द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 10 ऑक्टोबर 2011
1. तक्रारदारांचा मुलगा विजय लक्ष्मण घोरपडे हयांनी जाबदेणारांकडून एकूण तीन विमा पॉलिसीज घेतल्या होत्या. दिनांक 6/11/1997 रोजी वाशिंबे ते पारेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे पुलाखाली ता. करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. त्यानंतर नॉमिनी तक्रारदार यांनी जाबदेणारांकडे क्लेम मागितला. जाबदेणारांनी तिन्ही पॉलिसींची अॅश्युअर्ड क्लेमची रक्कम दिली परंतू अपघाती मृत्यूच्या क्लेमची रक्कम दिली नाही. हया रकमेबद्यल नंतर पत्राद्वारे कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. दिनांक 16/6/2007 रोजी जाबदेणार क्र.1 एल.आय.सी ने तक्रारदारांस त्यांच्या मुलाच्या अपघातील मृत्यूच्या फायदयाची रक्कम विचाराधीन आहे व त्यासाठी विमाधारकाच्या [विजय घोरपडे] मृत्यूबाबत उपविभागीय दंडाधिका-यांच्या न्यायालयीन अंतिम आदेशाची प्रत सादर करावी, असे पत्राद्वारे कळविले. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 26/12/2007 रोजी महाराष्ट्र शासन राज्यपत्रात प्रसिध्द झालेला आदेश जाबदेणा-यांकडे नेऊन दिला व क्लेमची रक्कम लवकरात लवकर देण्याची विनंती केली. त्यानंतर पुन्हा जाबदेणा-यांनी दिनांक 10/1/2008 च्या पत्राने उपविभागीय दंडाधिका-यांचा आदेश प्राप्त झाला, परंतू त्या आदेशात मृत्यूचे वर्गीकरण करण्यात आले नाही तरी तशा प्रकारचा आदेश सादर करावा असे तक्रारदारांना कळविले. म्हणून तक्रारदारांनी उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी यांच्याकडे, एल.आय.सी ला अपेक्षित असलेला आदेश मिळावा म्हणून लेखी अर्ज दिला. परंतू त्यांनी दिनांक 30/8/2006 रोजीचाच आदेश अंतिम असल्याचे सांगून एल.आय.सी स अपेक्षित असलेला आदेश देण्याचे नाकारले. तरीही जाबदेणार एल.आय.सी यांनी तक्रारदारास अपघाती विम्याची रक्कम दिली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार एल.आय.सी कडून अपघातील मृत्यू फायदयाची रक्कम रुपये 2,00,000/- 9 टक्के व्याजदराने तसेच नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- व रुपये 15,000/- तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपऋ व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणा-यांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी एस.डी.एम माढा यांच्याकडे मयत विजय घोरपडे यांच्या मृत्यूचे वर्गीकरण मागितले होते हे तक्रारदारांचे म्हणणे बरोबर आहे, परंतू त्यांनी तो देण्यास नकार दिला हे म्हणणे चुकीचे आहे. जाबदेणारांनी दिनांक 3/7/2009 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांस पॉलिसीच्या अट क्र. 8 (b)(1) नुसार विमाधारकाचा मृत्यू insanity मुळे झाला, असे कळविले. जाबदेणा-यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ एस.डी.एम माढा यांचे दिनांक 25/8/2008 चे पत्र दाखल केले. वरील कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणा-यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली.
4. तक्रारदारांच्या मुलाचा मृत्यू वेड लागून पाण्यात पडून बुडून झाला म्हणून तक्रारदारांना अपघाती मृत्यू फायदयाची रक्कम जाबदेणार यांनी देण्यास नकार दिला. जाबदेणा-यांच्या हया म्हणण्याच्या पुष्टयर्थ त्यांनी एस.डी.एम माढा यांचे पत्र दाखल केले. एस.डी.एम माढा यांच्या या पत्रासोबत डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांचा पुरावा नाही. विमाधारकाच्या डोक्यावर परिणाम झाला होता हे त्यांनी पुराव्यानिशी दिलेले नाही. केवळ एस.डी.एम आहे म्हणून त्यांच्या म्हणण्याला ऑथेन्टीसिटी येते असे नाही. त्यामुळे मंच एस.डी.एम माढा यांच्या पत्रासोबत डॉक्टरांचा पुरावा नसल्यामुळे त्या पत्राचा विचार करु शकत नाही. वस्तुत: जाबदेणार विमाधारकांच्या वैद्यकीय उपचारांचे कागदपत्रे आणू शकले असते. परंतू तसे नसल्यामुळेच त्यांनी ते दाखल केले नाहीत. याचाच अर्थ विमाधारकाचा मृत्यू अपघाताने पाण्यात पडून बुडून झाला असे सिध्द होते. जाबदेणार एल.आय.सी यांनी सम अॅश्युअर्ड ची रक्कम तक्रारदारांना दिलेली आहे, परंतू तक्रारदारांनी-नॉमिनी यांनी मागणी करुनही अपघाती मृत्यू फायदयाची रक्कम, देण्यात आलेली नाही. क्लेमच्या मागणी अयोग्य कारणास्तव नाकारण्यात आली, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदारांना अपघाती मृत्यू फायदयाची रक्कम अपघात दिनांकापासून ते रक्कम अदा करेपर्यन्त 9 टक्के व्याजदराने दयावी, तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 2,000/- दयावा असा मंच आदेश देतो.
5. मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या II (2002) CPJ 14 युनिअन टेरिटरी कन्झुमर डिस्पुट्स रिड्रेसल कमिशन, चंदिगड यांनी दिलेल्या श्रीमती गुरुदेव कौर विरुध्द शाखाधिकारी युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कं.लि., निवाडयाचे अवलोकन केले. सदरहू निवाडा प्रस्तूत प्रकरणी लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
[1] तक्रारअर्ज जाबदेणार क्र.1 यांचेविरुध्द अंशत: मान्य करण्यात येतो.
[2] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 2,00,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 6/11/1997 पासून संपुर्ण रक्कम अदा करेपर्यन्त, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 2,000/- तक्रारीचा खर्च दयावा.
[4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.