निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दिनांकः25/03/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986(यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.सं.कायदा’) च्या कलम 12 नुसार प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांची मुलगी पल्लवी ज्ञानेश्वर भामरे सन 2008 मध्ये तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण होवून तिची त्या पदावर नियुक्ती झाली होती. दि.28/2/2011 रोजी तिने सामनेवाल्यांकडे रु.2,50,000/- इतक्या रकमेची विमा पॉलिसी घेतली होती. त्याचा तिमाई हप्ता रु.3062/- असा होता. तिच्या पॉलिसीचा क्र.963152003 असा होता. दि.7/12/2012 रोजी तिचे निधन झाले. सटाणा नगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या मृत्युचे कारण Conpeslive cordiomypthay and viral cardiomypthay असे दिलेले आहे. तिच्या मृत्यु पश्चात तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडे विमा दावा दाखल केला. मात्र सामनेवाल्यांनी दि.11/2/2013 रोजी तक्रारदाराने विमा घेते समयी आरोग्याबाबत चुकीची माहिती भरुन दिल्यामुळे तिचा विमा नामंजूर केला. सामनेवाल्यांनी तिने तिच्या कार्यालयीन रजांचा चुकीचा अर्थ घेवून विमा लाभ देण्यास नकार दिलेला आहे. मुळात शासकीय सेवेत येतांना देखील तिची वैद्यकिय चाचणी सन 2008 मध्ये झालेली होती व त्यात तिला कोणताही आजार नसल्यामुळेच तिची नियुक्ती झालेली असतांना व तिने सामनेवाल्यांचा विमा सन 2011 मध्ये घेतलेला असतांना वरील कारणास्तव विमा दावा नाकारणे ही सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम रु.2,50,000/- व्याजासह मिळावी. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/- सह मिळावेत, अशी मागणी तक्रारदारांनी मंचाकडे केलेली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत सामनेवाल्यांकडे विमा हप्ते भरल्याच्या पावत्या, तलाठी पदी नियुक्तीचे आदेश, सन 2008 चा वैद्यकिय दाखला, सटाणा नगरपरिषदेचा मृत्युच्या कारणाचा दाखला, मृत्यु प्रमाणपत्र, सामनेवाल्यांशी केलेला पत्रव्यवहार, डॉ.आहिरे, डॉ.जाधव यांचे प्रमाणपत्र, लोकपालांकडे केलेला अर्ज इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाल्यांनी जबाब नि.13 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदारांच्या मुलीने पॉलिसी घेतांना तिच्या आजाराबाबत खोटी माहिती दिली. तिने पॉलिसी घेण्यापुर्वी तिला गंभीर आजारपण होते व त्यामुळे तिने वेळोवेळी नोकरीवरुन रजा घेतली होती, असे तपासात समोर आलेले आहे. सन 2008 मध्ये तिने दि.12/8/2010 ते 31/8/2010 या कालावधीत एंटरीक फिव्हर साठी डॉ.जाधव यांच्याकडे उपचार घेतले व त्यानंतरही दि.1/9/2010 ते 30/9/2010 या कालावधीत तिने इन इफेक्टीव्ह हेपॅटायटीज या आजारासाठी डॉ.किरण अहिरे यांच्याकडे उपचार घेतलेत. अशा परिस्थितीतही तक्रारदारांच्या मुलीने दि.28/2/2011 रोजी विमा पॉलिसी घेतांना ती बाब लपवून ठेवली. त्यामुळे तक्रारदारांचा विमा दावा योग्य रित्या नाकारण्यात आलेला आहे. त्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाल्यांनी बचावापुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.15 लगत डॉ.शामकांत जाधव व डॉ.किरण अहिरे यांची वैद्यकिय प्रमाणपत्रे, तक्रारदारांच्या मुलीचे रजेच्या अर्जांची झेरॉक्स, तहसिलदार नाशिक यांचे प्रमाणपत्र, विमा लोकपाल यांच्याकडील आदेशाची प्रत इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदारांचे वकील अॅड.शेळके यांचा लेखी युक्तीवाद नि.24 व सामनेवाल्यांचे वकील अॅड.मुंगसे यांचा लेखी युक्तीवाद अनुक्रमे नि.25 त्यांच्या तोंडी युक्तीवादासह विचारात घेण्यात आलेत.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाल्यांनी तक्रादारास सेवा
देण्यात कमतरता केली काय? होय.
- आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
8. सामनेवाल्यांनी तक्रारदारांच्या मुलीला पॉलिसी घेण्यापुर्वी म्हणजे दि.28/2/2011 रोजी पुर्वीपासून गंभीर स्वरुपाचे आजार होते व ते आजार तक्रारदारांच्या मुलीने पॉलिसी प्रपोजल फॉर्म भरुन देतांना नमूद केले नाहीत, असा बचाव घेतलेला आहे. मात्र सादर पुराव्याचे बारकाईने अवलोकन करता ही बाब स्पष्ट दिसते की, सामनेवाल्यांनी तक्रारदारांच्या मुलीने पॉलिसी घेतांना भरलेला प्रपोजल फॉर्म दाखल केलेला नाही. सामनेवाल्यांनी सादर केलेला पुरावा पाहिला तर असे दिसून येते की, तक्रारदारांच्या मुलीला दि.12/8/2010 ते दि.31/8/2010 या कालावधीत डॉ.शामकांत जाधव यांच्या प्रमाणपत्र नि.15/1 च्या आधारे एंटरीक फिव्हर होता व डॉ.किरण अहिरे यांचे प्रमाणपत्र नि.15/2 च्या आधारे दि.1/9/2010 ते दि.30/9/2010 या कालावधीत जॉण्डीस म्हणजे काविळ झालेला होता. वरील वैद्यकिय प्रमाणपत्र व तक्रारदारांच्या मुलीने त्या कालावधीत घेतलेल्या रजा यांच्या जोरावर सामनेवाले तक्रारदारांच्या मुलीने विमा पॉलिसी घेतांना प्रपोजल फॉर्ममध्ये आपले आरोग्य चांगले आहे, असे खोटे सांगितले, असा दावा करीत आहेत. मुळात एंटरीक फिव्हर म्हणजे टायफॉईड व तो चिघळला तर जॉण्डीस म्हणजे काविळ हे आजार जीव घेणे असले तरी ते दिर्घकाळ टिकणारे नाहीत. ते दुरुस्त होणारे आजार आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. सादर पुराव्यातून ही बाब समोर येते की, तक्रारदारांच्या मुलीला झालेला जॉण्डीस दि.30/9/2010 रोजी नंतर दुरुस्त झाल्यावर ती कामावर रुजु देखील झाली व त्यानंतर तिने दि.28/2/2011 रोजी (म्हणजे सुमारे 5 महिन्यांनी) सामनेवाल्यांकडून विमा पॉलिसी घेतलेली आहे. त्यामुळे तिने प्रि-एक्झीस्टींग डिसीज लपविला असे म्हणता येणार नाही, असे आमचे मत आहे. केवळ तक्रारदारांचा विमा दावा नाकारता यावा, यासाठी सामनेवाल्यांनी तक्रारदारांच्या मुलीला झालेला टॉयफॉईड व त्यानंतर झालेला काविळ या आजारांचे कारण पुढे करुन तक्रारदारांचा विमा दावा नाकारलेला आहे. सदर बाब सेवेतील कमतरता आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
9. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, कोणतेही योग्य कारण नसतांना सामनेवाल्यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु.2,50,000/- विमा दावा नाकारल्याची तारीख म्हणजेच दि.08/04/2013 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह मिळण्यास पात्र आहेत, असे आमचे मत आहे. त्याचप्रमाणे शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.7000/- अर्ज खर्च रु.3000/- सह मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत, असे आम्हास वाटते. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
- सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना रु.2,50,000/- दि.08/04/2013 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह अदा करावेत.
- सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.7000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- अदा करावेत.
- निकालपत्राच्या प्रती उभयपक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः25/03/2015