न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून जीवन सरल (with profits) पॉलिसी 10 वर्षाच्या मुदतीची (प्लान 165/10) दि. 15/4/2008 ते 15/04/18 या कालावधीकरिता खालील रकमेची घेतली होती.
रु. 2,90,370/- - मुदतीची रक्कम
रु. 7,50,000/- - मृत्यू जोखीम
रु. 15,00,000/- - अपघात जोखीम
तक्रारदार यांनी मुदत संपल्यानंतर वि.प. यांचेकडे मुदतीची रक्कम मागितली असताना वि.प. यांनी त्यांना आपण रु. 2,93,118/- एवढी रक्कम देऊ असे सांगितले. परंतु वि.प. यांनी गेल्या 10 वर्षाच्या मुदतीत विमा प्रिमियम म्हणून रु. 4,74,680/- एवढी रक्कम अदा केली आहे. तसेच वि.प. यांच्या प्रतिनिधीने आपणांस मुदतीनंतर जमा रक्कम व त्यावरचे व्याज आपणास मिळेल असे सांगितले होते. तक्रारदार यांनी या संदर्भात वि.प. यांना पत्र लिहिले होते, परंतु त्या पत्राला वि.प. यांनी उत्तर दिले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याय्य क्लेम कमी दिल्यामुळे तक्रारदारावर अन्याय झाला आहे व वि.प. यांनी सेवा देताना त्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून रक्कम रु. 4,74,680/- व त्यावरील व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- तक्रारदारास मिळावे अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे विमा पॉलिसी, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, सदर पत्राची पोहोच पावती, वि.प. यांचे क्लेम सेटलमेंट व्हाऊचर तसेच तक्रारदाराचे शपथपत्र, जीवन सरल व पोस्ट ऑफिस रिकरिंग खाते यामध्ये मिळणा-या रकमांचा तुलनात्मक तक्ता, तक्रारदाराचे पॅनकार्ड वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत विमा प्रस्ताव, पॉलिसी दस्ताऐवज, रिव्हयु स्लीप, मेडीकल रिपोर्ट, तसेच पॉलिसी बॉंड, मॅच्युरिटी इंटीमेशन, स्पीड पोस्ट रजिस्टर तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) पॉलिसी उतरविताना वि.प. यांनी तक्रारदारांना पॉलिसीबाबत पूर्ण माहिती दिली आहे.
iii) तक्रारदार यांना पॉलिसी उतरविताना पॉलिसीचे मिळणारे लाभ याबाबत माहिती होती. मुदतीनंतर तक्रारदार यांना रक्कम रु.2,09,370/- मिळणार असलेची माहिती दिली होती व तसे पॉलिसीमध्ये नमूद केले होते.
iv) तक्रारदार यांनी किती रक्कम हप्त्यापोटी भरली यावर सदर पॉलिसी अवलंबून नसून सदर पॉलिसीप्रमाणे मिळणारे वेगवेगळे लाभ यावर अवलंबून आहे. तक्रारदार यांना मुदतीनंतर जमा रक्कम व्याजासह मिळेल असे कधीही सांगितले नव्हते. तक्रारदार यांना मुदतीनंतर जमा रक्कम व्याजासह मिळेल असे सांगितले होते हे कथन खोटे आहे.
v) तक्रारदार यांनी खोटया व चुकीच्या माहितीवर आधारित तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम देणेस वि.प. जबाबदार नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून जीवन सरल (with profits) पॉलिसी 10 वर्षाच्या मुदतीची (प्लान 165/10) दि. 15/4/2008 ते 15/04/18 या कालावधीकरिता घेतली होती. सदर पॉलिसीची प्रत उभय पक्षांनी याकामी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने तक्रारअर्जात परिच्छेद क्र.1 मध्ये नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून जीवन सरल पॉलिसी 10 वर्षाच्या मुदतीची (प्लान 165/10) दि. 15/4/2008 ते 15/04/2018 या कालावधीकरिता खालील रकमेची घेतली होती.
रु. 2,90,370/- - मुदतीची रक्कम
रु. 7,50,000/- - मृत्यू जोखीम
रु. 15,00,000/- - अपघात जोखीम
तसेच वर नमूद बाब तक्रारदाराचे नमूद विमा पॉलिसीमध्येही नमूद आहे. त्यामुळे सदर कामी तक्रारदार हे पॉलिसीचे मुदतीनंतर म्हणजेच मॅच्युरिटी नंतर रक्कम रु. 2,09,370/- एवढी रक्कम वि.प. विमा कंपनीकडून मिळणेस पात्र आहे असे स्पष्ट होते.
8. त्यामुळे तक्रारदार यांनी याकामी वि.प. यांचेकडून तक्रारदाराने 10 वर्षाच्या मुदतीत वि.प. कडे जमा केलेली विमा हप्त्यांची एकूण रक्कम रु. 4,74,680/- व सदर रकमेवर 18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी विनंती केली आहे. तथापि सदरची तक्रारदारांची मागणी ही विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती व नियमात बसणारी नाही असे या आयोगाचे मत आहे. कारण सदरची बाब विमा पॉलिसीचे अटी, शर्ती व नियमात कोठेही नमूद नाही. त्यामुळे सदर रक्कम विमा पॉलिसीच्या अटी, शर्ती व नियमबाहय असलेने सदर तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम तक्रारदारास देणेस वि.प. कंपनीस आदेशीत करणे या आयोगास न्यायोचित वाटत नाही.
9. याकामी तक्रारदाराने खालील नमूद मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
- Writ Petition No. 112919/2014 (GM-RES) High Court of Karnataka – Dharwad Bench
LIC of India DharwadVs. Jaydev, Dharwad
- State Commission, SCDRC Mumbai
CC No. 745/15
Consumer Welfare AssociationVs.Life Insurance Corporation Ltd.
- National Consumer Disputes Redressal Commission
First Appeal No. 1531 of 2018
LIC of IndiaVs.Consumer Welfare Association & Ors.
वर नमूद तक्रारदाराने दाखल केलेले न्यायनिवाडे, त्यातील घटनाक्रम व परिस्थिती ही तक्रारदाराचे तक्रारअर्जापेक्षा भिन्न असलेने तक्रारदाराचे तक्रारअर्जास सदर न्यायनिवाडे व त्यातील दंडक लागू होत नाहीत असे या आयोगाचे मत आहे.
10. याकामी वि.प. ने तक्रारदार यांना विम्याची संपूर्ण लाभासहीत रक्कम रु. 2,93,118/- देऊ असे सांगितले होते. त्या रकमेचे व्हाऊचर तक्रारदाराला वि.प. ने पाठविले/अदा केले आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. ने तक्रारदाराला पॉलिसी नियमाप्रमाणे देय रक्कम देणेची पूरेपुर तयारी दाखविलेचे स्पष्ट होते. त्यामुळे वि.प. ने तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही हे स्पष्ट होते. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
11. सबब, वरील सर्व मुद्दे व विवेचन यांचे अवलोकन करता व सर्व कागदपत्रे, पुरावा शपथपत्रे व उभयतांचा लेखी तोंडी युक्तिवाद यांचे अवलोकन करता याकामी तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडे तक्रारअर्जात नमूद केलेली तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत, सबब, तक्रारअर्ज नामंजूर करणे या आयोगास न्यायोचित वाटते. सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.