सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तक्रार क्र. 20/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि. 18/02/2010 तक्रार निकाल झाल्याचा दि.12/05/2010 1) सौ.शांती पुखराज रायका वय सु.58 वर्षे, धंदा – गृहिणी, 2) पुखराम मुलारामजी रायका वय सु.62 वर्षे, धंदा – व्यापार, दोन्ही रा. जय अंबे स्वीट मार्ट, जयप्रकाश चौक, सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार विरुध्द 1) भारतीय जीवन विमा निगम तर्फे मे.वरिष्ठ मंडळ प्रबंधक, कोल्हापूर मंडळ कार्यालय, मु.पो.कोल्हापूर, जि. कोल्हापूर 2) भारतीय जीवन विमा निगम तर्फे मे.शाखा प्रबंधक, शाखा – कुडाळ, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष. गणपूर्तीः- 1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष 2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एस.व्ही. नातू. विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री ए.पी. बर्वे. (मंचाच्या निर्णयाद्वारे श्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष) नि का ल प त्र (दि.12/05/2010) 1) तक्रारदारांच्या मुलाचा अपघाती मृत्यू होऊन देखील त्याच्या विमा पॉलिसिची अपूर्ण रक्कम विमा कंपनीने तक्रारदारांना अदा केल्यामुळे उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी तक्रारदारांनी सदरचे तक्रार प्रकरण दाखल केले आहे. 2) तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदार क्र.1 व 2 यांचा मुलगा राकेशकुमार हा अज्ञान असतेवेळी त्याचे नावाने मेडिक्लेम पॉलिसी व जीवन किशोर पॉलिसी अशा दोन पॉलिसी उतरविण्यात आल्या असून त्या पॉलिसींचा क्रमांक अनुक्रमे 945942101 व 945525058 असे आहेत. पॉलिसीधारक हा अज्ञान असल्यामुळे त्याच्या पॉलिसीचे हप्ते तक्रारदारांनी जमा केले असून पॉलिसीधारक राकेशकुमार हा दरम्याने दिनांक 22/08/2007 रोजी अपघातात मरण पावला व मृत्यूसमयी त्याचे वय 22 वर्षे होते. पॉलिसीधारकाचा पॉलिसीची मुदत संपणेपूर्वी मृत्यू झाल्यास दोन्ही पॉलिसीअंतर्गत देय रक्कम आश्वासित रक्कमेच्या (Sum Assured) दुप्पट रक्कम देणेचे विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने लेखी स्वरुपात मान्य केले होते. 3) राकेशकुमार यांच्या अपघाती मृत्यूनंतर विमा कंपनीकडे विमा रक्कमेची मागणी करण्यात आली त्यानुसार विमा कंपनीने दि.01/12/2007 चे पत्राने दोन्ही पॉलिसीची एकत्रित रक्कम कळवून वारस दाखला (Succession Certificate) आणण्याची सूचना केली. त्यानुसार तक्रारदारांनी वारस दाखला विमा कंपनीकडे सादर केला असता, जीवन किशोर पॉलिसीची दुप्पट रक्कम व मेडिक्लेम पॉलिसीची रक्कम रु.6,28,504/- एवढीच रक्कम अदा केली. परंतु पॉलिसीधारक राकेशकुमार यांचे अपघाती मृत्यूपश्चात रु.5,00,000/- च्या पॉलिसीला रु.10 लाख मिळणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदारांनी आपले हक्क अबाधित ठेऊन (Under Protest) दि.28/08/2008 च्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या चेक क्रमांक 763182 द्वारे रक्कम स्वीकारली. त्यामुळे आपणांस उर्वरित रक्कम रु.3,71,496/- व्याजासह मिळण्याचे आदेश व्हावेत, यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. 4) तक्रारदाराने सदर तक्रारीसोबत नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीसोबत विमा कंपनीने उतरविलेल्या पॉलिसीसह त्याच्या शर्ती अटीचे पत्रक, मृत्यूचा दाखला, मिळालेल्या रक्कमेच्या धनादेशाची प्रत इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या. सकृतदर्शनी तक्रारदाराची तक्रार दाखल होणेस पात्र असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेऊन मंचाने दि.18/02/2010 ला विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीस नोटीस बजावणेचे आदेश पारीत केले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना तक्रारीची नोटीस बजावण्यात आली व ही तक्रार नोटीस नि.7 व 8 वरील पोच पावतीद्वारे विरुध्द पक्षास प्राप्त झाली. 5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत मंचात हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे शपथेवर नियुक्त प्रतिनिधी श्री दिपककुमार जगन्नाथ भोईर, वरिष्ठ मंडळ प्रबंधक, यांचेमार्फत नि.12 वर दाखल केले. विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने त्यांच्या लेखी म्हणण्यात तक्रारदाराच्या तक्रारीवर आक्षेप घेऊन तक्रारदारांचा मुलगा राकेशकुमार यांनी कोणतीही मेडिक्लेम विमा पॉलिसी उतरविली नसल्याचे व पॉलिसी क्र.945942101 हा क्रमांक चुकीचा असल्याचे स्पष्ट करुन तक्रारदारांचा मुलगा नामे राकेशकुमार याची 945942161 क्रमांकाची 25 वर्षाची नवीन मनी बॅक विमा पॉलिसी कोष्टक 93 अंतर्गत उतरविल्याचे स्पष्ट केले. तसेच सदर पॉलिसीवर मृत्यूपश्चात मिळणा-या लाभाचा स्पष्ट उल्लेख असून मुदतपूर्व अपघाती मृत्यू झाल्यास दुप्पट रक्कम देण्याचे विमा कंपनीने केव्हाही मान्य केले नव्हते, असे स्पष्ट करुन पॉलिसीच्या शर्ती अटीनुसार असा कोणताही लाभ मिळण्यास तक्रारदार पात्र नसल्याचे नमूद केले. पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या शर्ती व अटीनुसार तक्रारदारांना धनादेशाद्वारे रक्कम रु.6,28,504/- अदा केली असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी, अशी मागणी विरुध्द पक्षाने केली आहे. 6) तक्रारदाराने नि.15 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार दिवाणी कोर्टाने दिलेली वारसा दाखल्याची झेरॉक्स प्रत प्रकरणात दाखल केली; परंतु प्रतिउत्तराचे शपथपत्र(Rejoinder) दाखल न करता आपले लेखी युक्तीवाद नि.16 वर दाखल केले. तर विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने आपले लेखी युक्तीवाद नि.17 वर दाखल केले. त्यामुळे सदरचे प्रकरण अंतीम निकालासाठी घेण्यात आले. 7) तक्रारदारांची तक्रार, त्यांनी तक्रारीसोबत जोडलेली विमा पॉलिसीची कागदपत्रे, विरुध्द पक्षाचे लेखी म्हणणे व त्यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात उपस्थित केलेले आक्षेपाचे मुद्दे व प्रकरणाच्या अंतीम टप्प्यात करण्यात आलेला लेखी व तोंडी युक्तीवाद बघता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात. अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष | 1 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 च्या विमा कंपनीने त्रुटी केली आहे काय ? | नाही | 2 | तक्रारदारांची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | नाही | 3 | काय आदेश ? | अंतीम आदेशाप्रमाणे. |
-का र ण मि मां सा- 8) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी असून मयत विमाधारक राकेशकुमार यांचे ते आई-वडील आहेत. राकेशकुमार पी. रायका यांच्या नावाने 945942101 या क्रमांकाची कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 च्या विमा कंपनीकडे उतरविण्यात आली नसून वादग्रस्त पॉलिसीचा क्रमांक 945942161 असा आहे. ही पॉलिसी 93 टेबल अंतर्गत उतरविण्यात आली असून सदर पॉलिसी 25 वर्षाची मनी बॅक पॉलिसी असल्याचे तक्रारदारांनी दाखल केलेल्या नि.3/1 वरील पॉलिसी प्रत वरुन स्पष्ट होते. या पॉलिसीची मूळ प्रत तक्रारदारांकडे होती व या पॉलिसीसोबत शर्ती व अटींचे पत्रक जोडलेले होते.या पॉलिसीची प्रत स्वतः तक्रारदारांनी मंचासमोर प्रकरणात दाखल केली असून पॉलिसीच्या पहिल्या पानावर पॉलिसीच्या मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाल्यास पॉलिसी रक्कम व त्यावरील बोनस मिळणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच Conditions and privileges not applicable या सदराखाली कलम 10.2 ते 10.6 पर्यंतचे कलम या पॉलिसीला लागू नसल्याचे देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे पॉलिसीधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर तक्रारदार हे पॉलिसीची आश्वासित रक्कम रु.5 लाख व त्यावरील बोनस मिळण्यास पात्र होते. त्यानुसार विमा कंपनीने तक्रारदारांना रु.6,28,504/- एवढी रक्कम दि.28/08/2008 चे धनादेश क्र.763182 द्वारे अदा केले आहेत. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. 9) मुद्दा क्रमांक 2- तक्रारदार क्र.1 व2 यांचा मुलगा अज्ञान असतांना त्याच्या नावाने सदरची मनी बॅक पॉलिसी उतरविण्यात आली असून सदर पॉलिसी ही कोष्टक 93 अंतर्गत 25 वर्षांसाठी रु.5 लाख एवढया किंमतीची असल्याचे नि.3/1 वरील पॉलिसी प्रतवरुन दिसून येते. या पॉलिसीच्या कलम 10.2 पासून ते 10.6 पर्यंत नमूद करण्यात आलेल्या शर्ती अटी व सुविधा वादातील पॉलिसीला लागू नसल्याचे स्पष्टपणे पान 1 मधील तक्त्यात Conditions and privileges not applicable या सदराखाली नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अपघाती मृत्यूनंतर दुप्पट रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत, हे स्पष्ट होते. एवढेच नव्हेतर सदर पॉलिसीच्या पहिल्या पानावर Death before date of maturity या शिर्षकाअंतर्गत मिळणा-या लाभाचे वर्णन Sum Assured + Vested Bonus असे केले आहे. त्यामुळे मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आश्वासित रक्कम रु.5 लाख व त्यावरील बोनस रु.1,28,504/- अशी एकत्रित रक्कम रु.6,28,504/- मिळण्यास तक्रारदार पात्र असल्याचे सिध्द होते. पॉलिसीच्या शर्ती व अटी आपणांस बंधनकारक असल्याचे तक्रारदाराने स्वतः त्यांचे तक्रारीचे परिच्छेद क्र.3 मध्ये मान्य केले असून तक्रारदारांनी शर्ती व अटी वाचल्या होत्या व त्या शर्ती व अटी त्यांना मान्य होत्या हे निष्पन्न होते. त्यामुळेच तक्रारदारांनी विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने दिलेली रक्कम स्वीकारली. एवढेच नव्हेतर पॉलिसीच्या मान्य केलेल्या शर्ती अटीनुसार 5 वर्षानंतर मिळणारी 15 टक्के आश्वासित रक्कम रु.75 हजार देखील तक्रारदारांना दि.26/03/2007 ला मिळाली असल्याचे नि.3/1 वरील पॉलिसीच्या शेवटच्या पानावरील नोंदीनुसार स्पष्ट होते. त्यामुळे पॉलिसीधारक व विमा कंपनी यांचेदरम्यान झालेल्या विम्याच्या कराराला अधीन राहूनच विमा कंपनीने तक्रारदारांना योग्य त्या रक्कमेची लाभासह अदायगी केली असल्यामुळे तक्रारदार हे दुप्पट रक्कम मिळण्यास पात्र नाहीत, असे आमचे स्पष्ट मत आहे. 10) मुद्दा क्रमांक 3 - मुद्दा क्रमांक 1 व 2 मध्ये केलेल्या विस्तृत विवेचनानुसार आम्ही तक्रारदारांची तक्रार नामंजूर करीत असून त्या दृष्टीकोनातून खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत. अं ति म आ दे श 1) तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात येते. 2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही. ठिकाणः सिंधुदुर्गनगरी दिनांकः 12/05/2010 (उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) सदस्या, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि. प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि. Ars/-
| Smt. Ulka Gaokar, Member | Mr.Mahendra Goswami., PRESIDENT | HONABLE MRS. smt vafa khan, MEMBER | |