जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 16/2010. तक्रार दाखल दिनांक : 12/01/2010. तक्रार आदेश दिनांक :31/03/2011. श्रीमती अर्चना दयानंद वाकडे, वय 22 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. खडक गल्ली, बाळे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द लाईफ इन्शुरन्स कंपनी, पुणे विभाग कार्यालय, 2, सर्व्हे नं. 688 ए बी2, महावीर पार्क, चौथा मजला, पुणे-सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे. (समन्स सोलापूर शाखा, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर येथे बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : यु.बी. भोजने विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : आर.डी. आनदाने आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांचे पती दयानंद उत्तम वाकडे (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमेदार दयानंद’) यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘एल.आय.सी.’) यांच्याकडून पॉलिसी नं.956920468 व 956922785 अन्वये अनुक्रमे रु.1,00,000/- व रु.2,00,000/- चा विमा उतरविला आहे. दि.28/2/2008 रोजी विमेदार दयानंद यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी अर्ज केला असता, एल.आय.सी. ने दि.3/7/2009 रोजीच्या पत्रान्वये खोटे कारण देऊन क्लेम नाकारला आहे. एल.आय.सी. ने पॉलिसी संदर्भात केलेले आरोप खोटे असून तक्रारदार यांना अमान्य आहेत. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा कंपनीकडून विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक क्लेषापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. एल.आय.सी. ने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विमेदार दयानंद यांचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले नाही. डॉ.वाय.एम. ढेपे यांच्या प्रमाणपत्रानुसार विमेदार दयानंद यांचा मृत्यू वैद्यकीय उपचाराशिवाय घरामध्ये झालेला आहे. मृत्यूच्या कारणाबाबत विमेदार दयानंद यांचे पोस्टमार्टेम करण्यात आलेले नाही. त्यांनी तक्रारदार यांचा क्लेम उचित कारणाद्वारे नाकारला आहे. विमेदार दयानंद यांनी प्रस्तावातील प्रश्नांची चूक उत्तरे दिलेली आहेत. त्यांना चक्कर येणे व डोकेदुखी आजार होता आणि त्यांचे सिटीस्कॅन केल्याचे पुराव्याद्वारे निदर्शनास आले आहे. दि.16/8/2006 ते 22/8/2006 कालावधीमध्ये विमेदार दयानंद चक्कर येण्याच्या कारणामुळे डॉ.चिडगुपकर हॉस्पिटलमध्ये दाखल होत. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतल्याची माहिती प्रस्तावामध्ये नमूद केली नाही. विमेदार दयानंद यांनी आरोग्याविषयी चूक माहिती दिल्यामुळे व जाणीवपूर्वक अचूक माहिती लपवून ठेवल्यामुळे क्लेम नाकारला आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विमेदार दयानंद यांनी एल.आय.सी. कडे पॉलिसी नं.956920468 व 956922785 अन्वये अनुक्रमे रु.1,00,000/- व रु.2,00,000/- चा विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. दि.28/2/2008 रोजी विमेदार दयानंद यांचा मृत्यू झाल्याविषयी विवाद नाही. विमा पॉलिसीची रक्कम मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी विमा दावा सादर केल्याविषयी विवाद नाही. त्यानंतर एल.आय.सी. ने दि.3/7/2009 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, विमेदार दयानंद यांना चक्कर येणे व डोकेदुखी आजार होता आणि त्यांचे सिटीस्कॅन केल्याचे पुराव्याद्वारे निदर्शनास आल्यामुळे विमेदार दयानंद यांनी आरोग्याविषयी चूक माहिती देणे व जाणीवपूर्वक अचूक माहिती लपवून ठेवल्यामुळे क्लेम नाकारल्याचे निदर्शनास येते. 6. एल.आय.सी. ने विमेदार दयानंद यांना चक्कर येणे या आजारासाठी दि.16/8/2006 रोजी डॉ. चिडगूपकर हॉस्पिटल प्रा.लि., सोलापूर येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केल्याची कागदपत्रे रेकॉर्डवर सादर केली आहेत. 7. निर्विवादपणे, एल.आय.सी. ने विमेदार दयानंद यांना विमा पॉलिसी देण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करुनच पॉलिसी दिलेली आहे. आमच्या मते, ज्यावेळी एल.आय.सी. विमेदारास पॉलिसी देण्यापूर्वी वैद्यकीय व्यवसायिककडून विमेदाराची तपासणी करुनच पॉलिसी जारी करते, त्यावेळी प्रस्तावामध्ये आरोग्याविषयी नमूद केलेले प्रश्न व त्यास दिलेली उत्तरे गौण व दुय्यम ठरतात. एल.आय.सी. ने वैद्यकीय व्यवसायिकाकडून विमेदाराच्या आरोग्याची खात्रीशीर माहिती घेतल्यानंतर पॉलिसी जारी केली असल्यास त्यांना पुन्हा प्रस्तावातील प्रश्नांचा आधार घेऊन विमेदाराचा विम्याचा कायदेशीर हक्क हिरावून घेता येणार नाही. 8. रेकॉर्डवरील कागदपत्रांमध्ये विमेदार दयानंद यांनी चक्कर येण्याच्या आजाराकरिता वैद्यकीय उपचार घेतल्याचे निदर्शनास येते. निर्विवादपणे, विमेदार दयानंद यांचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हे त्यांनी पूर्वी उपचार घेतलेल्या आजाराशी निगडीत असल्याचे सिध्द होत नाही. त्यांनी घेतलेला उपचार व मृत्यूचे कारण भिन्न असल्यास त्याचा लाभ एल.आय.सी. यांना घेता येणार नाही. 9. मा.राष्ट्रीय आयोगाने ‘लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया /विरुध्द/ श्रीमती चंद्रकांता लोहांडे’, 2009 सी.टी.जे. 73 (सी.पी.) (एन.सी.डी.आर.सी.) निवाडयामध्ये असे नमूद केले आहे की, Para. 10 : In today’s world, people face problems like acidity, indigestion, back pain and headache, which are sometimes chronic in nature. These symptoms may occur from time to time with different levels of intensity. They cannot be considered as diseases, which require to be enumerated while answering the questionnaire of the LIC in its proposal form. 10. वरील सर्व विवेचनावरुन विमेदार दयानंद यांनी पॉलिसी घेताना प्रस्तावामध्ये चूक माहिती दिल्याचे किंवा सत्य माहिती लपवून ठेवल्याचे सिध्द होत नाही. एल.आय.सी. ने तक्रारदार यांचा विमा क्लेम अत्यंत तांत्रिक व अनुचित कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे पॉलिसी नं.956920468 व 956922785 ची देय विमा रक्कम त्या अनुषंगाने असलेल्या सर्व लाभांसह क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.3/7/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 11. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना पॉलिसी नं.956920468 व 956922785 अन्वये संपूर्ण देय विमा रक्कम त्या अनुषंगाने असलेल्या सर्व लाभांसह दि.3/7/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना उपरोक्त रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास देय रक्कम मुदतीनंतर द.सा.द.शे. 12 टक्के दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/30311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |