नि.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११७/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ११/०३/२०१०
तक्रार दाखल तारीख : १२/०३/२०१०
निकाल तारीख : ०७/०३/२०१२
----------------------------------------------------------------
बाळकृष्ण महादेव पाटील,
वय वर्षे – ७२, धंदा – पेन्शनर (रि.इंजिनियर)
रा.१६५५ अ, खणभाग, पंचमुखी मारुती रोड,
सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,
शाखा सांगली (९४२)
जीवन ज्योत, अमराई रोड, सांगली – ४१६४१६ .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.व्ही.डी.घाटगे
जाबदार तर्फे : +ìb÷.अश्विनी मिलिंद शहा
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा पॉलिसी मिळणेसाठी दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार यांच्या विमा कंपनीमार्फत जाहीर करण्यात आलेल्या “नवप्रभात” याचा टेबल नं.१३७/१४ ही पॉलिसी उतरविण्याचे ठरविले व त्यासाठी प्रपोजलची कार्यवाही सुरु केली. तक्रारदार यांनी डिपॉझिट म्हणून रक्कम रु.५००/- दि.७/२/२००० रोजी जमा केले. सदरची विमा पॉलिसी मंजूर करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती तसेच वैद्यकीय तपासण्याही जाबदार कंपनीच्या सूचनेप्रमाणे करुन घेतल्या. डॉक्टरांचा रिपोर्ट योग्य आल्यावर विमा कंपनीने विम्याचा हप्ता भरावयास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.३०/३/२००० रोजी रक्कम रु.१२,९६४/- इतकी रक्कम जमा केली. अशा प्रकारे तक्रारदार यांनी पहिल्या वर्षाचे हप्त्याची संपूर्ण रक्कम पूर्णपणे जमा केली. विमा कंपनीने दि.३१/३/२००० रोजी ५९०३ हा पॉलिसी नंबर घालून चेक नं.३७९६८० रक्कम रु.४५०/- चा चेक तक्रारदार यांना पाठविला. तक्रारदार यांनी सदर चेकबाबत विचारणा केली असता मेडीकल रिपोर्टसाठी झालेल्या स्वतच्या खर्चाचे पैसे पॉलिसी मंजूर झाल्याबरोबर घेतात त्यानुसारच स्वतच्या खर्चाचे पैसे परत केले आहेत असे सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा चेक स्वीकारला. तक्रारदार यांनी दि.१६/२/२००१ रोजी दुसरा हप्ता देयपत्र मागणीसाठी अर्ज केला व त्यानंतर विमा कंपनीकडून तक्रारदार यांचे नावे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगली यांचा चेक नं.३७४९५७ दि.७/३/२००१ चा रक्कम रु.१२,९६४/- चा चेक पाठविला व प्रपोजल कॅन्सल झाले असे कळविले. सदरचे प्रपोजल का कॅन्सल झाले याबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विचारणा केली असता प्रकरण मंजूर करणा-या बाबींमध्ये कोणतीही त्रुटी/कमतरता न दाखविताच Dropped असे मोघमच सांगितले. तक्रारदार यांचे प्रपोजल जाबदार यांनी कोणतीही त्रुटी न दाखविता रद्द केले व त्याबाबत भरलेली रक्कम एक वर्षाने परत केली. त्याबाबत जाबदार यांचेकडे वारंवार विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणा-या विमा विनियामक और विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority) यांचे हैद्राबाद येथील ऑफिसबरोबर पत्रव्यवहार सुरु केला. तसेच माहितीच्या अधिकारातही माहिती मागविण्याचा प्रयत्न केला. माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केल्यानंतर जाबदार यांच्या एल.आय.सी.सातारा डिव्हीजनचे नवीन अपिलीय अधिकारी यांनी दि.२३/९/२००९ रोजीच्या पत्राने अंडररायटरबाबतची सत्य माहिती कळविली. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी विमा पॉलिसी मंजूर करण्यात यावी, सन २००१ ते २०१० पर्यंतच्या सर्व हप्त्यांची रक्कम विलंबशुल्क न भरता हप्त्याने भरण्यास तक्रारदार यांना परवानगी द्यावी या मागणीसाठी तसेच इतर तदानुषंगिक मागणीसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ६५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी नि.१३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. सदर म्हणणे दाखल करताना जाबदार यांनी लेखी युक्तिवाद असे नमूद केले आहे. जाबदारांनी दिलेल्या या म्हणण्यामध्ये तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये विमा करारच अस्तित्वात आला नसल्याने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असे नमूद केले आहे. विमा कायद्यातील तरतुदींनुसार आलेले विमाप्रस्ताव स्वीकारायचे किंवा नाही याचे पूर्ण अधिकार जाबदार यांना आहेत त्यामुळे तक्रारदार यांची मागणी कायद्याने मान्य करता येणार नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे. तक्रारदार यांचा विमाप्रस्ताव नामंजूर झाला आहे हे तक्रारदार यांना दि.१८ नोव्हेंबर २००२ रोजीच्या पत्राने कळविणेत आले आहे. तेव्हापासून तक्रारदार यांनी मुदतीत तक्रारअर्ज दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदार यांचा प्रपोजल मंजूर न केल्यामुळे विमाकरार अस्तित्वात आला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.१२,९६४/- तक्रारदार यांस दि.६/३/२००१ रोजीच्या चेकने परत करण्यात आली आहे. सदरचा चेक तक्रारदार यांनी वटवला नसल्यामुळे सदरची रक्कम जाबदार यांचेकडे प्रलंबित आहे. जाबदार हे सदरची रक्कम तक्रारदार यांना परत करण्यास नेहमीच तयार होते व आहेत परंतु सदरची रक्कम घेण्यास तक्रारदार यांनी नकार दिला. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नसल्याने तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१४ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१६ ला प्रतिम्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.१७ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.१९ वर विनंती कॉलममधील अ व ब मधील मागणी सोडून देणे व नवीन मागणी समाविष्ट करणेसाठी अर्ज सादर केला आहे. सदरचा अर्ज मंजूर करणेत आला परंतु तक्रारदार यांनी त्याप्रमाणे नि.१ मध्ये दुरुस्ती केलेचे दिसून येत नाही.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामधील विनंती कलम अ व ब मध्ये विमा पॉलिसी मंजूर करावी व कोणतेही विलंबशुल्क न आकारता २००१ ते २०१० पर्यंतचे हप्ते भरण्यास तक्रारदार यांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. सदरची मागणी तक्रारदार यांनी सोडून दिली आहे व नि.१९ वरील अर्जानुसार हप्त्यापोटी भरलेली रक्कम रु.१२,९६४/- व्याजासह परत मिळावी, डॉक्टरांच्याकडून चाचण्या करुन घेण्यासाठी आलेला खर्च व्याजासह मिळावा, शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी या विनंत्या केल्या आहेत. तक्रारदार यांच्या मागण्यांबाबत आक्षेप घेताना जाबदार यांनी तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे असा तीव्र आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांच्या विनंत्यांचा विचार करता तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रु.१२,९६४/- दि.३०/३/२००० रोजी भरले असलेचे नमूद केले आहे. तक्रारदार यांचे प्रपोजल रद्द करुन सदरची रक्कम जाबदार यांनी तक्रारदार यांना चेक नं.३८४९५७ ने परत केली आहे. सदरचे पत्र नि.५/५ वर दाखल असून सदरचे पत्र दि.१२/३/२००१ रोजीचे आहे. म्हणजेच तक्रारदार यांना त्यांचे प्रपोजल रद्द केल्याबाबत जाबदार यांनी दि.१२/३२००१ रोजी कळविले आहे. सदर प्रपोजल रद्द केल्यानंतर तक्रारदार यांनी विमा विनियामक और विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority) कडे त्याबाबत तक्रार केली. विमा विनियामक और विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority) यांनी दि.२१ ऑगस्ट २००६ रोजी तक्रारदारांचे तक्रारीबाबत निर्णय दिला असून तक्रारदार यांना सदरचा निर्णय दि.२४/१०/२००६ रोजी मिळाला असल्याचे नि.५/३४ वरील पत्रावरुन दिसून येते. या सर्व बाबींवरुन तक्रारअर्जास कारण हे तक्रारदार यांचे प्रपोजल नाकारले त्यादिवशी घडले. विमा विनियामक और विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority) यांनी तक्रारदार यांच्या अर्जाबाबत दि.२१/८/२००६ रोजी निर्णय दिला, त्या तारखेपासून सुध्दा तक्रारअर्ज मुदतीत नाही असे जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतीत कसा काय येतो याबाबत कोणतेही कथन तक्रारअर्जामध्ये केलेले नाही. तक्रारदार यांनी सदरची रक्कम व्याजासह परत मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा अशीही मागणी केली आहे. तक्रारदार यांनी केलेल्या मागणीचा विचार करता तक्रारदार यांना जाबदार यांनी प्रपोजल रद्द करुन रु.१२,९६४/- चा चेक परत पाठविला होता. सदरचा चेक तक्रारदार यांनी स्वीकारला नाही. यामध्ये जाबदार यांचा कोणताही सेवादोष दिसून येत नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला असल्याने तक्रारदार मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ०७/०३/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.