आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. तक्रार – टायरच्या सदोष उत्पादनाबद्दल दाखल आहे. तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 लक्ष्मी ऍग्रो स्टील इंडस्ट्रीज म्हणजेच भंडारा येथील स्थानिक ट्रॅक्टर विक्रेता यांच्याकडून दिनांक 24/01/2011 रोजी ट्रॅक्टर खरेदी केला. या ट्रॅक्टरला अपोलो कंपनीचे टायर्स लागलेले आहेत. विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 हे अपोलो टायर्सचे अनुक्रमे नागपूर व कोचीन येथील उत्पादक आहेत. विरूध्द पक्ष क्र. 2 हे महिन्द्रा ऍन्ड महिन्द्रा कंपनी आहेत. तक्रारकर्त्याची तक्रार आहे की, त्याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या टायर्सचे छिलटे निघाले ही बाब दिनांक 04/06/2010 रोजी लक्षात आली म्हणून दिनांक 07/06/2010 रोजी त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे तक्रार नोंदविली. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी वॉरन्टी फॉर्म भरून घेतला व विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 म्हणजेच टायर्सचे उत्पादक यांच्याकडे पाठविला. दरम्यान तक्रारकर्ता भंडारा येथील भारत टायर्स यांच्याकडे गेला. अपोलो टायर्सचे हे स्थानिक प्रतिनिधी आहेत. भारत टायर्स भंडारा यांना तक्रारकर्त्याने सदोष टायर्सबद्दल नोटीसही पाठविली. 3. दिनांक 21/06/2010 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 यांची भेट घेतली. यामध्ये दिनांक 23/06/2010 रोजी सकाळी 11.00 वाजता टायर्सचे निरीक्षणासाठी तक्रारकर्त्याला उपस्थित राहण्यास सांगितले. तक्रारकर्ता म्हणतो की, दिलेल्या तारखेला तो हजर होता, परंतु विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांचे इंजिनिअर आले नाहीत म्हणून तो परत गेला. 4. यानंतर दिनांक 30/06/2010 रोजी विरूध्द पक्ष क्र. 1 ला तक्रारकर्त्याने नोटीस पाठविली. त्यानंतर दिनांक 02/09/2010 रोजी विरूध्द पक्ष क्र. 1, 2, 3 व 4 यांना नोटीस पाठविली. दोन्हीही नोटीसचा आशय दोषपूर्ण टायर बदलून द्यावे किंवा त्याची किंमत द्यावी असा आहे. दिनांक 14/09/2010 रोजी विरूध्द पक्ष क्र. 4 चे नोटीसला उत्तर प्राप्त झाले. या उत्तरानुसार दिनांक 23/06/2010 रोजी म्हणजेच निरीक्षणाच्या दिवशी त्यांचे इंजिनिअर आले होते, परंतु तक्रारकर्त्याने निरीक्षणासाठी ट्रॅक्टर आणला नाही. तक्रारकर्ता हजर नव्हता म्हणून हे प्रकरण त्यांनी बंद केले आणि closing report लिहिला. त्यावर विरूध्द पक्ष क्र. 1 ची सही आहे. दिनांक 16/09/2010 रोजी विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी नोटीसला उत्तर देऊन कारवाई सुरू आहे असे सांगितले. दिनांक 25/09/2010 रोजी तक्रारकर्त्याने तिस-यांदा विरूध्द पक्ष क्र. 1 ला नोटीस दिली. तक्रारकर्त्यानुसार, त्यांनी उत्तर दिले नाही. दिनांक 06/11/2010 रोजी तक्रारकर्त्याने चौथ्यांदा विरूध्द पक्ष क्र. 1 व 3 ला नोटीस दिली. दरम्यानच्या काळात दिनांक 11/11/2010 ही टायरच्या निरीक्षणाची तारीख ठरली. त्यानुसार विरूध्द पक्ष क्र. 3 हे विरूध्द पक्ष क्र. 1 च्या भंडारा येथील कार्यालयात हजर झाले. तक्रारकर्ता टायर ट्रॅक्टरसह हजर झाला व ट्रॅक्टरच्या टायर्सची पाहणी झाली. हा रिपोर्ट डॉक्युमेंट 14 रेकॉर्डवर आहे. या पाहणीनुसार अयोग्य वापरामुळे टायरचे छिलके निघाले, उत्पादनात दोष नाही असा अहवाल देण्यात आला. तक्रारकर्त्याला हा रिपोर्ट मान्य नाही. 5. तक्रारकर्त्याची मागणी खालीलप्रमाणे आहेः- क्रमांक | रक्कम | कारण | 1. | रू. 28,700/- | नवीन मागील दोन्ही अपोलो टायर्स व ट्युब च्या प्रचलित बाजार भाव. | 2. | रू. 50,000/- | टायर मुळे झालेला पिकाचे नुकसान, व्यवसायिक नुकसान, मानसिक कष्ट, असुविधा. | 3. | रू. 5,000/- | तह. मोहाडी पासून भंडारा पर्यंत ट्रॅक्टर पासून प्रवास भाडा व झालेला नुकसान | 4. | रू. 10,000/- | न्यायिक कार्यवाही, वारंवार दिलेले नोटीस व वकील फीस | | रू. 93,000/- | एकूण दावा |
6. तक्रारकर्त्याने एकूण 14 कागदपत्रे जोडली आहेत. तक्रारकर्त्यानुसार निकृष्ट दर्जाचे टायर पुरविणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. 7. विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्यातर्फे ऍड. बी. एस. वंजारी यांनी युक्तिवाद केला. उत्तर रेकॉर्डवर आहे. उत्तरानुसार विरूध्द पक्ष क्र. 1 हे भंडारा येथील ट्रॅक्टर विकणारे अधिकृत विक्रेता आहेत. त्यांनी तक्रारकर्त्याला महिन्द्रा ऍन्ड महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर विकल्याची बाब ते मान्य करतात. या ट्रॅक्टरला अपोलो कंपनीचे टायर्स लागलेले आहेत ही बाब सुध्दा ते मान्य करतात. तक्रारकर्त्याची तक्रार टायर्समधील उत्पादनासंबंधी आहे. विरूध्द पक्ष क्र. 4 यांनी ते उत्पादित केल्यामुळे तसेच विरूध्द पक्ष क्र. 3 हे नागपूर येथील विभागीय कार्यालय असल्याने ही जबाबदारी विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांची आहे असे ते म्हणतात. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्ता आणि विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांच्यामध्ये वेळोवेळी मध्यस्थी व पत्रव्यवहार करून दोघांचीही सांगड घालून दिली आणि तक्रारीचे निवारण करण्यास मदत केली 8. दिनांक 23/06/2010 रोजी टायर्सचे निरीक्षण ठरले होते. त्यासाठी विरूध्द पक्ष क्र. 3 भंडारा येथे हजर होते. परंतु तक्रारकर्ता ट्रॅक्टर घेऊन आला नाही. तक्रारकर्त्यानेच पुन्हा दिनांक 25/09/2010 रोजी अर्ज देऊन टायरच्या निरीक्षणाची विनंती केली. त्यानुसार दिनांक 11/11/2010 रोजी निरीक्षण झाले. त्यात उत्पादन दोष नाही असा निष्कर्ष विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी नोंदविला व प्रकरण बंद केले. विरूध्द पक्ष क्र. 1 यांचा टायरच्या प्रकरणामध्ये कोणत्याही सेवेचा किंवा त्यातील त्रुटीचा प्रश्न उद्भवत नाही म्हणून त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती ते करतात. 9. विरूध्द पक्ष क्र. 2 गैरहजर आहेत. त्यांचे उत्तर नाही. 10. विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांचे संयुक्त उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यांनी ही तक्रार मंचासमोर चालू शकत नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला आहे. कारण तक्रारकर्त्याने दोषपूर्ण टायर्सच्या उत्पादनाबाबत तज्ञाचा अहवाल सादर केला नाही. 11. दिनांक 11/11/2010 रोजी तक्रारकर्त्याच्या ट्रॅक्टरच्या टायर्सचे निरीक्षण करण्यात आले व तज्ञाचा अहवाल त्यांनी दिला. त्यात उत्पादनात दोष नाही असे निष्पन्न होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती ते करतात. विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 चे असे म्हणणे आहे की, त्यांनी वेळोवेळी तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला उत्तर दिले आहे. 12. मंचाने तक्रारकर्त्याचे वकील, विरूध्द पक्ष क्र. 1 चे वकील तसेच विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 तर्फे त्यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री. राधेश्याम पटले यांचा युक्तिवाद ऐकला. संपूर्ण कागदपत्रे तपासली. मंचाची निरीक्षणे खालीलप्रमाणेः- 13. तक्रारकर्त्याने दिनांक 24/01/2010 ला महिन्द्रा ऍन्ड महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर विरूध्द पक्ष क्र. 1 यांचेकडून खरेदी केला. या ट्रॅक्टरला विरूध्द पक्ष क्र. 4 यांनी उत्पादित केलेले अपोलो टायर्स लागलेले आहेत. दिनांक 04/06/2010 रोजी टायरच्या एका चाकाचे छिलटे निघाले म्हणून टायरचे उत्पादनच दोषपूर्ण आहे असे मानून तक्रारकर्त्याने टायरची किंमत अथवा नवीन टायर्स मिळावे आणि दोषपूर्ण टायर पुरविल्याबद्दल नुकसानभरपाईची मागणी याप्रमाणे तक्रार दाखल केली आहे. 14. तक्रारकर्त्याने निरनिराळया पक्षांना दोषपूर्ण टायरसंबंधी नोटीसेस पाठविल्या. त्यात भंडारा येथील भारत टायर्स यांचा समावेश आहे. वास्तविक पाहता त्यांचा सदर प्रकरणाशी काहीही संबंध नाही अथवा ते या प्रकरणात विरूध्द पक्ष नाहीत. तक्रारकर्त्याने दिनांक 30/06/2010 रोजी फक्त विरूध्द पक्ष क्र. 1 ला नोटीस पाठविली. त्यानंतर दिनांक 02/09/2010 रोजी विरूध्द पक्ष क्र. 1, 2, 3 व 4 यांना नोटीस पाठविली. त्यानंतर दिनांक 25/09/2010 रोजी विरूध्द पक्ष क्र. 1 यांना तिस-यांदा नोटीस पाठविली. त्यानंतर दिनांक 06/11/2010 रोजी फक्त विरूध्द पक्ष क्र. 1 व 3 ला नोटीस पाठविली. मंचाने संपूर्ण रेकॉर्ड तपासला असता या सर्वांनी तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर पाठविल्याचे निष्पन्न होते. 15. टायर सदोष आहे हे दाखविण्यासाठी तक्रारकर्त्याने दोन ठिकाणी छिलटे निघालेला टायरचा एक फोटोग्राफ दाखल केला आहे. तो तपासला असता त्यावर वरच्या जाड रबरी भागाचे अत्यंत बारीक असे छिलटे निघालेले अत्यंत अस्पष्टपणे दिसतात. बाकी संपूर्ण टायर अत्यंत सुस्थितीत असल्याचे दिसते. शिवाय हा फोटोग्राफ फक्त एकाच टायरचा असून दुस-या टायरचा फोटोग्राफ तक्रारकर्त्याने लावलेला नाही. तक्रारकर्त्याची तक्रार दोन्ही टायर दोषपूर्ण असल्याबद्दल आहे. म्हणून मंचाला टायर दोषपूर्ण आहेत या तक्रारकर्त्याच्या म्हणण्यात अजिबात तथ्थ्य वाटत नाही. 16. टायर दोषपूर्ण आहेत याबाबत तक्रारकर्त्याने कोणत्याही तज्ञ व्यक्तीचा अहवाल त्याच्यातर्फे दाखल केलेला नाही. यावरूनही टायर दोषपूर्ण नाहीत या मताला पुष्टी मिळते. याउलट विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांच्यातर्फे श्री. राधेश्याम पटले यांचे उत्तर, लेखी युक्तिवाद तसेच निरीक्षण परीक्षण अहवाल रेकॉर्डवर आहे. मंचामध्ये ते स्वतः वेळोवेळी हजर होते. त्यांचे Qualification – Diploma in Mechanical Engineering, Post Diploma in Automobile Engineering, Implant Training in Rubber Technology and Tyre Manufacturing असे आहेत. तक्रारकर्त्याची तक्रार विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्यानंतर ते स्वतः दिनांक 23/06/2010 रोजी हजर होते, परंतु तक्रारकर्ता आला नाही. त्यानंतर दिनांक 11/11/2010 रोजी पुन्हा ते हजर होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर टायरच्या परीक्षणासाठी आणला होता. त्यांनी पाहणी केली त्यावेळेस हे ट्रॅक्टर 985 तास physically चाललेले होते. युक्तिवादात त्यांनी सांगितले की, अर्थ मुव्हींग मशिनरीचे काम तासामध्ये मोजतात, किलोमीटरमध्ये नाही. तक्रारकर्त्याने टायर बद्दलची तक्रार खरेदीपासून जवळपास 5 महिन्यानंतर केली आहे. त्याची दखल विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांनी अत्यंत तातडीने घेतली. त्यांच्यानुसार एक टायर 53.6 टक्के घासले आणि दुसरे 48.76 टक्के घासले. याचाच अर्थ त्यांच्या तांत्रिक भाषेत टायर अत्यंत सुस्थितीत आहे असे त्यांनी युक्तिवादात सांगितले. विक्रीपासून पाहणीच्या तारखेपर्यंत 10 महिने ट्रॅक्टर चाललेले आहे म्हणजे एकूण 985 तास येतात. दोन्ही टायर कमीजास्त घासण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, ब्रेक पट्टी एकाच चाकाला लावून दुसरे चाक फिरविता येते त्यामुळे असे घडू शकते. टायर अजूनही चांगल्या स्थितीत आहे. टायरला अत्यंत जुजबी कट आहे व तो एखाद्या ऑब्जेक्टमुळे घडू शकतो. हे कट अत्यंत वरवर (रबर टू रबर) आहे. जर टायर निकृष्ट दर्जाचे असते तर ते 985 तास चालले नसते. टायरमध्ये हवेचे प्रमाणही योग्य नसल्यास टायरला इजा होऊ शकते. विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांच्या या तज्ञाने (श्री. राधेश्याम पटले) लेखी युक्तिवादही दाखल केला आहे. हा संपूर्ण लेखी युक्तिवाद मंचाच्या रेकॉर्डवरील पान क्रमांक 53 व 54 वर आहे. टायर जास्त घासण्याचे कारण Shippage & Spinning असू शकते असे ते या लेखी युक्तिवादात म्हणतात. त्यांच्यानुसार टायर मध्ये उत्पादन दोष नाही. तक्रारकर्त्याने प्रथम तक्रार जून 2010 मध्ये केली त्या वेळी टायरने 414 तास पूर्ण केले होते आणि दिनांक 11/11/2010 च्या निरीक्षणाच्या वेळी टायरने 985 तास पूर्ण केले होते. याचाच अर्थ ट्रॅक्टर सुस्थितीमध्ये चालला. म्हणजेच तक्रारीपासून तक्रारकर्त्याने टायरचा दुपटीपेक्षा अधिक उपयोग केला आहे. दिनांक 11/11/2010 ला निरीक्षणाच्या दिवशी कांद्री ते भोजापूर येणे जाणे किमान अंतर 50 कि.मी. आहे. हे अंतर पार करण्यास टायर सक्षम होते. तसे नसते तर टायर बैलगाडीतून आणावे लागले असते. मंचाला विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांच्या या तज्ञाचा अहवाल संपूर्णपणे ग्राह्य वाटतो. म्हणून टायरच्या उत्पादनात दोष नाही असा निष्कर्ष मंच नोंदविते. 17. तक्रारकर्त्याची दिनांक 30/06/2010 ची विरूध्द पक्ष क्र. 1 लक्ष्मी ऍग्रो स्टील इंडस्ट्रीज यांना तसेच तक्रारीमध्ये पार्टी नसलेले भारत टायर्सचे प्रोप्रायटर यांना दिलेली नोटीस तपासली असता त्यामध्ये तक्रारकर्त्याने खरेदीची तारीख 17/12/2009 अशी लिहिलेली आहे आणि ती चुकीची आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 02/09/2010 रोजी एकूण 5 लोकांना नोटीस दिली आहे. त्यात सदर तक्रारीतील चार विरूध्द पक्ष आणि भारत टायर्स ज्यांना यामध्ये पार्टी म्हणून जोडलेले नाही, या सर्वांना नोटीस देऊन त्यांच्याकडून रू. 3,00,000/- ची नुकसानभरपाई तसेच दोन नवीन टायर्स अथवा टायर्सची किंमत रू. 28,700/- आणि नोटीस खर्च रू. 10,000/- याप्रमाणे मागणी केली आहे. हातातील तक्रारीमध्ये मात्र तक्रारकर्त्याची एकूण मागणी फक्त रू. 93,000/- एवढी आहे. यावरूनही तक्रारकर्त्याने वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केल्याचे निष्पन्न होते. वरील सर्व विवेचनावरून मंचाचा निष्कर्ष आहे की, टायर दोषपूर्ण नाहीत आणि तक्रारकर्त्याने तसे सिध्द केले नाही. याउलट विरूध्द पक्ष यांनी ते योग्य असल्याबद्दल सप्रमाण तज्ञाकडून सिध्द केलेले आहे. सबब आदेश. आदेश 1. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा तक्रारीतील वादाशी काहीही संबंध नाही म्हणून त्यांच्याविरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 2. विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांच्या टायरच्या उत्पादनामध्ये दोष नाही म्हणून त्यांच्या विरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते 3. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही. -ःपुरवणी आदेशः- ( पारित दिनांक ः 04 मे, 2011) सदर प्रकरणात दिनांक 19 एप्रिल, 2011 रोजी आदेश पारित करण्यात आला. दिनांक 04/05/2011 रोजी लघुलेखक यांनी टंकलेखनामध्ये अनावधानाने झालेली एक चूक लक्षात आणून दिली. आदेशामध्ये ट्रॅक्टर खरेदीची तारीख 24/01/2011 अशी चूकून लिहिण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता ही तारीख, तक्रार व तक्रारीसोबतची तसेच विरूध्द पक्ष यांची सर्व कागदपत्रे तपासली असता त्यामध्ये ट्रॅक्टर खरेदीची तारीख 24/01/2010 अशी आहे. ही टंकलेखनामध्ये झालेली चूक दुरूस्त करणे अनिवार्य वाटल्यावरून हा पुरवणी आदेश पारित करण्यात येत आहे. मूळ आदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदीची तारीख 24/01/2011 अशी टंकलिखित झालेली आहे त्या त्या ठिकाणी ती 24/01/2010 अशी वाचण्यात यावी. पुरवणी आदेश पारित करण्यापूर्वी मूळ आदेशाची प्रत विरूध्द पक्ष क्र. 1 लक्ष्मी ऍग्रो स्टील इंडस्ट्रीज यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांना मूळ आदेशाची प्रत तसेच त्यासोबत पुरवणी आदेशाची प्रत पुन्हा मंचाच्या खर्चाने पाठवावी. हा पुरवणी आदेश मूळ आदेशाचा एक भाग समजण्यात यावा.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |