मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 20/11/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदारासोबत दि.18.05.2009 रोजी करारनामा करुन टाटा इंडिगो एल.एक्स.चेसीस क्र.01728,, इंजिन क्र.8748, वाहन क्र.एम एच-02/एनए-7733 एकूण रु.1,90,000/- मध्ये घेण्याचा ठरविले. त्याबाबत बयाना म्हणून रु.1,40,000/- गैरअर्जदारास दिले व नंतर 19.05.2009 ला रु.10,000/-, दि.17.08.2009 ला रु.20,300/- व दि.07.09.2009 ला रु.27,000/- दिले. तसेच कमीशन म्हणून रु.3,800/- व वाहन ट्रांसफर करण्याचा खर्च म्हणून रु.3,500/- दिले. वाहन ट्रांसफर करण्याकरीता रक्कम स्विकारल्याने वाहनाबाबत संपूर्ण दस्तऐवज व्यवस्थित व योग्यरीत्या देण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची होती. परंतु गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला वाहनाचे आर.सी.बुक हे टाटा इंडिगो एल.एक्स.चे न देता इंडिका डी.एल.चे दिले. वाहनाबाबतचे सदर दस्तऐवज अयोग्य असल्याने तक्रारकर्ता वाहन हे रोडवर चालवू शकत नाही, म्हणून योग्य दस्तऐवज देण्याबाबत गैरअर्जदाराला वारंवार ही बाब सांगितली व शेवटी कायदेशीर नोटीसही पाठविला. परंतू गैरअर्जदाराने योग्य दस्तऐवज देण्याबाबत काहीही पावले न उचलल्याने तक्रारकर्त्याला शेवटी मंचासमोर येऊन आपला वाद दाखल करावा लागला. सदर तक्रारीद्वारे तक्रारकर्त्याने टाटा इंडिगो एल.एक्स.चे आर.सी. बुक द्यावे अन्यथा वाहनाची किंमत व वाहनाला लागलेला खर्च असे एकूण रु.2,45,880/- व आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाबाबतचा खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. आपल्या तक्रारीचे समर्थनार्थ तक्रारकर्त्याने एकूण 15 दस्तऐवज दाखल केलेले असून त्यात मुख्यत्वे करारनामा, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आर.टी.ओ.कार्यालयाचे पत्र, खर्चाचे देयक, नोटीस व पावत्यांचा समावेश आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्तरही दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.22.06.2010 रोजी पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर दि.12.11.2010 रोजी युक्तीवादाकरीता आले असता उभय पक्ष गैरहजर. तक्रारकर्त्याचे वकील गैरहजर. मंचाने सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्याचे ठरविले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दस्तऐवज क्र.1 करारनामा दाखल केलेला आहे. सदर करारनाम्याच्या प्रतीवर तक्रारकर्ता व गैरअर्जदाराच्या स्वाक्ष-या असून त्यावर वाहन विकण्याचा करार झालेला आहे व त्याबाबत बयाना म्हणून रक्कमही देण्यात आलेली आहे. यावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 5. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या करारनाम्यानुसार गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला टाटा इंडिगो एल एक्स चेसीस क्र.01728, इंजिन क्र.8748, वाहन क्र.एम एच-02/एनए-7733 विकण्याचा करार केल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेली बाब की, त्याला आर.सी.बुक हे इंडिका डीएल चे देण्यात आलेले आहे ही बाबही दस्तऐवज क्र. 4 वरुन स्पष्ट होते. सदर दस्तऐवजावर तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या इतर दस्तऐवजावर वाहनाबाबतचे जे वर्णन आहे त्यात साधर्म्य असून फक्त मॉडेलचे वर्णन हे वेगळेच नमूद करण्यात आलेले आहे. तसेच विमा पॉलिसीमध्ये वाहनाचे वर्णन टाटा इंडिगो असेच करण्यात आलेले आहे. करारनामा करतांना वाहनाचे मॉडेल आहे तेच नमूद करण्यात आलेले आहे व आर.सी.बुकमध्ये मॉडेलचे नाव बदलविण्यात आलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार वाहन ट्रांसफर करण्याकरीता त्याने गैरअर्जदाराला रु.3,500/- ही रक्कम दिलेली आहे, त्यामुळे सदर वाहन हे व्यवस्थित वर्णनासह तक्रारकर्त्याच्या नावावर ट्रांसफर करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची होती, ती त्याने योग्यरीत्या पार न पाडून सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारकर्ता हा सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदाराने सदर प्रकरणी उपस्थित होऊन शपथपत्रावर आपले कथन किंवा दस्तऐवज दाखल करुन तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढलेले नाही. 6. तक्रारकर्त्याला वाहनाचे योग्य वर्णनासह दस्तऐवज नसल्याने वाहन रस्त्यावर चालविणे अशक्य झालेले आहे. तक्रारकर्त्याच्या मतानुसार गैरअर्जदाराने योग्य वर्णनासह आर.सी.बुक हस्तांतरीत करावे किंवा वाहनाची किंमत तिला आलेल्या खर्चासह परत करावी. मंचाचे मते तक्रारकर्त्याची सदर मागणी ही रास्त वाटते. कारण तक्रारकर्त्याकडे वाहन असूनही तो त्याचा उपयोग घेऊ शकत नाही. तसेच गैरअर्जदाराने सदर बाब नाकारली नाही किंवा तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढण्याकरीता कुठलेही दस्तऐवज दाखल केलेले नाही की, ज्यावरुन ही बाब सिध्द होईल की, गैरअर्जदाराने विकलेले वाहन हे आर.सी.बुकमधील विवरणाप्रमाणेच होते. म्हणून मंचाचे मते तक्रारकर्त्याने शपथपत्रावर दिलेले कथन हे सत्य समजण्यास काहीच हरकत नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने वाहनाकरीता रु.48,580/- चा खर्च केलेला आहे. वाहन जर परत करावयाचे असेल तर गैरअर्जदाराने वाहनाच्या किमतीसह सदर खर्चही तक्रारकर्त्याला परत करणे रास्त होईल असे मंचाचे मत आहे किंवा आर.सी.बुकमध्ये वाहनाचे मॉडेल शिर्षक बदलवून देणे आवश्यक राहील. 7. तक्रारकर्त्याने मंचासमोर शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई जी मागणी केलेली आहे, ती योग्य पुराव्याअभावी मंचाला अवास्तव असल्याचे मंचाचे मत आहे. तथापि, वाहनाचा उपभोग तक्रारकर्ता घेऊ न शकल्याने त्याला मानसिक व शारिरीक त्रास होणे शक्य आहे. सदर त्रासाची भरपाई म्हणून कायदेशीर व न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता हा रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यासही तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त विवेचनावरुन व उपलब्ध दस्तऐवजावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला आर.सी.बुकवर इंडिगो एल.एक्स.चे नाव संबंधित विभागाकडून नोंदवून द्यावे अथवा ते करण्यास असमर्थ असतील तर तक्रारकर्त्याला वाहनाची किंमत रु.1,97,300/- व वाहनाचा खर्च रु.48,580/- असे एकूण रु.2,45,880/- परत करावे. 3) गैरअर्जदाराने शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |