(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे जीवन विमा पॉलीसी Surrender केली होती, परंतु विरूध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करून सुध्दा तक्रारकर्त्याला पॉलीसीची Surrender Value न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष विमा कंपनी जी विद्यमान मंचाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे त्यांच्याकडून दिनांक 28/03/2005 रोजी 974716662 या क्रमांकाची जीवन विमा पॉलीसी काढली. सदरहू विमा पॉलीसीचा वार्षिक प्रिमियम रू. 10,000/- असा असून पॉलीसीची मुदत दिनांक 28/03/2012 पर्यंत होती. तक्रारकर्त्याने शेवटचा विमा हप्ता दिनांक 28/03/2011 रोजी भरला.
3. तक्रारकर्त्याने काढलेल्या विमा पॉलीसीची परिपक्वता मार्च 2012 ला होती. तक्रारकर्त्याला आर्थिक अडचणींमुळे विमा पॉलीसी दिनांक 10/03/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे Surrender करावी लागली. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला Surrender Value जी पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे Notional cash option नुसार रू. 71,050/- चे 90% म्हणजेच रू. 63,945/- व त्यावरील व्याज रू. 13,144/- असे एकूण रू. 77,089/- द्यावयास पाहिजे होते. परंतु ते विरूध्द पक्ष यांनी न दिल्यामुळे ही ग्राहक या नात्याने अनुचित व्यापार पध्दती आहे.
4. तक्रारकर्त्याने दिनांक 23/04/2012 व दिनांक 18/05/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे पॉलीसीची Surrender Value मिळण्यासाठी लेखी तक्रार केली होती. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी विम्याचे पैसे न देणे म्हणजे अनुचित व्यापार पध्दती असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास व्याजासह येणारी Surrender Value ची रक्कम रू. 1,12,555/- द्यावी तसेच नुकसानभरपाईपोटी रू. 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- मिळावे अशी तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 30/01/2014 रोजी मंचात दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली.
विरूध्द पक्ष यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दिनांक 24/04/2014 रोजी आपला जबाब मंचात दाखल केला.
विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने न्यू जीवन सुरक्षा योजना – 1, टेबल क्र. 147, सात वर्षे प्रिमियम भरण्याच्या अवधीकरिता दिनांक 28/05/2003 रोजी वार्षिक प्रिमियम हप्ता रू. 10,000/- नुसार विरूध्द पक्ष यांच्याकडून घेतली होती. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना त्याच्या पॉलीसी संबंधित पेन्शन घेण्याच्या योजनेनुसार विकल्प 6 महिन्याच्या आंत Special Provisions No.3 नुसार सुरू होण्याच्या पूर्वी कळविणे गरजेचे होते. परंतु तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना Option न कळविल्यामुळे विरूध्द पक्ष त्यांच्या पेन्शन पॉलीसी प्रमाणे दिनांक 28/03/2012 नंतर सुरू करू शकले नाहीत. तक्रारकर्त्याने काढलेल्या पॉलीसीच्या नियम क्रमांक 5 मध्ये Guaranteed Surrender Value नुसार तक्रारकर्त्याला त्याने भरलेल्या प्रिमियमच्या रकमेमधून पहिल्या वर्षाची प्रिमियम Value वजा करून Surrender Value दिल्या जाऊ शकते. तक्रारकर्त्याने दिनांक 10/03/2012 रोजी Surrender Claim रू. 77,089/- ची मागणी केली, परंतु ती मागणी पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार नसल्यामुळे विरूध्द पक्ष त्या तारखेस Surrender Value तक्रारकर्त्यास देऊ शकले नाहीत. तक्रारकर्त्याने दिनांक 10/03/2012 रोजी अर्ज केला असल्यामुळे त्यास पॉलीसीच्या अट क्र. 5 नुसार Surrender Value फक्त देय राहील असे जबाबात म्हटले आहे. परंतु विरूध्द पक्ष यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतरच Surrender Value देता येऊ शकते. त्यामुळे विरूध्द पक्ष यांची कृती ही पॉलीसीच्या अटी व शर्तीला अधीन असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी सेवेमध्ये कुठलीही त्रुटी केलेली नाही असे जबाबात म्हटले आहे.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत पॉलीसीची प्रत पृष्ठ क्र. 18 वर दाखल केली असून पॉलीसीचा Status Report पृष्ठ क्र. 21 वर दाखल केला आहे. पॉलीसीची Surrender Value मिळण्यासाठी विरूध्द पक्ष यांना दिलेला दिनांक 24/04/2012 रोजीचा अर्ज पृष्ठ क्र. 22 वर, पैसे मिळण्याबाबत दिनांक 18/05/2012 रोजीचा अर्ज पृष्ठ क्र. 23 वर दाखल केला असून पॉलीसीचे पैसे मिळण्याबाबतचा दिनांक 05/08/2013 रोजीचा अर्ज पृष्ठ क्र. 28 वर दाखल केला आहे.
7. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. कांबळे यांनी असा युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांनी Notional Cash Option नुसार रू. 71,050/- पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारकर्त्यास 90% वजा करून रू. 63,945/- व त्यावरील व्याज यासह एकूण रू. 77,089/- देणे बंधनकारक होते. पॉलीसीची Surrender Value मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना दिनांक 24/04/2012, 18/05/2012, 27/08/2012, 26/11/2012 तसेच दिनांक 05/08/2013 रोजी लेखी पत्र दिले. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या मागणीला कुठलेही संयुक्तिक उत्तर न दिल्यामुळे पॉलीसीची Surrender Value मिळण्याकरिता व व्याजासह नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्त्यास विद्यमान न्याय मंचात तक्रार दाखल करावी लागली. तक्रारकर्त्याने पॉलीसीची प्रत तसेच पॉलीसीचे पैसे भरल्याचा रिपोर्ट व विरूध्द पक्ष यांना दिलेले पत्र तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मान्य करण्यात यावी.
8. विरूध्द पक्ष व त्यांचे वकील वारंवार संधी देऊनही तोंडी युक्तिवादाकरिता गैरहजर राहिल्यामुळे तक्रारकर्त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण आदेशाकरिता बंद करण्यात आले.
9. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब तसेच तक्रारकर्त्याच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्त्याने जीवन सुरक्षा पॉलीसीची Surrender Value मिळण्यासाठी दिनांक 24/04/2012 व 18/05/2012 रोजी तसेच दिनांक 06/09/2013 व 25/10/2013 रोजी Notional Cash Option नुसार 90% Surrender Value मिळण्यासाठी अर्ज केलेले होते व ते अर्ज विरूध्द पक्ष यांना मिळाल्याची पोच सुध्दा अर्जावर नमूद केलेली आहे. विरूध्द पाक्ष यांनी जबाबात म्हटल्याप्रमाणे तक्रारकर्ता हा पॉलीसी नियम क्र. 5 नुसार Surrender Value मिळण्यासाठी पात्र आहे. परंतु तक्रारकर्त्यास Surrender Value ही अधिका-यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतरच देता येईल असे सुध्दा जबाबात म्हटले आहे. परंतु विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पॉलीसीचे तक्रारकर्त्याने पॉलीसीमध्ये जमा केलेले पैसे विमा पौलीसीचे नियम क्र. 5 नुसार Surrender Value ची रक्कम विरूध्द पक्षाच्या कार्यालयीन नियमांचे पालन कन व त्या नियमांची पूर्तता करून देणे ही जबाबदारी व कर्तव्य हे विरूध्द पक्षाचे असून सुध्दा विरूध्द पक्षाने ठराविक मुदतीत पालन न करणे म्हणजे विरूध्द पक्षाच्या सेवेमध्ये अनियमितता व सेवेमध्ये कसूर आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या अर्जाप्रमाणे Surrender Value न देणे म्हणजेच त्यांच्या सेवेतील त्रुटी होय.
11. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या अर्जाचे निराकरण योग्य वेळेत वरिष्ठ कार्यालयाकडून योग्य ती संमती घेऊन करणे आवश्यक होते. परंतु तक्रारकर्त्याने वेळोवेळी लेखी अर्जाद्वारे विनंती करून सुध्दा तक्रारकर्त्याला त्याने काढलेल्या पॉलीसीची अटी व शर्तीनुसार Surrender Value न देणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी होय. करिता विरूध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास पॉलीसीची Surrender Value रू. 63,945/- व्याजासह व नुकसानभरपाईसह देण्यास खालील आदेशाप्रमाणे बाध्य आहेत असे मंचाचे मत आहे. करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास जीवन विमा पॉलीसीची Surrender Value रू. 63,945/- द. सा. द. शे. 12% व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 30/01/2014 पासून संपूर्ण पैसे मिळेपर्यंत द्यावे.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रू. 20,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास रू. 10,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.