससून हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्यास सांगितले. अर्जदार यांनी रुग्णाला पूणे येथे नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी विविध चाचण्या करुन जाबदार यांनी ऑपेरशन करताना हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णाच्या पोटात पू व पाणी झाल्याचे सांगितले. ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी रुग्णाला वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु जाबदार यांचे हलगर्जीपणामुळे अर्जदारचे पत्नीचा दि. 18/12/2008 रोजी मृत्यू झाला. सबब वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणामुळे अर्जदारास रु.15 लाख मिळावेत, विनाकारण वैद्यकीय खर्च करण्यास भाग पडले त्यासाठी रु.2 लाख मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.2 लाख व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी योग्य ती तपासणी करुन कै.प्रमिला हिचेवर आवश्यकतेनुसार उपचार केला. उपचारामध्ये कोठेही कसूर केलेली नाही. कै.प्रमिला ही उपचारास कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू पावली आहे. जाबदार क्र.2 यांनी रुग्णाला गोळया दिल्यानंतर तिच्यामध्ये काहीच फरक न पडल्याने तिची सोनोग्राफी करण्यात आली व रक्त, लघवीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिच्या पित्ताशयामध्ये खडे आढळून आल्यामुळे तिचेवर ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला जाबदार क्र.2 यांनी दिला. परंतु पेशंटच्या नातेवाईकांनी आर्थिक ऐपत नसल्याने कमी खर्चात ऑपरेशन करण्याची विनंती केली. त्यांनी पेशंटची उघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. सदरची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची असते. उघड शस्त्रक्रियेमध्ये पेशंटच्या अवयवांची असणारी रचना तसेच इतर अडचणी व ऑपरेशननंतर उपचाराला दिलेला प्रतिसाद यावर सदरची शस्त्रक्रिया अवलंबून असते. सदरच्या सर्व बाबींची कल्पना जाबदार यांनी अर्जदार यांचे नातेवाईकांना दिली होती. जाबदार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करुन शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यानंतर पित्ताशयाची तपासणी करुन घेतली त्यामध्ये कॅन्सर नाही असा रिपोर्ट आला. त्यानंतर दि.19/11/2008 रोजी पेशंटची पुन्हा सोनोग्राफी केली, त्यावेळी पेशंटमध्ये सुधारणा होत असल्याचे जाबदार यांना आढळून आले. त्यानंतर दि.25/11/2008 रोजी टाके काढण्यात आले. पेशंटला सक्त विश्रांतीची गरज असताना अर्जदार यांनी पेशंटला जाबदार यांचे सल्ल्याविरुध्द घरी नेले. डिस्चार्ज दिल्यानंतर योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी नातेवाईकांची होती परंतु त्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे पुनहा पेशंटच्या पोटात दुखू लागले व त्यामुळे तिला पुन्हा दि.26/11/08 रोजी हॉस्पीटलमध्ये ऍडमिट केले. जाबदार यांनी पित्ताशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया ही वैद्यकीय शास्त्रातील तरतुदींनुसार तसेच व्यावसायिक नितीमूल्यांचे भान ठेवून केले असून कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. सबब तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 24 ला पाहिला. जाबदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 25 व 29 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार यांची पत्नी कै.प्रमिला हीच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी तिला जाबदार यांचेकडे उपचारासाठी आणले. जाबदार यांनी तिची तपासणी करुन तिला काही औषधे दिली परंतु तरीही सुधारणा न झाल्याने अर्जदार यांनी पुन्हा तिला जाबदार क्र.2 यांचेकडे नेले. जाबदार यांनी सोनोग्राफी करुन व इतर चाचण्या करुन पित्ताशयात खडे झाल्याचे निदान केले व अर्जदारचे नातेवाईकांची संमती घेवून उघड शस्त्रक्रिया दि.12/11/08 रोजी केली. सदरची शस्त्रक्रिया केलेनंतर दि.25/11/2008 रोजी अर्जदार व नातेवाईकांनी पेशंटला जाबदार यांचे सल्ल्याविरुध्द घरी नेले. परंतु तिच्या पोटात दूखू लागलेमुळे तिला पुन्हा दि.26/11/2008 रोजी जाबदार यांचेकडे आणले. त्यानंतर जाबदार यांनी अर्जदार यांना पेशंटला पूणे येथे नेण्यास सांगितले. म्हणून अर्जदार यांनी पेशंटला पूणे येथे नेले व तिच्यावर उपचार सुरु केले परंतु दि.18/12/2008 रोजी तिचा मृत्यू झाला. अर्जदार यांचे कथनानुसार जाबदार यांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांचे पत्नीचा मृत्यू झाला. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा प्रस्तुत कामात दाखल नाही. ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी जाबदार यांचेकडून उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे सांगितले असे कथन अर्जदारांनी केले आहे. परंतु सदरचे कथनाचे समर्थनार्थ अर्जदारतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचा अहवाल, मत, अगर शपथपत्र दाखल केलेले नाहीत. प्रस्तुतचे प्रकरणाबाबत मे.मंचाने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यांचा अभिप्राय मागविला असता त्यांनी वैद्यकीय उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. 6. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, त्यांनी पेशंटला पुणे येथील ससून हॉस्पीटलला ऍडमिट केलेनंतर तेथील डॉक्टरांनी विविध चाचण्या करुन जाबदार यांनी ऑपरेशन करताना हलगर्जीपणा केल्यामुळे पेशंटच्या पोटात पाणी व पू झाल्याचे सांगितले. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी संबंधीत वैद्यकीय अधिका-यांचे मत दर्शविणारा अहवाल/दाखला याकामी तक्रारअर्जासोबत सादर करणे जरुर होते. तथापि तसा कोणताही अहवाल तक्रारअर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेला नाही. तक्रारअर्जदार यांनी याकामी नि. 24 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सदरच्या युक्तिवादानुसार त्यांनी अर्जासोबत पूणे येथील ससून हॉस्पीटलमध्ये कै.प्रमिला हिचेवर करण्यात आलेल्या उपचाराची सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत व ही कागदपत्रे नि.23 सोबत दाखल केली आहेत, सदरची कागदपत्रे पाहता त्यामध्ये तशी गोष्ट नमूद आहे असे लेखी युक्तिवादामध्ये प्रतिपादन केले आहे. सदरची कागदपत्रे पाहिली असता कै.प्रमिला हिचेवर शस्त्रक्रिया करताना झालेल्या हलगर्जीपणामुळे तिच्या पोटात पू व पाणी झाले असे कोठेही नमूद केल्याचे दिसून येत नाही. तशा स्वरुपाचा कोणताही कागद अर्जदारतर्फे दाखविण्यात आलेला नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की, या केसपेपर्ससंबंधीत अर्जदारने त्याचे शपथपत्रात कोठेही तसे नमूद केलेले नाही. 7. महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारअर्जदार यांचे कथनानुसार कै.प्रमिला हिचेवर शस्त्रक्रिया करताना त्यामध्ये जाबदार यांनी हलगर्जीपणा केला व त्यामुळे तिच्या पोटात पाणी व पू झाला किंवा कसे याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे संबंधीत कागदपत्रे पाठविण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सदर कागदपत्रांची पाहणी करुन खालीलप्रमाणे अभिप्राय नि.28 ला दिला आहे. श्रीमती प्रमिला जनार्दन पवार यांचेवर ससून जनरल हॉस्पीटल पुणे यांनी केलेल्या उपचारांबाबतच्या कागदपत्रांची जिल्हास्तरीय तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची समिती यांचेकडून तपासणी करणेत आली असता वैद्यकीय उपचारामध्ये निष्काळजीपणा झालेचे दिसून आले नाही. सदरचा अभिप्राय विचारात घेता जाबदार यांनी कै.प्रमिला हिचेवर शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाला होता ही बाब सिध्द होत नाही. 8. तक्रारअर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात कै.प्रमिला हिला शस्त्रक्रियेसाठी जाबदार यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर तिला कोणत्या तारखेस सोडण्यात आले याबाबत कोठेही काहीही स्पष्ट कथन केलेले नाही. अशा या पार्श्वभूमीवर जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये केलेले कथन की, अर्जदार यांनी जाबदार यांचे सल्ल्याविरुध्द रुग्णाला घरी नेले या कथनात तथ्य दिसून येते. वास्तविक पाहता डॉक्टरांनी रुग्णाला हॉस्पीटलमध्ये थांबण्यास सांगितले नंतर अर्जदार यांनी रुग्णाला हॉस्पीटलमध्येच ठेवणे आवश्यक होते. परंतु तसेच न करता त्यांनी स्वतः जाबदार यांचे सल्ल्याविरुध्द रुग्णाला घरी नेले आहे. 9. आणखी एक विचारात घेण्यासारखी महत्वाची बाब अशी आहे की, अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात जाबदार यांनी कै.प्रमिला हिचेवर शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा केला असे कथन केले आहे. परंतु तीन जाबदारांपैकी निश्चित कोणत्या जाबदारने रुग्णावर शस्त्रक्रिया केली, तिन्हींपैकी कोणत्या जाबदारने उपचार वा शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा केला याबाबत काहीही सुस्पष्ट कथन केलेले नाही. 10. महत्वाची बाब अशी की, तक्रारअर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जातील कथनांचे समर्थनार्थ वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचा अहवाल वा शपथपत्र याकामी दाखल करणे जरुर होते. परंतु तसा कोणताही अहवाल वा शपथपत्र याकामी दाखल नाही. 11. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 3/2/2011 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |