अॅड. जयश्री कुलकर्णी तक्रारदारांतर्फे
अॅड श्रीमती एस. आर. नाईक जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 28/सप्टेंबर/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे -
1. विमाधारक - कै. सुरेश मुन्नीलाल गुप्ता हा तक्रारदारांचा मुलगा आहे. विमाधारकांनी जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,00,000/- ची विमा पॉलिसी क्र 956211169 घेतली होती. विम्याचे हप्ते नियमित भरत होते. तक्रारदारांचा मुलगा दिनांक 6/7/2006 रोजी रेल्वेने देवरिया गावी जात असतांना त्यांना अचानक उलटया सुरु झाल्यामुळे संजय क्लिनिक येथे उपचारार्थ गेला, उपचार सुरु झाले, परंतू दिनांक 7/7/2006 रोजी त्याचे निधन झाले. संजय क्लिनिकचे डॉ. एस. एन. सिंग यांनी अॅक्युट डायरिया मुळे मृत्यू असे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे व क्लेम फॉर्म जाबदेणार यांच्याकडे पाठवून दिला. परंतू जाबदेणार यांनी दिनांक 30/3/2007 रोजी विमा धारकाने पॉलिसी पुर्नजिवीत करतांना खरी माहिती दिली नाही या कारणावरुन क्लेम नामंजुर केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार विमाधारकांनी उत्तर प्रदेश राज्यातील लाईफ इन्श्युरन्स यांच्याकडूनही पॉलिसी घेतली होती व मुलाच्या मृत्यूनंतर क्लेमची रक्कमही तक्रारदारांना प्राप्त झालेली आहे. प्रस्तूतच्या जाबदेणारांनी चुकीच्या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला आहे म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून क्लेमची रक्कम रुपये 1,00,000/- व नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार विमा करार हा “Utmost good faith” वर अवलंबून असतो. विमा धारकांनी पॉलिसी पुर्नजिवीत केली त्यावेळी खरी माहिती सांगावयास हवी होती. विमा धारकांनी माहिती दडवून ठेवली. विमा धारक हे दिनांक 6/7/2006 रोजी रेल्वेने देवरिया गावी जात असतांना अचानक उलटया सुरु झाल्यामुळे संजय क्लिनिक येथे उपचारार्थ गेले, उपचार सुरु झाले, परंतू दिनांक 7/7/2006 रोजी अॅक्युट डायरिया मुळे त्यांचे निधन झाले. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार विमा धारकाचा मृत्यू अॅक्युट डायरिया मुळे झाला हे त्यांना मान्य नाही. त्यासाठी तक्रारदारांनी तसा पुरावा दयावयास हवा होता. पॉलिसी पुर्नजिवीत केल्यानंतर तीन दिवसातच विमा धारकाचा मृत्यू झाला, म्हणून पॉलिसी पुर्नजिवीत करतांना विमा धारकानी त्यांच्या आजाराविषयी योग्य ती माहिती सांगितली नाही या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला ते योग्य आहे असे जाबदेणार यांचे म्हणणे आहे. जाबदेणार यांनी शपथपत्र व मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. मयत सुरेश मुन्नीलाल गुप्ता यांनी जाबदेणारांकडून रुपये 1,00,000/- ची पॉलिसी घेतली होती. पॉलिसी पुर्नजिवीत केल्यानंतर तीन दिवसांनी विमा धारक हे दिनांक 6/7/2006 रोजी रेल्वेने देवरिया गावी जात असतांना अचानक उलटया सुरु झाल्यामुळे संजय क्लिनिक येथे उपचारार्थ गेले, उपचार सुरु झाले, परंतू दिनांक 7/7/2006 रोजी अॅक्युट डायरिया मुळे त्यांचे निधन झाले. जाबदेणार लेखी जबाबामध्ये एकीकडे विमा धारकांनी पॉलिसी पुर्नजिवीत करतांना आजाराविषयी माहिती दडवून ठेवली म्हणतात तर दुसरीकडे अॅक्युट डायरिया झाल्याबद्यलचा पुरावा तक्रारदारांकडून मागतात. विमा धारकांना पॉलिसी पुर्नजिवीत करतांना नेमका कुठला आजार झाला होता व त्या आजारामुळे विमा धारकांचा मृत्यू झाला, त्या आजाराची माहिती विमा धारकांनी जाबदेणारांपासून दडवून ठेवली याबद्यल जाबदेणारांनी लेखी जबाबात उल्लेख केला नाही तसेच क्लेम नामंजुरीच्या पत्रातही उल्लेख केलेला नाही, तसा पुरावाही दाखल केलेला नाही. केवळ विमा धारकांनी स्वत:चा आजार दडवून ठेवला या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम जाबदेणार यांनी नामंजुर केला आहे. याउलट तक्रारदारांनी विमा धारकांवर वैद्यकीय उपचार करणा-या डॉ. एस. एन. सिंह, इमामबरा चौराहा, ठाणा रोड, रौद्रापूर, देवरिया, यू.पी यांनी विमा धारकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिलेले आहे ते दाखल केले असून त्यामध्ये मृत्यूचे कारण अॅक्युट डायरिया नमूद केल्याचे स्पष्ट होते. यावरुन विमा धारकांनी पॉलिसी पुर्नजिवीत करतांना जर त्यांना डायरिया झाला असेल तर त्याचा उल्लेख त्यांनी पॉलिसी पुर्नजिवीत करतांना करावयास हवा अशी जर जाबदेणार यांची पॉलिसी असेल तर प्रत्येक व्यक्तीला सर्दी पडसे झाल्याबद्यलची सुध्दा माहिती दयावी लागेल, व या कारणावरुन सुध्दा जाबदेणार क्लेम नामंजुर करु शकतील. जाबदेणारांची ही कृती चुकीची आहे असे मंचाचे मत आहे. चुकीच्या, तथ्यहीन, अयोग्य व बिनबुडाच्या कारणावरुन जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदारांना सम अॅश्युअर्ड रुपये 1,00,000/- क्लेम नामंजुर केल्याचा दिनांका 30/3/2007 पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह अदा करावा असा आदेश देत आहे. तक्रारदारांना व्याज देण्यात आल्यामुळे तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी मंच नामंजुर करीत आहे. तक्रारदार तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
जाबदेणार यांनी दाखल केलेले निवाडे प्रस्तूत प्रकरणी लागू होत नाहीत असे मंचाचे मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
[2] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 30/3/2007 पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 2000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.