निकालपत्र
(दि.20.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
1. अर्जदार ही मयत श्रावण जळबा जहिरे याची पत्नी आहे. मयत श्रावण यांनी त्यांचे जिवन काळात गैरअर्जदार यांचेकडून जिवन सरल नावाची विमा पॉलिसी घेतलेली आहे. त्याचा पॉलिसी क्रांक 987788941 असा आहे. सदरील विमा हा दिनांक 15.09.2011 रोजी घेतलेला असून त्याचा मॅच्युरीटी दिनांक 15.09.2027 असा आहे. सदरील पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.10,368/- असा होता. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पतीकडून प्रथम वार्षिक हप्ता रक्कम रु.10,368/- दिनांक 231.09.2011 रोजी स्विकारलेला आहे. त्यानंतर अर्जदाराच्या पतीने पॉलिसीचा दुस-या वर्षाचा हप्ता रक्कम रु.10,368/- अधिक विलंब शुल्क रक्कम रु.492.50 असे एकूण रक्कम रु.10,860/- दिनांक 13.03.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेले आहे.
दरम्यानच्या काळात अर्जदाराचे पती अचानकपणे आजारी पडून त्यांचा आजार वाढत गेला. त्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य नव्हते. अंथरुणावर खिळून होते. त्यामुळे त्यांचे इलाजावर बराच खर्च झाला. त्यामुळे हप्त्याची तारीख कधी होती याची कल्पना त्यांना आलेली नाही. तसेच गैरअर्जदार यांनीही अर्जदाराचे पतीस हप्ता भरणेबाबत वेळेच्या आधी सुचना दिलेली नाही. अर्जदाराचे पतीचे आजारपणामुळे दिनांक 02.07.2014 रोजी निधन झाले. अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा विमा कालावधीत झालेला असल्याने पतीच्या मृत्यु नंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी क्लेम फॉर्म दाखल केला. क्लेम फॉर्मसोबत अर्जदाराने पॉलिसीची मुळ प्रत व आवश्यक ते सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दिनांक 23.07.2014 रोजी अर्जदारास गैरअर्जदाराकडून पॉलिसीचा हप्ता/प्रिमियम प्राप्त झालेला नसल्याने विमा पॉलिसी लॅप्स झालेली असल्याचे कळविले. गैरअर्जदार यांनी पॉलिसीचा हप्ता भरणेसाठी अर्जदाराचे पतीस एकदाही कल्पना दिलेली नाही. तसेच हप्ता वेळेवर व मुदतीत भरुन घेण्याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी निष्काळजीपणा दाखवून विमा रक्कम देणेस वेळेवर गैरअर्जदार यांनी अचानक विविध कारणे दाखवून अर्जदारास विमा रक्कम देता येत नाही असे सांगितले व अर्जदारास त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली. त्यामुळे अर्जदार यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून जिवन सरल विम्याची रक्कम रु.2,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह तसेच पॉलिसीचा राहिलेला एक हप्ता रक्कम रु.10,368/- विलंब शुल्कासहीत विमा रक्कम रु.2,00,000/- मधून कपात करण्याचा आदेश गैरअर्जदार यांना द्यावा. तसेच तसेच अर्जदार यांना झालेल्या मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व दावा खर्च रक्कम रु.5,000/- देण्याचा गैरअर्जदारास आदेश करावा अशी विनती तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
4. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक असून त्यांनी दिनांक 15.09.2011 रोजी गैरअर्जदार यांचेकडे जिवन सरल नावाची पॉलिसी घेतली होती असून पॉलिसीचा मॅच्युरीटी दिनांक 15.09.2027 असा आहे हे गैरअर्जदार यांनी मान्य केलेले आहे. पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.10,368/- असल्याचे गैरअर्जदार यांना मान्य आहे. गैरअर्जदार व अर्जदार यांचेत पॉलिसी घेतेवेळेस करार झालेला असून पॉलिसी घेतल्यापासून ते पॉलिसी कालावधीत संपेपर्यंत नियमित हप्ते भरणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे व नियमित हप्ते ठरवुन दिलेल्या तारखेस न भरल्यास सदरील पॉलिसी रद्य होईल व पॉलिसीच्या नियम व अटी मान्य केलेल्या आहेत. अर्जदाराने रक्कम रु.10,368/- दिनांक 13.03.2013 भरलेले असल्याचे दाखल पावतीवरुन स्पष्ट होते. घेतलेली आहे. परतु दिनांक 15.09.2013 चा हप्ता अर्जदाराने भरलेला नाही. अर्जदाराचे पतीने दिनांक 15.09.2013 चा हप्ता थकीत ठेवला होता. पॉलिसीच्या नियमानुसार ग्रेस कालावाधीमध्ये विमा हप्ता भरला नसल्याने विमा पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे विमाधारकाची पॉलिसी ही लॅप्स कंडीशनमध्ये गेली. त्यामुळे पॉलिसीतील नियम क्रमांक 2 प्रमाणे अर्जदारास गैरअर्जदार काहीही देणे लागत नाही. पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे प्रत्येक विमाधारकाने ठरलेल्या तारखेला वेळेवर हप्ता भरणे बंधनकारक आहे, प्रत्येक तारखेला त्याची कल्पना देणे गैरअर्जदार यांचेवर बंधनकारक नाही. गैरअर्जदार यांची हप्ता भरुन घेण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी कुठलाही निष्काळजीपणा केलेला नाही. अर्जदाराने विनंती केलेली मागणी पॉलिसीच्या नियम व अटीला धरुन नाही. अर्जदाराचा दिनांक 15.9.2013 रोजीचा हप्ता डयु असल्यामुळे पॉलिसी लॅप्स कंडीशनमध्ये गेली विमाधारकाचा मृत्यु दिनांक 02.07.2014 रोजी झाला.
10 महिन्याच्या कालावधी संपलेला आहे. एक महिन्याचा ग्रेस कालावधी सोडून विमाधारकाने हप्ता भरलेला नसल्यामुळे अर्जदाराची पॉलिसी लॅप्स कंडीशनमध्ये गेलेली असल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडून कोणतेही देणे लागत नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनती गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
7. अर्जदाराचे पती मयत श्रावण यांनी गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 15.09.2011 रोजी जिवन सरल ही पॉलिसी घेतलेली असून सदर पॉलिसीचा Death benefit sum assured under main plan Rs. 2,00,000/- असा असल्याचे दाखल पॉलिसीवरुन दिसून येते व ही बाब दोन्ही बाजूस मान्य आहे. अर्जदाराचे पतीचा म्हणजेच विमाधारकाचा हप्ता वार्षिक असून पुढील वर्षी दिनांक 15.09.2012 रोजी पॉलिसीचा हप्ता देणे होता. परंतु अर्जदाराचे पतीने सदरील हप्ता विलंब शुल्कसहीत दिनांक 13.03.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेला आहे व गैरअर्जदार यांनी सदीरल रक्कम पॉलिसीच्या दुस-या हप्त्यापोटी स्विकारलेली आहे. अर्जदाराचे म्हणणे नुसार अर्जदाराचे पती हे आजारी पडल्यामुळे त्यांना तिसरा हप्ता भरणे शक्य झालेले नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दुसरा वार्षिक हप्ता हा दिनांक 15.03.2013 रोजी स्विकारलेला असल्याने पुढील हप्ता हा गैरअर्जदार यांनी विलंब शुल्कासहीत स्विकारु शकतात असे यावरुन निदर्शनास येते. अर्जदाराचे पतीचे मृत्यु पश्चात अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराची पॉलिसी लॅप्स कंडीशनमध्ये असल्याने कोणतीही रक्कम देणे लागत नाही असे अर्जदारास कळविलेले असल्याचे लेखी जबाबामध्ये नमुद केलेले आहे. परंतु तसे केल्याचे दिसून येत नाही. कुठलेही पत्र अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी वादग्रस्त पॉलिसी व त्याच्या नियम व अटी दाखल केलेल्या आहेत. सदरील नियम व अटींचे अवलोकन केले असता पॉलिसीमध्ये “ death occurs in the first policy year, any premium that has been due but not paid and premiums if any failing due before the next policy anniversary shall be deducted from the claim amount.” अशी तरतूद असल्याचे दिसून येते. यावरुन विमाधारकास हप्ता देणे असतांना जर विमाधारकाचा मृत्यु झाला तर देणे असलेल्या हप्त्याची रक्कम वजा करुन विमा रक्कम देण्याची तरतूद आहे. सदरील प्रकरणामध्ये विमाधारकाने गैरअर्जदार यांचेकडे 2 वार्षिक हप्ते जमा केलेले असून तिसरा वार्षिक हप्ता विमाधारक गैरअर्जदारास देणे लागत होता. वरील तरतुदीनुसार गैरअर्जदार यांनी विमाधारकाचा तिसरा वार्षिक हप्त्याची रक्कम विलंब शुल्कासह कपात करुन अर्जदारारस विमा रक्कम देणे बंधनकारक होते. परंतु गैरअर्जदार यांनी तसे न करुन सेवेत त्रुटी दिलेली आहे व अर्जदाराचा क्लेम अतिशय निष्काळजीपणाने हाताळलेला असल्याचे निदर्शनास येते. अर्जदार ही विमा पॉलिसीची रक्कम रु.2,00,000/- पॉलिसीचा तिसरा वार्षिक हप्ता विलंब शुल्कासह कपात करुन मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणणेच्या पृष्टयर्थ मा.सर्वोच्च न्यायालय, मा. राज्य आयोग,पंजाब व मा. राज्य आयोग,छत्तीसगड यांचे निवाडे दाखल केलेले आहेत. सदरील निवाडयांचे अवलोकन केले असता ग्रेस पिरियड कालावधीमध्ये विमा हपता भरला नाही तर विमाधारकाची पॉलिसी लॅप्स झालेली आहे असे मत नोंदविलेले असल्याचे दिसून येते. परंतु प्रस्तुत प्रकरणात हप्ता डयु असल्यानंतर विमा रक्कम देणेबद्दलची तरतूद पॉलिसीच्या नियम व अटीमध्ये असल्यामुळे गैरअर्जदार यांनी दाखल केलेले निवाडे या प्रकरणास लागू होत नाही असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे. आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्क्रम रक्कम रु.2,00,000/- तिसरा वार्षिक हप्ता रक्कम रु.10,368/- + विलंब शुल्क अशी रक्कम कपात करुन आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2500/- व दावा खर्च म्हणून रक्कम रु.2500/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात
दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.