मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 159/2010 तक्रार दाखल दिनांक – 08/12/2010 निकालपत्र दिनांक - 15/03/2011 श्री. मनमोहन नारायण जोशी, फ्लॅट क्रामंक 7, 3 रा मजला, बी विंग, समाधान सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., 74 सी, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई 400 028. ........ तक्रारदार विरुध्द
1) महाव्यवस्थापक, एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.., रजि. ऑफीस – प्लॉट क्रमांक 51, उद्योग विहार, सुरजपूरद – कासना रोड, ग्रेटर नाइडा – 201 306 (उ.प्र).
2) व्यवस्थापक, विजय सेल्स, प्रभादेवी शाखा, प्रभादेवी गणपती मंदिरासमोर, मुंबई 400 025.. ......... सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार स्वतः व वकील सोनाली देसाई हजर विरुध्दपक्ष क्रमांक 1 तर्फे वकील आनंद कुमार विरुध्दपक्ष क्रमांक 2 गैरहजर - निकालपत्र - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केले आहे की, ते रिलायन्स एनर्जी या कंपनीतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 हे वॉशींग मशीनचे उत्पादक आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून दिनांक 29/12/2008 रोजी स्वंयचलीत धुलाई यंत्र रक्कम रुपये 16,190/- या किंमतीस विकत घेतले होते. सदर मशिन हे एलजी डब्ल्यूएम डब्ल्यूएफटी8519पीव्ही, 7.5 कि.ग्रॅ.ची होती. सदर मशिन विकत घेतल्यानंतर त्यात दोष उत्पन्न झाले, तसेच कपडयांची धुलाई होत नव्हती म्हणून तक्रार नोंदविली. परंतु मशिन नादुरुस्त झाल्याने गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदर मशिन बदलून दिले व गैरअर्जदार यांनी दिनांक 18/11/2009 रोजी नविन मशिन दिले. सदर बदलून दिलेल्या मशिनमध्ये पुन्हा दोष निर्माण झाल्यामुळे दिनांक 13/10/2010 रोजी तक्रारदाराने तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने गैरअर्जदार क्रमांक 1 चे प्रतिनिधी दिनांक 14/09/2010 रोजी वॉशींग मशिन दुरुस्त करण्याकरीता आले. तक्रारदारांनी नमूद केले आहे की, पुन्हा मशिन नादुरुस्त झाल्यामुळे त्यांनी दिनांक 24/09/2010 रोजी गैरअर्जदार यांना नोटीस पाठवून रकमेची मागणी केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केले आहे की, दुस-यांदा बदलून दिलेल्या वॉशींग मशीनमध्ये उत्पादीत दोष आहेत, मशीन सुरु होत नाही. त्यामुळे नविन मशीन बदलून मिळण्याची विनंती केलेली आहे.
2) मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 1 हे हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे, तो येणे प्रमाणे -
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांनी लावलेले सर्व आरोप अमान्य केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ही बाब मान्य केली आहे की, तक्रारदाराला दिनांक 29/12/2008 रोजी वॉशींग मशीन विकले होते. तसेच वॉशींग मशीनमध्ये बिघाड असल्यामुळे तक्रारदाराला नविन वॉशींग मशीन दिनांक 18/11/2010 रोजी बदलून दिले होते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी नमूद केल्याप्रमाणे दुस-यांदा बदलून दिलेल्या मशीनबद्दल आलेल्या तक्रारीनुसार दिनांक 14/09/2010 रोजी मशीनची तपासणी केली होती व त्यात कोणतेच उत्पादित दोष नव्हते. मशीन ही पूर्ववत सुरळीत सुरु होती. गैरअर्जदार क्रमांक 1 ने नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी बदलून दिलेल्या वॉशींग मशीनबद्दल तब्बल 10 महिन्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तरी सदर तक्रार खारिज करण्यात यावी असे नमूद केलेले आहे. 3) गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्यांनी नमूद केले आहे की ते फक्त विक्रेते आहेत. तसेच वॉशींग मशीनमध्ये असलेल्या उत्पादनातील दोषांकरीता गैरअर्जदार क्रमांक 1 हे जबाबदार आहेत. तसेच त्यांनी तक्रारदाराला योग्य ती सेवा दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्याविरुध्दची तक्रार ही खारिज करण्यात यावी.
4) प्रस्तुत प्रकरण मंचासमक्ष आज दिनांक 15/03/2011 रोजी मौखिक युक्तीवादाकरीता आले असता तक्रारदारातर्फे वकील सोनाली देसाई हजर होत्या, गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे वकील श्री. आनंद कुमार हजर होते, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचा पुकारा केला असता ते गैरहजर होते. उभयपक्षांनी दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेले आहे -
5) गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदाराला दिनांक 29/12/2008 रोजी स्वंयचलीत धुलाई यंत्र विकले होते. तसेच सदर मशीन हे तीन वेळा त्यांच्या तज्ञामार्फत पहाणी केल्यानंतर तक्रारदाराला बदलून देण्यात आलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदाराला दिनांक 18/11/2009 रोजी नविन मशीन बदलून दिलेले आहे व याबाबत उभयपक्षांमध्ये कोणताही वाद नाही. तक्रारदाराने नमूद केले आहे की, बदलून दिलेल्या मशीनमध्ये दोष असल्यामुळे त्यांनी दिनांक 13/09/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे तक्रार नोंदविली होती. त्या अनुषंगाने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 14/09/2010 रोजी बदलून दिलेले मशीन तपासून देण्यात आले. सदर जॉबकार्ड गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबासोबत निशाणी/ई म्हणून दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यात मशीनची दुरुस्ती केलेली आहे असा उल्लेख आहे. परंतु तक्रारदार हा बदलून दिलेल्या मशीन ऐवजी पुन्हा नवीन मशीनची मागणी करीत आहे असे नमूद केले आहे.
मौखिक युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदार स्वतः हजर होते व बदलून दिलेल्या मशीनमध्ये कपडे फाटले जातात व तसे फाटलेले कपडे त्यांनी मंचासमक्ष दाखवणेसाठी आणले होते. तक्रारदाराने दिनांक 18/11/2009 रोजी बदलून दिलेल्या मशीनबद्दल त्यांनी तब्बल 10 महिन्यांनंतर दिनांक 13/09/2010 रोजी तक्रार केलेली आहे.
प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षांनी बदलून दिलेल्या मशीनमध्ये उत्पादनातील दोष होते याबाबत कोणताच पुरावा दाखल केलेला नाही. तथापी मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराला बदलून दिलेले मशीन गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांच्या तज्ञ व्यक्तीकडून पूर्ण तपासणी करुन ती संपूर्णतः दुरुस्त करुन द्यावी, व एक वर्षाची हमी (वॉरंटी) द्यावी असे मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीत इतर केलेली मागणी मंचाला संयुक्तिक वाटत नाही. तथापी तक्रारदाराला तक्रार दाखल करावी लागली त्याकरीता तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- गैरअर्जदार क्रमांक 1 ने तक्रारदाराला द्यावा.
तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे तक्रारीत केलेली मागणी ही सिध्द होत नाही. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 हे विक्रेते आहेत व वॉशींग मशीनच्या उत्पादनात दोष आहेत त्यामुळे त्याला जबाबदार धरणे मंचाला संयुक्तिक वाटत नाही. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 च्या विरुध्द दाखल केलेली तक्रार खारिज करण्यात येते प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व पुराव्याचे अवलोकन केले असता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहेत
- अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 159/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराकडे असलेली वॉशींग मशीन ही कंपनीच्या तज्ञ व्यक्तीकडून तपासणी करुन पूर्णतः दुरुस्त करुन द्यावी व 1 वर्षाची वॉरंटी/गॅरंटी (मशिन विकतांना देण्यात येते ती) द्यावी. 3) गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारदाराला द्यावा.
4) गैरअर्जदार क्रमांक 2 च्या विरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते.
5) सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावी.
6) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 15/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. (सदर तक्रारीचा निकाल हा उभयपक्षांचा युक्तीवाद संपल्यानंतर लगेच मंचाच्या बैठकीत पारीत करण्यात आला.)
सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |