मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष //- आदेश -// (पारित दिनांक – 15/10/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने त्याचा मुलगा भूमेश्वर गोविंदराव मोटघरे ह्याच्या नावाने रु.55,000/- भरुन विमा पॉलिसी क्र.974412792 ही दि.28.01.2006 रोजी घेतली होती. सदर पॉलिसीमध्ये नामनिर्देशित व्यक्ती म्हणून तक्रारकर्त्याचे नाव होते. तक्रारकर्त्याने नियमितपणे विमा पॉलिसीचे हफ्ते भरले होते. भूमेश्वर गोविंदराव मोटघरे यांचा मृत्यू दि.26.06.2008 रोजी झाल्याने तक्रारकर्त्याने विमा रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदाराकडे विमा दावा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दाखल केला. वारंवार भेटूनही विमा रक्कमेबाबत काहीही स्पष्ट होत नसल्याने शेवटी तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला कायदेशीर नोटीस पाठविला असता गैरअर्जदाराने सदर विमा दावा हा उशिरा दाखल असल्याने तो निकाली काढण्यास काही कालावधी लागेल असे नमूद करुन नोटीसला उत्तर दिले. परंतू तीन महिन्यांच्या वर कालावधी लोटूनही विम्याची रक्कम न मिळाल्याने तक्रारकर्त्याने तक्रार मंचासमोर दाखल करुन विमा पॉलिसीची रक्कम बोनस रकमेसह, तक्रारीचा खर्च, नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदाराने सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व परिच्छेदनिहाय उत्तरात नमूद केले आहे की, भूमेश्वर गोविंदराव मोटधरे यांच्या नावाने त्यांच्याकडे पॉलिसी होती व सदर पॉलिसी धारकाचा मृत्यू हा 26.06.2008 रोजी सिकलसेल या आजाराने झाला. नामनिर्देशित व्यक्ती म्हणून तक्रारकर्त्याने विमा दावा दाखल केला व त्याला गैरअर्जदाराने वैद्यकीय कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले. परंतू त्यांनी जुने वैद्यकीय कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. म्हणून दि.02.01.2010 च्या पत्रांन्वये त्याचा विमा दावा नामंजूर करण्यात आला. सदर पत्र तक्रारकर्त्याला पाठविण्यात आलेले आहे. आपल्या अधिकच्या कथनात गैरअर्जदाराने नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने पॉलिसी घेतांना मुलाला कुठलाही आजार नसल्याचे नमूद केले आहे व पॉलिसीधारकाचा मृत्यू हा 17 व्या वर्षी झालेला आहे. विमा नियमानुसार जर पॉलिसी घेतल्यावर नजीकच्या काळात अनैसर्गिक मृत्यू झाला तर तो ‘अर्ली क्ेलम’ होतो व त्याची संपूर्ण चौकशी होते. मृतकाच्या बाबत अशी चौकशी केली असता त्याला जन्मापासून सिकलसेल आजार असल्याचे व त्यावर तेव्हापासून उपचार होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे, म्हणून त्याचा दावा हा नामंजूर करण्यात आला. तक्रारकर्त्याने स्वतःच पॉलिसी घेतांना माहिती लपवून ठेवल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्ता व त्यांचे वकील गैरहजर. गैरअर्जदारांचा यूक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज व गैरअर्जदाराने दाखल केलेल्या निवाडयांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून विमा हफ्ता भरुन पॉलिसी घेतल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. 5. सदर प्रकरणात गैरअर्जदाराचा बचाव असा आहे की, तक्रारकर्त्याने पॉलिसी घेतांना खोटी माहिती पुरविली आणि त्या आधारावर पॉलिसी घेतली. तसेच सदर पॉलिसीसंबंधीचा करार हा विश्वासाचा करार असतो आणि अशी खोटी माहिती देणे चुकीचे आहे व तो करार यामुळे रद्द होतो. या संबंधात महत्वाची बाब तपासणे गरजेचे आहे, ती अशी की, पॉलिसी ही सन 2005 च्या प्रस्तावानुसार तयार झालेली आहे आणि दोन वर्षाचा कालावधीनंतर मृत्यू आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकरणात विमा कायदा 1938 चे कलम 45 लागू होते. सदर कलमाप्रमाणे दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेली पॉलिसी, ही तीमध्ये पॉलिसी घेतांना केलेल्या विधानासंबंधीचा आक्षेप घेता येत नाही व त्याच्या सत्यतेबाबत अविश्वास दर्शविता येत नाही. जोपर्यंत विमा कंपनी हे सिध्द करीत नाही की, संबंधितांनी जाणून-बुजून खोटी माहिती दिलेली आहे व माहिती लपवून ठेवलेली आहे. या संबंधात विमा कंपनीने, संबंधिताने पॉलिसी घेतांना जाणिवपूर्वक खोटी माहिती देऊन, ती पॉलिसी घेतलेली होती हे सिध्द करणे गरजेचे आहे व त्याची संपूर्ण जबाबदारी विमा कंपनीची आहे. सदर प्रकरणात विमा कंपनीने जे काही दस्तऐवज दाखल केले आहे, त्या दस्तऐवजासंबंधी संबंधित डॉक्टरांचा प्रतिज्ञालेख इ. दाखल केलेले नाही व योग्य पुरावा दिलेला नाही आणि मा. राष्ट्रीय आयोगाने I (2003) CPJ 50 (NC), SENIOR DIVISIONAL MANAGER, LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA & ORS. Vs. SMT. J. VINAYA या निवाडयात लपवून ठेवलेली माहिती ही रास्त पुराव्याअभावी जर विमा कंपनीने सिध्द केली नसेल तर विमा दावा नाकारता येत नाही असे नमूद केले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी अशा योग्य व कायद्याने स्विकारण्यायोग्य पुराव्या अभावी हे दस्तऐवज विचारात घेऊन तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराची फसवणूक केली असा निष्कर्ष काढता येत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली विमा दाव्याची मागणी मंचाचे मते रास्त आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला विमा रक्कम रु.55,000/- ही विमा दावा निकाली काढल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 02.01.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे. 6. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतू प्रत्यक्षात त्याचे काय नुकसान झाले याबाबत स्पष्ट कथन किंवा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नसल्याने मंच सदर मागणी नाकारीत आहे. उपरोक्त विवेचनावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला विमा रक्कम रु.55,000/- ही विमा दावा निकाली काढल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 02.01.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे अन्यथा आदेशीत संपूर्ण रकमेवर गैरअर्जदार द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्यास बाध्य राहील. 5) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |