निकालपत्र :- (दि.14.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस स्विकारली नाही. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 विमा कंपनी आहे. सामनेवला क्र.2 तर्फे तक्रारदारांच्या भावाचा सामनेवाला विमा कंपनीकडे ‘जनश्री विमा योजने’ अंतर्गत विमा पॉलीसी उतरविलेली आहे. सदरची विमा योजना ही प्रामुख्याने कारखान्यातील ऊस तोडणी व वाहतुक कामगारांकरिता असून त्याचा रुपये 200/- चा प्रिमियम प्रत्येक कामगारा पाठीमागे असून रुपये 50/- कामगाराकडून व रुपये 150/- शासन भरीत होते. तक्रारदार हे कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे येथील कामगार होते व ते दि.13.04.2009 रोजी अपघाती मयत झाले. त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.14.01.2009 रोजी विमा कंपनीकडे क्लेमची मागणी केली असता तक्रारदारांना क्लेम देता येत नसल्याचे त्यांनी कळविले. (3) तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला विमा कंपनीस कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे यांना तक्रारदारांच्या करिता वकिलामार्फत दि.01.04.2010 रोजी नोटीस पाठविली. परंतु, त्याच चुकीची उत्तर दिले. त्यानंतर दि.15.04.2010 रोजी नोटीस पाठविली, परंतु त्यास उत्तर दिले नाही. (4) तक्रारदार पुढे सांगतात, जनश्री विमा योजना कालावधी सन 2007 ते 2008 या कालावधीकरिता होती व त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी जुनी पॉलीसी रिन्यू करणेकरिता कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे यांना रिन्युची रक्कम कामगारांकडून जमा करणेची सुचना केलेनंतर प्रिमियम गोळा करुन सामनेवाला क्र.1 यांचेकडे दि.16.05.2008 चा चेक नं.102700 रक्कम रुपये 2,55,350/- सन 2008-09 करिता पॉलीसीपोटी जमा केली. तो दि.29.05.2008 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे जमा झालेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी जुनी 2007-08 च्या पॉलीसीची मुदत संपलेनंतर लगेचच पुढील वर्षाची पॉलीसी रिन्यू करावयास पाहिजे होती. परंतु, सामनेवाला विमा कंपनीने सदर जबाबदारी झटकेलेली आहे व सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब, सामनेवाला यांनी वेयक्तिक तसेच संयुक्तिकरित्या क्लेम रक्कमरुपये 75,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत जनश्री विमा योजना पत्रक, कामगार आयुक्तांचे पत्र, सामनेवाला क्र.2 यांचे पत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली वकिल नोटीस, सामनेवाला क्र.1 यांचे पत्र इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या भावाचा मृत्यू अपघातात झाला किंवा कसे याबाबतची विमा कंपनीस माहिती नाही. त्याबाबतचा एफ्.आय.आर. किंवा मृत्यू दाखला दिलेला नाही. (7) सामनेवाला क्र.1 त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, जनश्री विमा योजना सन 2007-08 या कालावधीत दि.29.03.2007 ते दि.29.03.2008 असा होता. सदर कालावधी संपणेपूर्वी सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना पॉलीसीची मुदत संपत आहे याबाबत दि.07.01.2008 रोजी नोटीस दिली होती. सदर पॉलीसीमध्ये मृत्यू जर अपघातामध्ये झाला असेल तर सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम रुपये 75,000/- देणे लागतात व नैसर्गिक मृत्यू झालेस केवळ रुपये 30,000/- देणे लागतात. पॉलीसी रिन्यु करणेबाबत लगेच कोणतीही पावले उचलली नाहीत. तसेच, 30 दिवस ग्रेस पिरीयड रिन्युअलचे पैसे भरले नाहीत. त्यानंतर दि.29.05.2008 रोजी रक्कम रुपये 2,55,350/- सामनेवाला क्र.1 यांचेकडे भरणा केलेली आहे, परंतु त्यासोबत योजनेचा प्रस्ताव विलंबाने पाठविला व दि.31.01.2009 रोजी सन 2009 ते 2010 सालाकरिता पुढील नविन पॉलीसी सुरु केली. नविन पॉलीसीचा कालावधी दि.19.01.2009 ते दि.19.01.2010 असा होता. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ जनश्री योजना प्रस्ताव फॉर्म जुनी मास्टर पॉलीसी नियमावलीसहीत, जुनी मास्टर पॉलीसी नं.685761, रिन्युअल डेट कळविणेसाठी सामनेवाला क्र.2 नी सामनेवाला क्र.1 ला दिलेली नोटीस, जनश्री योजनेचा प्रस्ताव फॉर्म सामनेवाला क्र.2 नी सामनेवाला क्र.1 ला दिलेली (नविन पॉलीसी), नविन जनश्री पॉलीसी नं.705298 नियमावलीसहीत, मास्टर पॉलीसी नं.705298, सागर पिलारे यांचे नांवे दिलेले एल.आय.सी.चे अधिकारपत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (9) या मंचाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकला आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी त्यांच्या भावाचा मृत्यू हा अपघाती असल्याचे नमूद केले आहे ही वस्तुस्थिती सामनेवाला कंपनीने नाकारलेली आहे. तक्रारदारांच्या भावाचा मृत्यू अपघाती झाला, त्याबाबतचा एफ्.आय.आर. अथवा पोलीस स्टेशनकडील कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच, पॉलीसी ही तक्रारदारांचे भाऊ विष्णू नामदेव पाटील यांचे नांवे होती. सदर विष्णू नामदेव पाटील यांना तक्रारदारांव्यतिरिक्त अन्य कोणी वारस आहेत किंवा तक्रारदार हे एकमेव वारस आहेत याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच, योग्य त्या न्यायालयातून वारसाबाबत वारसा दाखला प्रस्तुत कामात दाखल केलेला नाही. याचा विचार करता तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार दाखल करणेस वैधस्थिती (Locus-standi) येत नाही. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |