(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 30 ऑगष्ट 2013)
अर्जदार रेखा ऊर्फ सुमन दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
1. अर्जदाराची संक्षिप्त फिर्याद अशी की,
अर्जदाराचे पती दिवाकर बाबुराव येनप्रेड्डीवार यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे पांच विमा पॉलिसी विकत घेतल्या होत्या.
अ.क्र. | विमा पॉलिसी क्रमांक | आश्वासित विमा रक्कम व इतर लाभ |
1. | 971684415 | 40,000/- |
2. | 971934468 | 25,000/- |
3. | 972120618 | 50,000/- |
4. | 973293375 | 1,00,000/- |
5. | 972205315 | 50,000/- |
2. अर्जदाराचे पती दिवाकर येनप्रेड्डीवार दि.9.8.2009 रोजी मरण पावले. अर्जदार दिवाकर येनप्रेड्डीवार यांची विधीवत पत्नी असल्याने त्यांची एकमेव वारस आहे व त्यांच्या मृत्युनंतर गैरअर्जदाराकडून वरील पॉलिसीच्या दाव्याची रक्कम मिळण्यास पाञ आहे. तिने गैरअर्जदाराकडे वरील पॉलिसीबाबत मृत्युदाव्याबाबत विचारणा केली तेंव्हा त्यांनी तिला वारसान प्रमाणपञ सादर करण्यास सांगितले. तिने वारसान प्रमाणपञासाठी कागदपञांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली असता मा.सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) गडचिरोली यांचेकडून वारसान प्रमाणपञ अर्ज क्र.51/2009 मधील नोटीस प्राप्त झाली. चौकशी केली असता अर्जदारास कळले कि, स्वर्गिय दिवाकर येनप्रेड्डीवार ह्यांचे वरील प्रकरणातील अर्जदार कुंदाताई हिच्याशी विवाहबाह्य संबंध होते व त्या संबंधातून तिला शुभम व सचिन ही मुले झाली आहेत.
3. सदर वारसान प्रमाणपञ अर्जावरील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, गडचिरोली यांच्या निर्णयाने व्यथित होवून अर्जदाराने मा.जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचेकडे अपिल क्र.13/2010 दाखल केले. त्या अपिलाचा निकाल दि.30.9.2011 रोजी लागून अर्जदाराचा मय्यत दिवाकर येनप्रेड्डीवार यांच्या एल.आय.सी. पॉलिसीच्या रक्कम रुपये 3,50,000/- मध्ये ¼ हिस्सा असल्याचे ठरविले व त्याप्रमाणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर गडचिरोली यांनी अर्जदाराचे नावाने ¼ हिस्याचे वारसान प्रमाणपञ दि.5.11.2011 रोजी मंजूर केले. दिवाकर येनप्रेड्डीवार यांची अनौरस मुले शुभम आणि सचिन यांचा प्रत्येकी ¼ हिस्सा आणि दिवाकर यांची आई इंदीराबाई यांचा ¼ हिस्सा ठरविण्यांत आला.
4. गैरअर्जदाराने कुंदाताई हिच्याशी हातमिळवणी करुन अर्जदारास कोणतीही कल्पना न देता विमा पॉलिसीची काही रक्कम तिला परस्पर देवून टाकल्याचे अर्जदारास कळले आहे.
5. मा.जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वरील पॉलिसीपैकी अर्जदाराच्या हिस्याची ¼ रक्कम तिला द्यावी म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.23.11.2011 व 5.3.2012 रोजी पञ आणि दि.9.4.2012 रोजी नोटीस पाठवून विनंती केली. परंतु गैरअर्जदार सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. गैरअर्जदाराची ही कृती सेवेतील न्युनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने दिवाकर यांच्या नावाने असलेल्या वरील पॉलिसीच्या देयक रकमेपैकी अर्जदाराच्या ¼ हिस्याची रक्कम रुपये 66,250/- व त्यावरील देय लाभ द.सा.द.शे.18 % व्याजासह देण्याचा, तसेच सेवेतील ञुटीबाबत अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासाबाबत रुपये 1,00,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रुपये 25,000/- देण्याचा गैरअर्जदारास आदेश व्हावा, अशी अर्जदाराने सदर तक्रार अर्जात मागणी केली आहे.
6. गैरअर्जदाराने नि.क्र.10 प्रमाणे लेखी जबाब दाखल करुन अर्जदाराची मागणी फेटाळली आहे. त्यांचे म्हणणे असे कि, अर्जदाराने अर्जात ज्या 5 पॉलिसींचा उल्लेख केला आहे त्या पॉलिसींपैकी अ.क्र.3 ची पॉलिसी क्र.972120618 आणि अ.क्र.5 ची पॉलिसी क्र.971684415 या दोन पॉलिसींचा कोणताही हप्ता विमाधारक दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी भरला नाही व तो गैरअर्जदारास प्राप्त झाला नाही म्हणून सदर पॉलिसीबाबत कोणतीही रक्कम, लाभ, बोनस अर्जदारास मिळू शकत नाही. अ.क्र.2 ची पॉलिसी क्र.973293375 मधील रक्कम अर्जदाराने मंचासमोर हे प्रकरण दाखल करण्यापूर्वीच सदर पॉलिसीवर नॉमिनी म्हणून नोंद असलेल्या कुंदा दिवाकर येनप्रेड्डीवार हिला गैरअर्जदाराने दिली आहे. आता केवळ अ.क्र.1 ची पॉलिसी क्र.974684415 ची देय रक्कम रुपये 98,251/- आणि अ.क्र.5 ची पॉलिसी क्र.971934468 ची देय रक्कम रुपये 51,204/- दिवाकर येनप्रेड्डीवार यांच्या वारसानांना देणे बाकी आहे.
7. गैरअर्जदाराने दिवाकरच्या वारसांना मायनर्स डिक्लरेशन तसेच संपूर्ण कागदपञ दाखल करण्यासाठी दि.28.3.2012 रोजी कळविले. परंतु त्यांच्याकडून पुर्तता करण्यांत आली नाही म्हणून दिवाकर यांच्या वरील दोन पॉलिसीबाबतचा देय क्लेम निकाली काढता आला नाही आणि अर्जदाराला पॉलिसीची रक्कम अदा करता आली नाही.
8. गैरअर्जदाराची कृती विमा कायद्याच्या आणि पॉलिसीच्या शर्ती व अटी प्रमाणेच असल्याने त्यांनी आपल्या सेवेत काणताही ञुटीपूर्ण व्यवहार केलेला नाही. म्हणून तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
9. वरील प्रमाणे दोन्ही पक्षांचे कथनावरुन खालील मुद्दे मंचापुढे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील, मंचाने निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणे मिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) गैरअर्जदाराने विमा पॉलिसीच्या लाभधारक : नाही.
अर्जदाराप्रती सेवेत न्यूनतापूर्वक व्यवहार केला
आहे काय ?
2) अर्जदार गैरअर्जदाराकडून दिवाकर एनप्रेड्डीवार : अंशतः रक्कम
यांच्या विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यास पाञ मिळण्यास पाञ आहे.
आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतीम आदेशाप्रमाणे
अर्ज अंशतः मंजूर.
- कारण मिमांसा -
10. आपल्या तक्रार अर्जाचे पृष्ठ्यर्थ अर्जदार रेखा ऊर्फ सुमन येनप्रेड्डीवार हिने अर्जात केलेल्या कथनाशिवाय गैरअर्जदाराचे म्हणणे नाकारणारे शपथपञावर शपथपञ नि.क्र.14 प्रमाणे दाखल केले आहे. गैरअर्जदाराने साक्षीचे वेगळे शपथपञ दाखल केले नसल्याने त्यांनी दाखल केलेले शपथपञावरील लेखी बयाण हाच त्यांचा पुरावा म्हणून विचारात घेण्यांत आला. अर्जदाराने यादी नि.क्र.4 सोबत 11 दस्ताऐवज दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने यादी नि.क्र.11 सोबत 3 दस्ताऐवज दाखल केले आहेत. अर्जदाराने आपला लेखी युक्तिवाद नि.क्र.16 वर दाखल केला असून गैरअर्जदाराने त्यांचा युक्तिवाद नि.क्र.18 प्रमाणे दाखल केला आहे. वरील सर्व बाबींचा प्रकरणाच्या निर्णितीसाठी विचार करण्यांत आला आहे.
11. मुद्दा क्र.1 व 2 बाबत :- या प्रकरणात मय्यत दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलिसी क्र. 971684415, 971934468, 972120618, 972205315, 973293375 ह्या पांच पॉलिसी काढल्या होत्या याबाबत वाद नाही. माञ सदर पॉलिसीं पैकी पॉलिसी क्र. 972120618, 973293375 ह्या पॉलिसीचे कोणतेही हप्ते दिवाकर यांनी गैरअर्जदाराकडे भरले नाही, त्यामुळे ह्या पॉलिसीबाबत कोणतीही रक्कम दिवाकर यांचे वारसानांना देय नाही असे गैरअर्जदाराचे शपथेवर म्हणणे असल्याने सदर पॉलिसीपोटी मय्यत दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी त्यांच्या हयातीत संपूर्ण हप्ते भरले आहेत हे सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदारावर आहे. परंतु सदर प्रकरणात अर्जदाराने असा कोणताही पुरावा दाखल केला नसल्याने, दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी वरील दोन पॉलिसीपोटी अर्जदाराकडे कोणतीही रक्कम भरली नाही हे गैरअर्जदाराचे शपथपञावरील कथन खरे समजण्याशिवांय पर्याय नाही म्हणून गैरअर्जदार सदर 2 पॉलिसीपोटी अर्जदार किंवा दिवाकरच्या इतर वारसानांना कोणतीही रक्कम देणे लागत नाही व अर्जदारास सदर 2 पॉलिसीपोटी तिच्या ¼ हिस्याची रक्कम मिळण्यास ती पाञ नाही.
12. अर्जदाराचे म्हणणे असे कि, दिवाकर येनप्रेड्डीवार यांचे कुंदाताई नावाच्या स्ञी बरोबर विवाहबाह्य संबंध होते व सदर संबंधातून कुंदाताईस शुभम व सचिन ही दोन मुले आहेत. गैरअर्जदाराने सदर कुंदाताईशी हातमिळवणी करुन अर्जदारास काहीही माहित न करता कुंदाताईस पॉलिसी क्र.973203375 मधील देय रक्कम रुपये 1,21,744/- दिली आहे. कुंदाताई ही दिवाकर येनप्रेड्डीवार यांची अनौरस अज्ञान मुले शुभम व सचिन यांची आई व अज्ञान पालनकर्ती असल्याने तिने उचललेली वरील पॉलिसीची रक्कम ही शुभम व सचिन यांच्या हिस्यास टाकून उर्वरीत पॉलिसीपोटी गैरअर्जदाराकडून देय असलेल्या रकमेतून अर्जदाराच्या ¼ हिस्याची रक्कम देण्यांत यावी.
13. गैरअर्जदाराचे म्हणणे असे कि, विमा धारक दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी सदर पॉलिसी काढतांना कुंदाताई हिचे नांव नॉमिनी म्हणून नमुद केले होते, त्यामुळे इन्शुरन्स अॅक्ट 1937 च्या कलम 39 अन्वये सदर पॉलिसीची देय रक्कम नॉमिनी म्हणून पॉलिसीत नोंद असलेल्या कुंदाताईस देण्याची कायदेशिर जबाबदारी गैरअर्जदाराची असून सदर कायदेशिर तरतुदीप्रमाणे गैरअर्जदाराने रक्कम कुंदाताई हिला दिली आहे.
14. याबाबत, इन्शुरन्स अॅक्टच्या कलम 1986 मधील तरतुद खालीलप्रमाणे आहे.
39.
“ (6) Where the nominee or if there are more nominees than one, a nominee or nominees survive the 4(person whose life is insured), the amount secured by the policy shall be payable to such survivor or survivors.”
15. सदर पॉलिसी क्र.973293375 ची प्रत अर्जदाराने यादी नि.क्र.4 सोबत दाखल केलेल्या वारसान मामला क्र.51/2009 मधील आदेश दस्त क्र.अ-1 सोबत दाखल पॉलिसी मध्ये अ.क्र.2 वर आहे. त्यात विमा कायद्याचे कलम 39 प्रमाणे नॉमिनी म्हणून सौ.कुंदा हिचे नांव नोंदलेले आहे.
16. वरील प्रमाणे पॉलिसी क्र.9732933375 साठी कुंदाताई हिला विमधारक
दिवाकर येनप्रेड्डीवार यांनी नॉमिनी म्हणून नियुक्त केले असल्याने आणि त्याबाबत पॉलिसी दस्तऐवजात नोंद असल्याने कलम 39 च्या तरतुदीप्रमाणे सदर पॉलिसीची रक्कम नॉमिनीला देणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे. म्हणून सदर पॉलिसीची रक्कम कुंदाताईस देण्याची गैरअर्जदाराची कृती ही अर्जदाराप्रती सेवेतील ञृटी किंवा अनुचित व्यापार पध्दती ठरत नाही.
17. अर्जदार हिने दि.23.11.2011 रोजी गैरअर्जदारास दिलेले विमा पॉलिसी रकमेच्या मागणीबाबतचे पञ दस्तऐवजाची यादी नि.क्र.4 सोबत दस्त क्र.6 वर दाखल आहे. सदर पञात विमा पॉलिसी क्र.973293375 ची रक्कम रुपये 1,21,744/- शुभम व सचिन यांची अज्ञान पालनकर्ती आई कुंदाताई हिने उचलली असल्याने त्यांच्या हिस्याची विमा पॉलिसीची रक्कम शिल्लक राहीली नाही, म्हणून बाकी राहिलेल्या पॉलिसी क्र.971684415 आणि 971934468 या पॉलिसीची रक्कम तिला एकटीला देण्याची मागणी केली होती. याच मागणीसाठी अर्जदाराने दि.5.3.2012 रोजी अॅड.राकेश सु.खोबरे यांचे मार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठविली होती. सदर नोटीसची प्रत यादी नि.क्र.4 सोबत दस्त क्र.7 वर दाखल आहे. सदर नोटीस मध्ये विम्याच्या मिळणा-या रकमांमध्ये अर्जदाराचा ¼ तसेच मय्यत दिवाकर यांची आई इंदीराबाई यांचाही ¼ हिस्सा असल्याचे म्हटले आहे.
18. अर्जदाराने पुन्हा दि.9.4.2012 रोजी अॅड.खोबरे यांचे मार्फत गैरअर्जदारास दुसरी नोटीस पाठविली व त्यांत पॉलिसी क्र.971684415, 971934468, 972205315 व 972120618 या पॉलिसीच्या रक्कमा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अर्जदारास देण्याची मागणी केली.
19. वर नमुद केल्याप्रमाणे मय्यत दिवाकर यांनी पॉलिसी क्र.972120618 व 971684415 या पॉलिसीचे हप्ते भरले नसल्याने त्यांची वारस म्हणून अर्जदारास वरील दोन पॉलिसीची रक्कम मिळू शकत नाही. पॉलिसी क्र.973293375 ची रक्कम पॉलिसीत नोंद असलेल्या नॉमिनी कुंदाताई दिवाकर येनप्रेड्डीवार यांना नियमाप्रमाणे गैरअर्जदाराने दिली आहे. सदरची रक्कम कुंदाताई यांनी नॉमिनी म्हणून स्वतःच्या अधिकारात मिळविली असून दिवाकर यांचे अज्ञान पुञ शुभम व सचिन यांची अज्ञान पालनकर्ती या अधिकारात स्विकारलेली नसल्याने सदरची रक्कम शुभम व सचिन यांना मिळाली असे समजून त्यांना गैरअर्जदाराकडून घेणे असलेल्या पॉलिसी क्र.974684415 रक्कम रुपये 98,251/- आणि पॉलिसी क्र.971934468 रक्कम रुपये 51,205/- मधील त्यांच्या प्रत्येकी ¼ हिस्याच्या रकमेपासून त्यांना वंचीत करता येणार नाही. म्हणून अर्जदाराच्या मागणीप्रमाणे गैरअर्जदाराने तिला पॉलिसी क्र.974684415 आणि पॉलिसी क्र.971934468 ची पूर्ण रक्कम किंवा या रकमेतील दुस-या नोटीसातील मागणी प्रमाणे अर्धी रक्कम दिली नाही म्हणून गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला किंवा सेवेत ञृटीपूर्ण व्यवहार केला असे म्हणता येत नाही. म्हणून मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
20. वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदाराकडे देणे बाकी राहिलेल्या पॉलिसी क्र.974684415 रक्कम रुपये 98,251/- आणि पॉलिसी क्र.971934468 रक्कम रुपये 51,205/- एकुण रुपये 1,49,456/- पैकी ¼ हिस्याची रक्कम रुपये 37,364/- मिळण्यास अर्जदार पाञ आहे. माञ तिने वस्तुस्थितीच्या विपरीत रुपये 66,250/- देण्याचा गैरअर्जदाराविरुध्द आदेश व्हावा अशी या अर्जात केलेली मागणी मंजूर करता येणार नाही.
21. गैरअर्जदारांनी आपल्या युक्तिवादात अर्जदाराच्या कायदेशीर हिस्याची रक्कम देण्याची तयार दर्शविली आहे. त्यांचे म्हणणे असे कि, विम्याची रक्कम देण्यापूर्वी त्यांना नियमाप्रमाणे कागदपञांची पुर्तता करुन घ्यावी लागते. सदरच्या प्रकरणातील मय्यत दिवाकर येनप्रेड्डीवार यांची दोन मुले अज्ञान असल्यामुळे वारसानांकडून मायनर्स डिक्लरेशन घेण्याची आवश्यकता असते. सदर कागदपञांची पुर्तता करावी म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास दि.24.3.2012 रोजी पञ पाठविले. त्याची प्रत यादी नि.क्र.11 सोबत दस्त क्र.ब-1 वर आहे. तसेच अन्य वारस इंदीराबाई आणि सचिन व शुभम येनप्रेड्डीवार यांना देखील त्याच दिवशी पञ पाठविले आणि दस्तऐवजांची मागणी केली. सदर पञाच्या प्रती यादी नि.क्र.11 सोबत अनुक्रमे दस्त क्र.ब-2 व ब-3 वर आहेत. परंतु अर्जदार व अन्य वारसानांकडून दस्तऐवजांची पुर्तता झाली नसल्याने दिवाकर येनप्रेड्डीवार यांचा मृत्युदावा मंजूर करता आला नाही व वारसानांना त्यांच्या हिस्याची रक्कम देता आली नाही.
22. वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदाराकडे मय्यत दिवाकर येनप्रेड्डीवार यांच्या वारस अर्जदार रेखा ऊर्फ सुमन, दिवाकरची आई इंदीराबाई आणि दिवाकरची अनौरस मुले शुभम व सचिन यांना देय असलेली केवळ दोन पॉलिसींची रक्कम रुपये 1,49,456/- शिल्लक असून या रकमेत अर्जदारासह वरील 3 वारसांचा प्रत्येकी ¼ म्हणजे प्रत्येकी रुपये 37,364/- एवढा अविभक्त हिस्सा आहे. वरील वारस ह्यांचे परस्परांशी पटत नसल्याने सर्व मिळून गैरअर्जदारास आवश्यक असलेल्या कायदेशिर बाबींची एकञ पुर्तता करतील हे असंभव आहे.
23. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) गडचिरोली यांनी वारसान मामला क्र.51/2009 मध्ये अर्जदार व मय्यत दिवाकर यांचे अन्य 3 वारस शुभम, सचिन व इंदीराबाई यांच्या नावाने प्रत्येकी ¼ हिस्याचे वारसान प्रमाणपञ दि.5.11.2011 रोजी मंजूर केले आहे. त्यामुळे अर्जदाराकडून दिवाकर यांच्या मृत्युचा दाखला व तिच्या ¼ हिस्याचे वारसान प्रमाणपञ व क्लेम फार्म स्विकारुन तिच्या ¼ हिस्याची विमा राशी रुपये 37,364/- देण्यास कोणतीही कायदेशीर अडचण दिसत नाही. म्हणून वरीलप्रमाणे कागदपञाची अर्जदाराकडून पुर्तता करुन घेवून गैरअर्जदाराने तिच्या ¼ हिस्याची विमा राशी रुपये 37,364/- दिला द्यावी असा आदेश होणे न्यायसंगत होईल.
वरील कारणांमुळे मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा अर्ज खालील प्रमाणे अंशतः मंजूर.
(1) गैरअर्जदाराने अर्जदार रेखा उर्फ सुमनबाई दिवाकर येनप्रेड्डीवार यांचेकडून दिवाकरचे मृत्यु प्रमाणपञ, वारसान प्रमाणपञ व क्लेम फार्म स्विकारुन त्यांचे मय्यत पतींच्या विमा पॉलिसी क्र.974684415 व पॉलिसी क्र.971934468 पोटी देय असलेल्या एकुण रक्कम रुपये 1,49,456/- पैकी ¼ हिस्याची रक्कम रुपये 37,364/- अर्जाचे तारखेपासून रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह द्यावी.
(2) सदर आदेशाची पुर्तता या आदेशाचे तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी.
(3) सदर प्रकरणाचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
(4) या आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/8/2013