श्री. सतीश देशमुख, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 27/02/2013)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्त्याचे तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्ता यांचे वि.प./बँक यांचे नागपूर शाखेमध्ये जानेवारी 2008 पासून खाते असून, एटीएम/क्रेडीट कार्ड क्र. 4346786000410554 द्वारे ते वि.प.ची आर्थिक व्यवहार करण्याकरीता सेवा घेत होते. सदर कार्डचे माध्यमातून तक्रारकर्त्याने दि.29.05.2008 पर्यंत आर्थिक व्यवहार केले व केलेल्या व्यवहाराची रक्कम वेळोवेळी रु.43,900/- तक्रारकर्त्याने रकमेच्या तपशिलात नोंद असल्याप्रमाणे अदा केली.
वि.प.ने दि.18.07.2008 रोजी थकबाकी रकमेपोटी तक्रारकर्त्याकडून जबरदस्तीने रु.7,000/- चा धनादेश घेतला व तक्रारकर्त्याचे खात्यात जमा केला. परंतू खात्यात पूरेशी रक्कम नसल्याने तो अनादरीत झाला. करीता वि.प.ने अनादरीत झालेल्या धनादेशापोटी दंड म्हणून तक्रारकर्त्यावर रु.300/- शुल्क लावून, वि.प.ने तक्रारकर्त्याला ती रक्कम भरण्यास सांगितले. या संदर्भात तक्रारकर्त्याने वि.प.ची प्रत्यक्ष भेट घेऊन समझोता म्हणून, रु.25,000/- एकमुस्त भरुन सदर खाते बंद करण्याची तयारी बँकेने दर्शविल्याने, तक्रारकर्त्याने दि.06.01.2009 रोजी रु.25,000/- बँकेत भरले.
त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.ला क्रेडीट कार्ड खाते बंद करण्यास सांगितले. वि.प.क्र.2 ने यावर क्रेडीट कार्ड बंद करण्याचे प्रपोजल मुख्यालयास पाठवितो असेही सांगितले. परंतू वि.प.ने सदर खाते बंद न करता, तक्रारकर्त्याला दि.10.01.2009 रोजी पत्र पाठवून त्याचे क्रेडीट कार्ड खात्याची मर्यादा ही रु.17,000/- केल्याचे कळविले.
सदर पत्र प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्याने वि.प.ला रजिस्टर्ड पोस्टाद्वारे खाते बंद करण्यास सांगितले. तथापि, वि.प.च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने पूर्तता केल्यावरही, वि.प.ने खाते बंद केल्याबाबत तक्रारकर्त्याला कधिही सुचित केले नाही व वि.प.ने दि.09.07.2010 रोजी तक्रारकर्त्याला कायदेशीर नोटीस देऊन रु.15,087/- व्याजासह भरण्यास सांगितले. यावर तक्रारकर्त्याने उत्तर दिले. असे असतांनाही वि.प.ने काहीही न कळविता तक्रारकर्त्याचे खाते गोठविले व दि.14.10.2011 रोजी तक्रारकर्त्याचे रु.21691.82 बँक खात्यातून क्रेडीट कार्ड खातेपोटी मध्ये वळते केले.
तक्रारकर्त्याच्या मते वि.प.ची सदर कृती ही अनुचित व्यापार प्रथेत मोडते व वि.प.ने ग्राहक सेवेत त्रुटी केलेली आहे, करिता तक्रारकर्त्याने सदर तक्रार या मंचासमोर प्रतिज्ञापत्रावर एकूण 10 दस्तऐवजासह खालील प्रार्थनेसह दाखल केले आहे, तक्रारकर्त्याची प्रार्थना
अ) रु.21,691.82 ही रक्कम व्याजासह मिळावी,
ब) तक्रारीचा खर्च आणि मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाईपोटी मिळावे. . तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्ट्यर्थ एकूण 16 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर, मंचाने वि.प.वर नोटीस बजावला. वि.प.ने हजर होऊन मंचासमोर, लेखी उत्तर दाखल केले.
3. विरुध्द पक्षाचे निवेदन - वि.प.ने आपल्या लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याला त्याच्या विनंतीवरुन क्रेडीट कार्डची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती व त्याचा वापर तक्रारकर्त्याने एक वर्ष केला. तक्रारकर्त्याने सदर रकमेचे भुगतान केल्याबाबतचा एकही पूरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने स्वतः रु.7,000/- चा धनादेश दिला व तो न वटता परत आला. त्यामुळे रक्कम ही थकीत राहीली. वि.प.ने तक्रारकर्त्याकडे 05.01.2009 रोजी रु.31,597/- ही रक्कम देणे शिल्लक असतांना रु.25,000/- मध्ये समझोता कधीच करण्यात आला नाही. तसेच शिल्लक रक्कम भरण्यापोटी तक्रारकर्त्याला नोटीस दिली असतांनाही त्याने थकीत रकमेचा भरणा केलेला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली मागणी अयोग्य असून, सदर तक्रार ही तक्रारकर्त्यावर खर्च आकारुन खारीज करावी अशी मागणी वि.प.ने केलेली आहे.
4. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर, तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर, लेखी युक्तीवाद दाखल केला. युक्तीवादाला वि.प.गैरहजर. वि.प.चा लेखी युक्तीवाद हाच युक्तीवाद म्हणून स्विकारावा अशी विनंती वि.प.ने मंचाला युक्तीवाद दाखल करतांना केली होती. सदर प्रकरणात दाखल दस्तऐवज, शपथपत्रे, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की,
-निष्कर्ष-
5. दस्तऐवज क्र. (पृ.क्र. 15 ते 18), असे निदर्शनास येते की, क्रेडीट कार्ड खाते बंद करण्याकरीता 19.01.2009, 07.02.2009 ला वि.प.ला पत्र दिलेले आहेत. तसेच वि.प.ने पाठविलेल्या कायदेशीर नोटीसला उत्तर देतांनाही सदर खाते बंद करण्याबाबत नमूद केले आहे.
6. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने वि.प.ला खाते बंद करण्याकरीता वेळोवेळी सुचित केले आहे. परंतू वि.प. बँकेने त्याचे खाते बंद न करता कार्ड मर्यादा ही रु.17,000/- पर्यंत केल्याचे पत्र त्याला पाठविले. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला अतिरिक्त रकमेची मागणी करुन, 09 जुलै 2010 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून रु.15,087/- रक्कम भरण्यास सांगितले. यावरु ही बाब स्पष्ट होते की, वि.प.ने तक्रारकर्त्याच्या खाते बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन, विवादित खाते सतत सुरुच ठेवले व तक्रारकर्त्याला अतिरिक्त रक्कम भरण्यास बाध्य करण्याचे प्रयत्न केले. तसेच वि.प.ने उभय पक्षात समझोता झाल्याची बाब नाकारलेली आहे. परंतू रु.25,000/- एकमुस्त त्यांनी कसे घेतले व त्यावेळेस काय ठरले होते ही बाबही स्पष्ट केलेली नाही. करिता वि.प.ची सदर कृती ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 तील कलम 2 (i) (g) नुसार सेवेतील त्रुटी दर्शविते असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. वि.प.च्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला व मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याचे दस्तऐवजावरील म्हणण्यावर, वि.प.ने आपले म्हणणे स्पष्ट करण्याकरीता, कुठलेही दस्तऐवज दाखल करुन तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढले नसल्याने, मंचाचे मते तक्रारकर्ता सदर प्रकरणी नुकसान भरपाई मागण्यास पात्र आहे. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून वळती करण्यात आलेली रक्कम रु.21691.82 ही तक्रारकर्त्याला, दि.14.10.2011 पासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीकरीता, द.सा.द.शे.9 % व्याजासह द्यावी.
3) वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला, मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईबाबत रु.2500/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.1,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून, 45 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे.