न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे रा. मजले, कार्वे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. वि.प. ही विमा कंपनी आहे. तक्रारदाराचे पती अशोक यशवंत टक्केकर यांची महाराष्ट्र शासनामार्फत वि.प. नं. 1 विमा कंपनीकडे “शेतकरी जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना” या कल्याणकारी विमा योजनेअंतर्गत विमा पॉलिसी उतरविली होती व आहे. सदर पॉलिसीचा विमा पॉलिसी नं. 4113-400301-14-5000011-00 असा आहे तर विमा कालावधी सन 2014 ते सन 2015 असा आहे. सदर पॉलिसी कालावधीतच दि. 19-07-2015 रोजी तक्रारदाराचे पती अशोक यशवंत टक्केकर हे त्यांची विवाहीत मुलगी सौ. पुजा सुनिल दळवी हिला सोबत घेऊन मोटर सायकलवरुन बेळगांवहून यशवंतनगर येथे येथे निघाले असता पाठीमागून भरघाव वेगात आलेल्या ट्रकची डावी बाजू धडकून ट्रकचे चाक अंगावून गेलेमुळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेळगांव येथील के.एल.ई. हॉस्पीटल येथे दाखल केले. परंतु सदर हॉसपीटलमध्ये उपचार चालू असतानाच त्याच दिवशी सदर तक्रारदाराचे पती व विवाहीत मुलगी यांचा मृत्यू झाला. सदर अपघातामध्ये पती व मुलगी एकाच दिवशी अपघातात मयत झालेमुळे तक्रारदारावर मोठे संकट ओढवलेले होते व आहे. त्यातूनही तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी, चंदगड यांचेकडे दि. 28-08-2015 रोजी घटनेची माहिती कळवली तदनंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तक्रारदाराने विमा दावा दि. 7-01-2016 रोजी सादर केला. तथापि वि.प. नं. 1 यांनी दि. 11-03-2016 रोजी प्रस्तुत विमा दावा विलंबाचे कारण देवून फेटाळला आहे. तक्रारदाराने प्रस्तुत विलंबाबाबत वि.प. नं. 2 कडे योग्य तो खुलासा केला आहे. तक्रारदाराने प्रस्तुत वि. प. नं. 1 यांनी कोणतीही दाद तक्रारदाराला दिली नाही व तक्रारदाराचा विमा क्लेम मंजूर केला नाहरी. सबब, तक्रारदारने प्रस्तुत विमा क्लेमची रक्कम वि.प. नं. 1 यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज केलेला आहे.
2) तक्रारदाराने प्रस्तुत कामी तक्रारदाराचा अर्ज खर्चासह मंजूर करावा, तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून विमा क्लेमची रक्कम रु. 2,00,000/- दि. 19-07-2015 पासून ते रक्कम पूर्ण वसुल होऊन मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 % व्याजासहीत देववावी, वि. प. ने दिले सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी वि.प. यांचेकडून रक्कम रु. 25,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- वि.प. यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती या कामी केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, नि. 5 चे कागद यादीसोबत अ.क्र. 1 ते 17 कडे अनुक्रमे वि.प. ने क्लेम नाकारलेचे पत्र, विमा प्रस्तावास आवश्यक ती कागद यादी, तालुका कृषी अधिकारी यांना तक्रारदाराचा अर्ज, विमा क्लेम फॉर्म भाग 1 व भाग 2, मयताचा 7/12 उतारा, 8-अ चा उतारा, वारसा प्रकरणांची नोंदवही, वर्दी जबाब, फिर्यादीचा जबाब, अॅक्सीडेंट रिपोर्ट फॉर्म, पोलिस अहवाल, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, चार्जशीट, मृत्यू दाखला, वाहन परवाना, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे ओळखपत्र, पत्ता मेमो, कलम 11(2)(b) नुसार अर्ज, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, वगैरे कागदपत्रे तक्रारदारने दाखल केली आहेत.
4) वि. प. नं. 1 यांनी प्रस्तुत कामी म्हणणे/कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, जिल्हा कृषी अधिका-यांचे पत्र, त्रिपक्षीय करारनामा, विमा पॉलिसी अटी व शर्ती, लेखी युक्तीवाद, मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा (2000)SCC 66, वि.प. नं. 2 ने जिल्हा कृषी अधिका-यांचे पत्र वगैरे कागदपत्रे या कामी वि. प. नं. 1 व 2 ने दाखल केली आहेत.
वि.प. यांनी तक्रारदारांचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणणे/कैफियतीत तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मजकूर मान्य व कबूल नाही.
(ii) तक्रारदाराचे पतीचा वि.प. नं.1 यांचेकडे विमा उतरविलेबाबतचा मजकूर व कालावधी सर्व साधारणपणे बरोबर आहे. सदरच्या पॉलिसीतील अटी व शर्ती लागू आहेत.
(iii) प्रस्तुत तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही.
(iv) वि.प. नं. 1 विमा कंपनीने दि. कमिशनर ऑफ अॅग्रीकल्चरल गर्व्हमेंट ऑफ महाराष्ट्र, पुणे डिव्हीजन यांना पुणे डिव्हीजनमधील शेतक-यांचे संदर्भात दि. 1-11-2014 ते 31-10-2015 रोजीपर्यंत “जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना” (ग्रुप) या सदराखाली पॉलिसी दिली होती. सदर पॉलिसी त्यातील अटी व शर्तीनुसार वि.प. कंपनीने पुणे डिव्हीजनमधील ठरावीक शेतक-यांची अपघाती मृत्यूबद्दल जास्तीत जास्त नुकसान भरपाईची जबाबदारी रक्कम रु. 1,00,000/- पर्यंत स्विकारली आहे.
(v) वि.प. नं. 1 विमा कंपनीने महाराष्ट्र शासनाबरोबर जो करारनामा केला आहे आणि जी विमा पॉलिसी दिली आहे त्यानुसार त्याव्दारे विमीत शेतक-यांनी पॉलिसीत नमूद अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक होते व आहे. विमीत शेतक-यांने अटी व शर्तींचे पालन न केल्यास पॉलिसीत व करारनाम्यात नमूद तरतुदीनुसार अशा शेतक-यांचा विमा दावा अपात्र ठरतो.
(vi) वि.प. विमा कंपनीच्या मते त्रिपक्षीय करार व विमा पॉलिसीच्या अटीनुसार विमा पॉलिसीचा कालावधी दि. 31-10-2015 ला संपतो. व ज्या शेतक-यांवर क्लेम करावयाचा असल्याने पॉलिसी कालावधीनंतर 90 दिवसांपर्यंत म्हणजेच दि. 31-01-2016 रोजी पर्यंत क्लेम सादर करावयाचा आहे तसेच जर दि. 31-01-2016 रोजी विमा क्लेम जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे प्रलंबित असले तर त्यांना तो क्लेम 30 दिवसांत म्हणजेच दि. 1-03-2016 ब्रोकरकडे पाठवायचा आहे व ब्रोकरने 7 दिवसांत म्हणजेच दि. 8-03-2016 अखेर विमा कंपनीकडे क्लेम दाखल करावयाचा आहे. तथापि या कामी वि.प.नं. 1 ला दि. 1-04-2016 राजी सदरच्या तक्रारदाराच्या क्लेमची कागदपत्रे मिळाली आहेत. तसेच अपघातानंतर दावा 257 दिवसांनी सादर करण्यात आला आहे. प्रस्तुत विलंबाच्या कारणास्तव योग्य कारणास्तव तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प. कंपनीने नाकारलेला आहे. तसेच तक्रारदाराने विमा दावा दाखल करण्यास विलंब झालेबाबत समाधानकारक उत्तर/स्पष्टीकरण दिलेले नाही. सबब, अशा सर्व कारणास्तव तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प. यांनी फेटाळलेला आहे. हे त्रिपक्षीय करारानुसार योग्य व बरोबर आहे. वि.प. ने तक्रारदाराला सेवा देणेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा, अशा स्वरुपाचे म्हणणे वि.प. नं. 1 विमा कंपनीने दिलेले आहे.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे काय ? | होय |
2 | वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून विमा क्लेमची व नुकसानीची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 ते 3 –
6) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदारचे पती शेतकरी होते त्यांचा शासनामार्फत “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा” योजनेअंतर्गत विमाउतरविला होता व अपघात काळात तो चालू होता या बाबी वि.प. ने मान्य व कबूल केल्या आहेत. म्हणजेच तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाले आहे. तसेच तक्रारदाराचे पती त्यांची विवाहीत मुलगी पूजा हिचेसह मोटर सायकलवरुन बेळगांवहून यशवंतनगर येथे निघाले असता पाठीमागून भरघाव वेगात येणा-या ट्रकची धडक बसून सदर अपघातात तक्रारदाराचे पती व मुलगी दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना बेळगांव येथील के.एल.ई. हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला त्यानंतर तक्रारदाराने दि. 28-08-2015 रोजी तालुका कृषी अधिकारी, चंदगड यांना प्रस्तुत अपघाताची व पतीचे व मुलीचे मृत्यूची माहिती कळविली व तदनंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन दि. 7-01-2016 रोजी विमा प्रस्ताव सादर केला. तथापि, वि.प. नं. 1 ने दि. 11-03-2016 रोजी तक्रारदाराचा विमा क्लेम विलंबाच्या कारणाने फेटाळला. तक्रारदार एक विधवा व असहारा स्त्री आहे. तरीही वि.प. ने विलंबासाठी मागितलेला खुलासा तिने प्रत्यक्ष वि.प. यांना भेटून केला परंतु वि.प. ने कोणतही दाद दिली नाही. वास्तविक मे. वरिष्ठ न्यायालयांनी वेगवेगळया न्याय निवाडयांमध्ये “विमा क्लेम दाखल करणेस उशिर झाला” केवळ या कारणासाठी विमा क्लेम नाकारणे न्याययोग्य होणार नाही.” असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. आणि या कामी वि.प. ने एका विधवा असहाय्य स्त्रीने तिचे पतीचे व विवाहीत मुलीचे एकाच वेळी अपघातात निधन झालेनंतर त्या संकटातून व दु:खातून सावरुन ताबडतोब विमा क्लेम दाखल करणेची वि.प. ने केलेली ही अपेक्षा व तक्रारदाराचा क्लेम दाखल होणेस झालेल्या विलंबामुळे तक्रारदाराने मागणी केलेला तक्रारदाराचो पतीचा विमा क्लेम नाकारणे म्हणजे खरोखरच वि.प. ने तक्रारदाराचा न्याय योग्य क्लेम नाकारुन तक्रारदाराला दिलेली सेवेतील त्रुटीच आहे असे या मे. मंचाचे सुस्पष्ट मत आहे. तसेच प्रस्तुत कामी तक्रारदार त्यांचे पतीचे मृत्यूनंतर विमा विमा क्लेम रक्कम मिळणेस व नुकसान भरपाई रक्कम वि.प. नं. 1 विमा कंपनीकडून वसूल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी वि.प. नं. 1 विमा कंपनीकडून तक्रारदार तिचे पतीच्या अपघाती मृत्यूची विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- (रक्कम रु. एक लाख मात्र) तसेच प्रस्तुत विमा क्लेम रक्कमेवर क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याजाची रक्कम वि.प. नं. 1 कंपनीकडून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- वि.प. नं. 1 कडून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि. प. नं. 1 विमा कंपनीने तक्रारदाराला तिचे पतीच्या विमा क्लेम पोटी रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख फक्त) अदा करावी. प्रस्तुत विमा क्लेम रक्कमेवर क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याज वि.प. नं. 1 ने तक्रारदाराला अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार फक्त) तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) वि. प. नं. 1 ने तक्रारदाराला अदा करावेत.
4) वरील सर्व आदेशांची पुर्तता वि.प. नं. 1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.