::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/01/2015 )
आदरणीय सदस्य, मा.श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार: -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ते क्र. 1 व 2 हे मयत सुनिल बबनराव कदम यांची पत्नी व मुलगा म्हणजेच कायदेशिर वारस आहेत. तक्रारकर्तीचे पती सुनिल कदम हयात असतांना त्यांनी विरुध्द पक्षाच्या, वाशिम शाखेतून वर्ष 2005, 2007 व 2008 मध्ये विमा पॉलिसीज काढलेल्या होत्या, त्याचे विवरण खालीलप्रमाणे . . .
अ. जिवनसाथी ( दोहरा संरक्षण संयुक्त जीवन योजना ( लाभ सहीत
( दुर्घटना हितलाभ के साथ ) पॉलिसी क्र. 821746724 कालावधी दिनांक 28/11/2005 ते 28/11/2026 रुपये 55,000/-
ब. (लाभ सहीत) जिवन सरल पॉलीसी क्र. 821857784 , कालावधी दिनांक 28/11/2007 ते 28/11/2020 रुपये 1,25,000/-
क जिवनसाथी ( दोहरा संरक्षण संयुक्त जीवन योजना ) लाभ सहीत
( दुर्घटना हितलाभ के साथ ) पॉलीसी क्र. 821883103 कालावधी
दिनांक 03/01/2008 ते 03/01/2028 रुपये 1,00000/-
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी या विरुध्द पक्ष यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पॉलीसी काढणा-याअभिकर्ता एजंट) ) ने पॉलिसीचे स्पष्टीकरण न देता, तुम्ही निशंक रहा असे सागून ब-याच कागदपत्रांवर मयत सुनिल कदम यांच्या सहया घेतल्या. मयत सुनिल कदम व त्यांची पत्नी शुभांगी यांनी सर्व सत्यस्थिती सांगून व योग्य माहिती, प्रक्रीया व कागदपत्रांची पुर्तता केली. तसेच दोघांच्या सहया काही कागदपत्रांवर घेतल्या. दिनांक 13/02/2010 रोजी सुनिल बबनराव कदमयांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मृत्यूची सुचना विरुध्द पक्ष यांना वेळीच देण्यात आली. तसेच विरुध्द पक्ष यांनी सांगीतल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली. दिर्घ प्रतीक्षेनंतर विरुध्द पक्षाने तब्बल तेरा ते चवदा महिन्यानंतर म्हणजेच दिनांक 01/04/2011 रोजी तक्रारकर्ती क्र.1 यांच्या नावाने पाठविलेल्या एका पत्रानुसार, तक्रारकर्ते यांच्या वरील तिन्ही पॉलीसीचा मृत्यू दावा अमान्य झालेला आहे, असे कळविले. परंतु सदर दावा का अमान्य केला, त्याचे कोणतेही कारण या पत्रामध्ये नमुद केले नाही तसेच नाकारल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दिनांक 20/04/2011, 05/07/2011 रोजी व त्यानंतर प्रत्येक महिन्याला दूरध्वनी व प्रत्यक्ष भेटी घेउन, तसेच दिनांक07/05/2012 रोजी लेखी स्वरुपात नोटीस पाठवून पॉलीसी रक्कमेची मागणी केली. परंतु नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रक्कम दिलेली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने सेवा पुरविण्यास कसूर व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे.
म्हणून तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन, वि. मंचास विनंती केली की, तक्रार मंजूर करण्यांत यावी व विरुध्द पक्ष यांच्याकडून तक्रारकर्तीला नमुद तीन विमा पॉलिसींची एकूण रक्कम रुपये 2,80,000/- व त्या रक्कमेवर सुनिल बबनराव कदम मयत झाल्यापासून म्हणजेच दिनांक 13/02/2010 पासुन रक्कम मिळेपर्यंत प्रतिमाह 18 % प्रमाणे व्याज तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अन्य न्याय व योग्य असा आदेश तक्रारकर्तीच्या हितामध्ये व्हावा.
तक्रारकर्तीने सदर तक्रार शपथेवर दाखल केलेली असून त्या सोबत निशाणी- 3 प्रमाणे एकुण 06 दस्तऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जवाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली व पुढे नमूद केले त्याचा थोडक्यात आशय असा, . . . .
तक्रारकर्तीचे पती सुनिल कदम यांनी काढलेल्या दोन विमा पॉलिशी हया त्यांच्या मृत्यूपुर्वी तिन वर्षे अगोदर काढलेल्या आहेत तसेच तिसरी पॉलिशी जिचा क्रमांक 821746724 असा आहे, ही पॉलिशी सुध्दा मृत्यूच्या अगोदर दोन वर्ष अकरा महिने आधी काढलेली असल्यामुळे ( अरली क्लेम ) ठरतात. अशास्थितीत रक्कमेची मागणी झाल्यास, विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे सखोल चौकशी करणे अत्यावश्यक असते. त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने चौकशी केली असता असे आढळून आले की, विमाधारक सुनील कदम यास सन 2004 पासुनच किडनीचा त्रास होता व त्याबाबत विमाधारक यांच्यावर डॉक्टर रविंद्र भाटू यांचेकडे उपचार चालू होते व सदरहू बाब ही त्यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांच्याकडे सादर केलेल्या दिनांक 15/04/2008 रोजीच्या अर्जात, तसेच सदर अर्ज मंजूर केलेल्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, विमाधारक मय्यत सुनिल कदम यांना किडनीचा गंभीर स्वरुपाचा आजार गेल्या चार वर्षापासुन असुन त्यांच्या उपचाराकरिता रक्कम मंजूर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे डॉ. रविंद्र भाटू यांच्या दवाखान्यातील दिनांक 29/11/2004 च्या रिपोर्ट प्रमाणे विमाधारकास किडणीचा व उच्च रक्त दाबाचा गंभीर स्वरुपाचा आजार असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. असे असतांना सुध्दा विमाधारकाने सदरहू गंभीर बाब विरुध्द पक्षापासून लपवून ठेवली होती. सदरहू बाब जर विमाधारक मय्यत सुनिल कदम यांनी पॉलिशी काढतांना विरुध्द पक्ष यांच्या लक्षात आणून दिल्या असत्या तर त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी होऊन पॉलिशीच्या प्रिमीयम मध्ये वाढ करुन पॉलिशी काढता आल्या असत्या किंवा विरुध्द पक्षाने सदरहू पॉलिशी नाकारल्या सुध्दा असत्या. परंतु विमाधारकमय्यत सुनिल कदम यांनी असे न करता करताजाणुन-बुजून माहिती असतांना देखील या विरुध्द पक्षाची फसवणूक करण्याकरिता विरुध्द पक्षास सदरहू माहिती दिली नाही व ती त्यांच्यापासून लपवून ठेवली. त्यामुळे विमा कायदा 1938
चे कलम 45 नुसार विरुध्द पक्षानी सदरहू तक्रारकर्ते यांचा क्लेम नामंजूर केला आहे व हे त्यांना दिनांक 29/03/2011 रोजीच्या पत्राने कळविले तसेच विम्याची प्रिमीयमची रक्कम सुध्दा फोरफीट केली आहे. विमाधारकाने स्वत:च्या आजाराची बाब लपविली नसती तर त्यांना दोन पॉलीशीचा पूर्ण क्लेम मिळाला असता व तिस-या पॉलिशीचा पेड अप क्लेम मिळाला असता. अशा परिस्थिती मध्ये तक्रारकर्ते यांनी केलेली तक्रार ही खर्चासह खारिज करण्यांत यावी.
विरुध्द पक्षाने लेखी जबाबासोबत दस्तऐवज यादीनुसार सात कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्त्यांचा लेखी युक्तिवाद, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले व खालील निष्कर्ष कारणे देवुन नमुद केला.
या प्रकरणात उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ती क्र.1 चे मयत पती सुनिल बबनराव कदम यांनी ते हयात असतांना विरुध्द पक्ष भारतीय जीवन विमा निगम कडून वर्ष 2005, 2007, 2008 मध्ये पुढीलप्रमाणे पॉलिसी काढल्या होत्या, जसे की, . . .
अ. जीवनसाथी जिचा कालावधी दिनांक 28/11/2005 ते 28/11/2026
असा असून ती रक्कम रुपये 55,000/- ची आहे.
ब. जिवन सरलया पॉलीसीचा कालावधी दिनांक 28/11/2007 ते 28/11/2020
असा असून त्याची रक्कम रुपये 1,25,000/- ची आहे.
क. जीवनसाथी या नावाच्या पॉलीसीचा कालावधी दिनांक 03/01/2008
ते 03/01/2028 असा असून ती रक्कम रुपये 1,00000/- ची आहे.
विरुध्द पक्षाला हे ही मान्य आहे की, सुनिल बबनराव कदम यांचा मृत्यू दिनांक 13/02/2010 रोजी आजारपणामुळे झालेला आहे.
तक्रारकर्तीच्या युक्तिवादानुसार, तिने तिच्या पतीच्या मृत्यूची सुचना वेळीच विरुध्द पक्ष यांना दिलेली होती. तसेच आवश्यक ते सर्व दस्तऐवज पुरविले होते. परंतु त्यानंतर देखील विरुध्द पक्षाने वरील तिन्ही पॉलिसीची रक्कम वेळेवर देण्याऐवजी दिनांक 01/04/2011 रोजी तिला पत्र पाठवून असे कळविले की, त्यांचा विमा दावा नाकारला गेला आहे. ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील न्यूनता ठरते.
यावर विरुध्द पक्षाचा असा युक्तिवाद आहे की, विमाधारक मयत सुनिल बबनराव कदम यांचा मृत्यू, पॉलिसी घेतल्यापासून 3 वर्षाच्या आत झाल्यामुळे, या तिन्ही पॉलिसी अर्ली क्लेम या सदरातल्या असल्यामुळे विमा कंपनीच्या नियमानुसार सदर पॉलिसी बाबत सखोल चौकशी करणे अत्यावश्यक असते, व तशी चौकशी केल्यानंतर असे आढळले की,विमाधारक सुनिल बबनराव कदम यांना सन 2004 पासुनच किडनीचा त्रास होता, व त्याबाबत त्यांचे उपचार चालू होते. त्यांचे उपचार चालू होते असे दर्शविण्या करिता विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर मयत सुनिल बबनराव कदम यांच्या कार्यालयातील दस्तऐवज तसेच डॉक्टरकडील दस्तऐवज दाखल केलेले आहेत. मयत विमाधारकाने त्याच्या आजारपणाची माहिती असतांना देखील ती बाब लपवून सदरहू विमा पॉलिसीज काढून विरुध्द पक्षाची फसवणूक केली आहे, सबब तक्रार खारिज करावी.
उभय पक्षांचा वरीलप्रमाणे युक्तिवाद ऐकल्यानंतर व त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज काळजीपूर्वक तपासले असता, असे दिसून येते की, विरुध्द पक्षाचे असे कथन आहे की, मयत सुनिल बबनराव कदम यांनी काढलेल्या दोन पॉलिसी हया त्यांच्या मृत्यूपुर्वी 3 वर्ष अगोदर काढलेल्या आहेत, व तिसरी पॉलिसी जिचा क्र. 821746724 असा आहे, ही मृत्यूच्या अगोदर दोन वर्षे अकरा महिने आधी काढलेली असल्यामुळे अर्ली क्लेम ठरतात. विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन असे दिसते की, त्यांनी वरील कारणामुळे विमाधारक मयत सुनिल बबनराव कदम यांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, किन्हीराजा या कार्यालयातून दस्तऐवज मिळवले. त्या दस्तऐवजांवरुन असा बोध होतो की, मयत सुनिल बबनराव कदम यांनी त्यांच्या कार्यालयीन अधिका-याकडे दिनांक 15/12/2008 रोजी अर्ज करुन असे कळविले होते की, ते मागील चार वर्षापासून किडनी विकाराने त्रस्त आहेत व त्या ऑपरेशन करिता त्यांना शासकीय स्तरावरुन आर्थिक मदत हवी आहे. तसेच इतर कागदपत्रांवरुन असाही बोध होतो की, मयत सुनिल बबनराव कदम यांनी आर्थिक मदत त्यांच्या कार्यालयाकडून मिळविलेली आहे. परंतु विरुध्द पक्षाने ज्या अर्ली क्लेमसाठी ही चौकशी केली त्यातून प्राप्त झालेली माहिती ही सन 2005 व सन 2007 मध्ये काढलेल्या पॉलिसीला लावता येणार नाही असे मंचाचे मत आहे. कारण विरुध्द पक्षाने विमाधारकाची पॉलिसी काढण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करणे भाग होते. तसेच विरुध्द पक्षाच्या एजंटने पॉलिसी काढण्यापूर्वी विमाधारकाला सर्व बाबी समजावून त्यानंतर त्यांच्याकडून प्रपोजल फॉर्म स्विकारणे भाग होते. परंतु विरुध्द पक्षाने मयत विमाधारक सुनिल कदम यांची पॉलिसी काढण्यापूर्वी कधी वैद्यकीय तपासणी केली होती अथवा नाही, याबद्दलचे स्पष्टीकरण विरुध्द पक्षाने दिलेले नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या या चुकीचा फायदा केवळ त्यांनी नंतर जी माहिती गोळा केली, त्यावरुन देता येणार नाही. तसेच हीच माहिती विरुध्द पक्षाने पॉलिसी देण्यापूर्वी काढली असती तर ती बाब नैसर्गीक न्यायतत्वानुसार स्विकारता आली असती, त्यामुळे विरुध्द पक्षाचे लेखी जवाबातील कथनानुसार तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या मा. वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाडयातील निकषानुसार तक्रारकर्ते / वारस हे
1 ) जिवनसाथी ( दोहरा संरक्षण संयुक्त जीवन योजना ( लाभ सहीत ( दुर्घटना हितलाभ के साथ ) पॉलिसी क्र. 821746724कालावधी दिनांक 28/11/2005 ते 28/11/2026 रुपये 55,000/- व (2)जीवनसरल लाभसहीत पॉलिसी क्र. 821857784 ,कालावधी दिनांक 28/11/2007 ते 28/11/2020 रुपये 1,25,000/- या दोन्ही पॉलिसींचा पूर्ण क्लेम मिळण्यास व तिसरीजिवनसाथी ( दोहरा संरक्षण संयुक्त जीवन योजना ) लाभ सहीत ( दुर्घटना हितलाभ के साथ ) पॉलीसी क्र. 821883103 कालावधी दिनांक 03/01/2008 ते 03/01/2028 रुपये 1,00000/- या पॉलिसीचा पेड अप क्लेम मिळण्यास पात्र आहेत,असे मंचाचे मत आहे. परंतू विरुध्द पक्षाने या पॉलिसीची रक्कम दिनांक 01/04/2011 च्या पत्रान्वये नाकारलेली आहे, हे योग्य नाही. तसेच नैसर्गीक न्याय तत्वाच्या दृष्टीने विमाधारक मयत सुनिल बबनराव कदम यांनी सन 2005 व सन 2007 मध्ये काढलेल्या पॉलिसीचा लाभ दिलेला नाही, व सन 2008 च्या पॉलिसीच्या पोटी भरलेली दिनांक 13/02/2010 पर्यंतची प्रिमीयम राशी विरुध्द पक्षाकडे जमा आहे, ती रक्कम सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिली नाही. म्हणून यामुळे झालेल्या शारीरिक,आर्थिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई पोटीची रक्कम घेण्यास सुध्दा तक्रारकर्ती पात्र ठरते व तक्रारकर्तीला त्यासाठी मंचात प्रकरण दाखल करावे लागले म्हणून त्याबद्दलचा न्यायिक खर्च मिळण्यास देखील तक्रारकर्ती पात्र आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
- तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष - विमा कंपनीने मयत विमाधारक सुनिल बबनराव कदम यांच्या जीवनसाथी पॉलिसी क्र. 821746724 या नावाच्या पॉलिसीची विमा रक्कम रुपये 55,000/- ( अक्षरी रुपये पंचावन्न हजार फक्त ) व जीवनसरल लाभसहीतपॉलिसी क्र. 821857784 रुपये 1,25,000/- ( अक्षरी रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त) दरसाल, दरशेकडा 9 टक्के व्याजदराने दिनांक 01/04/2011 ( क्लेम नाकारल्याची तारीख ) पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंतव्याजासहीत तक्रारकर्ते / वारस यांना द्यावी.
- विरुध्द पक्ष यांनी, विमाधारक सुनिल बबनराव कदम यांनी काढलेली जीवनसाथी पॉलिसी क्र. 821883103 पोटी जमा केलेली त्यांच्या मृत्यूपर्यंतची प्रिमीयम राशी तक्रारकर्ते / वारस यांना द्यावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते / वारस यांना झालेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई पोटी व प्रकरणाचा न्यायिक खर्च मिळून एकत्रीत रक्कम रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) द्यावी.
- विरुध्द पक्ष यांनी सदर आदेशाची पुर्तता, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांत करावी.
6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).