द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
सामनेवाला क्र.2 विजया लक्ष्मी शेट्टी या एल.आय.सी.च्या एजंट आहेत. सामनेवाला क्र.2 या तक्रारदारांची मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत एल.आय.सी. ची पॉलिसी देण्यासाठी गेल्या होत्या. त्या शाळेतील वर्गशिक्षीकेने सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांच्या घराचा पत्ता दिला व त्यानंतर सामनेवाला क्र.2 या तक्रारदारांच्या घरी नोव्हेंबर, 2003 मध्ये आल्या. तक्रारदारांची एकुलती एक मुलगी मतिमंद आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना त्यांच्या मतिमंद मुलीसाठी एल.आय.सी.ची ‘जीवन आधार’ पॉलिसी विकत घेण्याची विनंती केली. तक्रारदारांनी त्या पॉलिसीचे माहितीपत्रक सामनेवाला क्र.2 यांचेकडे मागितले असता सामनेवाला क्र.2 यांनी सदरचे पॉलिसीसंबंधीचे माहितीपत्रक आपणाकडे नसल्याचे त्यांना सांगितले व त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा असे सांगितले. सामनेवाला क्र.2 यांनी एल.आय.सी. ने ‘जीवन आधार’ ही पॉलिसी अपंग मुलांसाठी काढली असून जर तक्रारदारांनी 10 वर्षे एल.आय.सी.च्या वरील पॉलिसीचे प्रिमिअम भरले तर पुढील वर्षापासुन दर महिन्याला त्यांच्या मुलीला ठराविक रक्कम मिळत जाईल व त्यावर तिला एल.आय.सी. काही अतिरिक्त रककम सुध्दा देईल सांगितले. तक्रारदारांनी यापूर्वीच एल.आय.सी. च्या ब-याच पालिसीस घेतल्या होत्या व परिपक्वतेनंतर त्या पॉलिसींचे पैसेही तक्रारदारांना मिळाले होते. तक्रारदारांचा एल.आय.सी.वर विश्वास असल्यामुळेत्यांनी सामनेवाला यांचेकडे ‘जीवन आधार’ पॉलिसीसंबंधी माहितीपत्रक देण्यासाठी आग्रहाने मागणी केली नाही.
2) जीवन आधार विमा पॉलिसीचे 10 वर्षे प्रिमिअम भरल्यानंतर दर महिन्याला आपल्या अपंग मुलीला पैसे मिळतील या सामनेवाला क्र.2 यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या दोन पॉलिसी घेतल्या. सदर पॉलिसींचे नं.902297760 व 902297776 असे आहेत. तक्रारदारांनी वरील पॉलिसीचे प्रिमियम सन् 2003 ते 2006 पर्यंत नियमितपणे भरले.
3) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सन् 2006 मध्ये त्यांच्या ओळखीतील एका एजंटकडे सदर पॉलिसीच्या प्रिमियमचे चेक भरण्यासाठी दिले असता त्या एजंटकडून कळले की, सदर पॉलिसीला मॅच्युरिटी पेमेंट नाही. विमा पॉलिसीधारकचा मृत्यु झाल्यानंतर म्हणजेच तक्रारदाराचा मृत्यु झाल्यानंतरच पॉलिसीचे पैसे त्यांच्या मुलीला मिळू शकतील. वरील माहिती मिळाल्यानंतर तक्रारदारांना मानसिक धक्का बसला. तक्रारदारांनी त्यानंतर एल.आय.सी.च्या अधिका-यांना तसेच व्यवस्थापकांना बरीच पत्र पाठवूनसुध्दा एल.आय.सी. अधिका-यांनी किंवा व्यवस्थापकांनी कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्या पत्रास उत्तरही दिले नाही. म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. तक्रारदारांनी वरील दोन विमा पॉलिसीपोटी भरलेले सर्व पैसे सामनेवाला यांनी व्याजासहित व नुकसानभरपाईसहित परत करावेत अशी तक्रारदारांची विनंती आहे. तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ तक्रारदारांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन त्यांचा सामनेवाला यांचेबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराच्या छायांकीत प्रती, विमा पॉलिसीच्या छायांकीत प्रत, इत्यादी दाखल केल्या आहेत.
4) सामनेवाला क्र.1 यांनी कैफीयत दाखल केली असून तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. सामनेवाला क्र.2 या सामनेवाला क्र.1 च्या एजंट आहेत ही बाब सामनेवाला क्र.1 यांना मान्य आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नोव्हेंबर, 2003 मध्ये तक्रारदारांना दोन ‘जीवन आधार’ पॉलिसी त्यांच्या मतिमंद मुलीसाठी दिल्या हेही सामनेवाला यांना मान्य आहे. तथापि, सामनेवाला 2 यांनी तक्रारदारांना ‘जीवन आधार’ पॉलिसीसंबंधी चुकीची माहिती दिली ही बाब नाकारली आहे. सामनेवाला क्र.1 यांच्या म्हणण्याप्रमाणे वरील दोन्ही जीवन आधार पॉलिसी तक्रारदारांना देण्यापूर्वी त्यासंबंधीची माहिती पुस्तिका तक्रारदारांना सामनेवाला क्र.2 यांनी दिली होती. तक्रारदारांनी प्रिमिअम भरल्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना दोन्ही ‘जीवन आधार’ पॉलिसी पाठविल्या होत्या. त्यामध्ये पॉलिसीसंबंधीच्या सर्व अटी व शर्ती नमूद केल्या आहेत. आय.आर.डी.ए.च्या मार्गदर्शकतत्वाप्रमाणे तक्रारदारांना जर पॉलिसीच्या अटी व शर्ती पसंद पडल्या नाहीत तर पॉलिसी 15 दिवसाच्या कालावधीत सदरची पॉलिसी परत करता येईल ही बाब निदर्शनास आणली होती परंतु तक्रारदारांनी दोन्ही पॉलिसी परत केल्या नाहीत.
5) तक्रारदारांनी दि.22/04/2007 रोजी पत्र पाठवून त्यांच्या दोन्ही पॉलिसी बंद करुन चांगल्या अटी व शर्ती असणा-या पॉलिसी द्याव्यात अशी विनंती केली, तसेच दि.26/08/07 चे पत्राने त्यांच्या पॉलिसी बंद करुन त्यांनी भरलेले पैसे परत करावेत अशी विनंती केली. तक्रारदारांनी त्यासोबत मूळ विमा पॉलिसी परत केल्या नव्हत्या. दि.21/01/2008 च्या पत्राने तक्रारदारांनी त्यांच्या पॉलिसी दुस-या प्रकारच्या कमी मुदतीच्या व निश्चित मॅच्युरिटी व्हॅल्यू असणा-या पॉलिसीमध्ये रुपांतरीत कराव्यात अशी विनंती केली होती. सामनेवाला क्र.1 यांनी दि.19/05/2008 चे पत्राने तक्रारदारांना देण्यात आलेली जीवन आधार पॉलिसी प्लान नं.114 ही अपंग मुलांच्या फायदयासाठी दिलेली असल्यामुळे सदर पालिसीचे दुस-या पॉलिसीत रुपांतर करता येणार नाही असे कळविले. सामनेवाला क्र.1 यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता नाही त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेविरुध्द कोणतीही दाद मागता येणार नाही व सदर तक्रारअर्ज खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे असे म्हटले आहे.
6) सामनेवाला क्र.2 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. तक्रारअर्जात त्यांच्याविरुध्द केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत व त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासाहित रद्द होणेस पात्र आहे असे सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे आहे. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळी ते तक्रारदारांच्या घरी नोव्हेंबर, 2003 मध्ये गेले त्यावेळी ‘जीवन आधार’ पॉलिसीसंबंधीची सर्व माहिती त्यांनी तक्रारदारांना दिली. तक्रारदारांनी वरील पॉलिसीचे प्रिमियम 10 वर्षे भरल्यानंतर पुढील प्रिमिअम भरण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर वरील पॉलिसीप्रमाणे विमाधारकाच्या मुलीस विम्याची रक्कम मिळेल असे सांगितले होते. तक्रारदारांना त्यांच्या मतिमंद मुलीस दरमहा ठराविक उत्पन्न मिळेल याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदारांनी स्वतःहून त्यांच्याकडून वरील जीवन आधारच्या दोन पॉलिसी घेतल्या. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले आरोप सामनेवाला क्र.2 यांनी स्पष्टपणे नाकारले आहेत. त्यांनी तक्रारदारांकडून वरील पॉलिसीसंबंधीची माहिती लपवून ठेवली नव्हती असे सामनेवाला क्र.2 चे म्हणणे आहे. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांना पॉलिसी डाक्यूमेंट मिळाल्यानंतर त्यातील अटी व शर्तींची माहिती तक्रारदारांना झाली होती. जर त्या अटी व शर्तीं तक्रारदारांना मान्य नव्हत्या तर तक्रारदारांना त्या पॉलिसी परत करता आल्या असत्या परंतु तक्रारदारांनी सदरच्या पॉलिसी परत केल्या नाहीत. तक्रारदारांनी मुद्दामहून त्यांच्याविरुध्द खोटे आरोप दाखल करुन सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला असल्यामुळे तो खर्चासहित रद्द करणेत यावा असे सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे आहे.
7) तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा पॉलिसीसाठी केलेल्या अर्जाच्या छायांकीत प्रती, त्यासोबतचे इतर कागदपत्रे व तक्रारदारांना देण्यात आलेल्या ‘जीवन आधार’ पॉलिसीच्या छायांकीत प्रती, तसेच तक्रारदाराना दि.29/05/08 रोजी पाठविलेल्या पत्राची छायांकीत प्रत दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तक्रारदार श्री.सत्यभाष साळगांवकर, सामनेवाला क्र.1 तर्फे वकील नवीनकुमार तसेच सामनेवाला क्र.2 स्वतः यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात येवून प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
8) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर -नाही.
मुद्दा क्र.2 –तक्रारदारांना तक्रारअर्जात मागितल्याप्रमाणे सामनेवाला यांचेकडून दाद मागता येईल काय ?
उत्तर - नाही.
कारणमिमांसा
स्पष्टीकरण मुद्दा क्र.1– सामनेवाला क्र.2 विजया लक्ष्मी टी. शेट्टी या सामनेवाला क्र.1 आयुर्विमा महामंडळाच्या एजंट आहेत ही बाब तक्रारदार, सामनेवाला क्र.1 व 2 यांना मान्य आहे. तसेच तक्रारदारांची मुलगी मतिमंद आहे ही बाब सुध्दा उभयपक्षकारांना मान्य आहे. सामनेवाला क्र.2 सौ.विजया लक्ष्मी शेट्टी या तक्रारदारांची मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत एल.आय.सी. ची पॉलिसी देण्यासाठी गेल्या. त्या शाळेतील वर्गशिक्षीकेने सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांच्या घराचा पत्ता दिला व त्यानंतर सामनेवाला क्र.2 या तक्रारदारांच्या घरी गेल्या ही बाब सामनेवाला क्र.2 यांना मान्य आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांच्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी एल.आय.सी.ची ‘जीवन आधार’ पॉलिसी विकत घ्यावी असे तक्रारदारांना सुचविले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी त्या पॉलिसीचे माहितीपत्रक सामनेवाला क्र.2 यांना मागितले असता सामनेवाला क्र.2 यांनी सदरचे पॉलिसीसंबंधीचे माहितीपत्रक आपणाकडे नसल्याचे त्यांना सांगितले. सामनेवाला क्र.2 यांनी एल.आय.सी.ने ‘जीवन आधार’ ही पॉलिसी मतिमंद मुलांसाठी काढली असून 10 वर्षे एल.आय.सी.च्या वरील पॉलिसीचे प्रिमिअम भरले तर पुढील वर्षापासुन दर महिन्याला त्यांच्या मुलीला ठराविक रक्कम मिळत जाईल व त्या शिवाय तिला एल.आय.सी. काही अतिरिक्त रककम सुध्दा देईल असे सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी स्वतः व त्यांच्या पत्नीने सामनेवाला क्र.2 यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून दोघांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या पॉलिसी घेतल्या व सदर पॉलिसीचे प्रिमिअम सन् 2003 ते 2006 पर्यंत भरले.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तक्रारदारांच्या घरी जावून तक्रारदारांना ‘जीवन आधार’ पॉलिसीची माहिती दिली. त्या पॉलिसीचे माहितीपत्रक तक्रारदारांना देण्यात आले. त्या पॉलिसीच्या अटी व शर्ती व फायदे तक्रारदारांना समजावून सांगितले. 10 वर्षे पर्यंत सदर पॉलिसीचे प्रिमिअम नियमितपणे भरावे लागतील असेही सांगितले. सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे पॉलिसीधारकाचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या अपंग (मतिमंद) असणा-या मुलीस दरमहा काही रक्कम मिळेल असे सांगितले. वरील सर्व माहिती समजावून सांगितल्यानंतरच तक्रारदारांनी प्रत्येकी एक अशा दोन‘जीवन आधार’पॉलिसी त्यांच्या मतिमंद मुलीसाठी घेतल्या.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सन् 2006 मध्ये त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका एजंटकडे वरील पॉलिसीच्या प्रिमिअमचे चेक भरण्यासाठी दिले असताना वरील पॉलिसीप्रमाणे मॅच्युरिटी पेमेंट नाही व विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतरच त्यांच्या मुलीस सदर पॉलिसीचे पैसे मिळतील ही बाब सांगितली. त्यामुळे त्यांनी वरील पॉलिसीचे प्रिमिअम त्यावेळेपासून भरण्याचे बंद केले. सामनेवाला क्र.2 यांनी जीवन आधार पॉलिसीप्रमाणे विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतरच लाभार्थींना विमा पॉलिसीचे पैसे मिळतील तसेच या पॉलिसीला मॅच्युरिटी पेमेंट नाही ही बाब सांगितली नव्हती हा तक्रारदारांचा आरोप फेटाळला आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 यांच्या म्हणण्याप्रमाणे आय.आर.डी.ए.च्या गाईडलाईन्स प्रमाणे जीवन आधार पॉलिसीची प्रत तसेच तिच्या अटी व शर्ती तक्रारदारांना पाठविण्यात आल्या. तक्रारदारांना सदर विमा पॉलिसीच्या अटी शर्ती पसंत नसतील तर सदर पॉलिसी सामनेवाला यांना परत पाठवावी असे तक्रारदारांना कळविण्यात आले होते. तक्रारदारांना सदर पॉलिसीच्या अटी शर्ती मिळाल्यानंतर तसेच त्या अटी व शर्ती तक्रारदारांनी वाचल्यानंतर सदरच्या पॉलिसी सामनेवाला यांना परत केल्या नाहीत उलट तक्रारदारांनी त्या पॉलिसीचे प्रिमिअमचे हप्ते सन् 2006 पर्यंत निमयमितपणे भरले. सामनेवाला वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे वरील परिस्थिती विचारात घेता तक्रारदारांना ‘जीवन आधार’ पॉलिसीच्या अटी व शर्ती मान्य होत्या असे दिसून येते.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना जीवन आधार पॉलिसीसंबंधीची चुकीची माहिती दिली असा तक्रारदारांनी आरोप केला आहे. त्याच्या पुष्टयर्थ तक्रारदारांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. उलटपक्षी सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तक्रारदारांना जीवन आधार पॉलिसीच्या अटी व शर्तींची संपूर्ण माहिती व पुस्तिका दिली होती व सदर पॉलिसीच्या अटी व शर्ती तक्रारदारांनी मान्य करुन सदर पॉलिसी स्वीकारली व नंतर काही वर्षे नियमितपणे प्रिमिअमही भरले. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला आहे. तक्रारदारांना सामनेवाला क्र.2 यांनी जीवन आधार पॉलिसीसंबंधी चुकीची माहिती दिली हा आरोप तक्रारदारांना सिध्द करता आला नाही.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जीवन आधार पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर लाभार्थींस रक्कम मिळू शकते ही बाब निदर्शनास आल्यानंतर सामनेवाला क्र.1 विमा कंपनीस मॅच्युरिटी पेमेंट असणारी दुसरी पॉलिसी द्यावी अशी विनंती केली. सामनेवाला वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे जीवन आधार पॉलिसी ही मतिमंद/अपंग मुलांसाठी एल.आय.सी.ने काढली असून त्या पॉलिसीचे रुपांत इतर पॉलिसीत करता येत नाही ही बाब सामनेवाला यांनी तक्रारदारांना स्पष्ट करुन सांगितली. तक्रारदारांनी त्यानंतर भरलेले पैसे परत मागितले तथापि, तक्रारदारांनी प्रिमिअमपोटी भरलेले सर्व पैसे तक्रारदारांना नियमाप्रमाणे परत करता येत नाही ही बाब तक्रारदारांना समजावून सांगितली आहे. तक्रारदारांनी मागितल्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांना नवीन स्वरुपाची जीवन आधार पॉलिसीच्या ऐवजी जीवन आधार एन्डोमेंट पॉलिसी दिली नाही किंवा तक्रारदारांनी भरलेले पैसेही परत केले नाहीत यावरुन सामनेवाला क्र.1 यांच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती तक्रारदारांच्यावर बंधनकारक आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांना सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करता आले नाही असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देणेत येते.
स्पष्टीकरण मुद्दा क्र.2 - तक्रारदारांना सामनेवाला यांच्या विरुध्द केलेले आरोप सिध्द करता आले नाहीत, तसेच सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करता आली नाही. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती तक्रारदारांच्यावर बंधनकारक असल्यामुळे तक्रारदारांना तक्रारअर्जात मागितलेली दाद सामनेवाला यांचेविरुध्द मागता येणार नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देणेत येते.
वरील कारणास्तव खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रारअर्ज क्रमांक 128/2009 रद्द करणेत येत आहे.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. सदर आदेशाची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना देणेत यावी.