नि. २९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २२७८/०९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १/१२/२००९
तक्रार दाखल तारीख : १४/१२/२००९
निकाल तारीख : ३०/११/२०११
----------------------------------------------------------------
दिनकर जोमाजी नाईक
व.व.५९, धंदा – निवृत्त
रा.दिपसागर निवास, गणेशनगर,
कुपवाड रोड, मिरज ता.मिरज ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन
शाखा बाळकृष्ण कॉम्प्लेक्स,
शिवाजी रोड, मिरज तर्फे शाखाधिकारी
२. स्टेट बॅंक ऑफ इंडिया
शाखा पंचायत समिती शेजारी, मिरज
ता.मिरज जि. सांगली तर्फे शाखाधिकारी .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.डी.एम.धावते
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री एस.डी.चांदेकर
जाबदार क्र.२ तर्फे : +ìb÷. श्री एम.वाय.ताम्हणकर
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडून रक्कम रु.१,५०,०००/- ची मनीबॅक पॉलिसी घेतली होती. तसेच तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा याचे शिक्षणाकरिता जाबदार क्र.२ यांचेकडून रक्कम रु.१,५०,०००/- चे शैक्षणिक कर्ज घेतले होते. तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी जाबदार क्र.२ यांना Assign करुन दिली होती. तक्रारदार हे कर्जाची रक्कम नियमितपणे भरीत होते. तक्रारदार यांच्या पॉलिसीच्या लाभाची येणारी रक्कम रु.३३,५०४/- जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांना दि.२९/४/२००९ रोजीच्या चेक क्र.क्र.६३४१२३ ने परस्पर पाठवून दिली. त्याबाबत तक्रारदार यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर दि.६/८/२००९ रोजी जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांना पत्र व्यवहार करुन दि.२९/४/२००९ रोजीचा चेक न वटवला असल्याबाबत कळविले व तक्रारदार यांचेकडून चेकची मागणी केली. तक्रारदार यांना चेकच प्राप्त झाला नसल्याने तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडे समक्ष जावून चौकशी केली असता जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे चेक कर्जखात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठविला असल्याचे सांगितले. त्यावेळी जाबदार क्र.२ यांचेकडे विचारणा केली असता जाबदार क्र.२ यांनी प्रथमत: चेक आला नसल्याचे सांगितले त्यानंतर जाबदार क्र.१ यांचे कार्यालयात पुन्हा जावून जाबदार क्र.१ मार्फत जाबदार क्र.२ यांना फोन केला असता जाबदार क्र.२ यांनी चेकवर अपुरी माहिती, चेकवर नमूद प्रमाणे कर्जखाते नाही, असे सांगितले. त्यानंतर चेक परत मिळण्यासाठी तक्रारदार यांना पत्र घेवून येण्यास सांगण्यात आले. तक्रारदार यांनी जाबदार क्र. १ यांचेकडून तसे पत्र घेवून जाबदार क्र.२ यांना दिले. त्यावेळी जाबदार क्र.२ यांनी पहिला चेक न वटविल्याबाबत जाबदार क्र.१ यांना कळवून दुसरा चेक देणेबाबत सांगितले. त्याप्रमाणे जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे दि.१३/८/२००९ रोजी दुसरा चेक क्र.६६२९५४ चा पाठविला. या दरम्यानच्या काळामध्ये तक्रारदार यांना सदर कर्जखात्यावरील नाहक व्याज भरावे लागले, जाबदार यांनी दिलेल्या या दूषित सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज व्याजाची रक्कम मिळावी या मागणीसाठी तसेच इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ७ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी नि.१५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी पॉलिसी Assign केलेमुळे पॉलिसीचे फायदे घेण्याचा अधिकार कर्ज घेतल्याने बॅंकेस मिळतो, त्यामुळे दि.२९/४/२००९ या तारखेस अर्जदारास मिळणा-या फायद्याची रक्कम दि.२/५/२००९ रोजीच्या चेकद्वारे जाबदार क्र.२ कडे पाठविण्यात आले. सदरचा चेक मुदतीत वटवण्याची जबाबदारी जाबदार क्र.२ यांची होती. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१६ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. जाबदार क्र.२ यांनी नि.१९ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाकरिता शैक्षणिक कर्ज घेतले होते. सदर कर्जासाठी अर्जात नमूद पॉलिसी Assign केली होती. तक्रारदार यांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरले नाहीत. तसेच जाबदार क्र.१ यांचेकडून मिळणारा फायद्याचा एल.आय.सी.चा धनादेश तक्रारदार यांनीच जाबदार क्र.२ यांचेकडे आणून त्यांचे कर्जखात्यावर जमा केला आहे. सदरच्या धनादेशावर पूर्ण नाव नमूद नव्हते. त्यामुळे जाबदार यांनी सदरचा धनादेश तक्रारदार यांना परत केला. सदर धनादेश तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ कडून बदलून आणला व त्यांचे कर्जखातेस जमा केला व सदरचे कर्जखाते पूर्णपणे भागविले आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.२० ला प्रतिज्ञापत्र व नि.२१ च्या यादीने १ कागद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांनी नि.२२ ला शपथपत्राच्या स्वरुपात प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.२३ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.२८ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, प्रतिउत्तर, दाखल कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार व जाबदार क्र.२ यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांना काही न कळविता जाबदार क्र.२ यांना चेक परस्पर पाठविला व जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांचे खात्यावर चेक भरण्यास विलंब केला. त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत दाद मागितली आहे. जाबदार क्र.१ यांनी दिलेल्या सदोष सेवेचा विचार करता तक्रारदार यांनी त्यांची पॉलिसी कर्जखात्यासाठी Assign केली असल्यामुळे जाबदार क्र.१ यांनी मिळणारी लाभाची रक्कम जाबदार क्र.२ यांचेकडे जमा केली आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये पॉलिसीच्या लाभाची रक्कम तक्रारदार यांना अदा करणे अगर कर्ज थकीत आहे किंवा कसे अशी विचारणा करणे गरजेचे होते असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी कर्जाची रक्कम संपूर्णपणे भरली असती तर त्याप्रमाणे त्यांनी जाबदार क्र.१ यांना लाभाची रक्कम मला मिळावी असे कळविणे गरजेचे होते. तक्रारदार यांचे कर्ज संपूर्णपणे फेड झालेले नाही. त्यामुळे लाभाची रक्कम जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे पाठविणे यामध्ये जाबदार क्र.१ यांचा कोणताही सेवादोष दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचेकडून कोणतीही रक्कम मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
७. तक्रारदार यांना जाबदार क्र.२ यांनी सदोष सेवा दिली आहे का ? ही बाब प्रस्तुत प्रकरणी पाहणे गरजेचे आहे. जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे रक्कम रु.३३,५०४/- चा चेक दि.२/५/२००९ रोजी दिला असल्याचे आपल्या नि.१५ वरील म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.१९ वर तक्रारदार यांनी धनादेश कर्जखात्यावर जमा केला असे नमूद केले आहे. कर्जखात्यावर जमा केलेला धनादेश हा ६६२९५४ चा आहे. सदरचा धनादेश हा दि.१२ ऑगस्ट २००९ रोजी तक्रारदार यांनी जमा केला आहे. तत्पूर्वी जाबदार क्र.१ यांनी धनादेश क्र.६३४१२३ चा जाबदार क्र.२ यांना दिला होता. सदरचा धनादेश वटण्यासाठी जाबदार क्र.२ यांनी वेळेत भरला नाही त्यामुळे सदरचा धनादेश परत मिळावा असे पत्र जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांना दि.१०/८/२००९ रोजी दिले असल्याचे नि.५/२ वरुन दिसून येते. सदर पत्रामध्ये जाबदार क्र.१ यांनी ६३४१२३ चा धनादेश दिला असल्याचे नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये धनादेशावर पूर्ण नाव नसल्याने सदर धनादेश परत केला असे नमूद केले आहे. परंतु नेमका किती नंबरचा धनादेश परत केला याबाबत कोणतेही कथन केले नाही. तसेच जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांना पाठविलेल्या पत्राबाबतही कोणताही ऊहापोह केलेला नाही. यावरुन धनादेश क्र.६३४१२३ चा दि.५/२/२००९ पासून दि.१०/८/२००९ पर्यंत जाबदार क्र.२ यांच्या ताब्यात होता व सदरचा धनादेश तक्रारदार यांच्या कर्जखात्यावर जाबदार क्र.२ यांनी भरला नाही त्यामुळे निश्चितच तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तक्रारदार हे सदर रक्कम रु.३३,०५४/- या रकमेवर दि.५/२/२००९ पासून १०/८/२००९ पर्यंत द.सा.द.शे.९ टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
८. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांना जाबदार क्र.२ यांनी दिलेली सदोष सेवा विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.२ यांनी रक्कम रु.३३,०५४/- या रकमेवर दि.५/२/२००९ पासून
१०/८/२००९ पर्यंत द.सा.द.शे.९ टक्के दराने व्याज अदा करावे असा जाबदार यांना आदेश
करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.२ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार माञ) अदा करावेत असा
जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.२ यांनी दिनांक १५/१/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.२ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: ३०/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११