निकालपत्र
(दि.06.08.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार क्र. 1 चे पती व अर्जदार क्र. 2 चे पिता नामे अजयकुमार वर्मा हे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने दिनांक 15.11.2013 रोजी झाला. मृत्युच्या वेळेस अर्जदार क्र. 1 चे पती त्यांचे कर्तव्य बजावत होते. मृत्यु पुर्वी अजयकुमार वर्मा यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा करार क्रमांक 982515411 रक्कम रु.50,000/- व विमा करार क्रमांक 933873601 रक्कम रु.3,00,000/- असे करार केलेले आहेत. त्यापैकी गैरअर्जदार यांनी विमाधारकाचा मृत्यु नंतर विमा करार क्रमांक 982515411 चा दुर्घटना लाभ दिनांक 16.10.2014 रोजी अर्जदार यांना दिला. विमाधारकाने दिनांक 30.03.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे काढलेल्या विमा कराराच्या अटी व शर्तीनुसार दिनांक 30.03.2014 रोजी विमा हप्ता रक्कम रु.3960/- भरणा केलेले आहे. अर्जदार क्रं. 1 यांनी पतीच्या निधनाबाबतचा चा दुर्घटना लाभ देणे विषयी विनंती करणारा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला. दिनांक 04.12.2014 रोजीचे पत्रानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा पस्ताव नाकारलेला आहे. विमा प्रस्ताव नाकारतांना गैरअर्जदार यांनी Deliberately incorrect statement म्हणून जाणुनबुजून खोटी माहिती दिली असे नमुद केलेले आहे. गैरअर्जदार यांनी विमाधारकाचे मृत्यु चा दुर्घटना लाभ देण्याचे नकार देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी पतीचे निधनाबद्दलचा विमा करार क्रमांक 933873601 प्रकार व कालावधी 149-16 प्रमाणेचा दुर्घटना लाभ अर्जदार यांना देण्यास गैरअर्जदार यांना आदेश द्यावेत. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार हे वकीलामार्फत हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचे लेखी जबाबातील म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदार क्र. 1 चे मयत पती अजयकुमार वर्मा यांचा दिनांक 15.11.2013 रोजी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यांनी आपल्या हयातीत गैरअर्जदार यांचेकडून विमा पॉलिसी क्रमांक 982515411 व 983873601 अनुक्रमे दिनांक 15.03.2000 व दिनांक 28.03.2013 जोखीम रक्कम रु.50,000/- व रक्कम रु.3,00,000/- घेतलेली असून पहिल्या पॉलिसीचा लाभ रक्कम रु.65,094/- अर्जदारास देण्यात आलेला आहे. याबद्दल गैरअर्जदार यांना कुठलाही वाद नाही. अर्जदाराची मयत पतीची पॉलिसी क्रमांक 983873601 चा विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांनी दिनांक 21.12.2014 रोजीचे पत्रानुसार नाकारलेला आहे. विमा दावा नाकारण्याचे कारण deliberate misstatement असे आहे. याबाबत गैरअर्जदार यांनी असे स्पष्टीकरण देतात की, पहिली पॉलिसी अस्तित्वात असतांना 13 वर्षानंतर दुसरी पॉलिसी घेण्यात आलेली आहे. ती पॉलिसी काढतेवेळेस प्रस्ताव फॉर्ममधील माहितीची स्थिती लक्षात घेता अडचण नसल्यामुळे त्या पॉलिसीचा लाभ देण्यात आला. परंतु दुसरी पॉलिसीचा प्रस्ताव फॉर्म भरतेवेळेस तो 55 दिवस आजारी असतांनाही त्यातील कलम 11(डी) व कलम 11(इ) मधील प्रश्नांची उत्तरे नाही असे हेतूपुरस्सर खोटी दिलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीची फसवणुक केलेली आहे. गैरअर्जदार यांनी रुग्णालय कार्ड,एम्लॉयर सर्टीफीकेट व वैद्यकीय प्रमाणपत्र अवलोकनार्थ दाखल केलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी पतीच्या मृत्युनंतर गैरअर्जदार यांचेकडे विमा पॉलिसी क्रमांक 982515411 व विमा पॉलिसी क्रमांक 933873601 या पॉलिसींची रक्कम गैरअर्जदार यांना मागीतली असता गैरअर्जदार यांनी विमा पॉलिसी क्रमांक 982515411 या पॉलिसीची रक्कम अर्जदारास दिली. परंतु अर्जदाराच्या पतीने दिनांक 30.03.2014 रोजी काढलेली विमा पॉलिसी क्रमांक 933873601 या पॉलिसीची रक्कम अर्जदारास दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी विमा पॉलिसी क्रमांक 933873601 या पॉलिसीची रक्कम न देण्याचे कारण असे सांगितले आहे की, विमाधारकाने पॉलिसी घेतेवेळेस जाणूनबुजून सत्य माहिती लपवून ठेवली. गैरअर्जदार यांनी विमाधारकाने दिनांक 18.10.2012 ते दिनांक 09.12.2012 या कालावधीमध्ये वैद्यकीय कारणास्तव रजा घेतलेली होती व आजारपणासाठी उपचार घेतलेले होते. याबद्दलचे कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमाधारकाने वैद्यकीय उपचार HTN with RTLI या कारणासाठी वैद्यकीय उपचार पॉलिसी घेण्यापुर्वी घेतलेले असून सदर कालावधीमध्ये आजारपणाची रजा ही घेतलेली आहे व ही बाब पॉलिसी घेतांना विमाधारकाने प्रपोजल फॉर्ममध्ये नमुद केलेले नाही. यावरुन विमाधारकाने सत्य माहिती गैरअर्जदार यांचेपासून लपवून ठेवलेली असल्याचे सिध्द होते. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा योग्य कारणामुळे नाकारलेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.