निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 17/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 18/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 04/05/2013
कालावधी 01 वर्ष 08 महिना 16 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सयाजी पिता राघोजी अंभोरे. अर्जदार
वय 65 वर्षे. धंदा.सेवानिवृत्त. अड.डी.यु.दराडे.
रा.यलदरी कॅम्प,ता.जिंतूर.जि.परभणी.
विरुध्द
1 भारतीय जीवन विमा निगम लि. गैरअर्जदार
तर्फे शाखा अधिकारी,परभणी. अड.एम.एम.कुंभारीकर.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदार सयाजी पिता राघोजी अंभोरे यांची तक्रार भारतीय जीवन विमा निगम लि. यांच्या विरुध्द जीवन अक्षय योजनेतील रक्कम रु. 1,08,772/- 12 टक्के व्याजासह मिळणे बाबत आहे अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
अर्जदार हा एम.एस.इ.डी.चा सेवा निवृत्त कर्मचारी आहे गैरअर्जदार क्रमांक 2 हे अर्जदार यांच्या घरी आले व गैरअर्जदार क्रमांक 1 यांची पॉलिसी घेण्या विषयी विचारणा केली. व जीवन -3 योजनेची माहिती दिली. त्याने असे सांगीतले की, योजनेत जर रु.4,00,000/- गुंतवले तर आपणांस रु.7500/- ते 8,000/- इतके मासिक प्राप्ती होईल. तसेच आपल्या जिवीतास रु,4,00,000/- चे विमा संरक्षण असेल, तसेच इतर पॉलिसी प्रमाणे हि पॉलिसी सुध्दा मुदतपूर्व बंद करुन पूर्ण रक्कम मिळते आणि त्याने ह्याच पॉलिसीत गुंतवणुक करण्याचा आग्रह धरला तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरचा आवेदन पत्र भरताना मजकुर इंग्रजी भाषेत भरला व तो न वाचुन दाखवता त्यावर तक्रारदाराची सही घेतली.सदर आवेदन पत्रांत पॉलिसी ही मुदतपुर्व बंद करता येणार नाही असा कोणताही मुद्दा स्पष्ट केलेला नाही. त्याचे पुढे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारांस दिनांक 11/03/2005 रोजी पॉलिसी क्रमांक 983212141 ही दिली.त्यानंतर अर्जदारांस 2228/- इतकी मासिक प्राप्ती मिळण्यास सुरुवात झाली. अर्जदारास ज्याप्रमाणे सांगीतले होते की, मासिक प्राप्ती रु.7500/- इतकी होईल, परंतु गैरअर्जदार कमांक 1 यांनी तशी मासिक प्राप्ती दिली नाही, त्या संबंधीचा पत्र व्यवहार त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी सुरु आहे.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, दिनांक 11/11/2009 रोजी दुर्देवाने अर्जदारास ह्दय रोगाचा त्रास सुरु झाला, म्हणून त्याला परभणी येथील डॉ. महेश सोनी यांचे दवाखान्यांत शरीक करण्यांत आले अर्जदाराने त्या ठिकाणी दिनांक 17/11/2009 पर्यंत ह्दय रोगांवर उपचार घेतले. त्यावेळी संबंधीत डॉक्टरने सांगीतले की, अर्जदारांस ह्दय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. व त्याच्या उपचारासाठी अर्जदारास रु. 2,50,000/- इतका अनपेक्षीत खर्च करावा लागणार आहे.म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे जावुन अशी विनंती केली की, त्यास ह्दयाच्या उपचारासाठी 2,50,000/- एवढया रक्कमेची गरज आहे व त्याच्या जवळ इतकी रक्कम नसल्यामुळे सदरची पॉलिसी रद्द करुन रु.4,00,000/- परत करावे अशी विनंती केली.अर्जदाराने पुन्हा तसा अर्ज दिनांक 10/03/2010 रोजी केला, परंतु गैरअर्जदार यांनी असे कळविले की, सदर पॉलिसीसाठी सरेन्डर क्लॉज लागु नाही असे कारण सांगुन रक्कम परत करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचा अर्ज मंजूर करुन रु.2,91,228/- चा धनादेश दिला.
अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 05/05/2011 रोजी दिनांक 27/04/2011 चा 2,91,228/- रुपयांचा धनादेश पाठवला अर्जदाराने योजनेत 4,00,000/- रुपये गुंतवले होते, परंतु गैरअर्जदाराने केवळ 2,91,228/- रुपये प्रदान केले सदर पॉलिसी मध्ये पॉलिसी सरेंन्डरची अट लागु नाही म्हणून पॉलिसीची सरेन्डर व्हॅल्यु करणे चुकीचे आहे,म्हणून रु.2,91,228/- देणे हे चुकीचे व क्लेशदायक आहे. अर्जदाराने मंचास अशी विनंती केली की, अर्जदारास त्याचा पॉलिसी क्रमांक 983212141 ची राहिलेली रक्कम रुपये 1,08,772/- ही 12 टक्के व्याजासह देण्यास गैरअर्जदारांना आदेशीत करावे.
अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे व आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 4 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्रांची झेरॉक्स प्रती जोडल्या आहेत.
गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठवल्या नंतर गैरअर्जदार हा आपल्या वकीला मार्फत हजर होवुन आपले लेखी म्हणणे सादर केलेले आहे जे नि.क्रमांक 11 वर आहे,त्यांचे थोडक्यांत म्हणणे पुढील प्रमाणे आहे. त्याच्या म्हणण्यांत त्याने काही प्राथमिक आक्षेप घेतले आहे.जे पुढील प्रमाणे आहेत.
गैरअर्जदार यांच्या म्हणणे प्रमाणे अर्जदाराची तक्रार पात्र नाही. कारण त्यांने स्वतः अर्ज करुन पॉलिसी सरेंन्डर केली होती व रु. 2,91,228/- हे त्याने स्वीकारले होते, म्हणून त्याला आता principal of estopel प्रमाणे कोठलीही तक्रार या संदर्भात करता येणार नाही. प्रथमतः भारतीय जीवन विमा निगम ने पॉलिसी च्या Term & Condition च्या Clause 7 मुळे पॉलिसी सरेंन्डर करण्यास नकार दिला होता, पण अर्जदारास त्याच्या तातडीच्या मेडीकल Treatment साठी पैशाची अत्यंत गरज होती,म्हणून Executive Director यांनी वरील कारणास्तव परत विचार करुन पॉलिसी Surrender करुन घेण्यास होकार दिला. व त्या प्रमाणे अर्जदाराची पॉलिसी सरेंन्डर करुन त्यास 2,91,228/- रुपये दिले व पॉलिसी संपवली. हि रक्कम अर्जदाराने विना अट स्वीकारली व Discharge Voucher वर सही केली.व म्हणून अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली नाही व म्हणून अर्जदारास हि तक्रार करण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने पॉलिसी सरेंन्डर करण्यास नकार दिल्यावर अर्जदाराने त्यांस दिनांक 10/03/2010 दिनांक 03/06/2010 आणि दिनांक 11/08/2010 रोजी अर्ज देवुन पॉलिसी सरेंन्डर करण्याची इच्छा व्यक्त केली व तसे करुन घेण्यासाठी विनंती केली.
अर्जदाराने त्याच्या मुख्य म्हणण्यांत देखील प्रामुख्याने वरील मुद्दा मांडला आहे. तसेच शाखाधिका-याने अर्जदारांचा जीव वाचवण्यासाठी पैसे लागणार आहेंत असे वेळोवेळी अर्ज दिल्यामुळे Clause 7 मधील Surrender Value बद्दलची अट रद्द करुन वरीष्ठा कडून अर्जदारास पैसे मिळण्या संबंधी कसे प्रयत्न केले हे दाखवुन दिले आहे व तसेच वरीष्ठ अधिका-यांना देखील शाखाधिकारी यांचे म्हणणे पटल्यामुळे त्यांनी आतापर्यंत उचलेली पेंन्शन व इतर बाबी लक्षांत घेवुन रुपये 2,91,228/- Surrender Value ठरवली व ती अर्जदारास दिली. गैरअर्जदाराने सहानुभूतीपुर्वक विचार करुन हे सर्व केले आहे म्हणून आता अर्जदार यास हि तक्रार करण्याचा अधिकार नाही.मंचास सदरची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे.
अंतिम सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षाच्या कैफीयतीवरुन निर्णयासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसते की, अर्जदाराने 4,00,000/- रुपयांची जीवन अक्षय III Plan ही पॉलिसी घेतली होती. अर्जदारास 2227 प्रती महा मिळतील असे पॉलिसी मध्ये लिहिलेले आहे.व म्हणून अर्जदाराचे म्हणणे की, त्याला 7500/- ते 8000/- रुपये प्रतीमहा मिळणार होते हे या मंचास योग्य वाटत नाही.तसेच पॉलिसी चे कलम 7 हे पुढील प्रमाणे आहे.
7) Surrender: The Policy shall not acquire any surrender value.
म्हणुन अर्जदाराचे म्हणणे की, पॉलिसी ही मुदतपुर्व बंद करण्या विषयी कोणताही मुद्दा पॉलिसीत नाही हे म्हणणे ही योग्य नाही. अर्जदाराने माहे एप्रिल 2005 ते मे 2011 पर्यंत 2227 रुपये प्रती महा पेन्शन घेतलेले आहे व या 6 वर्षांत त्यांची कोणतीही तक्रार नव्हती व तसा पुरावाही मंचासमोर आणला नाही, त्यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने प्रतीमहा 2227 रुपये पेन्शन आपल्या राजीखुशीने घेतलेले आहे.
अर्जदाराचे हे म्हणणे की, अर्जदाराने रुपये 4,00,000/- गुंतवले होते व ते त्यास पॉलिसी सरेंन्डर केल्यावर मिळावयास पाहिजे होते,तसेच गैरअर्जदाराने त्यास 2,91,228/- देवुन चुकीचे केले व त्यास क्लेश दिला हे देखील मंचास योग्य वाटत नाही याचे कारणे पुढील प्रमाणे आहे.
1) पॉलिसीच्या कलम 7 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, पॉलिसीला सरेंन्डर व्हॅल्यु असणार नाही.
2) अर्जदाराने माहे एप्रिल 2005 ते मे 2011 पर्यंत महिना 2227/- रुपयांचे पेन्शन घेवुन पॉलिसीचा लाभ घेंतलेला आहे.
3) तसेच अर्जदाराने भारतीय जीवन विमा निगम लि.च्या शाखाधिका-यांकडे स्वतःचा जिव वाचवण्यासाठी आपल्याला रक्कमेची गरज आहे असा अर्ज दिनांक 30/03/2010, 03/06/2010, व 11/08/2010 रोजी केला आहे व त्यांत पॉलिसी बंद करुन पैसे परत करण्या विषयी विनंती केली आहे.
दिनांक 28/10/2010 रोजी मुख्य शाखा प्रबंधक यांनी अर्जदारास पॉलिसीची सोड किंमत देता येणार नाही, म्हणून पॉलिसी त्यांच्या पत्रासह परत केले, पण नंतर अर्जदाराची तातडीची गरज व जिवन मरणाचा प्रश्न लक्षांत घेवुन शाखा प्रबंधकाने पाठपुरावा केल्यावर एल.आय.सी.च्या Executive Director यांनी सहानूभुतीपूर्वक पॉलिसी सरेंन्डर करुन घेण्याचा निर्णय घेतला व सर्व वजावट जाता सोड किंमत हि 2,91,228/- रुपये हे अर्जदारास देवु केले व अर्जदाराने सोड किंमत ( S.V. discharge ) पावतीवर दिनांक 27/04/2011 रोजी सही करुन सदरील रक्कम घेतली. व त्यामध्ये अर्जदाराने 2,91,228/- रुपये S v मान्य केली आहे. त्याबाबत त्या Discharge Voucher वर अर्जदाराने सही करताना सदरील रक्कमे बाबत कोणताही आक्षेप नोंदवीला नाही.म्हणून एल.आय.सी. चे म्हणणे कि, पॉलिसीला सोड किंमत नसताना सुध्दा सहानुभूती म्हणून अर्जदाराचा जीव वाचवण्यासाठी पॉलिसीची सोड किंमत करुन अर्जदारास रक्कम दिली त्यात तथ्य आहे.व तसेच अर्जदाराने 6 वर्ष पॉलिसींचा लाभ घेवुन परत रुपये 4 लक्ष पैकी उर्वरित रक्कम 1,08,772/- रुपये मागणे हे या मंचास योग्य व कायदेशिर वाटत नाही,तसेच L.I.C. चे म्हणणे की, Complainant cannot approbate & reprobate and he is stopped by law. हे कायदेशिर व योग्यच वाटते.( सदरचे S v discharge receipt हे गैरअर्जदाराने नि.क्रमांक 38 वर दाखल करुन सिध्द केले आहे.)
अर्जदाराने आपल्या तक्रारीत सामनेवाला क्रमांक 2(गैरअर्जदार क्रमांक 2) याचा वारंवार उल्लेख केलेला आहे, पण सामनेवाला क्रमांक 2 कोण आहे याचा उल्लेख तक्रारीत केला नाही अथवा त्यास पार्टी केलेले नाही,म्हणून त्याचे कृत्य मंचास योग्य व कायदेशिर वाटत नाही.
वरील कारणे पाहता मंचास असे वाटते की, अर्जदाराने आपले म्हणणे सिध्द केलेले नाही.व म्हणून गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचास वाटत नाही, म्हणून मंच पूढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यांत येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष