तक्रार दाखल दि.03-09-2016
तक्रार निकाली दि.30-01-2017
न्यायनिर्णय
द्वारा:- मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे सुरुपली, ता.कागल, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. वि.प.क्र.1 विमा कंपनी आहे तर वि.प.क्र.2 हे कृषी अधिकारी आहेत. तक्रारदार यांचे पतीचा वि.प.क्र.2 शासनामार्फत शेतकरी अपघात विमा उतरविला होता. प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा व्यवसाय शेती होता. तक्रारदाराचे पती-शंकर जकाप्पा खंदारे हे दि.15.04.2015 रोजी हमीदवाडा येथे जात असताना हमीदवाडा फाटयावर मुरगुड-निपाणी रोडवर येणा-या एका मोटार सायकलने जोराची धडक दिली. त्यामुळे तक्रारदाराचे पती जोरात खाली पडले व डोक्यास गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्युमुखी पडले. तक्रारदाराचे पती यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. त्याचा विमा पॉलीसी क्र.4113400301/14/5000011/00/000 असा आहे. तक्रारदाराने तिचे पतीचे अपघाती मृत्युनंतर सर्व कागदपत्रांसह दि.01.09.2015 रोजी विमा क्लेम मिळणेसाठी अर्ज करत होता. परंतु वि.प.ने कोणताही प्रतिसाद दिला नाही. व दि.27.11.2015 रोजी तक्रारदाराचा विमा क्लेम चुकीचे कारण देऊन नामंजूर केला व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब, तक्रारदाराने वि.प.यांचेकडून विमा क्लेम मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेम रक्कम रु.1,00,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- अशी एकूण रक्कम रु.1,25,000/- अर्ज दाखल तारखेपासून 18टक्के व्याजदराने वसुल होऊन मिळावी अशी विनंती केली आहे.
4. प्रस्तुत कामी तक्रारदाराने अॅफीडेव्हीट, विमा क्लेम प्रस्ताव, क्लेम फॉर्म, तालुका कृषी अधिका-यांचे पत्र, तलाठयाचे प्रमाणपत्र, जबाब, वर्दी जबाब, पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, दोषारोप, अंतिम अहवाल, मृत्यु नोंद दाखला, खाते नं.388 ची खातेवही, वि.प.कंपनीचे पत्र, पुरावा शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
5. वि.प.क्र.1 व 2 यांनी म्हणणे/कैफियत, त्रिपक्षीय करार, विमा पॉलीसी अटी व शर्तीसह मयत शंकर खंदारे यांचे ड्रायव्हिंग लायसन्स, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस व लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे, वि.प.यांनी या कामी दाखल केली आहेत.
6. वि.प.यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
अ तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबुल नाही.
ब तक्रारदाराचे पती शेतकरी होते व तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेला विमा पॉलीसीचा मजकूर सर्वसाधारणपणे बरोबर आहे.
क तक्रारदाराचे पतीचे अपघाती निधन झालेनंतर तक्रारदाराने वि.प.विमा कंपनीकडे विमा क्लेम सादर केला हे म्हणणे चुकीचे आहे, कारण वि.प.क्र.1 विमा कंपनीकडे तक्रारदाराने क्लेम सादर केला नव्हता तर वि.प.क्र.2 कृषी अधिका-यांमार्फत विमा क्लेम सादर केला होता.
ड प्रस्तुत तक्रादाराचे पतीचे मोटरसायकल चालवणेचा वैध परवाना ड्रायव्हिंग लायसन्स नसलेने नाकारणेत आला आहे व प्रस्तुत योगय कारण देऊनच तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे.
इ तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तो खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे वि.प.ने दाखल केले आहे.
7. वर नमुद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
8. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 4 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे पती शेतकरी होते व त्यांचा विमा शासनामार्फत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता व अपघात काळात तो चालू होता, या बाबी वि.प.यांनी मान्य व कबूल केलेल्या आहेत. म्हणजेच तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते होते हे निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द झालेले आहे. तसेच तक्रारदाराचे पती हे मोटर सायकलचे झाले अपघातात डोक्यास गंभीर दुखापत होऊन मयत झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेमार्फत वि.प.क्र.1 यांचेकडे विमा क्लेम सर्व कागदपत्रांसह सादर केला. परंतु वि.प.1 विमा कंपनीने तक्रारदाराचे पती यांचे मोटरसायकल चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स अपघातादिवशी वैध नव्हते हे कारण देऊन तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे. वास्तविक वि.प.क्र.1 ने दाखल केले दि.09.11.2016 रोजीचे कागद यादीसोबत तक्रारदाराचे पतीचे ड्रायव्हिंग लायसन्सचे अवलोकन केले असात, तक्रारदाराचे पतीचे लायसन्सवर Valid Till-13-03-2015 (NT) तसेच 13.03.2016 (TR) असे नमुद आहे. म्हणजेच तक्रारदाराचे पतीचा अपघात झाला त्या तारखेच्या साधारण एक महिन्याअगोदर नॉन-ट्रान्सपोर्ट लायसन्सची मुदत संपली होती. परंतु ट्रान्सपोर्ट (TR) ची मुदत दि.13.03.2016 पर्यंत होती. म्हणजेच तक्रारदाराचे पती अपघातात मयत झाले त्यावेळी त्यांचेकडे ट्रान्सपोर्ट व्हेईकलचे लायसन्स होते तसे नॉन ट्रान्सपोर्टचे लायसन्स होते पण त्याची मुदत संपली होती नूतनीकरण करायचे होते. याचा सरळ अर्थ होते की, तक्रारदार नॉन ट्रान्सपोर्ट व ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालवू शकत होता आणि तरीही वि.प.क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम मोटर सायकल चालवणेचे लायसन वैध नसलेचे कारण देऊन नाकारला आहे ही बाब म्हणजे सेवेतील त्रुटीच आहे असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
9. वरील विवेचन, तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा ऊहापोह करता, प्रस्तुत कामी तक्रारदार हे वि.प.क्र.1 विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम वसुल होऊन मिळणेस व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सबब, सदर कामी तक्रारदार वि.प.क्र.1 विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- तसेच प्रस्तुत विमा क्लेम रक्कमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के दराने व्याजाची होणारी रक्क्म मिळणेस त्याचप्रमाणे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्क्म रु.15,000/- वि.प.क्र.1 विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
11. सबब प्रस्तुत कामी, आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराला विमा क्लेम रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख फक्त) अदा करावी व प्रस्तुत रक्कमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9% रक्कम वि.प. नं. 1 ने तक्रारदाराला अदा करावी.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंधरा हजार फक्त) वि.प.क्र.1 ने तक्रारदाराला अदा करावेत.
4) वरील सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम-25 व कलम-27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.