जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 536/2008
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-19/04/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/09/2013.
श्रीमती शोभाबाई राजेंद्र चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.बागवान गल्ली, मु.पो.ता.पारोळा,
जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. ब्रँच मॅनेजर,
भारतीय जिवन बिमा निगम, ब्रँच अंमळनेर.
2. डिव्हीजनल मॅनेजर,
भारतीय जिवन बिमा निगम,
नाशिक डिव्हीजन, नाशिक.
3. क्षेत्रीय प्रबंधक,
भारतीय आर्युविमा महामंडळ,
पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, योगक्षेम,
पुर्व विभाग, जिवन बिमा मार्ग,मुंबई. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.उज्वल बी.मिसर वकील.
विरुध्द पक्ष 1 व 2 तर्फे श्री.पी.जी.मुधडा वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदाराचे पतीचे निधनानंतर विमा क्लेम न देऊन केलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर तक्रारदाराने दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे पती राजेंद्र दयाराम चौधरी यांनी ते हयात असतांना विरुध्द पक्ष विमा कंपनीकडुन विमा पॉलीसी क्र.967406591 दि.04/12/2002 रोजी काढली होती. तक्रारदाराचे पती दि.6/12/2003 रोजी मौजे पारोळा येथे मयत झाले तसेच त्यांचेवर दि.7/12/2003 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांची पुर्तता करुन दाखल केलेला विमा क्लेम विमा कंपनीने दि.8/2/2006 रोजीचे पत्राने तक्रारदाराचे पती दि.8/11/2003 रोजी मयत झालेले असुन त्यांनी मृत्युचे वेळी 5/03 चा हप्ता भरलेला नसल्यामुळे विमा पॉलीसी रक्कम देता येत नाही असे खोटे कारण सांगुन विमा पॉलीसीची रक्कम देण्यास नकार दिला. सबब विमा पॉलीसी क्र. 967406591 अन्वये देय असलेली संपुर्ण रक्कम व्याजासह मिळावी व तक्रारदाराचा झालेला संपुर्ण खर्च वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली.
4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदाराचे पती व विरुध्द पक्ष यांचेत विमा करार संपुष्टात आलेला होता व त्यांचे ग्राहक व विक्रेता असे संबंध नव्हते. तक्रारदाराचे पतीने त्यांचे मृत्युआधी विरुध्द पक्षास विमा हप्ता भरलेला नव्हता. विमा पॉलीसी घेतलेनंतर राजेंद्र चौधरी यांनी दि.28/5/2003 पासुन विमा पॉलीसीचे हप्ते भरलेले नाहीत. विमा पॉलीसीचा देय हप्ता देय तारखेपासुन एक महीन्याचे आंत न भरल्यास विमा पॉलीसी ही आपोआप बंद झाल्याचे ग्राहय धरले जाते. सदरकामी तक्रारदाराचे पतीने मे,2003 व नोव्हेंबर,2003 चे हप्ते भरलेले नव्हते त्यामुळे पॉलीसी रद्य झालेली होती. विमा पॉलीसीची रक्कम मिळावी म्हणुन तक्रारदाराने दि.23/12/2003 रोजी अर्ज केला होता तसेच तक्रारदाराने त्यांचे अर्जात राजेंद्र चौधरी हे दि.6/12/2003 रोजी मयत पावल्याचे नमुद केलेले होते तसेच दि.10/11/2003, मे 2003 व नोव्हेंबर,2003 चे विम्याचे हप्ते भरलेले असल्याचे नमुद केले होते. विरुध्द पक्षाचे अधिका-यांनी मयत राजेंद्रच्या मृत्युबाबत चौकशी केली असता राजेंद्र हा दि.08/11/2003 रोजी मयत झालेला होता. विमा कंपनीकडुन पैसे मिळविण्याचे इराद्याने दि.10/11/2003 रोजी राजेंद्र चे नावाने विमा हप्ता भरल्याचे आढळुन आले होते तसेच ज्या डॉक्टरांनी मयत राजेंद्रचे मृत्युचे वेळेस मयत चिकित्सा प्रमाणपत्र भरुन दिलेले होते त्यांनी विरुध्द पक्षास लेखी कळवुन राजेंद्र हा दि.08/11/2003 रोजी मयत झाल्याचे व दि.6/12/2003 तारीख अर्जदार शोभाबाई चे सांगण्यावरुन लिहीली असल्याचे कळविले आहे. तसेच गंधमुक्तीचा कार्यक्रम दि.18/11/2003 रोजी केल्याचे दिलीप गोपाळ भंडारी या पुरोहीतांनी विरुध्द पक्षास लेखी कळविले आहे. अशा परिस्थितीत मे व नोव्हेंबर,2003 चे हप्ते न भरल्याने पॉलीसी पुर्ण बंद झालेलेली होती व याची तक्रारदारास जाणीव असल्याने केवळ मृत्युची चुकीची तारीख देऊन व मयताच्या नावाने त्याचे मृत्युनंतर विम्याची रक्कम भरुन राजेंद्र चौधरी हे जिवंत असल्याचा भास निर्माण केला व त्याचा मृत्यु दि.6/12/2003 रोजी झाल्याचे भासवुन विमा रक्कम मिळविण्याचे प्रयत्न केल्याचे दिसुन येतात. वास्तविक तक्रारदाराचे पतीने दि.8/11/2003 पर्यंत विमा पॉलीसीचे हप्ते भरलेले नसल्याने पॉलीसी बंद झालेली होती त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नामंजुर केलेला आहे. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा अर्ज खर्चासह रद्य करण्यात यावा व नुकसानी दाखल रु.10,000/- तक्रारदाराकडुन मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्षांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, याचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्षाने तक्रारदाराचा विमा क्लेम चुकीचे
कारणास्तव नाकारुन सेवेत त्रृटी केली आहे काय? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 व 2 - तक्रारदाराची तक्रार पाहता तक्रारदाराचे पतीचे निधन झाल्यानंतर विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम चुकीचे कारण दर्शवुन नाकारला अशी आहे. याकामी विरुध्द पक्ष विमा कंपनीने हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केलेले असुन तक्रारदाराचे पतीने मे व नोव्हेंबर,2003 चे हप्ते न भरल्याने विमा पॉलीसी बंद झालेली होती तसेच तक्रारदाराचे पतीचे निधनाची तारीख ही तक्रार अर्जात कथन केल्याप्रमाणे नसुन ती प्रत्यक्षात वेगळीच आहे असे नमुद करुन विमा क्लेम योग्य कारणास्तव फेटाळल्याचे प्रतिपादन विरुध्द पक्षाचे वकीलांनी या मंचासमोरील युक्तीवादात केले.
7. तक्रारदाराने तक्रार अर्जात कथन केलेप्रमाणे तिचे पतीचा मृत्यु 06/12/2003 रोजी झाल्याचे नगर परिषद कार्यालय, पारोळा यांचे मृत्यु प्रमाणपत्र नि.क्र.3 लगत दाखल केले असुन त्यावरुन तक्रारदाराचे पतीचा मृत्यु तिने तक्रार अर्जात कथन केलेप्रमाणे दि.6/12/2003 रोजी झाल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराचे पतीने मृत्युचे अगोदर म्हणजे माहे नोव्हेंबर,2003 चा हप्ता दि.10/11/2003 रोजी भरणा केल्याचे विरुध्द पक्षाचे नि.क्र.3 लगत दाखल पावतीचे छायाप्रतीवरुन स्पष्ट होते. तसेच त्यावर पुढील प्रिमियम भरणा करण्याचा दि.05/2004 असा नमुद आहे तथापी त्याचे आत म्हणजे दि.06/12/2003 रोजी तक्रारदाराचे पतीचे निधन झाल्याचे तक्रार अर्जासोबत दाखल कागदपत्रांवरुन दिसुन येते.
8. याउलट विरुध्द पक्ष विमा कंपनीने याकामी हजर होऊन ज्या डॉक्टरांनी मयत राजेंद्रचे मृत्युचे वेळेस मयत चिकित्सा प्रमाणपत्र भरुन दिलेले होते त्यांनी विरुध्द पक्षास लेखी कळवुन राजेंद्र हा दि.08/11/2003 रोजी मयत झाल्याचे व दि.6/12/2003 तारीख अर्जदार शोभाबाई चे सांगण्यावरुन लिहीली असल्याचे कळविले आहे. तसेच गंधमुक्तीचा कार्यक्रम दि.18/11/2003 रोजी केल्याचे दिलीप गोपाळ भंडारी या पुरोहीतांनी विरुध्द पक्षास लेखी कळविले आहे. अशा परिस्थितीत मे व नोव्हेंबर,2003 चे हप्ते न भरल्याने पॉलीसी पुर्ण बंद झालेलेली होती व याची तक्रारदारास जाणीव असल्याने केवळ मृत्युची चुकीची तारीख देऊन व मयताच्या नावाने त्याचे मृत्युनंतर विम्याची रक्कम भरुन राजेंद्र चौधरी हे जिवंत असल्याचा भास निर्माण केला व त्याचा मृत्यु दि.6/12/2003 रोजी झाल्याचे भासवुन विमा रक्कम मिळविण्याचा तक्रारदाराचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन विरुध्द पक्षाचे वकीलांनी या मंचासमोर हजर होऊन केले. तथापी सदर म्हणण्याचे पृष्ठयर्थ संबंधीत डॉक्टरचे लेखी पत्र, पुरोहीताचे पत्राची प्रत तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रारदाराचा मृत्यु दि.08/11/2003 रोजी झाला याबाबतचे मृत्यु प्रमाणपत्र वगैरे महत्वाचे कागदोपत्री पुरावे म्हणण्यासोबत दाखल केलेले नाहीत.
9. वरील एकंदर विवेचनावरुन तक्रारदाराचे पतीने माहे नोव्हेंबर,2003 चा विमा हप्ता भरलेला असतांनाही तसेच तक्रारदाराचे पतीचा मृत्यु दि.06/12/2003 रोजी झालेला असल्याची वस्तुस्थिती मृत्यु प्रमाणपत्राप्रमाणे समोर असतांनाही विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम चुकीचे कारण दर्शवुन नाकारुन तक्रारदारास प्रदान केलेल्या सेवेत त्रृटी केल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे. तक्रारदार ही विरुध्द पक्षाकडुन विमा पॉलीसी क्र.967406591 ची नियमाप्रमाणे संपुर्ण देय रक्कम क्लेम नाकारल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही मुद्या क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजुर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विमा कंपनी यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार हिस तिचे पतीचे विमा पॉलीसी क्रमांक 967406591 ची विमा क्लेमची नियमानुसार देय असलेली संपुर्ण देय रक्कम विमा क्लेम नाकारल्याची दि.08/02/2006 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह या निकालाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत द्यावी.
( क ) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विमा कंपनी यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार हिस तक्रार अर्जाचे खर्चादाखल रक्कम रु.1,000/- (अक्षरी रक्कम रु.एक हजार मात्र ) या निकालाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत द्यावे.
ज ळ गा व
दिनांकः- 07/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.