अॅड जयश्री कुलकर्णी तक्रारदारांतर्फे
अॅड शैला नाईक जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 30/एप्रिल/2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार विमा कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सेवेमधील त्रुटी संदर्भात दाखल केलेली आहे. यातील कथने खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हिचे पती सुर्यकांत दामोदर भोसले रा. मु. पो. जळोची, ता. बारामती, जिल्हा पुणे यांनी जाबदेणार यांचेकडे विमा पॉलिसी घेतली होती. पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे सदर पॉलिसीची सुरुवात दिनांक 15/10/2008 रोजी झाली व त्याचा अखेरचा दिनांक 15/10/2018 असा होता. पॉलिसीचा हप्ता दरमहा रुपये 250/- महिन्याच्या 15 तारखेच्या आत भरावयाचा होता व मुदत संपल्यानंतर अथवा निधन झाल्यास पॉलिसी धारकाच्या वारसांना रक्कम रुपये 30,000/- दयावयाची होती. श्री. सुर्यकांत दामोदर भोसले यांनी दिनांक 17/4/2010 पर्यन्त सर्व हप्ते वेळेवर भरले होते परंतू दिनांक 8/5/2010 रोजी त्यांचे ह्दयविकारामुळे निधन झाले. तक्रारदार या मयत सुर्यकांत दामोदर भोसले यांच्या विध्वा असल्यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रांसह जाबदेणार यांचेकडे विमा रक्कम मिळावी असा अर्ज दाखल केला. परंतू जाबदेणार यांनी दिनांक 15/2/2011 रोजी सदरची पॉलिसी व्यपगत झाल्यामुळे क्लेम नामंजूर केला. तक्रारदार यांचे कथनानुसार मयत सुर्यकांत दामोदर भोसले यांनी दिनांक 17/4/2010 पर्यन्त सर्व हप्ते भरले होते व मे महिन्याचा हप्ता भरण्यास अद्याप 10 दिवस बाकी होते. त्यामुळे सदर पॉलिसी चालू अवस्थेत होती. जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या पध्दतीमुळे नाकारला आहे. सबब जाबदेणार हे पॉलिसी रक्कम रुपये 30,000/- देण्यास बांधील आहेत. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून पॉलिसी रक्कम त्याचप्रमाणे मानसिक त्रासासाठी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- अशी रक्कम मागितली आहे.
2. या प्रकरणात जाबदेणार यांनी ग्राहक मंचामध्ये हजर राहून आपला लेखी जबाब दाखल केला. त्यामध्ये तक्रारीतील सर्व कथने नाकारलेली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार सदरच्या पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार दरमहा हप्ता रुपये 250/- प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेस जमा करावयाचा होता. तक्रारदार यांच्या पुर्वहक्कदाराने शेवटचा हप्ता दिनांक 17/4/2010 रोजी भरलेला आहे व सदरचा हप्ता भरतांना त्यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्यांच्या हप्त्यापोटी रक्कम रुपये 500/- जमा केलेली आहे. त्यांनी एप्रिल महिन्याचा हप्ता भरलेला नव्हता. सदरचा हप्ता दिनांक 15/4/2010 रोजी भरणे आवश्यक होते. त्यांना सदरचा हप्ता भरण्यासाठी 15 दिवसांची म्हणजे दिनांक 30/4/2010 पर्यन्त सवलत होती. तथापि त्यांनी एप्रिल महिन्यात हप्ता भरलेला नसल्यामुळे सदरची पॉलिसी व्यपगत झालेली आहे. त्याचप्रमाणे सदर पॉलिसी धारकाने पुर्वीचे हप्ते वेळेत न भरल्यामुळे व त्यावर दंड न भरल्यामुळे पॉलिसी व्यपगत झालेली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य पध्दतीने व कायदेशिररितीने नामंजुर केलेला आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणारांतर्फे करण्यात आली.
3. या प्रकरणात दाखल केलेली कागदपत्रे, दोन्ही पक्षकारांची लेखी कथने व वकील यांनी केलेला युक्तीवाद विचारत घेतला असता खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्याचे तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय |
2 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे-
मुद्या क्र. 1 व 2-
या प्रकरणातील कथनांचा विचार केला असता असे दिसून येते की तक्रारदार यांचे पती सुर्यकांत दामोदर भोसले यांनी जाबदेणार यांच्याकडे विमा पॉलिसी उतरविलेली होती ही बाब निर्वीवाद आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की त्यांनी दिनांक 15/10/2008 ते 17/4/2010 पर्यन्त दरमहा रुपये 250/- प्रमाणे हप्ते भरलेले आहेत. दिनांक 17/4/2010 चा हप्ता रुपये 500/- हा फेब्रुवारी व मार्च 2010 महिन्यांसंबंधी आहे. यावरुन असे स्पष्ट होते की तक्रारदार यांचे पुर्वहक्कदाराने एप्रिल 2010 चा हप्ता भरलेला नव्हता. तक्रारदार यांचे पुर्वहक्कदार दिनांक 8/5/2010 रोजी मयत झाले व त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता या बाबीत कोणताही वाद नाही. पॉलिसीतील अट क्र 2 नुसार जर हप्ता वार्षिक, अर्धवार्षिक किंवा त्रैमासिक असेल तर एक महिना हप्ता भरण्यासाठी सवलत असते. परंतू जर हप्त्याची मुदत मासिक, अर्धमासिक किंवा साप्ताहिक असेल तर सवलतीची मुदत 15 दिवस असते. यदाकदाचित पॉलिसी धारकाचा मृत्यू सवलतीच्या मुदतीत झाला असेल व हप्ता भरलेला नसला तरीही ती पॉलिसी चालू आहे असे मानण्यात येते. परंतू या प्रकरणात पुराव्यावरुन असे स्पष्ट होते की तक्रारदार यांचे पुर्वहक्कदाराने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल पुर्वी भरलेला नाही त्यामुळे पॉलिसी व्यपगत झालेली आहे.
प्रस्तुतची पॉलिसी ही जीवन विमा पॉलिसी असल्यामुळे जेवढे हप्ते पुर्वहक्कदाराने भरलेले आहेत तेवढे हप्ते त्यांनी वारसाला देणे आवश्यक होते. परंतू सदरची रक्कम विमा कंपनीने तक्रारदार यांना दिलेली नाही. सदरची रक्कम न दिल्यामुळे सेवेतील त्रुटी सिध्द झालेली आहे. सबब प्रस्तुतची तक्रार ही अंशत: मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारदार त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- मिळण्यास पात्र आहेत.
वर उल्लेख केलेले मुद्ये, निष्कर्ष व त्यावरील कारणे यांचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी पॉलिसीपोटी जमा केलेल्या हप्तांची रक्कम
तक्रारदार यांना परत न देऊन सेवेतील त्रुटी निर्माण केलेली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
[3] जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदार यांच्या पुर्वहक्कदाराने भरलेली रक्कम 4500/- व त्यावर द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याज तक्रार दाखल दिनांक 19/5/2011 पासून संपूर्ण रक्कम अदा फिटेपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
[4] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 30/4/2013