जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २१७/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०८/११/२०११
तक्रार निकाली दिनांक – २२/०४/२०१४
श्री.राजेंद्र श्रीराम पवार उर्फ
विजय श्रीधर पवार
उ.व. ४८, धंदा-नोकरी,
रा.पढावद ता.शिदखेडा जि.धुळे ..…........ तक्रारदार
विरुध्द
१) वरिष्ठ प्रबंधक,
लॉईफ इंन्शुरस कॉरपरेशन
ऑफ इंडिया राणीमा प्लाझा,
शॉपींग कॉम्प्लेक्स दोंडाईचा
ता. शिदखेडा जि.धुळे
२) क्षेत्रिय प्रबंधक
आयुविमा मंडळ कार्यालय, जीवन प्रकाश,
गडकरी चौक, गोल्फ क्लब ग्राउंड,
पुराना आग्रा रोड, पोस्ट बॉक्स नं.११०
नाशिक ता.जि. नाशिक ........... सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.व्ही.ए. पवार)
(सामनेवाला तर्फे – अॅड.श्री.व्ही.एस. भट)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री. एस.एस. जोशी)
१. विमाधारकाच्या मृत्यूनंतर सामनेवाले यांनी त्याच्या विमा दाव्याची रक्कम
नाकारली. ती रक्कम मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांचा मुलगा राहुल याने सामनेवालेंकडून दि.३०/०७/२००९ रोजी रूपये २,००,०००/- रकमेची विमा पॉलीसी घेतली होती. त्याचा क्रमांक ९६४३६३६५२ असा होता. या पॉलीसीत राहुल याने तक्रारदार यांना वारस लावले होते. दि.०१/०१/२०११ रोजी गडखांब ता.अमळनेर जि.जळगाव येथील विहिरीत पडून विमाधारक राहुल राजेंद्र पवार याचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला. त्यावर सामनेवाले यांनी दि.२६/०७/२०११ रोजी पत्र पाठवून दावा नाकारत असल्याचे तक्रारदार यांना कळविले. विमाधारक राहुल हा मानसिक विकाराने आजारी होता. पॉलीसी घेण्यापूर्वी त्याने डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. ही माहिती त्याने पॉलीसी घेतांना दडवून ठेवली, असे कारण देवून सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा दावा फेटाळला. कोणतेही कारण नसतांना सामनेवाले यांनी विमा नाकारला. तो मंजूर करावा. दाव्याच्या रकमेवर दि.०१/०१/२०११ पासून १८ टक्के व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रूपये ७५,०००/- आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी सामनेवाला यांनी दावा नाकारल्याचे पत्र, राहुल राजेंद्र पवार याच्या विमा पॉलिसीची नक्कल, राहुल यांच्या मेडिकल दुकानासंदर्भात केलेला करारनामा, फार्मसी काउन्सीलचे प्रमाणपत्र, डी फार्मसीचे गुणपत्रक, औषध विक्री करण्याचा व साठविण्याचा परवाना, राहुल याचा डॉ.किरण पाटील यांच्याकडून केलेला एम.आर.आय, राहुल याच्यावर डॉ.आनंद दिवाण यांनी केलेले उपचार, डॉ.दीपक पाटील यांच्याकडील केस पेपर, डॉ.सुशील गुजर यांच्याकडील केस पेपर, डॉ.लुनावत यांच्याकडील केस पेपर, दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आदी दस्ताऐवजांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले नं.१ व २ यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार कायदेशीर नाही. तक्रारीत नमूद तथाकथीत वाद हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गंत अभिप्रेत असलेल्या वाद या संज्ञेत मोडत नाही. तक्रारीत योग्य पक्षकारांना सामील केलेले नाही. मयत राहुल याच्या मानसिक स्थितीचे वर्णन तक्रार अर्जात तसेच विमा पॉलीसी काढतेवेळी लपवून ठेवले आहे. राहुल याला मानसिक आजार होता. त्यास नेहमी डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यावर अमळनेर येथील डॉ.बहुगुणे, चोपडा येथील डॉ.दीपक पाटील व डॉ.सुशील मुथा यांच्याकडे उपचार सुरू होते. त्याच्या मनावर परिणाम झाला होता. त्या वेडसरणाच्या भरात त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तक्रारदार यांनी ही बाब लपवून ठेवली. त्यामुळे त्यांचा दावा नाकारला. तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
५. आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ सामनेवाले यांनी मयत राहुल याचे मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारदार यांना पाठविलेले पत्र, राजेंद्र पवार यांचा जबाब, अनिताबाई पवार यांचा जबाब, रिंकुबाई पवार यांचा जबाब, अहिल्याबाई पवार यांचा जबाब, प्रकाश पाटील यांचा जबाब, ज्ञानेश्वर पाटील यांचा जबाब, अमळनेरचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे पत्र, तुकाराम पवार यांचा जबाब, अमळनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे पत्र, राहुल पवार यांच्या मृत्यूची शरद पवार यांनी दिलेली खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, कॉज ऑफ डेथ प्रमाणपत्र व शवविच्छेदन अहवाल आदी दस्तऐवजांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि उभय बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर आमच्यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत का ? होय
ब. तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्यास
योग्य आहे, हे सामनेवाले यांनी सिध्द केले
आहे का ? नाही
क. आदेश काय ? सविस्तर आदेशाप्रमाणे
विवेचन
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांचा मुलगा राहुल याने सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलीसी घेतली होती. त्यावेळी त्याने तक्रारदार यांना वारस लावले होते. विमाधारक म्हणजे राहुल हा सामनेवाला यांचा ग्राहक होता. त्याच्या मृत्यूनंतर तक्रारदार हे त्याचे कायदेशीर वारस आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २(ब) (५) मधील तरतुदीनुसार तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक ठरतात. त्यामुळे मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’- विमाधारक राहुल राजेंद्र पवार हा मनोरूग्ण होता. त्याबाबत तो डॉक्टरांकडून उपचार घेत होता. मनोरूग्ण अवस्थेतच त्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही बाब तक्रारदार यांनी लपवून ठेवली. याच कारणामुळे तक्रारदार यांचा विमा दावा रदद केला, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. विमाधारक राहुल हा मनोरूग्ण होता हे सिध्द करण्यासाठी सामनेवाले यांनी राहुल याचे वडील राजेंद्र पवार यांचा जबाब, अनिताबाई पवार यांचा जबाब, रिंकुबाई पवार यांचा जबाब, प्रकाश पाटील यांचा जबाब, ज्ञानेश्वर पाटील यांचा जबाब, तुकाराम पवार यांचा जबाब दाखल केला आहे.
राहुल हा मनोरूग्ण नव्हता हे सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी, मेडिकल दुकानासंदर्भातील करारनामा, फार्मसी काऊन्सीलचे प्रमाणपत्र, डी फार्मसीचे गुणपत्रक, औषध विक्री परवाना, डॉ.किरण पाटील यांच्याकडील एम.आर.आय., डॉ.आनंद दिवाण, डॉ.दीपक पाटील, डॉ.सुशील गुजर, डॉ.लुनावत यांच्याकडील उपचारांची माहिती, दहावीचे गुणपत्रक दाखल केले आहे.
सामनेवाले यांनी दाखल केलेल्या निरनिराळया व्यक्तींच्या जबाबात ‘राहूल यांची आई मनोरूग्ण होती. त्याचे आजोबा मनोरूग्ण आहेत. म्हणून राहूल यास अनुवंशिक आजार असण्याची शक्यता होती. सुमारे ५ ते ६ महिन्यांपासून तो डोकेदुखीच्या आजारावर औषधोपचार घेत होता आणि शेवटी ‘त्याच्या मनावर परिणाम झाला होता. या वेडसरणपणाचे भरात त्याने वरील ठिकाणी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे’ असा उल्लेख आहे. या सर्व जबाबांचे निरीक्षण केल्यावर आमच्या असे निदर्शनास आले की, हे सर्व जबाब सारखेच आहेत. ते सत्य प्रमाणित करण्यात आले असले तरी त्यावर जबाब देणा-यांची स्वाक्षरी नाही. राहूल हा मानसिक रूग्ण होता याचा कोणताही दाखला जबाब देणा-यांनी दिलेला नाही. ज्यांनी जबाब दिला आहे आणि ज्यांनी तो नोंदवून घेतला आहे, ते वैद्यकीय तज्ज्ञ किंवा डॉक्टर नाहीत.
तक्रारदार यांनी जी विविध कागदपत्रे दाखल केली आहे त्यावरून आमच्या असे निदर्शनास आले की, मयत राहुल याने औषधी दुकान टाकण्यासाठीचे शिक्षण घेतले होते. औषधी दुकानासाठीचा परवाना त्याच्याकडे होता. कराराने त्याने दुकानही ताब्यात घेतले होते. डॉ.किरण पाटील यांच्याकडे त्याचा दि.३१/१०/२०१० रोजी एम.आर.आय. करण्यात आला. त्याच्या निष्कर्षात डॉक्टरांनी ‘No significant abnormality seen in the screening MRI study of brain, MR ongiography and MR venography. Mild changes sinusitis’. असे नमूद केले आहे. राहूल याला डोकेदुखी असल्याने हा एम.आर.आय. कारण्यात आला असेही डॉक्टरांनी सुरूवातीला म्हटले आहे.
डॉ. आनंद दिवाण यांनी दि.३१/१२/२०१० रोजी त्याला डोकेदुखीवर औषधे दिली. डॉ.सुशील गुर्जर यांनी दि.०२/१२/२०१० रोजी राहुल याला तपासले. त्यावेळी डोकेदुखीसाठीच औषधी दिल्याचे दिसते. डॉ.एस.पी. लुनावत यांनी दि.३१/१२/२०१० रोजी केस पेपरवर ‘migrane’ लिहिले आहे.
डॉक्टरांच्या या कागदपत्रांवरून राहुल याला डोकेदुखीचा त्रास होता असे स्पष्ट होते. वरील पैकी कोणत्याही डॉक्टरांनी त्यांच्या कागदपत्रात राहुल याला मानसिक विकार होता असा उल्लेख केलेला नाही, असे आमच्या निदर्शनास येते.
आपल्या खुलाश्यात सामनेवाले यांनी राहुल मनोरूग्ण होता आणि त्याच्यावर डॉ.बहुगुणे, डॉ.दीपक पाटील, डॉ.सुशील मुथा यांच्याकडे उपचार सुरू होते असा उल्लेख केला आहे. तथापि वरील डॉक्टरांचे कोणतेही कागद, अहवाल अथवा उपचारासंबंधी माहिती सामनेवाले यांनी दाखल केलेले नाही.
सामनेवाले यांनी पोलिसांसमोरचे अनेक जबाब, खबर, पंचनामा दाखल केले. मात्र ते तज्ज्ञ वैद्यकिय व्यक्तींचे जबाब नाहीत. वैद्यकीयदृष्टया त्याला आधार नाही. तक्रारदार यांनी त्याच संदर्भात डॉक्टरांचे अहवाल, औषधोपचाराची कागदपत्रे दाखल केली. डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाविषयी तेच निश्चितपणे निदान करू शकतात असे आम्हाला वाटते.
वरील विवेचनाचा विचार करता विमाधारक राहुल पवार हा मनोरूग्ण होता ही बाब लपवून ठेवली या कारणावरून तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्याचा निर्णय योग्य होता, हे सामनेवाले सिध्द करू शकलेले नाहीत, असे आमचे मत बनले आहे. याच कारणावरून मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही नाही असे देत आहोत.
१०. मुद्दा ‘क’– संपूर्ण तक्रार, सामनेवालेंनी उपस्थित केलेले मुददे, तक्रारदाराचा विमा दावा नाकारण्यामागील कारण आणि मुददा ‘ब’ चे विवेचन याचा आम्ही आणखी विस्तृत विचार केला. विमाधारक राहुल याने दि.३०/०७/२००९ रोजी विमा पॉलीसी घेतली. दि.०१/०१/२०११ रोजी त्याचा मृत्यू झाला. विमा पॉलीसी घेण्यापूर्वी राहूल आजारी होता, त्याने उपचार घेतले होते, ही बाब तक्रारदार यांनी
लपवून ठेवली व या कारणावरून सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला. तथापि पॉलीसी घेण्यापूर्वी विमाधारक आजारी होता, त्याने डॉक्टरांकडून उपचार घेतले याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाले यांनी मंचासमोर आणलेला नाही. राहूल याने डोकेदुखीसाठी डॉक्टरांकडून जे उपचार घतले, तेही पॉलीसी काढल्यानंतर सुमारे वर्षाभरानंतर. ती कागदपत्रेही तक्रारदार यांनी दाखल केलेली आहेत. यावरून अयोग्य कारणाच्या आधारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला असे आमचे मत बनले आहे. तक्रारदार यांना त्यांची विम्याची रक्कम, त्यावर दावा नाकारल्यापासून ६ टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळाला पाहिजे या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. त्यामुळे आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशता मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले नं.१ व २ यांनी तक्रारदार यांना निकालापासून ३०
दिवसांच्या आत,
अ) तक्रारदार यांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम द्यावी.
ब) विमा दाव्याच्या रकमेवर दि.२७/०७/२०११ पासून संपूर्ण रक्कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के व्याज द्यावे.
क) मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १०००/- भरपाई द्यावी.
ड) या तक्रारीचा खर्च रूपये ५००/- द्यावा.
धुळे.
दि.२२/०४/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.