-- आदेश --
(पारित दि. 31-01-2007)
द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा -
अर्जदार श्री. रामकिशन सुरजप्रसाद गुप्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून 8 पॉलिसी क्रं. 74287680 ते 74287687 रुपये 25,000/- प्रत्येकी या (14-31) या योजने खाली 1983 मध्ये घेतल्या. त्याचा विमा हप्ता हा दरवर्षी 09 डिसेंबरला भरावयाचा होता.
2. अर्जदार यांनी या पॉलिसींवर लोन घेतले होते. अर्जदार हे काही कारणास्तव दि. 09 डिसेंबर 1999 पासून विमा हप्ता न भरु शकल्यामुळे या 8 पॉलिसी कालबाहय झाल्या.
3. पॉलिसीतील तरतुदीप्रमाणे विमा हप्ता न भरल्यामुळे कालबाहय झालेल्या पॉलिसी या 5 वर्षाच्या आत संपूर्ण विमा हप्ता भरुन पुनर्जिवित करता येतात. त्याप्रमाणे अर्जदार यांनी दि. 06.12.2004 रोजी गैरअर्जदार यांच्या कार्यालयाला भेट देऊन कालबाहय झालेल्या पॉलिसी पुनर्जिवित करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना डॉ. प्रिथयानी व डॉ. ओझा यांच्याकडून ईसीजी रिपोर्ट आणण्यास सांगितले. अर्जदार यांनी दि. 06.12.2004 व दि. 07.12.2004 रोजी सदर डॉक्टरचे रिपोर्ट डॉ. ठाकून यांच्या दवाखान्यातील केलेल्या रक्त तपासणी अहवालासह दि. 08.12.2004 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे सादर केले. तथापि गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सांगितले की, अर्जदार यांचे सर्व कागदपत्र विभागीय कार्यालय नागपूर येथे मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक आहे.
4. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे पॉलिसी पुनर्जिवित करण्याबाबत अनेकदा चौकशी केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
5. अर्जदार यांनी विनंती केली आहे की, अर्जदार यांच्या 8 पॉलिसी हया दि. 06.12.2004 पासून कोणतेही दंड अथवा व्याज न लावता पुनर्जिवित करण्याचा आदेश व्हावा. अर्जदार यांना रुपये 25,000/- रक्कम शारीरिक व मानसिक त्रासासाठी मिळावी व ग्राहक तक्रारीचा खर्च हा गैरअर्जदार यांच्यावर लादण्यात यावा.
6. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी बयान निशाणी क्रं. 7 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदार यांची पॉलिसी पुनर्जिवित करण्याबाबतचे कागदपत्र हे मंजुरीसाठी विभागीय कार्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. अर्जदार यांनी 5 वर्षा नंतर सदर कागदपत्र गैरअर्जदार यांच्याकडे सादर केले आहेत. अर्जदार यांचा पॉलिसींचे पुनर्जिवित करण्यासाठी देण्यात आलेला अर्ज मंजूर अथवा नामंजूर करणे हा सर्वस्वी गैरअर्जदार यांचा अधिकार आहे. अर्जदार यांनी पॉलिसी पुनर्जिवित करण्याचा अर्ज हा उशिरा दिला आहे. अर्जदार यांनी फक्त पॉलिसी पुनर्जिवित करण्याचा अर्ज दिला परंतु त्यांनी विमा हप्त्याच्या व्याजासह भरणा केलेला नाही. अर्जदार विमा हप्ता भरण्यास नेहमीच अनियमित होते व पॉलिसी ही कालबाहय झाल्यानंतर शेवटच्या क्षणी ती पुनर्जिवित करण्याचे अर्ज देण्याची त्यांना सवय आहे. अर्जदार यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
कारणे व निष्कर्ष
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा , शपथपत्र व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार यांचा पॉलिसी पुनर्जिवित करण्याबाबतचा अर्ज याच्यावर गैरअर्जदार यांनी अजुन ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. गैरअर्जदार यांनी .दि. 11.10.2005 चे असिस्टंट सेक्रटरी, सीआरएम यांनी लिहिलेले पत्र रेकॉर्डवर दाखल केलेले आहे. त्या पत्रामध्ये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, सदर प्रकरण हे सेंट्रल ऑफिसकडे पाठविण्यात आले आहे व त्यांच्या निर्णयाची वाट पाहण्यात येत आहे.
8. विद्यमान न्याय मंचाने दि. 28.12.2006 रोजी निशाणी क्रं. 1 वर असा आदेश पारित केला होता की, पॉलिसी पुनर्जिवित करण्याच्या प्रक्रियेच्या संबंधातील दस्ताऐवज रेकॉर्डवर दाखल केलेले नाही.
9. गैरअर्जदार यांच्या तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, अर्जदार यांनी विमा हप्त्याचे पैसे हे व्याजासह भरलेले नाही व डॉ. ओझा यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर तंज्ञाचे मत आवश्यक आहे अशी नोंद आहे. मात्र गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना याबाबतीत कोणतेही पत्र दिल्याचे निदर्शनास येत नाही.
10. गैरअर्जदार यांनी 8 पॉलिसीशी संबंधित “ ORDINARY REVIVAL QUOTATION ” दि. 04.12.2004 हे रेकॉर्डवर दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी असा युक्तिवाद केला आहे की, पॉलिसी पुनर्जिवित करण्यात येण्यासाठी Ordinary Revival Quatation मध्ये नमूद असलेली रक्कम भरण्यास अर्जदार यांना सांगण्यात आले होते. परंतु या 8 Ordinary Revival Quatation ची प्रत अर्जदार यांना देण्यात आल्याचा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही.
11. पॉलिसी पुनर्जिवित करणे अथवा पॉलिसी पुनर्जिवित करण्याचे नाकारणे हा सर्वस्वी गैरअर्जदार यांचा अधिकार आहे. परंतु पॉलिसी पुनर्जिवित करण्याचा अर्ज आल्यानंतर त्यावर एक वर्षाच्या वर कालावधी होऊन सुध्दा निर्णय न घेणे हा गैरअर्जदार यांचा सेवा दोष आहे.
12. अर्जदार यांनी दि. 09.12.1999 पासून विमा हप्ता भरला नव्हता, मात्र त्यांनी दि. 06.12.04 रोजी पॉलिसी पुनर्जिवित करण्याचा अर्ज दिलेला आहे व दि. 08.12.04 ला गैरअर्जदार यांनी सांगितलेल्या वैद्यकीय अधिका-यांकडे तपासणी करुन त्याचे अहवाल गैरअर्जदार यांना सादर केले आहेत. अर्जदार यांनी कालबाहय झालेल्या पॉलिसी हया पुनर्जिवित करण्याचा अर्ज हा 5 वर्षाच्या आत गैरअर्जदार यांच्याकडे केला याबाबत वाद नाही.
अशी स्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. अर्जदार यांच्या 8 पॉलिसी क्रं. 74287680 ते 74287687 या नियमाप्रमाणे पुनर्जिवित करण्यात याव्यात. मात्र त्यावर दि. 06.12.2004 चे नंतर व्याज अथवा दंड लावू नये.
2. गैरअर्जदार यांनी आदेशाचे पालन आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे. अन्यथा गैरअर्जदार हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.