तक्रारदार : वकील श्री.मेंडन सोबत हजर.
सामनेवाले 1व3 : वकीलाचे कारकून श्री.वाडेकर मार्फत हजर.
सामनेवाले क्र.2 : गैर हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचे उत्पादन करणारी कंपनी आहे. सा.वाले क्र.2 हे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाने विक्रेते आहेत. तर सा.वाले क्र.3 हे अधिकृत सेवा केंद्र आहे.
2. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली डिश वॉशर दिनांक 14.12.2006 रोजी रु.25,000/- किंमतीस खरेदी केली. खरेदी केल्यानंतर 7 ते 8 महीन्यामध्ये डिश वॉशर मध्ये पाण्याची गळती दिसून आली व ती सदोष आहे असे दिसून आले, व तक्रारदारांनी सतत पाठपूरावा केल्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी म्हणजे उत्पादकाने सा.वाले क्र.3 यांचे मार्फत ती डिश वॉशर बदलून दिली. परंतु तक्रारारांना त्या बद्दल रु.3000/- ज्यादा सा.वाले क्र.1 यांना द्यावे लागले.
3. तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले यांनी बदलून दिलेली डिश वॉशर ऑक्टोबर,2007 पासून वापरात असतांना ती पुन्हा बिघडली. त्यामध्ये पाण्याची गळती दिसून आली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 सेवा केंद्रामध्ये वारंवार तक्रारी दिल्या व सा.वाले क्र.3 यांच्या अभियंत्याने डिश वॉशरची पहाणी केली व दुरुस्तीचे प्रयत्न केले परंतु ती दुरुस्त होऊ शकली नाही. या प्रकारे बदलून दिलेली डिश वॉशर देखील वापरणे योग्य राहीले नाही व ती सदोष असल्याने तक्रारदारांचे नुकसान झाले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 30.3.2009 रोजी वकीलांमार्फत नोटीस दिली व डिश वॉशरची किंमत रु.25,000/- + 3000= 28,000/- व नुकसान भरपाई रु.50,000/- अशी मागणी केली.
3. त्या नंतरही सा.वाले यांनी तक्रारदारांच्या मागणीस प्रतिसाद न दिल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 27.4.2009 रोजी दाखल केली.
4. सा.वाले क्र.1 व 3 यांनी आपली एकत्रित कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली डिश वॉशर डिसेंबर,2006 मध्ये खरेदी केली होती हे मान्य केले. ती सदोष असल्याने ऑक्टोबर,2008 मध्ये ती डिश वॉशर बदलून देण्यात आली असे कथन केले. तथापी सा.वाले क्र.1 व 3 यांनी असे कथन केले की, तक्रारदारांनी दुस-या डिश वॉशर संबंधित तक्रार केल्यानंतर ती दुरुस्ती करुन देण्यात आली व ती व्यवस्थित चालु आहे. या प्रकारे तक्रारदारांची तक्रार खोटी असून सा.वाले यांचेकडून पैसे वसुल करण्याचा तो एक प्रयत्न आहे असे सा.वाले यांनी
5. सा.वाले क्र.2 विक्रेते यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांना डिश वॉशरची विक्री केल्याचे मान्य केले. तथापी डिश वॉशर ची हमी उत्पादकाकडून देण्यात येत असल्याने डिश वॉशर सदोष असल्यास त्याची जबाबदारी सा.वाले क्र.1 यांचेवर असल असे कथन केले.
6. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीला आपले प्रति उत्तराचे शपथपत्र तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी सिंडीकेट इलेक्ट्रीकल यांचे मालक श्री.बलविंदर सिंग यांचेकडून डिश वॉशरची पहाणी करुन घेतली व त्या बद्दलचा अहवाल व शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी श्री.अभिषेक नंदा यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना डिश वॉशरचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून डिश वॉशरची किंमत व नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. डिश वॉशरची किंमत व्याजासह. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रासोबत मुळचे कागदपत्र हजर केलेले आहे. त्यामध्ये सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेला डिश वॉशर तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून दिनांक 14.12.2006 रोजी रु.25,000/- अदा करुन विकत घेतल्या बद्दलची मुळची पावती हजर केलेली आहे. या व्यवहाराबद्दल सा.वाले यांनी नकार दिलेला नाही. त्यानंतर काही महिन्यातच डिश वॉशर चे पाईपमध्ये दोष असल्याचे दिसून आले, गळती असल्याचे दिसून आहे व तक्रारदारांचे तक्रारीवरुन सा.वाले यांनी दिनांक 30.10.2007 रोजी तक्रारदारांकडून रु.3000/- ज्यादा स्विकारुन तो बदलून दिला. त्या बद्दलची मुळ पावती देखील तक्रारदारांनी दाखल केलेली आहे.
9. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे नविन डिश वॉशर करीता सा.वाले यांनी हमी कालावधी वाढवून दिला होता व त्या हमी कालावधीमध्ये डिश वॉशर मध्ये पुन्हा दोष दिसून आला. तो हमी कालावधी दोन वर्षाचा होता. म्हणजे डिश वॉशर बदलल्या पासून म्हणजे दिनांक 31.10.2007 पासून दोन वर्ष होता.
10. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे या दुस-या डिश वॉशरमध्येसुध्दा दोष दिसून आला. त्यामध्ये गळती चालु होती सा.वाले क्र.3 सेवा सुविधा केंद्र यांनी यांनी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतू डिश वॉशर दुरुस्त होऊ शकला नाही. अंतीमतः डिश वॉशर अडगळीमध्ये पडून राहीला.
11. ही बाब सिध्द करणेकामी डिश वॉशरची तपासणी सिंडीकेट इलेक्ट्रीकल यांचे मालक श्री.बलविंदर सिंग यांचेकडून करुन घेतली. श्री.बलविंदर सिंग यांचेकडून डिश वॉशरचे संदर्भात दिलेला अहवाल व त्यांचे शपथपत्र तक्रारदारांनी दाखल केलेले आहे. त्यातील मजकूरावरुन असे दिसते की, डिश वॉशरमध्ये गळती असून डिश वॉशरमध्ये मुलभूत दोष आहेत व ते दुरुस्त होऊ शकत नाहीत. सा.वाले यांनी या पुराव्याचे खंडण करणेकामी त्यांचे अधिकारी श्री.सचिन गर्जे यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तथापी गर्जे हे अभियंता आहेत अथवा तज्ञ आहेत असे दिसून येत नाही. या उलट ते सा.वाले यांचे कर्मचारी आहेत असे दिसून येते. डिश वॉशर जर दुरुस्त होण्यायोग्य असेल तर ती दुरुस्त करुन चालु स्थितीमध्ये का आणली जावू शकत नाही याचा खुलासा श्री. सचिन गर्जे याचे शपथपत्रात नाही. ती डिश वॉशर जर चालु स्थितीत असेल तर सा.वाले यांनी ती डिश वॉशर मंचासमोर हजर करावी व सा.वाले त्याचे प्रात्याक्षिक देतील असे आव्हान सा.वाले यांनी तक्रारदारांना दिले असते. परंतु सा.वाले यांनी त्या स्वरुपाचे कथन केलेले नाही व कृतीही केलेली नाही. यावरुन बदलून दिलेली डिश वॉशर देखील नादुरुस्त होती ती सदोष आहे व त्यामध्ये मुलभूत दोष आहेत असे दिसून येते. सहाजिकच सा.वाले यांनी तक्रारदारांना डिश वॉशर चे संबंधात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागेल.
12. सा.वाले यांनी तक्रारदारांना पहीली डिश वॉशर बदलून दिली. परंतू दुस-या डिश वॉशरमध्ये देखील दोष दिसून आला. या परिस्थितीमध्ये सा.वाले यांनी दुसरी डिश वॉशर बदलून द्यावी या स्वरुपाचा आदेश देणे योग्य रहाणार नाही असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. तक्रारदारांचा सा.वाले यांचे उत्पादनावर विश्वास राहीलेला नाही व सा.वाले यांनी डिश वॉशर बदलून द्यावी अथवा दुरुस्त करुन द्यावी असा आदेश झाल्यास भविष्यसात तक्रारीची शक्यता नाकारता येत नाही व गुंतागुंत निर्माण होईल. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना डिश वॉशरची किंमत रु.25,000/- + 3000 = 28,000/- व मानसिक त्रास व गैरसोय या बद्दल नुकसान भरपाई रु.2000/- असे एकत्रित रु.30,000/- विशिष्ट मुदतीत अदा करावेत असा आदेकश देणे योग्य व संयुक्तीक राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. अर्थात तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडे म्हणजे सा.वाले क्र.1 यांचे सेवा केंद्राकडे नादुरुस्त डिश वॉशर जमा केल्यानंतरच तक्रारदार वरील रक्कम मिळण्यास पात्र राहतो.
13. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 325/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना डिश वॉशरचे संर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारारांना डिश वॉशरची किंमत व नुकसान भरपाई असे एकत्रित रु.30,000/- न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत अदा करावी असा आदेश देण्यात येतो.
4. वरील मुदत संपण्यापूर्वी तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 व 3 यांना नोटीस देवून बदलून दिलेली डिश वॉशर आहे त्या स्थितीत सामनेवाले यांचेकडे जमा करावी व सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्या बद्दल पावती द्यावी व त्यानंतर सा.वाले क्र.1 अथवा क्र.3 यांनी वरील रक्कम तक्रारदारांना अदा करावी.
5. सामनवाले यांनी वरील रक्कम मुदतीत अदा न केल्यास त्यावर मुदत संपल्यापासून 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
6. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 अथवा 3 यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5000/- अदा करावेत.
7. तक्रार सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द रद्द करण्यात येते.
8. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.