ग्राहक तक्रार क्र. 172/2013
अर्ज दाखल तारीख : 03/12/2013
अर्ज निकाल तारीख: 22/12/2014
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती कांताबाई शिवाजी राठोड,
वय-40 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.घाटंग्री,(तांडा) ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. भारतीय जीवन विमा निगम लि.
मंडळ कार्यालय, औरंगाबाद.
जीवन प्रकाश डिव्हीजनल ऑफीस अदालत रोड,
औंरगाबाद -431005.
2. भारतीय जीवन बिमा निगम,
मंडळ कार्यालय शाखा उस्मानाबाद,
उस्मानाबाद जनता बँकेसमोर,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य..
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमुख.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.पी.डी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री. मुकुंद बी. सस्ते यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार ही मौजे घाटंग्री (तांडा) ता.जि.उस्मानाबाद येथील रहीवाशी आहे. दि.11/06/2012 रोजी सोलापूर येथून तुळजापुरकडे शाळेच्या कामाकरीता जात असतांना मोटार सायकल क्र. एम.एच. -25/व्ही-360 वर जात असतांना सोलापुर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.9 वर बोरामपी शिवारामध्ये टैम्पो क्र.एमएच-25/बी-7420 च्या ड्रायव्हरने निष्काळजीपणे व जोरात गाडी चालवून मयताच्या मोटारसायकलाला चुकीच्या दिशेने येऊन धडक दिल्याने शिवाजी हाबू राठोड यांचा मृत्यू झाला. शिवाजी राठोड यांच्या नावे पॉलीसी क्र.98561043 व 984317612 अशा आहेत. तक्रारदाराच्या पतीच्या पगारातून विरुध्द पक्षकार परस्पर हप्ते कपात करुन घेत होते. तक्रारदाराने विरुध्द पक्षकार क्र.2 कडे सदर विमा दावा दाखल केला विरुध्द पक्षकार क्र.1 ने पॉलिसीची रक्कम पुर्णपणे मंजूर करुन त्याचा धनादेश दिला पंरतु सदर पॉलीसीचा दुर्घटना हितलाभ म्हणजे अपघाताबददलचा डबल बेनिफिट मंजूर न करता दि.27/11/2012 रोजी पत्र देवून तक्रारदारास कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगण्यात आले त्यानुसार सदर कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली. मात्र विरुध्द पक्षकारने सदर दावा देण्यास टाळाटाळ केली व योग्य ती सेवा न देता गैरव्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणुन सदरची तक्रार दाखल करण्यात आली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदर विमा पॉलीसी क्र.985641043 व 984317612 पॉलीसच्या दुर्घटना लाभ रु.3,00,000/- व 50,000/- व्याजासह व मानसिक त्रासाबददल रु.5,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत दोषारोपपत्र क्र.128/12, फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोष्ट मार्टम रिपोर्ट, पॉलिसी क्र.985641043, व 984317612, विमा कंपनीने दिलेले पत्र, विरुध्द पक्षकारस दिलेली नोटीस इ. च्यापती अभिलेखावर दाखल केल्या आहेत.
2) यावर विरुध्द पक्षकार यांना नोटीसा काढल्या असता दि.13/06/2014 रोजी विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी आपले म्हणणे सादर केले. ते पुढीलप्रमाणे.
त्यांनी विमा पॉलीसी क्र.985641043 व 984317612 या पॉलिसी शिवाजी राठोड यांनी आपल्या हयातीत विरुध्द पक्षकाराकडून घेतल्याचे मान्य करुन त्याचे मासीक हप्ते पगारातून कपात होऊन विरुध्द पक्षकार यांच्याकडे जमा होत असल्याचे मान्य केले. विरुध्द पक्षकार पुढे असे म्हणतात की सदर दोन पॉलीसी अंतर्गत माहे मे.2012 चा देय हप्ता त्यांच्याकडे जमा झालेला नाही अथवा जमा करण्यात आलेला नाही व सदर पॉलीसीचे हप्ते त्यांच्याकडे जमा करण्याची जबाबदारी विमाधारक शिवाजी राठोड यांचीच होती. ते पुढे असेही म्हणतात की विमा पॉलीसी क्र.984317612 कलम 11 व पॉलिसी क्र.985641043 च्या कलम 10 मध्ये नमूद अटी व शर्तीस अधीन राहून जर विमा धारकास अपघाती मृत्यू आला तर ज्यादाची विमा रक्कम दुर्घटना हितलाभ म्हणून देण्याचे विरुध्द पक्षकार यांची जबाबदारी आहे. तथापि त्यासाठी नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पुर्तता करणे जरुरी आहे. विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म दाखल करते वेही अपघाता संदर्भात आवश्यक सर्व कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे विरुध्द पक्षकार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रारदार यांना दि.27/11/2012 व 18/03/2013 रोजी लेखी पत्र पाठवून आवश्यक कागदपत्र म्हणजेच 1) पोलीस चौकशीचा अंतिम अहवाल 2) मॅजिस्ट्रेटचे मृत्यूच्या कारणाबाबतचे मत 3) व्हीसेराचा अहवाल व 4) वाहन चालविण्याचा परवान्याची मागणी केली परंतु तक्रारदार यांनी फक्त पोलीस चौकशीचा अंतीम अहवाल व मॅजिस्ट्रेटचे मृत्यूच्या कारणाबाबतचे मत अशी दोनच कागदपत्रे दाखल केली. त्यामुळे हे म्हणणे चूकीचे आहे की तक्रारदार यांनी क्लेम संदर्भातील सर्व त्रुटी पुर्ण केल्या. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे आहे की तक्रारदार यांनी क्लेम संदर्भातील सर्व त्रुटी दुर केल्या तक्रारदार यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्याने दुर्घटना हितलाभासंबंधी निर्णय विरुध्द पक्षकार यांना घेता आला नाही.
3) तदनंतर तक्रारदार यांनी दुर्घटना हितलाभ मिळण्यासाठी दि.21/10/2013 रोजी त्यांचे वकिला मार्फत विरुध्द पक्षकार यांचेवर कायदेशीर नोटीस बजावली. सदर कायदेशीर नोटीसला विरुध्द पक्षकार यांनी दि.09/11/2013 रोजी उत्तर दिले. त्यात मागणी केल्याप्रमाणे तक्रारदाराने सी.ए. रीपोर्ट ड्रायव्हींग लायसेन्स दिल्याचे रेकॉर्डवर दाखल केले, सी.ए. रिपोर्टबाबत असमर्थता व्यक्त केली.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय .
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा.
मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचन
5) तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तक्रार दुर्घटना हितलाभ म्हणजे अपघाताबददल डबल बेनिफिट मंजूर / नामंजूर करण्याबाबत आहे. विपने दि.27/11/2012 रोजी तक्रारदारास दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने मागीतलेली सर्व कागदपत्रे दिली या संदर्भात हे पत्र पाहीले असता तक्रारदारास पोलीसांचा अंतीम चौकशी अहवाल, वाहन परवाना, मॅजीस्ट्रेटचे मृत्यू कारणाबाबतचे मत, सी.ए. रिपोर्ट (viscera) अहवाल पैकी नंतर दि.18/03/2013 च्या पत्रानंतर वाहन परवाना, व्हीसेरा अहवाल या दोन्हीची पुर्तता करण्याविषयी सुचविले आहे.
6) याच संदर्भात दाखल दाव्या सोबतची कागदपत्रे पाहिली असता त्यात तक्रारदारचा वाहन परवाना तसेच Viscera चा अहवाल मात्र दिसून येत नाही. मात्र हा अहवाल Charge sheet ची पाहणी करतांना वैदयकीय अधिकारीने अहवालात opinion as to the came probable comes of death “Head Injury however to bottles of viscera preserved for chemical analysis.’’ असे नमुद केले आहे याचा अर्थ Head injuryमान्य करुन अधिकची खात्री करण्यासाठी व्हिसेरा सी.ए. साठी पाठवलेला दिसतो. त्यामुळे सदरचा अहवाल तक्रारदाराच्या ताब्यात नाही त्यामुळे त्याला तो देता येणे शक्य नाही. तथापि विरुध्द पक्षकाराला अगदीच आवश्यकता असल्यास त्याला तोही मागवता येणे शक्य आहे. तथापि वैद्यकीय अधिकारीचा अहवाल तसेच charge sheet, तसेच FIR इतर सर्व बाबी या अपघात झाल्याबाबत स्पष्ट दाखवतात त्यामुळे व्हिसेरा अहवालामुळे एकूण तक्रारीत काही फरक पडत नाही.
7) तथापि अनावश्यक कागदपत्रांची मागणी विरुध्द पक्षकाराने केली असून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तक्रारदाराची तक्रार ही सत्य असल्याचे आढळून येते व तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघातानेच झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे नैसग्रीक मृत्यू झाल्यास मिळणारा विमा पॉलिसी रक्कम व अपघाती रक्कम दुर्घटना हित लाभ देणे विरुध्द पक्षकाराची जबाबदारी विरुध्द पक्षकारने स्विकारलेली असतांना देखील दुर्घटना हितलाभ या पॉलीसीची रक्कम मयत शिवाजी हाबू राठोड यांना त्यांची पॉलीसीच्या संदर्भात देय असतांना दिली गेली नाही. सदर डबल बेनीफीटबाबत अधिकार डिव्हीजन ऑफिसला आहे म्हणून विरुध्द पक्षकार क्र.2 यांनी विरुध्द पक्षकार क्र.1 कडे सदर पॉलिसी पाठवली अर्थात हे त्यांचे अंर्तगत ऑफिस व्यवहार असतांना याचा तक्रारदारचा विमा नाकारण्यात व स्विकारण्यात काही संबंधी नाही. त्यामुळे विप क्र.1 व विरुध्द पक्षकार क.2 ची ही संयुक्त जबाबदारी ठरते त्यामुळे दुर्घटना हित लाभ देण्यात यावे. या संदर्भात दाखल केलेले न्यायनिवाडे पैकी मा.राज्य आयोगाचा न्यायनिर्णय एल.आय.सी. विरुध्द संगीता साधू गोरड, प्रथम अपील A/09 1141 चे अवलोकन केले असता सदरचा न्यायनिवाडा हा ड्रायव्हींग लायसेंन्सच्या पुराव्या संदर्भातील असून तसे पुरावेही तक्रारदाराने रेकॉर्डवर दाखल केले असून या प्रकरणी वरील न्याय तत्व लागू करता येणार नाही. दुसरा एक न्याय निवाडा मॅनेजर एल.आय.सी. विरुध्द गिरजा संजीव जाधव प्रथम अपील क्र.542/2009 या मध्येही मा.राष्ट्रीय आयोग ड्रायव्हींग लायसेन्सचा पुरावा नसला तर पॉलीसी लाभ देता येणार नाही अशा स्वरुपाचा निष्कर्ष काढला आहेत. तथापि तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराने दि.03/05/2011 रोजीचे पत्र ज्यामध्ये दि.26/04/2008 ते 25/04/2020 या कालावधीसाठी मयताकडे असलेले वाहन चालविण्याचा विहीत पुरावा सादर केलेला आहे. त्यामुळे हाही न्यायनिवाडा या प्रकरणी वरीष्ठ न्यायालयाचा योग्य तो आदर राखून लागू करता येणार नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश देतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास विमा क्र.985641043 व 984317612 ची
दुर्घटना हित लाभ रु.3,00,000/- (रुपये तीन लक्ष फक्त) व रु.50,000/- (रुपये पंन्नास
हजार फक्त) मंजूर करत आहोत.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास वरील रक्कम द.सा.द.शे.9 व्याजसह
दि.03/12/2013 रोजी पासून दयावे.
3) विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर
करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द
पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.