::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/11/2014 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता हा वरदरी बु. ता. मालेगाव जि. वाशिम येथील रहिवाशी आहे. तक्रारकर्ता दिनांक 11/12/2008 रोजी रोजी मोटर सायकलने खामगाव ते नांदुरा रोडने जात असतांना, अचानक मधात गाय आल्याने तक्रारकर्त्याचे मोटर सायकलवरील नियंत्रण सुटून, मोटर सायकल रस्त्यावर पडली. या अपघातात तक्रारकर्ता गंभीररित्या जखमी झाला व त्यांचा डावा पाय फॅक्चर झाला तसेच डोक्याला व डाव्या खांदयाला जखमा झाल्या. तक्रारकर्त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे तक्रारकर्त्यास विठ्ठल हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले व तेथे दिनांक 13/12/2008 ते 14/12/2008 या कालावधीत तक्रारकर्त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली व त्याच्या डाव्या पायामध्ये रॉड टाकण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्त्यास सर जे.जे. हॉस्पीटल, मुंबई येथे दिनांक 08/1/2009 ते 23/11/2009 या कालावधीत भरती करण्यात आले व तेथे सुध्दा तक्रारकर्त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारकर्त्यास या अपघातामध्ये 42 % कायम अपंगत्व आले व तसे प्रमाणपत्र सरकारी रुग्णालय,वाशिम येथून मिळालेले
आहे. तक्रारकर्त्यास या अपघातामुळे रुपये 2,00,000/- खर्च आला.
केंद्र शासनाने, आम आदमी विमा योजना महाराष्ट्र राज्यात राबविली. तक्रारकर्ता या योजनेचा लाभार्थी आहे. या योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 75,000/- तसेच अपघातात एक पाय, एक डोळा निकामी झाल्यास रुपये 37,500/- देय ठरतात. तक्रारकर्त्याचा अपघातात एक पाय पुर्णपणे निकामी झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने योजनेचा लाभ मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला परंतु विरुध्द पक्ष टाळाटाळ करीत आहेत. विरुध्द पक्ष यांनी सेवेतील न्युनता अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे, तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, त्यांच्याकडून तक्रारकर्त्याला देय असलेली रक्कम रु. 37,500/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन 18 % व्याज तसेच झालेल्या शारिरीक, आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- प्रत्येक विरुध्द पक्षाकडून व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश करावा, अशी विनंती केली.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकुण 05 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) या प्रकरणात वि. मंचाने दिनांक 22/08/2014 रोजी आदेश पारित केला की, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्द पक्ष गैरहजर. तरी प्रकरण विरुध्द पक्षा विरुध्द एकतर्फी चालविण्यात यावे.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवुन नमुद केला.
या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचाची नोटीस बजाविल्यानंतर देखील ते गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज ‘‘ आम आदमी विमा योजना सदस्यता प्रमाणपत्र ’’ या दस्तावरुन असे दिसते की, तक्रारकर्ता हा केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेचा सदस्य आहे. तक्रारकर्त्याने तो दरिद्री रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र रेकॉर्डवर दाखल केले आहे. सदर विमा योजने अंतर्गत कशाप्रकारे लाभ प्राप्त होईल, त्यामध्ये अट क्र. सी ( C )नुसार, ‘‘ दूर्घटनामे एक ऑंख या एक हाथ/पॉंव अक्षम होने पर रुपये 37,500/- ’’ चा फायदा हया योजने अंतर्गत मिळणार होता, असे दिसून येते. या योजनेचा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र. 1 कडे दावा दाखल केला होता, असे विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे दिनांक 15/09/2012 रोजीच्या पत्रावरुन दिसून येते. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदरहू अपंगत्व विमा दावा मिळण्याकरिता तक्रारकर्त्यास एफ.आय.आर / स्पॉट पंचनामा पाठवावा, तरच अपंग लाभ मिळू
शकेल, असे कळविलेले या पत्रावरुन दिसून येते. परंतु, तक्रारकर्त्याचे कथनच असे आहे की, तो मोटर सायकलवरुन जात असतांना खामगाव बायपास जवळ
अचानक मधात गाय आल्यामुळे, मोटर सायकलचे नियंत्रण सुटून सदरहू अपघात घडला. अशा परिस्थितीत घटनेचाएफ.आय.आर. किंवा स्पॉट पंचनामा, असलाच पाहिजे असे नाही. कारण तक्रारकर्ता याने वैदयकीय अधिकारी यांचे, वैदयकीय प्रमाणपत्र दाखल केले असून, त्यामध्ये त्याला 42 % कायम अपंगत्व आले आहे, असे नमुद आहे. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेले इतर दस्तऐवज पाहता असे दिसते की, त्याला या अपघातामुळे उपचार करण्याकरिता निश्चीतच खर्च आलेला आहे. सबब अशा परिस्थितीत, तक्रारकर्त्याला आम आदमी विमा योजनेचा फायदा मिळणे गरजेचे आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच हया प्रकरणात विरुध्द पक्षातर्फे कोणतेही नकारार्थी कथन उपलब्ध झाले नाही. अशा परिस्थितीत, तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून सदर पॉलिसीची रक्कम व्याजासह घेण्यास पात्र आहे, अशा निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या किंवा वेगवेगळे तक्रारकर्त्यास
आम आदमी पॉलीसीनुसार रक्कम रुपये 37,500/- ( अक्षरी, सदोतिस
हजार पाचशे फक्त ) ही दरसाल, दरशेकडा 5 % व्याजदराने दिनांक
27/08/2013 ( प्रकरण दाखल तारीख ) पासुन ते प्रत्यक्ष अदायगी पर्यंत
दयावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या किंवा वेगवेगळे तक्रारकर्त्यास
झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 5,000/- ( अक्षरी,
पाच हजार फक्त ) व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- ( अक्षरी,
दोन हजार फक्त ) दयावा.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशाचे पालन, आदेशाची प्रत
मिळाल्यापासुन 45 दिवसाचे आत करावे.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.