:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–19 नोव्हेंबर, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष भारतीय जिवन बिमा निगम आणि इतर विरुध्द त्याचे मुलाचे मृत्यू पःश्चात विम्याची रक्कम न दिल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याने त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील प्रदिप रंगारी, वय-14 वर्ष याचे साठी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विमा पॉलिसी क्रं-978880913 दिनांक-28/09/2014 रोजी काढली होती, त्याचे मुलाचा मृत्यू दिनांक-01/08/2015 रोजी झाला आणि त्यामुळे तक्रारकर्ता हा कायदेशीर वारसदार वडील या नात्याने विमा योजने मध्ये लाभार्थी आहे. सदर विमा पॉलिसीचा हप्ता हा त्रैमासिक रुपये-5669/- असून विमा रक्कम रुपये-5,00,000/- होती. पॉलिसी घेते वेळी स्वप्नील याचे आरोग्य चांगले होते. पॉलिसी काढल्या पासून दिनांक-18/06/2015 पर्यंत एकूण चार विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचा मुलगा स्वप्नील यास गेटवेल हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च ईन्सिटयुट, धंतोली, नागपूर येथे अचानक आजारी पडल्याने भरती करण्यात आले आणि तेथे त्याचा दिनांक-01/08/2015 रोजी मृत्यू झाला. त्याचे मृत्यू नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीकडे आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा सादर केला. परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 ने त्याचा विमा दावा विमा प्रस्तावाचे वेळी माहिती दडपल्याचे कारणा वरुन दिनांक-31/08/2016 रोजीचे पत्रान्वये नाकारला, त्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 आणि क्रं 3 ला वकीलाचे मार्फतीने कायदेशीर नोटीस दिनांक-27/10/2016 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविली आणि ती त्यांचेवर तामील झाली. विरुध्दपक्ष क्रं 2 आणि क्रं 3 ने नोटीसला चुकीचे उत्तर पाठवून विमा राशी देण्याची जबाबदारी नाकारली. तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा स्वप्नील याची पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं 4 एजन्टचे मार्फतीने काढली होती, त्यावेळी स्वप्नील याचे आरोग्य चांगले असल्याची एजन्टची खात्री पटल्याने त्याने विमा कंपनीच्या पॅनेल वरील डॉक्टरां कडून त्याची वैद्दकीय तपासणी केली नाही, जेंव्हा की साकोली येथे विमा कंपनीचे वैद्दकीय पॅनल उपलब्ध होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 4 एजन्टचे कृती बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांची जबाबदारी येते. पॉलिसी काढते वेळी स्वप्नील याला “Pontin glioma” (Cancer) आजार नव्हता, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 त्याचा विमा दावा नाकारु शकत नाही परंतु विरुध्दपक्षानीं त्याचा विमा दावा नाकारुन त्याला दोषपूर्ण सेवा दिली असल्याने तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी विम्याची रक्कम रुपये-5,00,000/- विमाधारकाचे मृत्यू दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्दावी.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई विरुध्दपक्षां कडून मिळावी आणि योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने देण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) भारतीय जीवन बिमा निगम तर्फे मंचा समक्ष एकत्रित लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उततरात नमुद केले की, दिनांक-01/08/2015 रोजी तक्रारकर्त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील याचा मृत्यू झाला. पॉलिसी काढते वेळी तक्रारकर्त्याचा मुलगा स्वप्नील वय-14 वर्ष हा अज्ञान असल्याने तक्रारकर्ता हा विमा प्रस्तावक (Proposer) होता तसेच तक्रारकर्त्याने त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील प्रदिप रंगारी याचे साठी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विमा पॉलिसी क्रं-978880913 दिनांक-28/09/2014 रोजी काढली होती, त्याचा त्रैमासिक हप्ता होता व विमा राशी रुपये-5,00,000/- एवढया रकमेची होती या बाबी वादातीत नसल्याचे नमुद केले. तसेच दिनांक-28/09/2014 ते 28/06/2015 पर्यंत पॉलिसीपोटी एकूण 04 त्रैमासिक हप्त्याची रक्कम भरणा केली होती ही बाब देखील मान्य असल्याचे नमुद केले. विम्याची रक्कम विमाधारक अथवा प्रस्तावक याला मिळणार होती. तक्रारकर्त्याचा मुलगा हा दिनांक-01/08/2015 रोजी गेटवेल हॉस्पीटल, नागपूर येथे मृत्यू पावल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याचे नोटीसला त्यांनी उत्तर दिल्याची बाब मान्य केली परंतु त्यांचे उत्तर चुकीचे होते ही बाब नामंजूर केली. विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष क्रं 4 एजंटचे मार्फतीने काढली होती हे मान्य केले परंतु पॉलिसी काढते वेळी विमाधारक स्वप्नील याची शारिरीक आणि मानसिक प्रकृती चांगली असल्याची बाब नाकारली. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी असे नमूद केले आहे की, विमा प्रस्ताव हा विमाधारकाने दिलेल्या माहितीचे आधारावर तसेच त्यावेळी केलेल्या वैद्दकीय तपासणीचे अहवालावर स्विकारल्या जातो, त्यावेळी विमा प्रस्तावात घोषीत केलेली माहिती योग्य असल्याचे विश्वासाचे आधारावर विमा प्रस्ताव स्विकारल्या जातो. प्रस्तुत प्रकरणात पॉलिसी काढते वेळी तक्रारकर्त्याचा अज्ञान मुलगा याचे वैद्दकीय परिक्षण विरुध्दपक्ष विमा कंपनीचे पॅनेल वरील तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आलेले नाही. आपल्या विशेष कथनात विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने विमा प्रस्ताव दिनांक-12/10/2014 रोजी सादर केला होता व तो विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात दिनांक-14/10/2014 रोजी पाठविण्यात आला. तक्रारकर्त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील याचे नावे न्यु एंडोमेन्ट प्लॅन टेबल क्रं 814 पॉलिसी काढली होती आणि ती दिनांक-28/09/2014 पासून अस्तित्वात आली. तक्रारकर्त्याने त्याचे मुलाचे प्रकृती संबधाने विमा प्रस्तावातील प्रश्न क्रं 13 ते 17 विचारलेल्या प्रश्नांना “नकारार्थी” उत्तर दिले. तक्रारकर्त्याने विमा प्रस्तावात घोषीत केले होते की, त्याने विमा प्रस्तावात दिलेली माहिती खरी आणि बरोबर आहे आणि एखादी माहिती खोटी आढळून आल्यास विमा करार हा संपुष्टात येईल, विमा पॉलिसीतील अट क्रं 6 प्रमाणे विमा प्रस्तावातील घोषीत माहिती चुकीची आढळून आल्यास विमा करार रद्द होणार होता आणि विम्याचे मिळणारे सर्व लाभ रद्द होणार होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिलेल्या पत्रात त्याचे लहान मुलाचे मृत्यूचे कारण “PONTIN GLIOMA” (Cancer) असे दिले होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा मुलगा स्वप्नील याचे शाळेतील हजेरी संबधात शाळे कडून अभिलेख मागितले होते, त्यानुसार शाळेच्या हजेरी अभिलेखावरुन मृतक हा ऑक्टोंबर-2014 मध्ये फक्त एक दिवस हजर होता आणि त्यानंतर नोव्हेंबर-2014 पासून ते एप्रिल-2015 पर्यंत तो सातत्याने गैरहजर असल्याचे नमुद केले. शाळेतील अभिलेखावरुन स्पष्ट होते की, विमा प्रस्ताव देण्याचे आधी डॉ.गणेश पुस्तोडे (Dr.Ganesh Pustode) यांनी दिलेल्या वैद्दकीय प्रमाणपत्रात स्वप्नील हा “Enteric Fever and Hepatitis” या आजाराने दिनांक-09/10/2014 पासून आजारी असल्याचे नमुद केलेले आहे परंतु ही बाब विमा प्रस्तावात जाणूनबुजून हेतूपुरस्पर उघड करण्यात आली नसल्याचे नमुद केले. मृतक स्वप्नील याचे शाळेतील गैरहजेरीचे अभिलेखावरुन तसेच शाळेत सादर केलेल्या डॉ.गणेश पुसतोदे यांचे वैद्दकीय प्रमाणपत्रावरुन विमाधारक स्वप्नील हा पॉलिसी घेण्याच्या पूर्वीपासून आजारी होता ही बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिलेल्या दिनांक-12/10/2015 रोजीचे पत्रात त्याचे मुलावर जॉईन्डीस आजारा साठी आयुर्वेदिक उपचार डॉ.मेहता आणि डॉ.आनंद पाठक यांचे कडून आणि पुढे गेटवेल हॉस्पीटल नागपूर येथे घेतल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने त्याचे मुलाचे वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज जळाल्याचे सांगितले, त्यावरुन त्याचे सदहेतू बद्दल शंका उपस्थित होते. गेटवेल हॉस्पिटल, नागपूर यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात स्वप्नील याचा मृत्यू “Pontin Glioma (Cancer) with post radiation Necrosis etc.” मुळे झाल्याचे नमुद केले. विरुध्दपक्षां तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने वेळोवेळी पारित केलेल्या निवाडयां मध्ये विमा करार हा विश्वासावर आधारीत करार आहे आणि विमाधारकाचे कर्तव्य आहे की, त्याने योग्य ती खरी माहिती प्रस्तावात घोषीत केली पाहिजे. तक्रारकर्त्याने त्याचे मुलाचे प्रकृती संबधीची माहिती विमा प्रस्तावाचे वेळी लपविल्याने त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला त्यामुळे त्यांनी दोषपूर्ण सेवा दिली असे म्हणता येणार नसल्याचे नमुद केले. त्यांनी तक्रारकर्त्याला त्याचा विमा दावा नाकारल्या बाबत दिनांक-31/08/2016 रोजी कळविले आणि त्यांची ही कृती योग्य व कायदेशीर असल्याचे नमुद करुन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-4) प्रकाश चंद्रप्रकाश बडोले, एलआयसी एजंट याला मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही तो गैरहजर राहिल्याने त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-13 नुसार एकूण-11 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये विमा पॉलिसीची प्रत, त्याने पॉलिसीपोटी जमा केलेल्या हप्त्यांच्या पावत्या, स्वप्नील याचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू रजिस्टर, दिनांक-31/08/2016 रोजीचे विमा दावा नाकारल्याचे पत्र, तक्रारकर्त्याने पाठविलेली कायदेशीर नोटीस, विरुध्दपक्षाचे नोटीसला दिलेले उत्तर अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं-72 ते 78 वर शपथपत्र दाखल केले असून सोबत स्वप्नीलचे शाळे कडून विमा कंपनीला दिलेले पत्र ज्यामध्ये तो व्हॉलिबाल व बेसबॉलचा खेळाडू असल्याचे नमुद असून सोबत पात्रता प्रमाणपत्र, व्हॉलिबाल गुणपत्रकाच्या प्रतीचा समावेश आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3)विमा कंपनी तर्फे पृष्ट क्रं 40 वर जोडलेल्या यादी नुसार विमा प्रस्तावाची प्रत, पॉलिसीची प्रत, तक्रारकर्त्याचे पत्र व मृत्यू प्रमाणपत्र, हक्क सांगणा-याचे निवेदन, मेडीकल अटेन्डन्स सर्टिफीकेट, हॉस्पीटल ट्रिटमेंट सर्टीफीकेट, विरुध्दपक्षाने शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र, कृष्णमुरारी कटकवार विद्दालयाचे पत्र, स्वप्नील रंगारी याचे शाळेतील उपस्थितीचा रेकॉर्ड, तक्रारकर्त्याने दिलेली पत्रे, गेटवेल हॉस्पीटलचे मृत्यू प्रमाणपत्र, विमा दावा नाकारल्याचे पत्र व त्याचे मराठी भाषांतर अशा दसतऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) विमा कंपनी तर्फे एकत्रितलेखी उत्तर, उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकील आणि विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) विमा कंपनी तर्फे वकील यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08 दिनांक-01/08/2015 रोजी तक्रारकर्त्याचा अज्ञान मुलगा विमाधारक स्वप्नील याचा मृत्यू झाला. पॉलिसी काढते वेळी तक्रारकर्त्याचा मुलगा स्वप्नील वय-14 वर्ष हा अज्ञान असल्याने तक्रारकर्ता हा विमा प्रस्तावक (Proposer) होता तसेच तक्रारकर्त्याने त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील प्रदिप रंगारी याचे साठी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून न्यु एंडोमेन्ट प्लॅन टेबल क्रं 814 विमा पॉलिसी क्रं-978880913 दिनांक-28/09/2014 रोजी काढली होती, त्याचा त्रैमासिक हप्ता होता व विमा राशी रुपये-5,00,000/- एवढया रकमेची होती तसेच दिनांक-28/09/2014 ते 28/06/2015 पर्यंत पॉलिसीपोटी एकूण 04 त्रैमासिक हप्त्याची रक्कम भरणा केली होती. विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष क्रं 4 एजंटचे मार्फतीने काढली होती. पॉलिसी काढते वेळी तक्रारकर्त्याचा अज्ञान मुलगा याचे वैद्दकीय परिक्षण विरुध्दपक्ष विमा कंपनीचे पॅनेल वरील तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले नव्हते या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत.
09. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा मुख्य विवाद असा आहे की, पॉलिसी काढते वेळी तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा स्वप्नील रंगारी याचे प्रकृती संबधाने दिनांक-12/10/2014 रोजीचे विमा प्रस्तावातील प्रश्न क्रं 13 ते 17 विचारलेल्या प्रश्नांना “नकारार्थी” उत्तर दिले होते. विमा पॉलीसी घेतानां तक्रारकर्त्याने त्याच्या मुलाच्या प्रकृतीबाबतची माहिती विरुध्द पक्ष कंपनीकडून लपविली, त्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळला.
10. तक्रारकर्त्याचा मुलगा स्वप्नील हा गेटवेल हॉस्पीटल, नागपूर येथे दिनांक-23/07/2015 ते दिनांक-01/08/2015 या कालावधीत तातडीच्या उपचारासाठी भरती होता आणि तो “Pontin Glioma (Cancer) with post radiation Necrosis with Aspiration ” या आजाराने ग्रस्त असल्याने त्याचा दिनांक-01/08/2015 रोजी मृत्यू झाल्याचे गेटवेल हॉस्पीटल, नागपूर येथील डॉक्टरांनी जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात नमुद केलेले आहे. मुलाचे मृत्यू नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे साकोली शाखेला क्लेम फॉर्म मिळण्या बाबत लिहिलेल्या पत्रात त्याचे मुलाचा मृत्यू हा “Pontin Glioma” (Cancer) या आजाराने झाल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने त्याचे मुलाचे मृत्यू नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनी समोर हक्क सांगणा-याचे निवेदन या मध्ये त्याचे मुलाचे वैद्दकीय उपचारा संबधाने खालील माहिती दिली
सल्ल्याची तारीख | डॉक्टरांचे नाव व पत्ता | सल्ल्याचे कारण |
08/07/15 | डॉ.मेहता, नागपूर | उलटया व कमजोरी हातापायाला |
11/07/15 | डॉ.आनंद पाठक, नागपूर | उलटया व कमजोरी हातापायाला |
23/07/15 | डॉ.पी.शेंबाळकर | श्वास घेण्यास त्रास होत असल्याने |
11. डॉ.प्रदिप शेंबाळकर मेडीकल अटेंडन्ट, गेटवेल हॉस्पीटल, नागपूर यांनी दिलेल्या मेडीकल अटेन्डन्टस सर्टीफीकेट मध्ये मृत्यूचे कारण “Aspiration pneumonia with shock with CRA” आणि आजाराचे लक्षण यामध्ये “hypoxia acute resp. distress” असे नमुद केलेले आहे. मुख्याध्यापक कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल साकोली यांनी दिनांक-23/10/2015 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिलेल्या पत्रात स्वप्नील याचा मृत्यू “Pontin Glioma या आजारामुळे झाल्याचे नमुद केले. स्वप्नील याचे शाळेतील गैरहजेरी बाबत शाळेत दिलेले वैद्दकीय प्रमाणपत्र दिनांक-11/11/2014 रोजीचे ज्यामध्ये तो दिनांक-09/10/2014 पासून ते दिनांक-10/11/2014 पावेतो शाळेत “Hepatitis” या आजारामुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे नमुद करण्यात आले तसेच याच शाळेतील हजेरीपत्रका मध्ये माहे ऑक्टोंबर-2014 एक दिवस आणि नोव्हेंबर-2014 ते एप्रिल-2015 पर्यंत सातत्याने अनुपस्थित असल्याचे मुख्याध्यापकांनी दिनांक-29/10/2015 रोजी जारी केलेल्या प्रमाणपत्रावरुन दिसून येते. दिनांक-15/03/2016 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे साकोली शाखेत दिलेल्या पत्रात चि.स्वप्नील याचेवर क्रिष्णम आर्युवेदीक काटोल रोड, नागपूर येथे कावीळ आजारासाठी आयुर्वेदिक औषध घेण्यात आले असल्याचे नमुद आहे.
12. विरुध्दपक्ष विमा कंपनीने उपरोक्त नमुद दस्तऐवजांवर विशेतः डॉ. गणेश पुस्तोडे यांनी दिनांक 11/11/2014 ला दिलेल्या फिटनेस प्रमाणपत्रावर आपली भिस्त ठेऊन तक्रारकर्त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील याचे मृत्यू नंतर करण्यात आलेला विमा दावा हा त्यांचे दिनांक-31/08/2016 रोजीचे पत्रान्वये नाकारला आहे. या उलट तक्रारकर्त्याच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, पॉलीसी घेते वेळी त्याचे मुलाची प्रकृती चांगली होती त्यामुळेच विरुध्द पक्षांनी त्याची वैद्यकीय तपासणी न करता विरुध्द 4 तर्फे पॉलीसी काढण्यात आली. तक्रारकर्त्याने त्याच्या प्रकृती विषयी कोणतीही माहिती विरुध्द पक्षाकडून लपवून ठेवलेली नाही. तक्रारकर्त्याच्या मुलाचा मृत्यु हा “Pontin Glioma (Cancer) या आजाराने झाला असून पॉलीसीचा प्रस्ताव अर्ज भरतानां तक्रारकर्त्याच्या मुलास सदर आजार नव्हता.
13. मंचा तर्फे येथे विशेषत्वाने नमुद करण्यात येते की, विरुध्दपक्ष विमा कंपनी ज्या वैद्दकीय दस्तऐवजांवर आपली भिस्त ठेवीत आहे ते सर्व दस्तऐवज विमाधारक चि.स्वप्नील याचेवर त्याचे मृत्यूचे पूर्वी गेटवेल हॉस्पीटल नागपूर येथे जे वैद्दकीय उपचार करण्यात आलेत त्या संबधीचे आहेत आणि त्याचे मृत्यूचे वेळी गेटवेल हॉस्पिटल नागपूर येथे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण “Pontin Glioma (Cancer) with post radiation Necrosis with Aspiration ” असे असल्याचे तक्रारकर्त्याला माहिती पडल्या नंतर त्याने विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दाखल केला त्यावेळी त्याने सदरचे कारण विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे प्रथमतः उघड केले.
14. तक्रारकर्त्याने त्याचा अज्ञान मुलगा स्वप्नील याचा विमा प्रस्ताव दिनांक-12/10/2014 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर केला होता, त्यावेळी त्याचे मुलाला “Pontin Glioma (Cancer) with post radiation Necrosis with Aspiration ” हा गंभिर आजार होता किंवा इतर कुठला “Hepatitis” आजार होता ही बाब कुठल्याही वैद्दकीय परिक्षणातून उघड झालेली नव्हती तसेच तक्रारकर्त्याला सुध्दा त्याचे मुलाला विमा काढण्याचे पूर्वी “Pontin Glioma (Cancer) वा “Hepatitis” हा आजार होता ही माहिती नव्हती. त्याच बरोबर विमा पॉलिसी काढण्यापूर्वी चि.स्वप्नील वर “Pontin Glioma” (Cancer) with post radiation Necrosis with Aspiration ” या आजारा संबधी कुठल्याही दवाखान्यात वैद्दकीय उपचार करण्यात आले होते ही बाब पुराव्यानिशी मंचा समोर आलेली नाही.
15. अभिलेखावर दाखल एस्ताऐवजांचे अवलोकन केले असता विरुध्दपक्ष विमा कंपनीने शाळेतील मुख्याध्यापका कडून जो रेकॉर्ड मागविला त्यामध्ये चि. स्वप्नील याचे शाळेतील गैरहजेरी बाबत डॉ.गणेश पुसतोदे (Dr.Ganesh Pustode) यांनी दिनांक-11/11/2014 रोजीचे दिलेले वैद्दकीय प्रमाणपत्र ज्यामध्ये तो दिनांक-09/10/2014 पासून ते दिनांक-10/11/2014 पावेतो शाळेत “Hepatitis” या आजारामुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. मंचा तर्फे येथे नमुद करण्यात येते की, विरुध्दपक्ष विमा कंपनी ज्या डॉ.गणेश पुस्तोडे (Dr.Ganesh Pustode) यांचे वैद्दकीय प्रमाणपत्रावर आपली भिस्त ठेवीत आहे, त्या वैद्दकीय प्रमाणपत्राची प्रत त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त केली परंतु तक्रारकर्त्याच्या मुलावर ज्या डॉ.गणेश पुस्तोडे (Dr.Ganesh Pustode) यांनी वैद्दकीय उपचार केलेत त्यांचा पुराव्या दाखल कोणताही प्रतिज्ञालेख मंचा समक्ष दाखल केलेला नाही. तसेच विरुध्द पक्षाने डॉ. गणेश पुस्तोडे यांच्याकडे चौकशी केल्याबाबचा कोणताही पुरावा अभिलेखावर दिसून येत नाही. तक्रारकर्त्याचा मुलगा चि.स्वप्नील याचा विमा प्रस्ताव हा दिनांक-12/10/2014 रोजी भरण्यात आला होता आणि तो शाळेत प्रकृती अस्वास्थामुळे दिनांक-09/10/2014 पासून ते दिनांक-10/11/2014 पावेतो गैरहजर होता, असेही अभिलेखावरील दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते परंतु दिनांक 12/10/2014 रोजी पॉलीसी प्रस्ताव भरतानां तक्रारकर्त्याला त्याचे मुलाला “Hepatitis” हा आजार झालेला होता याची कल्पना होती ही बाब सदर डॉक्टरांचे चौकशीत किंवा पुराव्याने सिध्द होऊन शकली असती परंतु विरुध्द पक्षाने सुस्पष्ट पुरावा मंचासमक्ष आणलेली नाही. त्यामुळे दिनांक 11/11/2014 डॉक्टरांचे प्रमाणपत्रानुसार जरी तक्रारकर्त्याचा मुलगा “Hepatitis” या आजाराकरीता उपचार घेंत होता तरी पॉलीसी भरतानां म्हणजे दिनांक 12/10/2014 रोजी तक्रारकर्त्याला त्याच्या मुलास “Hepatitis” हा आजार झाला आहे याबाबत माहिती होती असे पुराव्याअभावी म्हणता येणार नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याचे मुलाला “Hepatitis” आजार असल्याचे निदान डॉ.गणेश पुस्तोडे (Dr.Ganesh Pustode) यांनी दिनांक-11/11/2014 रोजी दिलेल्या वैद्दकीय प्रमाणपत्रावरुन उघड झाले होते परंतु त्यापूर्वीच विमा प्रस्ताव भरण्यात आलेला होता. तसेही “Hepatitis” आणि “Pontin Glioma” (Cancer) या आजाराचा एकमेकाशी काहीही संबध दिसून येत नाही. तक्रारकर्त्याचे मुलाला पॉलिसी घेण्याचे पूर्वी पासून “Pontin Glioma” (Cancer) हा आजार होता आणि त्या आजारासाठी त्याचेवर पॉलिसी काढण्याचे पूर्वी पासून तक्रारकर्ता वैद्दकीय उपचार करीत होता हे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे आरोप तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या शपथपत्राव्दारे नाकारलेले आहेत. तक्रारकर्त्याने शपथपत्रा सोबत चि.स्वप्नील याचे शाळेतील मुख्याध्यापकांनी दिनांक-23/04/2016 रोजी जारी केलेले प्रमाणपत्र दाखल केले, ज्यामध्ये चि.स्वप्नील हा सन-2012-13 ते 2014-15 या कालावधीत व्हॉलिबाल, बेसबॉलचा खेळाडू होता व तो जिल्हास्तरावर खेळला असल्याचे नमुद आहे. सदर दस्ताऐवजांत तक्रारकर्त्याच्या मुलगा त्या खेळांकरीता शारीरीक दृट्या पात्र असल्याबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे नमूद केले आहे. चि.स्वप्नील याचेवर आयुर्वेदिक उपचार करण्यात आले याचा अर्थ त्याला त्यावेळी कॅन्सर होता असा होत नाही.
16. मंचाचे मते चि.स्वप्नील याला पॉलिसी घेण्याचे पूर्वी पासून “Pontin Glioma” (Cancer) हा आजार होता या संबधी कोणताही वैद्दकीय पुरावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नाही व तो दाखल करण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष विमा कंपनीची आहे. चि.स्वप्नील याची विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष क्रं 4 एजंटचे मार्फतीने काढलेली आहे आणि सर्वसाधारण व्यवहारात पॉलिसी काढते वेळी एजंट हे स्वतः विमा प्रस्ताव फॉर्म भरतात आणि त्यावर प्रस्तावकाची स्वाक्षरी घेतल्या जाते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे एजंट मार्फतीने विमा पॉलिसी काढल्याची बाब उत्तरात मान्य केलेली आहे परंतु त्याच बरोबर असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने विमा प्रस्तावात घोषीत केलेल्या माहितीचे आधारावर त्यांनी विमा प्रस्ताव स्विकारला, परंतु सदर विरुध्द पक्ष 4 चा पुरावा मंचासमक्ष सादर केला नाही. त्याच बरोबर ही बाब सुध्दा मान्य केली की, विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून पॉलिसी काढते वेळी चि.स्वप्नील याची त्यांचे पॅनेलवरील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलेली नव्हती. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, ज्यावेळी त्याचे मुलाची विमा पॉलिसी एजंटचे मार्फतीने काढली तेंव्हा साकोली येथे विमा कंपनीचे तज्ञ डॉक्टरांचे पॅनल होते आणि अशा पॅनल कडून त्याचे मुलाची वैद्दकीय तपासणी विरुध्दपक्ष विमा कंपनीला करता आली असती परंतु त्यानीं तसे काहीही केलेले नाही. तक्रारकर्त्याने सुध्दा अशी वैद्दकीय तपासणी करण्यास कोणताही विरोध केलेला नव्हता.
17. मंचाचे मते विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमाधारक चि.स्वप्नील याचे मृत्यू नंतर गेटवेल हॉस्पिटल, नागपूर यांनी जारी केलेल्या वैद्दकीय प्रमाणपत्रा मध्ये त्याला “Pontin Glioma” (Cancer) हा आजार असल्याने त्याचा मृत्यू झाला ही बाब उघड झाली. तक्रारकर्त्याला त्याचे मुलाला “Hepatitis” हा आजार झालेला होता याची कल्पना नव्हती म्हणून विमा प्रस्तावाचे वेळी दिनांक-12/10/2014 रोजी त्याचे मुलाला “Hepatitis” आजार झालेला आहे ही बाब त्याने उघड केलेली नव्हती. तक्रारकर्त्याचे मुलाला “Hepatitis” आजार असल्याचे निदान डॉ.गणेश पुस्तोडे (Dr.Ganesh Pustode) यांनी दिनांक-11/11/2014 रोजी दिलेल्या वैद्दकीय प्रमाणपत्रावरुन उघड झाले होते, त्यामुळे विमा प्रस्ताव भरताना म्हणजे दिनांक-12/10/2014 रोजी चि.स्वप्नील यास “Hepatitis” हा आजार असल्याची तक्रारकर्त्याला कोणतीही माहिती नव्हती कारण “Hepatitis” आजाराचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र हे विमा दावा प्रस्ताव भरल्या नंतरच्या तारखेचे आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा दावा प्रस्ताव भरताना मुलाचे आरोग्य संबधीची माहिती दडवून ठेवली होती असे दिसून येत नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीने कोणत्याही ठोस पुराव्या शिवाय चुकीचा निष्कर्ष काढून तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला आणि ही विरुध्दपक्ष विमा कंपनीची कृती दोषपूर्ण सेवेत मोडते.
मा. सुप्रिम कोर्ट यांनी P. Vankat Naidu Vs Life Insurance Corporation Of India & another IV (2011) CPJ 6 (SC) 6 held in Paras No. 6 and 7 as follows:
6. We have heard learned counsel for the parties and carefully perused the record. IN our view, the finding recorded by the District Forum and the State Commission that the respondents had failed to proved that the deceased has suppressed information relating to his illness was based on correct appreciation of the oral and documentary evidence produced by the parties and the National Commission committed serious illegality by upsetting the said findings on a suppressed information relating to hospitalization and treatment.
7. Since the respondents had come out with the case that the deceased did not disclose correct facts relating to his illness, it was for them to produced cogent evidence to prove the allegation. However, as found by the District Forum and State Commission, the respondent did not produce any tangible evidence to prove that the deceased had withheld information about his hospitalization and treatment. Therefore, the National Commission was not justified in interfering with the concurrent finding recorded by the District Forum and the State Commission by making a wild guesswork that the deceased had suppressed the facts relating to his illness”
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वरील न्यायनिर्णयातील Ratio हातातील प्रकरणांस तंतोतंत जूळतो त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
18. विरुध्दपक्ष विमा कंपनीने कोणत्याही ठोस पुराव्या शिवाय तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला म्हणून तक्रारकर्ता हा त्याचा मुलगा विमाधारक चि.स्वप्नील याचे मृत्यू संबधाने देय विमा राशी रुपये-5,00,000/- तक्रार दाखल दिनांक-21/03/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(4) प्रकाश चंद्रप्रकाश बडोले हा विरुध्दपक्ष क्रं (1) ते (3) विमा कंपनीचा एजंट असून त्याचे मार्फतीने तक्रारकर्त्याचे मुलाची विमा पॉलिसी काढली होती ही बाब जरी खरी असली तरी विमा पॉलिसी प्रमाणे देय रक्कम देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष विमा कंपनीची असल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
19. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला चि.स्वप्नील प्रदिप रंगारी याचे मृत्यू संबधाने देय विमा रक्कम रुपये-5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त) तक्रार दाखल दिनांक-21/03/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला अदा करावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(4) एलआयसी एजंट याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.