निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्र तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाला हे इन्शुरन्स कंपनी आहे. 2 तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडून पाच लाखाची Kiran Bima Policy no.892903142 घेतली. त्याचा कालावधी दि.10.08.2005 ते दि.10.08.2024 होता. त्यासाठी तक्रारदारांना रक्कम रु.6,926/- एवढा सहामाही हप्ता भरावे लागत होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी सदर पॉलीसीचे रक्कम रु.6,926/- चे दोन हप्ते नियमित भरले. 3 तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सामनेवाला यांनी दि.03.07.2006 रोजी पत्राव्दारे तक्रारदारांना हप्त्याची रक्कम ठरविताना परिगणती चूकीची झाल्याचे कळविले. यामुळे भरलेल्या हप्त्यांवरील फरक (difference in premium) रु.5,425/- भरावयास सांगितले. 4 तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सामनेवाला हे तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेल्या करारास बांधील आहेत. सदर पॉलीसी प्रमाणपत्रांवर सहामाही हप्ता रु.6,926/- दर्शविला आहे. त्यानंतर सामनेवाला यांच्याकडून तक्रारदारांची चुक नसताना हप्त्याबद्दलची मागणी करणे हे चुकीचे आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जर हप्त्याची आकारणी चुकीची झाली आहे हे लक्षात आल्यानंतर सामनेवाला यांनी विमा हप्ता स्विकारावयास नको होते. तक्रारदारांनी सामनेवाला यांना आधी आकारलेला हप्ता रु.6.926/- पॉलीसी घेण्यास तयार असल्याचे कळवले व सतत सामनेवाला यांच्याशी संपर्क साधले तेव्हा सामनेवाला यांनी दि.22.12.2006 रोजी पत्राव्दारे त्यांचा विमा रद्द केल्याचे कळविले व पत्रांसोबत सामनेवाला यांनी रक्कम रु.6,926/- चे दोन धनादेश अंतिम प्रदान म्हणून पाठविले. सामनेवाला यांच्या या कृतीमुळे तक्रारदारांस मानसिक त्रास झाला म्हणून तक्रारदाराने या मंचापुढे आपली तक्रार नोंदवून खालीलप्रमाणे मागणी केल्या. 5 सामनेवाला यांनी सदर पॉलीसी त्याच अटी शर्थीवरती व आधी ठरलेल्या कराराप्रमाणे हप्ता आकारुन पॉलीसीचे सुरु ठेवावे व तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- दयावी अशी सूचना सामनेवाला यांना दयावे. 6 मंचाकडून पाठविलेल्या नोटीसीनूसार सामनेवाला हजर झाले व त्यांनी तक्रार अर्जास उत्तर दाखल केले. 7 सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांना दि.10.08.2005 पासून ते सन 2024 पर्यंत रक्कम रु.5,00,000/- चा विमा किरण पॉलीसी दिली होती व त्यासाठी रक्कम रु.6,926/- चा हप्ता याप्रमाणे आकारणी झालेली होती. परंतु त्यानंतर, ऑडीटरने हप्त्याची आकारणी चुकीचे झाल्याचे दाखवून दिले. हप्ता रक्कम रु.6,926/- च्या ऐवजी रक्कम रु.12,351/- असल्याचे दाखवून दिले, म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांशी संपर्क साधून हप्त्याच्या रक्कमेतील फरकाची भरण्यास दि.03.07.2006 च्या पत्राव्दारे कळविले. 8 सामेनवाला यांच्या म्हणण्यानुसार, सामनेवाला यांना नंतर असेही लक्षात आले कि, तक्रारदारांना आधी दिलेली विमा पॉलीसी क्र.981995468 चे नूतनीकरण सामनेवाला यांच्या शाखा क्र.914 कडून दि.06.01.2005 रोजी करण्यात आले होते व त्यासाठी त्यांच्याकडून रक्कम रु.3,750/- अधिक सहामाही हप्ता आकारला जात होता. परंतु तक्रारदारंनी वादातील असलेल्या पॉलीसीसाठी proposal form भरताना वरील गोष्टी स्पष्ट केल्या नव्हत्या (लपवल्या होत्या). जर तक्रारदारांनी त्या गोष्टीचा खुलासा केला असता तर त्यांना वयाच्या 41 व्या वर्षी रक्कम रु.10,000/- विमा दयावा लागला असता व त्यासाठी त्यांना SBT -12 ची चाचणी दयावी लागणार होती, म्हणून तक्रारदारांनी महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा दिला नाही म्हणून वादातील असलेली पॉलीसी प्रथमपासूनच अस्तित्वात नसल्याचे तक्रारदारांना दि.17.03.2007 च्या पत्रांव्दारे कळविले. (निशाणी क्र.2). 9 सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हे मंचापुढे स्वच्छ हेतुने आलेले नाहीत. याउलट, त्यांनी खोटे व चुकीचे म्हणणे मांडले आहे व तक्रारदांरास कोणतेही कारण नाही, म्हणून तक्रारदार कोणत्याही मागणीस पात्र नसल्यामुळे तक्रार अर्ज खारीज करावे अशी मागणी केली. 10 तक्रारदारांनी कैफियतीस आपले प्रतिउत्तर दाखल करुन व सामनेवाला यांचे म्हणणे नाकारले. 11 तक्रार अर्ज, सामनेवाला यांची कैफियत, तक्रारदारांचे प्रतिनिवेदन व दोन्हीं पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे व त्यांचा लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले व तसेच दोन्हीं पक्षाचे युक्तीवाद ऐकला, त्यावरुन, निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | उत्तरे | 1 | तक्रारदार सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | नाही | 2 | तक्रारदार सामनेवाला यांच्याकडून त्यांनी घेतलेली विमा पॉलीसी त्याच अटी व शर्थीप्रमाणे व ठरलेल्या हप्त्याने मागणी करु शकतात काय ? | नाही | 3 | तक्रारदार सामनेवाला यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,00,000/- मागू शकतात काय ? | नाही | 4 | आदेश ? | तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो. |
कारणमिमांसाः- 12 तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडून रक्कम रु.5,00,000/- ची दि.04.08.2005 ते दि.10.08.2024 या कालावधीसाठी न्यु विमा किरण पॉलीसी क्र.892903142 घेतली. त्यासाठी तक्रारदारांना सहामाही हप्ता रक्कम रु.6,926/- इतकी रक्कम भरावी लागणार होती. त्यानुसार, तक्रारदारांनी दोन सहामाही हप्त्याची रक्कम भरली व त्यानंतर, हप्ता आकारणी करताना परिगणतीमध्ये चूक झाल्याचे लेखा परिक्षकाने ऑडीटरने निर्दशनास आणून दिल्यामुळे, सामनेवाला यांनी तक्रारदारांना हप्ता रक्कमेमध्ये रक्कम रु.5,425/- फरक असल्याचे दि.03.07.2006 च्या पत्राव्दारे कळविले ही बाब दोन्हीं पक्षांना मान्य आहे. 13 त्यानंतर, तक्रारदारांनी त्यांना वाढीव रक्कमेचे सहामाही हप्ता मान्य नसल्याचे सामनेवाला यांना दि.05.08.2006 व दि.15.01.2007 च्या पत्राव्दारे कळविले तसेच आधी पॉलीसी कराराप्रमाणे ठरलेल्या सहामाही हप्ता देऊन पॉलीसी सुरु ठेवण्यास सांगितले. 14 तक्रारदारांनी वाढीव हप्ता न भरल्यामुळे सामनेवाला यांनी दि.22.12.2006 रोजी तक्रारदारांनी पॉलीसी क्र.892903142 ही पॉलीसीची रद्द झाली. त्यानुसार, तक्रारदारांना सामनेवाला यांनी दि.22.12.2006 च्या पत्राव्दारे कळविले. दि.22.12.2006 चे पत्र तक्रार अर्जासोबत दाखल केले आहे. 15 तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सामनेवाला यांनी विमा पॉलीसीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पॉलीसीच्या कराराच्या अटी व शर्थी दोन्हीं पक्षांना बंधनकारक असतात. विमा पॉलीसीच्या प्रमाणपत्रावर सहामाही हप्ता रक्कम रु.6,962/- एवढी रक्कम नमूद केलेली असताना सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून वाढीव रक्कमेची मागणी करणे हे गैर असून बेकायदेशीर आहे. वाढीव हप्ता रक्कम न भरल्यामुळे पॉलीसी रद्द केली यात सामनेवाला यांची कमतरता दिसून येते. 16 यावर, सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार, ऑडीटरने हप्त्याची आकारणी करताना परिगणतीमध्ये चुक झाल्याने पुन्हा हप्त्याची आकारणी करुन सहामाही हप्त्यामध्ये रु.5,425/- चे फरक पडत असल्याचे निर्दशनास आणून दिले, म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांना हप्त्याच्या फरकाची रक्कम कळविले. ती फरकाची रक्कम भरण्यास दि.03.07.2006 च्या पत्राव्दारे कळविले परंतु तक्रारदारांनी हप्ता फरकाची रक्कम भरली नाही म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांची पॉलीसी क्र.892903142 हे रद्द केल्याचे दि.22.12.2006 च्या पत्राव्दारे कळविले. त्यानंतर, सामनेवाला यांच्या असे निर्दशनास आले कि, सदर पॉलीसीचे proposal form भरताना तक्रारदार यांनी ठोक प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली नाहीत. तक्रारदारांनी आधी घेतलेल्या पॉलीसीबद्दल माहिती पूरविली नाही. सामनेवाला यांची दिशाभूल करण्याकरिता चुकीची माहिती दिली. सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार, नवीन पॉलीसी घेताना पॉलीसी रक्कम ठरवितांना आधीच्या पॉलीसीची माहिती आवश्यक असते. पॉलीसी कराराच्या कलम-5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, जर पॉलीसीधारकाने चूकीची माहिती दिली असेल किंवा महत्त्वाची माहिती लपविली असेल तर Insurance Policy Act, 1938 च्या कलम-45 नुसार पॉलीसी प्रथमपासूनच आस्तित्वात रहात नाही. (Null and Void). प्रपोझला फॉर्म मधील माहिती बरोबर न दिल्यामुळे / चुकीची दिल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांची पॉलीसी क्र.892903142 ही सुरुवातीपासून अस्तित्वातच नसल्याचे (Null and Void) जाहीर केले, त्यानुसार, दि.17.03.2007 च्या पत्राव्दारे तक्रारदारांना कळविले. दि.17.03.2007 चे पत्र कैफियतीसोबत दाखल केले आहे. 17 तक्रारदारांनी तक्रार अर्ज दि.14.05.2008 रोजी दाखल केले. तक्रारदारांना सामनेवाला यांच्याकडून दि.17.03.2007 चे पत्र, तक्रार दाखल करण्या आधीच मिळाले होते. त्यांची पॉलीसी क्र.892903142 हे अस्तित्वातच नाही हे माहित असूनही तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जात यांचा जाणून बुजून उल्लेख केलेला नाही. यावरुन, तक्रारदारांचे तक्रार अर्ज दाखल करण्यामागचा हेतु स्वच्छ नाही हे स्पष्ट होते. पॉलीसी सुरुवातीपासून अस्तित्वात नाही असे जाहीर केल्यानंतर त्या संबंधीचे सर्व व्यवहार संपर्क संपुष्टात येते. तक्रारदारांनी अस्तित्वात नसलेल्या पॉलीसीसंबंधी तक्रार दाखल केली आहे. पॉलीसी अस्तित्वात नसल्यामुळे तक्रारदार ग्राहक नाहीत, म्हणून तक्रारदारांचा अर्ज अमान्य करण्यात येतो. वरील विवेचनावरून, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश (1) तक्रार अर्ज विनाखर्च अमान्य करण्यात येतो. (2) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं विनामुल्य दोन्हीं पक्षकारांना पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |