नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी दाखल केला विमा प्रस्ताव विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन नाकारुन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रार क्र.२८५/१०
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचे पती योगेश सुदामराव सोनवणे यांना विमा कंपनीकडून रक्कम रु.१,००,०००/- ची विमा पॉलिसी क्र.९६४३५८८४८ घेतली होती. त्यांचे हप्ते नियमित भरले होते. कै.योगेश हे दि.०१/०५/१० रोजी मोटार अपघातामध्ये मयत झाले.
३. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव सादर केला व विमा कंपनीने सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तताही केली परंतू विमा कंपनीने दि.०६/०७/१० रोजी खोटे-नाटे कारण देऊन विमा दावा नाकारला व सेवेत त्रुटी केली आहे.
४. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडुन जोखिम रक्कम रु.१,००,०००/- व बोनसची रक्कम, देय रकमांवर व्याज व नुकसान भरपाई रु.२,००,०००/- अर्जाचा खर्च रु.१५,०००/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.५०,०००/- असे एकूण रु.३,६५,०००/- मिळावे अशी विनंती केली आहे.
५ तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.२ वर शपथपत्र तसेच नि.५ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ३ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.५/१ वर मृत्यु प्रमाणपत्र, नि.५/२ वर पॉलिसीची झेरॉक्स आणि नि.५/३ वर अर्जाची प्रत दाखल केली आहे.
६. विमा कंपनीने आपला खुलासा नि.१२ वर दाखल करुन तक्रारदार यांचा अर्ज खरा नाही, तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही, अर्ज मुदतीत नाही म्हणून तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
७. विमा कंपनीने खरी वस्तुस्थिती या सदरात पॉलिसीधारक सुदामराव सोनवणे यांनी दि.१३/०३/०९ रोजी पॉलिसी घेतली होती परंतू त्यांनी मुदतीत हप्ते न भरल्यामुळे ती बंद अवस्थेत गेली. कार्यालयीन रेकॉर्डप्रमाणे विमेदाराने सप्टेंबर २००९ चा हप्ता दि.१७/०२/१० रोजी भरला होता त्यानंतर दि.०१/०४/१० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा सहामाई हप्ता मार्च २०१० मध्ये देय होता. मात्र तो न भरल्यामुळे दि.०१/०५/१० रोजी त्यांची पॉलिसी बंद होती. त्यामुळे तक्रारदार यांना काहीही रक्कम मिळू शकत नाही.
८. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, पॉलिसीच्या अट क्र.४ (Non forfeiture Regulations) नुसार तक्रारदार पॉलिसी बंद असल्यामुळे कुठलीही रक्कम मागू शकत नाही. विमा पॉलिसीचे हप्ते नियमित भरणे विमेदाराची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही त्यामुळे
तक्रार क्र.२८५/१०
विमा कंपनीने कुठल्याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही. त्यामुळे तक्रार अर्ज रद्द करावा व कॉस्ट रु.५०००/- मिळावेत अशी त्यांनी विनंती केली आहे.
९. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.१२ वर प्रकाश लक्ष्मण कुलकर्णी मॅनेजर यांचे शपथपत्र आणि नि.१५/१ वर विमा कंपनीचे पत्र दाखल केले आहे.
१०. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी
केली आहे काय? नाही.
२. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
११. मुद्दा क्र.१ - तक्रारदार यांचे पती कै.योगेश सुदामराव सोणवने यांनी विमा कंपनीकडूनदि.१३/०३/०९ रोजी विमा पॉलिसी घेतली होती. त्याचा क्र.९६४३५८८४८ आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यांनी सहामाही हप्ता रु.२०१५/- व भरण्याचा कालावधी मार्च व सप्टेंबर महिना होता असे दिसून येते. तक्रारदार यांचे पती यांनी पॉलिसी घेतल्यानंतर दुसरा हप्ता सप्टेंबर मध्ये भरणे अपेक्षीत होते. परंतू त्यांनी तो उशिरा दि.१७/०२/१० रोजी भरल्याचे विमा कंपनीने म्हटले आहे. त्यानंतर मार्च २०१० चा हप्ता दि.१२/०९/१० पर्यंत भरणे आवश्यक होते. सदर हप्ता भरण्यात आला नाही. त्यामुळे पॉलिसी बंद पडली. विमेदाराने मार्चचा हप्ता ग्रेस पिरियडमध्येही भरल्याचे दिसून येत नाही.
१२. तक्रारदार यांनी मार्चचा हप्ता भरला असल्याबाबत पुरावा दिलेला नाही. या परिस्थितीत विमा पॉलिसी बंद होती हे मान्य करणे भाग आहे. त्यामुळे विमा कंपनीने विमा दावा नाकारण्याचे दिलेले दि.१०/०७/१० चे पत्र चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. तसेच विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.१ चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
तक्रार क्र.२८५/१०
१३. मुद्दा क्र.२ – तक्रारदार यांनी विमा पॉलिसीचे हप्ते न भरल्यामुळे विमा पॉसिली बंद पडली होती असे आम्ही मुद्दा क्र.१ मध्ये मान्य केलेले आहे. तसेच विमेदाराने फक्त २ हप्ते भरलेले असल्यामुळे भरलेल्या रकमेतून surrender value देखील तक्रारदार यांना मिळू शकत नाही. त्यामुळे तक्रार अर्ज रद्द होण्यास पात्र आहे. वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
२. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
|
[HONABLE MR. D. D. Madake] |
PRESIDENT |
|
[HON'ABLE MR. C. M. Yeshirao] |
MEMBER |