निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार राजाबाई भ्र.शिवाजी शिंदे ही मयत शिवाजी कोंडीबा शिंदे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती हे दिनांक 30.12.2012 रोजी उस तोडतांना अचानक कोसळून उसाच्या फडात मृत्यु पावले. पोलीस स्टेशन उस्माननगर तालुका कंधार,जिल्हा नांदेड यांनी गुन्हा क्र. 24/2012 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराचे पती शिवाजी यांच्या नावाने गैरअर्जदार यांचे कार्यालयात जिवन सरल पॉलिसी(दुहेरी लाभ) नप-यासह काढली होती, पॉलिसीचा कालावधी 16 वर्षाचा आहे. विमा पॉलिसीच्या कालावधीमध्ये जर विमाकृत व्यक्तीचा अपघाताने मृत्यु झाल्यास त्याच्या वारसांना विम्याची मुळ रक्कम, अपघाती रक्कम व बोनस त्यांच्या वारसांना मिळणार अशी तरतूद सदरील पॉलिसीमध्ये आहे. अर्जदाराने पतीच्या मृत्यु नंतर गैरअर्जदार यांचेकडे क्लेम फॉर्म विनंती अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मुळ विमा रक्कम रु.62,500/- दिले परंतु अपघाती रक्कम व बोनसची रक्कम दिलेली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विचारणा केली असता गैरअर्जदार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून दुहेरी अपघाताची रक्कम रु.62,500/- दिनांक 30.12.2012 पासून द.सा.द.शे. 12टक्के व्याजासह द्यावेत. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.ञ15,000/- व दावा खर्च रक्कम रु.5,000/- इत्यादी रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावी अशी मागणी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार हे त्यांचे वकीलामार्फत तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदार ही मयत शिवाजी शिंदे यांची पत्नी असल्याचे गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार यांचेकडे जीवन सरल विमा पॉलिसी नप-यासह कोष्टक क्रमांक 165 पॉलिसी क्रमांक 987785620 प्रमाणे काढलेली असून पॉलिसीचा कालावधी 16 वर्षाचा आहे. परंतु सदरील विमा पॉलिसीच्या कालावधीमध्ये विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना विम्याची अपघाती रक्कम (दुहेरी लाभ) व बोनस मयताच्या वारसांना द्यावी अशी तरतूद सदरील विमा पॉलिसीमध्ये केली आहे हे म्हणणे चुक आहे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये मयत शिवाजी शिंदे यांचा मृत्यु हृदयाला रक्त पुरवठा करणा-या मुख्य रक्त वाहिन्या बंद पडल्या व श्वासोच्छवास बंद पडल्यामुळे शिवाजी शिंदे यांचा मृत्यु झाल्यामुळे त्यांचा मृत्यु हा अपघाती नसून नैसर्गिकरीत्या झालेला आहे. विमा पॉलिसीच्या परिच्छेद क्रमांक 11 अन्वये अर्जदाराचे पतीला विमा पॉलिसीचे सर्व अटी व नियम हे समजावून सांगितले होते. विमा पॉलिसीच्या परिच्छेद क्रमांक 11 चे अवलोकन केल्यास असे दिसून येईल की एखाद्या विमाधारकाचा मृत्यु हा अपघाती झाला असेल तरच गैरअर्जदार हा विमा पॉलिसीच्या नियमाप्रमाणे विमाधारकाच्या वारसाला दुहेरी लाभ देण्याची कायदेशीर जोखीम स्विकारलेली आहे. परंतु प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये मयत शिवाजी शिंदे यांचा मृत्यु अपघातामुळे झालेला नसून नैसर्गिक मृत्यु झाला आहे. अर्जदाराने जाणीवपूर्वक तीच्या पतीचे अपघाती निधन झाले असे सांगून खोटी तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 20.08.2013 रोजी मुळ विमा रक्कम रु.62,500/- अधिक मुळ रक्कमेवरील व्याज रु.1488/- अशी एकूण रक्कम रु.63,985/- विमा पॉलिसी रक्कम दिलेली आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु नैसर्गिकरीत्या झालेला असल्याने गैरअर्जदार रक्कम देण्यास जबाबदार नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन अर्जदार यांचे पती शिवाजी शिंदे यांनी गैरअर्जदार यांचेकडून जीवन सरल (with profit) ही पॉलिसी घेतलेली असल्याचे दोन्ही बाजूस मान्य आहे. दाखल पॉलिसीचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी दिनांक 21.06.2011 पासून पॉलिसी अंतर्गत जोखीम स्विकारलेली असून सदर पॉलिसीची परिपक्व दिनांक 21.06.2027 अशी आहे. अर्जदाराचे पती यांनी गैरअर्जदार यांचा विमा हप्ता भरलेला असून पॉलिसीची परिपक्व किंमत Maturity Sum Assured Rs. 49,827/- , Death benefit sum Assuisred under Main Plan Rs.62,500/- व Accident Benefit Sum Assuired रक्कम रु.62,500/- अशी जोखीम गैरअर्जदार यांनी स्विकारलेली आहे. त्यासाठी अर्जदाराने Instalment Premium for main plan Rs.1464.75 व Instalment Accident benefit premium Rs.31.25 असे एकूण रु.1516.00 भरलेले आहेत. यावरुन अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्यास गैरअर्जदार अर्जदारास रक्कम रु.62,500/- देणार असल्याचे दिसून येते. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा उस तोडत असतांना अचानक कोसळून झालेला असल्याचे दाखल पोलीस पेपर्सवरुन सिध्द होते. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती नसून तो नैसर्गिक आहे असे विमा कंपनीचे कथन आहे. याऊलट अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती असल्याने अर्जदार पॉलिसी अंतर्गत दुहेरी लाभाची रक्कम मिळणेस पात्र आहे. यासाठी अर्जदाराने मा. राज्य आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी प्रकरण क्रमांक 206/2013 मध्ये दिनांक 15.07.2014 रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतलेला आहे. सदर निवाडयामध्ये मा. राज्य आयोगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने Param Pal Singh Vs. National Insurance Co., 2013 A.I.R., SCW 283 मधील
“Unexpected death of deceased was an accident arising out of and in course of his employment. It is further observed by the Hon’ble Apex Court that deceased being a professional heavy vehicle driver when undertakes the job of such driving as his regular avocation it can be safely held that such constant driving of heavy vehicle, being dependant solely upon his physical and mental resources and endurance, there was every reason to assume that the vocation of driving was a endurance, there was every reason to assume that the vocation of driving was a material contributory factor if not the sole cause that accelerated his unexpected death to occur which in all fairness should be held to be an untoward mishap in his lifespan.”
म्हणजेच अचानक झालेला मृत्यु हा अपघाती मृत्युच आहे असे नमुद केलेले आहे. मा. राज्य आयोगाने दिलेल्या प्रकरणामध्येही मयताचा मृत्यु हा उस तोडत असतांना कोसळून झालेला आहे व सदर मृत्यु हा अपघाती असल्याचे मत दिलेले आहे. त्यामुळे सदर निवाडा हा या प्रकरणास तंतोतंत लागू होतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती झालेला असल्याने अर्जदार ही पॉलिसीप्रमाणे रक्कम रु.62,500/- मिळणेस पात्र आहे. गैरअर्जदार यांनी दुहेरी लाभाची रक्कम न देऊन सेवेत त्रुटी दिलेली आहे. वरील विवेचनावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी दुहेरी लाभाची रक्कम रु.62,500/- अर्जदाराच्या पतीच्या मृत्यु दिनांक 30.12.2012 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2500/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.